शाक्य संघाने युद्धास विरोध केल्याने सिद्धार्थ गौतमाला शाक्य संघाने त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकून जमीन जप्त करणे किंवा देहांताची अथवा देशत्यागाची शिक्षा घेणे असे पर्याय ठेवले. सिद्धार्थ गौतमांनी देशत्यागाचा पर्याय निवडला होता. महात्मा गांधींनी समुद्र ओलांडून परदेशगमन केल्याने त्यांना जात बहिष्कृत करण्यात आले होते. नाशिकच्या गोदावरी नदीत डुबकी मारून गावजेवण दिल्यावर त्यांच्यावरील जात बहिष्कार उठविण्यात आला होता. पुणे येथील पंचहौद मिशनमध्ये लोकमान्य टिळकांनी ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून चहा व बिस्किटे खाल्ल्याने धर्ममार्तंडांनी त्यांना जात बहिष्कृत केले होते. काशीमध्ये प्रायश्चित्त घेतल्याचा दाखला दिल्यावर त्यांना परत जातीत घेण्यात आले होते. विधूर पुरूषाने अल्पवयीन कुमारिकेशी विवाह करण्याची प्रथा मोडत विधवेशी विवाह केल्याने महर्षी कर्वेंना जातबहिष्कृत करण्यात आले होते. त्यांनीही वाराणशीच्या नदीत डुबकी मारली होती. बौद्ध तत्वज्ञानाची सांगड हिंदू तत्वज्ञानाशी घालण्याचा प्रयत्न केल्याने आद्य शंकराचार्य यांनाही जात बहिष्कृत करण्यात आले होते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र वरील सर्व व्यक्तींचे त्यावेळचे प्राधान्यक्रम वेगळे होते. त्यामुळे या प्रथेच्या विरोधात मोठे बंड झाले नाही. ज्या कारणांसाठी या सर्वांना जात बहिष्कृत करण्यात आले होते ती कारणे सुधारणावादी होती, हे विशेष.
आज मात्र जातपंचायतच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रातला सामान्य माणूस पुढे येत आहे, हे असे का शक्य झाले आहे? महाराष्ट्र अंनिसच्या पंचवीस वर्षांतील संघटीत कार्याच्या प्रभावातून आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दूरदृष्टीमुळे जातपंचायतच्या अमानुष अन्यायाचे आणि समांतर न्याय व्यवस्थेचे वास्तव दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर जातपंचायतीकडून बहिष्कृत केलेल्या कुटुंबीयांना मानसिक आधार देऊन कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने पुढाकार घेतला. गेल्या पावणेदोन वर्षांत अनेक प्रकरणे समोर आली. परंतु काही प्रकारात पीडितांनी बंड केले आहे. पंचाचा विरोध झुगारून दिला. काहींनी तर पंचांनाच बहिष्कृत केले आहे. हळूहळू जातपंचायतीचे जोखड उतरत आहे. काही पीडितांनी ‘तुम्हारा कानून तोड दिया’ असं पंचांना सुनावत सामाजिक परिवर्तन केले आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे हनमंत जावळे व स्वाती मोरे यांचा विवाह पंचाच्या परवानगीशिवाय पोलिसांच्या उपस्थितीत लावला गेला. कोल्हाटी डोंबारी समाजातील अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह ठरला. पुढच्याच आठवड्यात आणखी एक विवाह अशाच पद्धतीने लागला. ही एक मोठी क्रांती समजली जाते. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रा. सतिश चौगुले व इतर कार्यकर्ते या जातपंचायत विरोधात गेल्या वर्षीपासून लढत आहेत. महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने कोल्हापूरच्या मंगलसिंग कांबळे या तरूणाच्या हिंमतीमुळे, कंजारभाट समाजातील कौमार्याच्या परिक्षेचे भीषण दाहक वास्तव समोर आले. तो स्वत: कौमार्याच्या परिक्षेशिवाय लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. तसे झाले तर त्या समाजात एक मोठी सुधारणा ठरेल. पिंपरी चिंचवड मनपाचे माजी महापौर कवीचंद भाट व त्यांच्या मुख्य पंचाला जातपंचायतच्या एका घटनेत अटक झाली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील लढवय्ये वकील अॅड. महेश भोसले यांच्या प्रयत्नाने ते शक्य झाले. तरूणांचे संघटन करत पंचाच्या परवानगीशिवाय केवळ दिडशे रूपयांत लग्न लावण्याचे काम मंगलसिंग करत आहे. अन्यथा पंच विविध परंपरेच्या नावाखाली लग्नात खुशाली वसूल करत होते. धुळे येथील भगवान गवळी हे आंतरजातीय विवाह केल्याने वीस वर्षांपासून आई वडीलांना भेटले नव्हते. महाराष्ट्र अंनिसच्या मोहिमेमुळे त्यांची मित्रांकडून वाजतगाजत मिरवणूक काढून स्वगृही प्रवेश केला होता. त्यांच्या बहिणीच्या तक्रारीमुळे औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पंचांना बहिष्कार उठवणे भाग पडले. या प्रकरणात राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील, गोपाळ नेवे, सुनील वाघमोडे आदी पाठपुरावा करत होते.
