विवेकवादाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत
– अविनाश पाटील
विजयवाडा : सन 2020 मध्ये तरूणांचा देश म्हणून भारताचा नावलौकिक संपूर्ण जगात होणार आहे. या सर्व तरूणांना विवेकवादी विचाराची शिकवण मिळण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत असे मत ‘मअंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांनी ‘9 व्या जागतिक नास्तिक परिषदे’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
नास्तिक केंद्र, विजयवाडा यांचे वतीने दि. 6 व 7 जानेवारी 2016 रोजी सिद्धार्थ कॉलेज सभागृह, विजयवाडा येथे ‘धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टीकोनाची आवश्यकता’ या विषयावर 9 व्या जागतिक नास्तिक परिषदेचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात अविनाश पाटील म्हणाले की, “सर्वसामान्य लोकांचे अंधश्रद्धेमुळे होणारे शोषण थांबविता आले पाहिजे. अनेक वर्षापासून चालत आलेल्या रुढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा व कर्मकांड यांची चिकित्सा करून, कालसुसंगत नसलेल्या बाबींपासून सोडवणूक करण्यासज्ञठी शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी शालेय शिक्षणात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा समावेश करणे गरजेचे आहे.”
सनातनी विचारांच्या लोकांनीच डॉ. दाभोलकरांचा खून केला आहे. विवेकवाद्यांचा खून केल्याने विचार संपतात असा गैरसमज सनातन्यांचा असावा. प्रत्यक्षात मात्र, विवेकवादी विचार अधिक जोमाने समाजात पोहोचत आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रचार करण्यासाठी विवेकवादी कार्यकर्ते अधिक कार्यक्षमतेने क्रियाशील झाले आहेत तसेच संघटीत झाले आहेत.
या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पेरियार मनिअम्माई विद्यापीठ, तामिळनाडूचे कुलगुरू मा. के. वीरमणी हे हजर होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, ‘नास्तिक लोकांचे कार्य हे जगातील सर्व लोकांना समान पातळीवर आणण्याचे कार्य आहे.’
‘मअंनिस’चे राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी ही परिषदेत शोधनिबंध सादर केला. तसेच ‘धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता’ या गटचर्चेचे नेतृत्व करून धर्म निरपेक्षतेबद्दल विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या राज्यघटनेत, धर्मनिरपेक्षता हे तत्त्व ठासून ठरलेले आहे. तथापि राज्यघटना राबविणारे सरकार कोणत्या विचारांचे आहे, त्या नुसार राज्यघटनेतील तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल हे अवलंबून असते.”
या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आयोजित नास्तिक केंद्राच्या कार्याचा परिचय करून देणारे फोटोे प्रदर्शनाचे उद्घाटन मा. रॉबर्ट सस्ताद, (नॉर्वेजिअन ह्युमॅनिस्ट असोसिएशन) यांचे हस्ते झाले. ‘मअंनिस‘ तर्फे देखील ‘जादूटोणा विरोधी कायद्या’ची चित्रमय पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली होती.

परिषदेसाठी नॉर्वे, जर्मनी, अमेरिका इत्यादी देशांतून 25 तर भारतातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मिर इत्यादी राज्यांतून कार्यरत असलेल्या विवेकवादी विचारांच्या संघटनांचे 500 प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी नास्तिक केंद्र, विजयवाडाचे संचालक डॉ. जी. विजयम. श्रीमती जे. मैथरी, विकास गोरा, हासिल गोरा, नाऊ गोरा, डॉ. जी. सामाराम यांनी अथक परिश्रम घेतले.