उंब्रज पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या गोपाळ समाजाच्या पंचांच्या बैठकीमध्ये पेर्ल्यातील गोपाळ समाजाच्या पंचांनी, ते आजपासून त्यांच्या समाजातील जातपंचायतीच्या प्रथेला मूठमाती देत असल्याचे जाहीर करीत, ऐतिहासिक निर्णय घेतला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या आणि म.अं.नि.स.ने त्यांच्या पश्चात जोमाने चालू ठेवलेल्या ‘जातपंचायतीला मूठमाती’ अभियानाला आज एक महत्त्वाचे यश आले. अडीच महिन्यांपूर्वी म.अं.नि.स.कडे पेर्ले येथील गोपाळ समाजातील चव्हाण या मुलाने गोपाळ समाजात जातपंचायतीची अनिष्ट प्रथा सुरू असल्याची तक्रार केली होती.
समाजातील तंटे मिटवण्यासाठी पंचांनी एकत्र येऊन निर्णय घेणे आणि दंड ठोठावणे असे या प्रथेचे स्वरूप होते. पंचांचा निर्णय न पाळल्यास समाजातून बहिष्कृत करण्याची शिक्षा पंचांकडून दिली जात असे. या विषयीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर वरील बैठक घेण्यात आली होती. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घातले होते. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी म.अं.नि.स.चे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, डॉ.हमीद दाभोलकर, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर कणसे आणि भगवान रणदिवे; तसेच पेर्ले ग्रामस्थ व गोपाळ समाजाचे पंच उपस्थित होते.
जातपंचायत हे घटनाबाह्य न्यायकेंद्र असून ते बेकायदेशीर आहे, ही गोष्ट पंचांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सर्व उपस्थित पंचांनी मिळून त्यांच्या गावातील जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे आपण केवळ समाजसुधारणा मंडळ म्हणून काम करू आणि कोणालाही दंड करणार नाही; तसेच वाळीत देखील टाकणार नाही, असे या पंचांनी जाहीर केले. तसेच गोपाळ समाजाच्या इतर भागातील पंचांनादेखील या अनिष्ट प्रथेपासून आपण थांबवण्याचा प्रयत्न करू, असे देखील उपस्थित पंचांनी जाहीर केले. जातपंचायतींच्या विरोधातील प्रस्तावित कायदा शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा; तसेच इतर समाजातील तरुणांनी देखील अशाच प्रकारे धाडस दाखवून जातपंचायतींना मूठमाती देण्यास पुढे यावे, असे आवाहन यावेळी म.अं.नि.स.तर्फे करण्यात आले.
– शंकर कणसे, सातारा
संपर्क :9922355435