Categories
संपादकीय

अंनिवाची झुंजार पंचविशी

फेब्रुवारी – २०१६

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे प्रवाहाविरोधी दिशेने समाजपरिवर्तन करणार्‍या कृतिशील अशा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा विकास आणि वार्तापत्राची प्रगती एकमेकांना पूरक ठरल्याने दोन्हीचाही उत्कर्ष त्याच वेगाने होत गेला. सद्यस्थितीला वार्तापत्र हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वैचारिक मासिक म्हणून ख्यातनाम झालं आहे. पण वार्तापत्राच्या प्रगतीची वाटचाल ही सुखासुखी झालेली नाही. 25 वर्षांच्या या वाटचालीत वार्तापत्राच्या कार्यात अनेक अडथळे आले, पण त्यावर मात करीत वार्तापत्र अधिक जोमाने पुढच्या प्रवासाला सिद्ध आहे. या प्रवासाबाबत सिंहावलोकन करणे आणि पुढच्या वाटचालीची दिशा समजून घेणे आपणा सर्वांना आवश्यक आहे.

अंधविश्वासाच्या गर्तेत सापडलेल्या सामान्य जनाविषयी उत्कट करुणा असलेले डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी 1989 च्या सुमारास महाराष्ट्र अंनिसच्या संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. या अगोदर ते वैयक्तिक पातळीवर प्रबोधन, व्याख्याने देत होते. ‘तुका म्हणे झरा, मुळचाची खरा’ अशा वृत्तीचे दाभोलकर पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर दौरे करू लागले. त्यांनी अनेक नवे सवंगडी मिळविले. विविध ठिकाणी अंनिसची केंद्रे उभी राहू लागली. नव्या कार्यकर्त्यांना वैचारिक मार्गदर्शनाची गरज भासू लागली. नवे कार्यकर्ते उत्साहाने बुवाबाबांचा पर्दाफाश करू लागले. कृतिशील कार्यक्रम घेऊ लागले. या सगळ्याचं रिपोर्टिंग करणारे आणि कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा देणार्‍या माध्यमाची आवश्यकता भासू लागली. या गरजेतून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा जन्म झाला.

अंधश्रद्धा निर्मूलन मासिकाचा पहिला अंक ‘कवडसे’ या नावाने ऑगस्ट 1989 मध्ये निघाला. एप्रिल 1992 पर्यंत ‘कवडसे’ पुणे येथून प्रकाशित होत राहिले. अलका जोशी, शुभांगी शहा, विद्याधर बोरकर यांनी या मासिकाचे प्रकाशन संपादनाचे काम पाहिले. पनवेल येथील उल्हास ठाकूर यांनी पनवेल येथून ‘कवडसे’चे वितरण केले. ते स्वत: तिकिटे लावून अंक पोस्टात टाकीत.

1992 पासून ‘कवडसे’ हे नाव बदलून ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या नावाने मासिक प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला मासिकाचा अंक हा फक्त 4 पानांचा टाईप केलेल्या फॉर्ममध्ये असायचा. हळूहळू त्याची छपाई आणि पानसंख्या वाढत गेली. शुभांगी शहानंतर 1993 ते 95 डॉ.प्रदीप पाटकर हे मासिकाचे संपादन करीत. उल्हास ठाकूर वाशी येथे त्याची छपाई करून पनवेलमधून प्रकाशन आणि वितरण करीत.

अंनिसचे कार्य हे सेवाकार्य आहे. कोणीही या कामाबाबत मानधन घेत नाही. त्याग भावना या कार्याच्या केंद्रस्थानी आहे. तळमळ असलेले कार्यकर्ते हीच या चळवळीची ताकद आहे. शुभांगी शहा, अलका जोशी, विद्याधर बोरकर, डॉ.पाटकर, उल्हास ठाकूर या मंडळींनी निष्ठापूर्वक या मासिकाचा पाया घातला. टायपिंग ते प्रिंटिंग तसेच पानसंख्या 4 ते 36 पर्यंत वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र अंनिस त्यांची कृतज्ञ आहे.