श्रीरामपूर येथील एक पंच अटक टाळण्यासाठी लपून बसले होते. त्या समाजात लग्नात पंचांना टिळा लावल्यावरच इतर लोकांना टिळा लावण्याची प्रथा आहे. घरासमोर लग्न लागत असताना पंच मानाचा टिळा लावण्यासाठी हजर होऊ शकला नाही. त्यामुळे पंचाची समाजावरची पकड सुटली नाही. लपवणार्या पंचांना आम्ही मानत नाही अशी क्रांतीकारी भाषा समाजबांधव बोलायला लागले. गेल्या दीड वर्षांतील प्रबोधनामुळे राज्याची सर्वोच्च वैदू जातपंचायत बरखास्त झाली. अॅड. रंजना गवांदे यांनी मोठ्या हिमतीने लढा दिला. ही जातपंचायत बरखास्त झाल्यावर आता एका विधवेचा विवाह लावण्याचा प्रयत्न काही तरूण करत आहेत. वैदू समाजात असे परिवर्तन प्रथमच घडत आहे. या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेतील सर्वच जवळपास पन्नास जातपंचायती झाल्या नाहीत. बारा जातपंचायतींच्या पंचांनी जातपंचायत बरखास्त केली असल्याचे जाहीरपणे प्रसारमाध्यमांकडे सांगितले आहे. त्यामुळे लाखो लोकांची सातशे वर्षांची गुलामगिरी संपली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांची माळेगाव(नांदेड) येथीलही यात्रेत जातपंचायती झाल्या नाहीत. जेजुरी येथीलही यात्रेत जातपंचायत घेण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. काही जातपंचायतींनी अनिष्ट परंपरा नाकारत पोटातील, पाळण्यातील अथवा अल्पवयीन लग्नाची प्रथा थांबवत मुलींना शिक्षण देण्याचे व इतर निर्णय घेतले. जोगेश्वरी येथील जातपंचायतची पीडित दुर्गा व गोविंदी गुडेलू या आता अंनिसच्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. वैदू जातपंतायतीचे रूपांतर सामाजिक सुधारणा मंडळात करून एक आदर्श दिला आहे. सामाजिक कामे व पंचांच्या समस्याही एकत्रित येऊन मिळवल्या जात आहेत. जातपंचायत विरोधी लढा नाशिकमधून सुरू झाला. येथील अनेक पीडित महिला पंचांना उद्देशून जाहीरपणे म्हणतात की, तुम्ही आम्हाला काय वाळीत टाकता? जा, आम्हीच तुम्हाला वाळीत टाकतो. आंतरजातीय विवाह केल्याने जीव घेण्यासाठी दबाव टाकणारे पंच आज आंतरजातीय विवाहाला उपस्थित राहतात. त्यांची परवानगी कुणी घेतही नाही. खर्या अर्थाने हे समाजिक परिवर्तन आहे. माणसांत बदल होऊ शकतो, यावरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. राज्यातील अनेक प्रकरणातील पंच अटक वाचविण्यासाठी फरार झाल्याने स्वत:च वाळीत टाकले गेले आहेत. पंचांना आता हे समजले आहे की, जातीची सत्ता आपल्या हातातून गेली आहे. त्यामुळे लोक आपले स्वत:चे निर्णय स्वत: घेत आहेत. अंनिसचे प्रबोधन, प्रशासनाचा धाक व प्रसार माध्यमांचे सहकार्य यामुळे कालसुसंगत होणारा बदल पंच निमूटपणे बघत आहेत. कर्नाटकच्या गोंधळी जातपंचांनी नाशिकचे एक लग्न मोडले होते. पाच पिढ्यांचा शोध न लागल्याचे कारण दिले गेले होते. भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी रेणके यांच्या प्रयत्नाने पंचांना सपशेल माघार घेऊन लग्नाला मान्यता द्यावी लागली. अशाच प्रकारे परभणी येथे तीन लग्ने मोडणार्या पंचांनी महाराष्ट्र अंनिसच्या हस्तक्षेपामुळे माघार घेत लग्नाला संमती दिली. पंचाच्या अगोदरच्या निर्णयामुळे आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या संकटातून त्यांची सुटका झाली. सातारा जिल्ह्यातील मरडमुरे येथे वयोवृद्ध दांपत्यावरील बहिष्कार उठविण्यात आला. शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे व शंकर कणसे यांच्यासह प्रशासनाने पुढाकार घेतला.
