बंड्याने चिंटूचे थोबाड रंगवले होते आणि चिंटू रडत घरी आला होता. म्हणून चिंटूची आई जाब विचारण्यासाठी बंड्याच्या घरी गेली होती.
चिं. आ. (चिंटूची आई) – अहो बंडूची आई, तुमच्या बंडूला जरा ताकीद द्या ना. त्याने आज पुन्हा आमच्या चिंटूला मारले.
बं. आ. (बंड्याची आई) – नाही. आमचा बंडू कुणाला मारत नाही. तो शांतताप्रिय मुलगा आहे.
चिं. आ.- अहो, आमच्या चिंटूच्या गालावर बोटे उठली आहेत. जरा एकदा बंडूला ताकीद द्या ना. तो सारखे चिंटूला मारत असतो. नेहमी शिव्या पण देत असतो.
बं. आ.- अस्सं का? तुला बंडूच्याच तेवढ्या चुका दिसतात. मागच्या आठवड्यात आमच्या बंडूला चंद्याने मारले त्यावेळी कुठे गेली होतीस? त्यावेळी का गप्प बसली होतीस?
चिं. आ.- चंदूचा आणि आमचा काय संबंध? चंदूला आम्ही मार म्हणून सांगितले होते का? चंदूने मारले असेल तर ते चुकीचेच आहे.
बं.आ.- मग त्यावेळी चंद्याच्या आईला का खडसावले नाहीस? तू कशी खडसावणार म्हणा? तुला तिच्याकडून मलिदा खायला मिळत असणार.
चिं. आ.- नाही हो तसे काही नाही. तुमचा बंडू आमच्या चिंटूला खूप त्रास देतो हो. त्याला जरा समजावा ना.
बं. आ.- वा गं वा! समजावा म्हणे. चार दिवसांपूर्वी उस्मान मुलाण्याची म्हैस आमच्या शेतात घुसली तेव्हा काही बोललीस का? तेव्हा का गप्प बसलीस? त्यावेळी तोंड शिवले होतेस का?
चिं. आ.- अहो. चिंटूबद्दल बोलतेय मी. तुमच्या बंडूने आमच्या चिंटूला मारलेय आणि तो सारखा चिंटूला त्रास देतो. त्याबद्दल बोला. न्यायबुद्धीने त्याला जरा समजावा.
बं. आ.- बारा वर्षांपूर्वी माझ्या माहेरच्या घरावर दरोडा पडला होता त्यावेळी साधा निषेध तरी केलास का? एका शब्दाने तरी काही बोललीस का? त्यावेळी तुझी न्यायबुद्धी कुठे गेली होती?
चिं.आ.- अहो त्यावेळी माझे लग्न पण झाले नव्हते. त्यावेळी आपली ओळख पण झाली नव्हती. मी कशी निषेध करणार? जरा बंड्याला समजावा ना.
बं. आ.- खबरदार आमच्या बंडूचे नाव घेशील तर. आमचा बंडू कधीच चूक करत नाही. तुला आताच बरे तोंड फुटले गं! आज सकाळी आमच्या ह्यांना डेविड व्यापार्याच्या गाडीचा धक्का लागला. एका शब्दाने तरी बोललीस का?
चिं.आ.- अगं बाई, मला तर हे माहीतच नव्हते. लागले नाही ना बंडूच्या बाबांना?
बं. आ.- वा गं वा. म्हणे माहित नव्हते. आम्हाला तुमचे आणि डेव्हिड व्यापार्याचे साटेलोटे माहीत नाही काय? त्याने फूस लावलीय म्हणून तर तू आमच्या बंडूची तक्रार करायला आली आहेस. त्याच्याकडून तुम्हाला धान्य फुकट मिळते आम्हाला माहीत आहे.
चिं. आ.- नाही हो. तुमचा चुकीचा समज आहे. आम्हाला विकतच्या धान्याची गरज पडतच नाही. आमच्या शेतात भरपूर धान्य पिकते. पण तुम्ही बंडूला काही सांगणार की नाही?
बं. आ.- आमच्या बंडूला नावे ठेवतेस? तू या गावावरील कलंक आहेस. चालती हो या गावातून आणि परत बंडूबद्दल तक्रार केलीस तर तुझे हातपाय तोडून टाकीन. तुझी जीभ हासडून टाकीन…
चिंटूची आई उदास मनाने बंड्याच्या घरातून बाहेर पडली. कारण बंड्याचे वडील एक बदमाश गुंड होतेच, पण सध्या गावाचे सरपंच होते. पण चिंटूच्या आईचा निर्धार कायम होता. न्याय तर मिळवायचाच, पण बंडूला देखील सक्षम करायचे.
-वाघेश साळुंखे
लेखक संपर्क : 8600365536