मे 1995 पासून वार्तापत्राचे कार्यालय आणि संपादन सांगली मध्ये आले. संपादक होते डॉ.प्रदीप पाटील. त्यांच्या घरूनच मासिकाचे काम चालू राहिले. उज्ज्वला परांजपे (प्रदीपच्या पत्नी) यांनी या कामात सुरुवातीला मोलाची साथ दिली.

1995 ते आजतागायत वार्तापत्र सांगली येथूनच प्रसिद्ध होते. 1995 ते 2001 अखेर डॉ.प्रदीप पाटील यांनी वार्तापत्राच्या संपादक पदाची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळात मी उपसंपादक म्हणून योगदान दिले. प्रभाकर नानावटी, टी.बी.खिलारे, राजीव देशपांडे, आशुतोष मुळ्ये यांनी संपादक मंडळात सहभाग दिला. या काळात वार्तापत्राची सभासदसंख्या वाढून ती 8 हजारांवर पोहोचली. वार्तापत्राची गुणवत्ता वाढली. नोव्हेंबर-डिसेंबरचा विशेषांक अधिक समृद्ध होत गेला.

2002 पासून मुख्य संपादकाची जबाबदारी अंनिसने माझ्यावर सोपविली. आजतागायत ती मी यशस्वीरित्या सांभाळली आहे. संपादक मंडळात राजीव देशपांडे, प्रभाकर नानावटी, आशुतोष मुळ्ये आणि संजय सावरकर माझे सहकारी राहिले. अलिकडे मुक्ता दाभोलकर आणि उमेश सूर्यवंशी या नव्या दमाच्या सहकार्‍यांचा समावेश संपादक मंडळात झाला आहे. आशुतोष, खिलारे आणि सावरकर यांच्या वैयक्तिक कारणामुळे निवृत्त झाले आहेत. 1995 ते आजतागायत राहुल थोरात, सुहास पवार आणि सुहास यरोडकर या त्रयींनी मासिकाचे व्यवस्थापन, छपाई आणि वितरणाचे काम यशस्वीपणे सांभाळले.

वार्तापत्र हे मासिक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे मुखपत्र आहे. एकाच विषयाला वाहिलेल्या मासिकात सारखं-सारखं नवीन काय छापणार? या प्रश्नाचे उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन विषयांची व्याप्ती आणि विविधता. श्रद्धा-अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संमोहन, ज्योतिष, बुवाबाजी, मन-मनाचे आजार, बुद्धिप्रामाण्यवाद, चमत्काराचे विज्ञान आणखी बरेच काही. या आणि तत्सम विषयावरील विचारप्रवर्तक लेख वेगवेगळ्या अंगाने प्रसिद्ध करता येणे शक्य होते. त्याची गरजही आहे. विचारवंतांकडून नवनवीन मुद्दे उपस्थित होतात. विषय तेच पण मुद्दा नवा. त्यामुळे विषय मांडणीत नाविन्य रहाते आणि वाचकांना प्रत्येक विषयाचे विविध पैलू माहीत होतात.

कोणत्याही सामाजिक चळवळीची तीन वैशिष्ट्ये असतात. प्रबोधन, संघटन आणि कृतिशीलता. या तिन्ही उद्दिष्टांबाबत चळवळीत घडलेल्या घटना, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चळवळीच्या मुखपत्राची निर्मिती होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रबोधनपर लेखाबरोबरच चळवळीतील कृती कार्यक्रमाचे रिपोर्टिंग प्रसिद्ध होते. संघटना सशक्त बनण्यासाठी तिची सूत्रे आणि कार्यकर्त्यांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन असते. बुवाबाजीचा पर्दाफाश करणारी कृती वार्तापत्रात प्रसिद्ध झाल्याने इतर कार्यकर्त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळते. वैचारिक लेखांनी कार्यकर्ते सजग होतात. विचाराविना कृती फोल तर कृतीविना विचार वांझ असतो. परिवर्तनासाठी प्रबोधन, संघटन आणि कृतिशीलता अत्यावश्यक असतात. चळवळीच्या या सर्व पैलूंचे प्रतिबिंब वार्तापत्रात पडते. साहजिकच चळवळ जसजशी वाढली तसतसे वार्तापत्रही अधिक समृद्ध होऊन वाढत राहिले.