कोकणातही नितीन राऊत व इतर कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून अनेक लोकांना न्याय मिळाला आहे. काही तक्रारी दाखल आहेत. दापोली जवळच्या एकोणीस गावांच्या गावकीने एकत्र येऊन कुणालाही वाळीत न टाकण्याचे ठरवले. मुक्ता दाभोलकर यांनी हे प्रकरण लावून धरले होते. कोकणात गावकीची प्रचंड दहशत आहे. राजकारणात कुणाला निवडून आणायचे हे गावकी ठरवते. कोकणात नामवंत लेखक झाले परंतु एकानेही गावकी बद्दल थोडेसुद्धा लिहिले नाही. त्यामुळे या निर्णयाला मोठे महत्व आहे. कोकणातील वृत्तपत्रात वाळीत टाकल्याच्या बातम्या येताच पोलीस तक्रारीची वाट न पाहता चौकशी सुरू करत आहेत. पोलिसांची आजवरची प्रतिमा पाहता, हे आश्चर्यकारक वाटते आहे. कोकणातील काही घटनांत गावकीचे पंचांनी थेट मुंबई गाठत, पीडितांना तक्रार न करण्यासाठी विनंती केली. काही पंचांनी पीडितांकडे सुधारण्यासाठी वेळ मागून घेतली. तोपर्यंत पोलिसांत तक्रार करण्यासाठी थांबण्याची विनंती केली जात आहे. काही ठिकाणी पीडित व्यक्तींना पोलीस संरक्षण मिळाले आहे. नागपूरजवळील शिक्षणाचे प्रमाण जवळजवळ शून्य असलेल्या भाट समाजाच्या जातपंचायतने महिलांनी न भटकता घरी थांबत मुलांमुलींना शिकविण्याचे ठरविले. आम्ही बी वाघिणीचे दूध पिणार अशी शपथ त्यांनी घेतली. महिलांनी गाऊन न घालण्याचा फतवा काढणार्या मुंबईच्या एका मंडळाला सामाजिक दबावापुढे झुकत फतवा रद्द करावा लागला. अहमदनगरचे विठ्ठल बुलबुले यांनी अंनिवाचे जातपंचायतीचे लेख पद्मशाली समाजात घरोघरी वाटले. अथकपणे लढत पंचांची मनमानी त्यांनी मोडून काढली. नाशिकच्या कळवण येथील आदिवासी कोकणा समाजाने महाराष्ट्र अंनिस व प्रशासनाच्या प्रबोधनामुळे जातपंचायत बंद केली आहे. मुंबईच्या भोई जातपंचांनी डॉ. दाभोलकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उच्च न्यायालयातून जातपंचायत विरोधी कायद्याच्या अभावी सुटलेल्या भोई समाजाचे हे पंच मोहिमेला प्रतिसाद देत आहेत, ही अनोखी बाब आहे. नंदिवाले समाजाचे माजी पंच बाळासाहेब वायकर यांनी तर लढ्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत की, आपला विरोध पंचांना नसून त्यांच्या शोषक प्रवृत्तींशी आहे. डॉ. दाभोलकरांचा सुसंवाद व प्रबोधनावर प्रचंड विश्वास होता. डॉक्टरांच्या निर्घृण खुनाचे दु:ख, मारेकरी व सूत्रधार न सापडण्याचा तीव्र संताप लपवून कार्यकर्ते उर फुटेपर्यंत विवेकी मार्गाने काम करत आहेत. पंचाच्या चांगुलपणास साद घातल्यास परिवर्तन होऊ शकतं. अभियानातील ‘मुठमाती’ शब्द जाणीवपूर्वक वापरण्यात आला आहे. जातपंचायत बरखास्त करतांना अनेक पंच ‘आम्ही जातपंचायतीला मुठमाती देत आहोत’ असं म्हणतात. असा बदल कसा होऊ शकतो, याचं कोडं अनेकांना उलगडत नाही. बाबा आमटे यांनी म्हटल्याप्रमाणे, हात हे उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात. जातपंचायतीला मुठमाती दिलेले पंच सामाजिक सुधारणांची भाषा कशामुळे बोलायला लागले, हे जाणून घेणे अनेकांना आवश्यक वाटते. मला वाटते, आपल्या हातात, मुठीत प्रचंड ताकद असते. गांधीजींनी साबरमतीच्या काठावर मूठभर मीठ उचलले आणि शांततामय मार्गाने एका राजकीय परिवर्तनाची सुरवात झाली. 1927 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी उचलले व मुठ आवळली. त्यामुळे मोठ्या सामाजिक परिवर्तनाची सुरवात झाली. याच गांधीजींना जातपंचायतीचे शुद्धीकरण झालेल्या नाशिकमध्ये मुठमाती अभियानाची सुरवात झाली. जातपंचायतीमुळे प्रमिला कुंभारकरचा खून झालेल्या ठिकाणच्या मातीत डॉ.दाभोलकरांसहीत मान्यवरांनी समतेचा वृक्ष लावला. त्या वृक्षाला मुठ-मुठभर खतपाणी घातलं. तो वृक्ष बहरला. पुढे चौथ्या परिषदेला गावकीमुळे बळी गेलेल्या मोहिनी तळेकरच्या घरच्या मातीबरोबरच चवदार तळ्याचे पाणी समतेच्या ह्या वृक्षाला दिले गेले. येथेही अविनाश पाटील यांच्यासह मान्यवरांनी मुठ-मुठभर खतपाणी घातले. हा सर्व संदर्भ लक्षात घेता मोहीमेचे महत्व समजते. कारण ही मोहीम सत्यासाठी, न्यायासाठी आग्रह धरत आहे. माणसांचं हरवलेलं नव्हे तर हिसकावून घेतलेले माणूसपण परत मिळण्यासाठी आग्रह धरते आहे. सुसंवादाने, प्रबोधनाने बदल होण्याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. चाळीस वर्षांपूर्वी मध्यप्रदेशात खतरनाक डाकूंना सरकार शरण आणू शकत नाहीत. मात्र विनोबाजींनी स्वत: डाकूंच्या प्रदेशात जाऊन त्यांना शस्त्रास्त्रे फेकण्याचे आवाहन केले. डाकूंनी त्यांंच्या बंदुका धडाधड विनोबाजींच्या समोर टाकल्या. सुसंवादात प्रचंड ताकद अशी असते. आपण सुसंवाद करतोय ते पंच काही खतरनाक नाहीये. फक्त जातीच्या अहंकारात आहेत. जातीचे नियम कुणी तोडू नये, असं त्यांच्या मनोमनी पक्कं झालं आहे. मुलींनी शिक्षण घेऊ नये, इतर समाजात सहभागी होऊ नये, आंतरजातीय विवाह होऊ नये यासाठी बालविवाह अथवा पोटात मूल असतांना लावणे, यामध्ये त्यांना चुकीचे वाटत नव्हते. किंबहुना आपण देव-धर्मांनी सांगितलेल्या प्रथांचे अनुकरण करतोय, असं त्यांना वाटत असे. त्यांनी कालसुसंगत बदल करून घेणं, हे त्यांच्याच फायद्याचे कसे आहे हे त्यांना समजून सांगणं महत्वाचे असते. परंतु पंचाचा शब्द हा अंतिम मानणं व त्यांना देवाचा अवतार समजणं, यामुळे जातीतल्या लोकांना ते शक्य होत नाही. किंवा पंचाच्या दहशतीमुळे ते शक्य होत नाही. कोकणात तर गावकीच्या पंचाला करणी करता येते. असा गैरसमज रूढ झालेला आहे. त्यामुळे करणी करेल किंवा देव कोपेल अशा भीतीने कोणी बोलायला तयार नाही. असे अनुभव सांगणारी अनेक पीडित कुटुंबे अंनिसकडे मदतीसाठी धाव घेत आहेत. भटके