सुरुवातीला महाराष्ट्र अंनिस अघोरी अंधश्रद्धांविरोधी चळवळ राबवीत होती. साहजिकच भुताने झपाटणे, अंगात येेणे, भूत काढणार्‍या अघोरी प्रथा आणि तद् अनुषंगिक बुवाबाजी यावर प्रबोधन आणि कृती होत राहिली. या विषयावरचे वैचारिक लेख आणि बुवाबाबांचा पर्दाफाश वार्तापत्रात प्रसिद्ध होत असे. पुढच्या टप्प्यात अंनिसने धर्मचिकित्सा सुरू केली. विधायक धर्मचिकित्सा करण्याच्या समाजसुधारकांच्या परंपरेला अंनिसने प्राधान्य दिले. धर्मस्थळात चालणार्‍या गैरप्रकारांना वाचा फोडणे, धर्मातील शोषण करणार्‍या कर्मकांडांना विरोध करणे, उत्सवात कालानुरूप बदल करणे या मार्गांनी विधायक कृतिशील धर्मचिकित्सा आणि त्यासाठीच्या जनजागरणाची मोहीम अंनिसने नेटाने सुरू केली आणि इथेच संघर्षाला तोंड फुटले.

ज्यांचे हितसंबंध धार्मिक कर्मकांडात गुंतले आहेत. त्यांना अंनिस शत्रू वाटू लागली. तथाकथित धर्माच्या ठेकेदारांनी अंनिसला बदनाम करण्याची मोहीम सुरू केली. या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे काम वार्तापत्राने केले. कार्यकर्त्यांबरोबरच नागरिक जनांना अंनिसच्या मानवतावादी कार्याचा परिचय करून देणे आणि देव-धर्म कल्पना नीतिमूल्यासाठी वापराव्या याबाबतचे प्रभावी प्रबोधन वार्तापत्राने केले. धर्मचिकित्सा करणे म्हणजे धर्म नाकारणे नव्हे. देव कल्पनेची चिकित्सा करणे म्हणजे देवाला रिटायर करणे नव्हे, तर गाडगेबाबा म्हणाले तसे, ‘देव देवळात नाही तर तो तुमच्या आमच्या मनात आहे’ हे समजून घेणे. प्रबोधनकार ठाकरे हेच सांगत होते.

विधायक देव-धर्म चिकित्सा देखील ज्यांना नको होती त्या धर्मांधांनी अंनिस बदनामीची मोहीम हाती घेतली. वार्तापत्रावर आणि डॉ.दाभोलकरांवर विविध कोर्टात दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल करण्यात आले. या सर्व खटल्यांना वार्तापत्राने धैर्याने तोंड दिले. ज्या खटल्यांचे निकाल लागले त्यात वार्तापत्र व दाभोलकर निर्दोष सुटले. धर्मांध हरले. अखेरीस अंनिसची चळवळ रोखण्यासाठी नायकालाच संपविले. ‘सॉक्रेटिस-ल्यूथर किंग, संत तुकाराम यांना संपविणार्‍या विघातक शक्तींनी दाभोलकरांना संपविले. अंनिस संपावी हा त्यांचा उद्देश होता. पण अंनिस संपली नाही. उलट जोमाने वाढू लागली. त्याचबरोबर वार्तापत्र अधिक जोमाने वाढू लागले. त्याच्या विशेषांकांना जनमानसाकडून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. गेल्या दोन वर्षांत विशेषांक 700 पानांचे निघाले. जाहिरातींच्या रूपात अभूतपूर्व प्रतिसाद मिळून वार्तापत्र चळवळीचा आर्थिक कणा बनला.