विमुक्त समाजात तर पोलिसांत जाणं हेच पाप समजलं जाते. अनेक वर्षांपासून बहिष्कृत कुटुंबीय असं जिणं सहन करत होते. कोणी हिंमत करून पोलिसांत गेल्यास कायद्याअभावी न्याय मिळत नव्हता. मात्र जातपंचायत मुठमाती अभियानामुळे समाजात असा संदेश जात आहे की, पोलीस तक्रार दाखल करून घेत आहेत, पंचांना अटक होत आहे. अंनिसच्या मदतीने व प्रसारमाध्यमामुळे न्याय मिळत आहे किंवा न्याय मिळण्याची शाश्वती मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहे. प्रबोधनाने जातपंचायतीना मुठमाती देणे, यास अंनिसची मर्यादा आहे. त्यासाठी सक्षम कायदा व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अजून राज्यातील जातपंचायतींची संख्या हजारांत असावी. एका बाजूने कायद्याचा धाक तर दुसर्या बाजूने व्यापक प्रबोधन झाल्यास जातपंचायतींना संपूर्णपणे मुठमाती देणे शक्य आहे.
जात पंचायत मूठमाती अभियान हे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात एक महत्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले जात आहे हे अभियान अनेकांनी जाणून घेतले. अगदी आंतरराष्ट्रीयमाध्यमांनीसुद्धा या लढ्याची दखल घेतली. अमेरिकेचे महत्वाचे प्रमुख दैनिक लॉस एन्जालिस टाईम्सने याबाबतचे विस्तृत वार्तांकन करत लढ्याचे कौतुक केले आहे. बीबीसीने महाराष्ट्रातील जातपंचाची मक्तेदारी अंनिसने मोडून काढलेल्या घटनांना ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. दिल्लीच्या इंग्रजी व हिंदी साप्ताहिक तहेलकाने दोन भागात मोहिमेची माहिती दिली आहे. जातपंचायत विरोधी संघटीतपणे लढा फक्त महाराष्ट्रातच होतोय. ही माहिती या निमित्ताने समोर आली आहे. पाच देशात चित्रीत झालेल्या ‘इन द नेम ऑफ ऑनर’ या लघुपटात नाशिकमधील जातपंचायतने बाधीत झालेल्या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एन एच-10’ या हिंदी चित्रपटात अशीच दाहकता दाखविण्यात आली आहे. रवी भूषण प्रॉडक्शनचा व अश्विनी प्रधान यांचा जातपंचायतवर आधारीत ‘दंडीत’ हा मराठी चित्रपट येत आहे. सिनेसृष्टी व दूरचित्रवाणीच्या काही व्यक्तींनी जातपंचायतच्या घटनांची प्राथमिक माहिती घेतली आहे. अनेक अभ्यासक सुद्धा शोध घेत अंनिसकडे येत आहेत. दूरचित्रवाणीच्या बहुतांश वाहिनीवर अनेकवेळा स्पेशल रिपोर्ट व चर्चा झाल्या. सर्वच वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला आहे. आकाशवाणीवर विषय चर्चिला गेला. अनेक जातपंचायतींचा क्रूर चेहरा समोर आणणारे पत्रकार विलास बढे यांनीही जात पंचायत या विषयावर एक दर्जेदार लघुपट बनवला आहे. महाराष्ट्र अंनिससाठी हे सर्व निश्चितच अभिमानस्पद आहे. परंतु नेहमीप्रमाणे भरून येतं. सारखं वाटतं की, डॉक्टर तुम्ही आज हवे होतात.
– कृष्णा चांदगुडे
संपर्क : 9822630378