अंनिसच्या चतु:सूत्रीत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे मूल्य अंतर्भूत आहे. या विषयावर अंनिसने केलेल्या प्रबोधन कार्यक्रमाचे रिपोर्टिंग वार्तापत्रात वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. एका अध्यात्माबरोबर 100 फसवी अध्यात्मे निर्माण होतात. विज्ञानाचे क्षेत्रही याला अपवाद नाही. खगोल विज्ञानाच्या विरोधी ज्योतिष, मनोविज्ञानाच्या विरोधी परामानसशास्त्र, मेडिकल विज्ञानाच्या क्षेत्रात अ‍ॅक्युपंक्चर, चुंबकचिकित्सा, रेकी इ. फसवी विज्ञाने यांचा सुळसुळाट सुरू आहे. या फसव्या विज्ञानाचे स्वरूप उघडे करणारे विचारप्रवर्तक लेख वार्तापत्रात वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. विज्ञानाचे खरे स्वरूप, वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करणारे साहित्य वेळोवेळी प्रसारित झाले आहे.

अघोरी अंधश्रद्धांना विरोध, विधायक धर्मचिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार यासाठी महाराष्ट्र अंनिसने गेल्या 25 वर्षांत विविध मोहिमा राबविल्या. विविध परिषदा आयोजित केल्या. चमत्कार सिद्ध करा मोहीम, कोकणची भूत शोधमोहीम, शिक्षण क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन, याबाबतच्या परिषदा आणि अंनिसच्या उद्दिष्टांबाबत झालेली भव्य अधिवेशने यांचे रिपोर्टिंग वार्तापत्राने प्रसिद्ध केले आहे. याबाबत खास विशेषांकही प्रसिद्ध झालेत.

दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करणारा विशेषांक, कॉ.पानसरे आणि डॉ.कलबुर्गी स्मृती विशेषांक वार्तापत्राने प्रसिद्ध केले आहेत.

केवळ चार पानाच्या टाईप केलेल्या मजकुरापासून ते 700 पानांचा मजकूर प्रसिद्ध होण्यापर्यंत वार्तापत्राची झालेली ही वाटचाल थक्क करून सोडणारी आहेच पण अंनिसच्या वाढत्या कार्याचा दस्तऐवज म्हणून भावी पिढ्यांना ती स्मरणात राहील. या वाटचालीत वार्तापत्राचे शतकवीर आणि अंनिसचे ध्येयनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. अनुभवसमृद्ध अशा साहित्याचा हा खजाना पुस्तक रूपात प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. 25 वर्षांतील विविध लेखांच्या विषयावर मांडणीचा 10 पुस्तकांचा संच येत्या साहित्य संमेलनापूर्वी प्रसिद्ध करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शैला दाभोलकर, मुक्ता आणि हमीद तसेच अंनिसचे सर्व सचिव यांचे आम्हाला समर्थ पाठबळ आहे.

एकाही महिन्याचा खंड न पडता सातत्याने 25 वर्षे वार्तापत्र प्रसिद्ध होत राहिले. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन येत्या 14 व 15 मे मध्ये घेण्याचा मानस आहे. या संमेलनात अंनिसच्या लेखकांचे साहित्य, वार्तापत्रातील साहित्य तसेच भारतातील समविचारी संघटनांचे साहित्य याचा परिचय रसिकांना करून दिला जाणार आहे. या संमेलनात मान्यवरांची भाषणे तर होतीलच; पण तो एक अभूतपूर्व असा अंनिसच्या कार्यकर्त्यांचा आणि हितचिंतकांचा सांस्कृतिक उत्सवही ठरणार आहे.