Categories
जात पंचायत

जातपंचायत विरोधी कायदा मसुदा

मे - २०१५

महाराष्ट्र जात पंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम-2015

सदरचा कायदा जातपंचायत किंवा गावकी किंवा याच प्रकारचे कार्य करणार्‍या गावकी संस्था किंवा स्थानिक पातळीवर इतर नावाने कार्य करणार्‍या जात पंचायतींच्या सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या कृत्याना व कार्यशक्तीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच या प्रकरणातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरीता अधिनियम.

प्रारंभ :-

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जात पंचायती किंवा गावकी यांचे कार्यशक्तीसंबंधी शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचा अनुभव आहे. समाजातील लोकांमधील वाद मिटविण्याच्या नावाखाली, वाद मिटवितांना जातपंचायतींकडून अनेक प्रकारची दुष्कृत्ये केली जात आहेत. जातपंचायती या समांतर वाद निवारण पद्धती किंवा न्यायदान पद्धतीप्रमाणे कार्यशक्ती वापरत असल्याचे दिसून येते. अधिक रकमेचा दंड आकारून ते वसूल करणे, पीडित व्यक्तीला वाळीत टाकणे, समाजातून बाहेर काढणे, त्यांचेवर सामाजिक बहिष्कार टाकणे, सोबतच त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होणार्‍या शिक्षा करणे इ. प्रकारचे दुष्कृत्य जातपंचायती स्वार्थाकरिता करीत आहेत. जातपंचायतीचे हे गैरकृत्य भा.दं.वि.सोबतच प्रचलित कायद्यांच्या विविध कलमांनुसार दखलपात्र गुनह्यांच्या स्वरूपाचे आहे. त्यांच्या या दुष्कृत्याने समाजातील पीडितांना होणारा त्रास कमी होणेसाठी, त्यांचे पुनर्वसन होणेसाठी तसेच सामाजिक न्याय मिळणेसाठी जातपंचायतींच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

1)संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ :

1) या अधिनियमास ‘महाराष्ट्र जातपंचायती कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम-2015’ असे म्हणावे.

2) तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू राहील.

3) राज्यशासन घोषित करेल त्या तारखेपासून महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करून या अधिनियमाचा अंमल सुरू होईल.

2) व्याख्या :-

1) या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर

) जातपंचायत याचा अर्थ समाजातील लोकांचे वैवाहिक वाद, सांपत्तिक वाद, जातीविषयक वाद, जातीच्या रूढी परंपरांविषयक वाद मिटविणारी, गेल्या अनेक दिवसांपासून पारंपारिक वाद निवारण पद्धती म्हणून कार्य करणारी संस्था. समाजातील व्यक्तीने जातीच्या नियमांचे उल्लंघन केले, जात रूढी परंपरा तोडल्यात, बाहेरील व्यक्तीसोबत विवाह केला. यासारख्या अनेक कारणांवरून त्या व्यक्तीस अगर त्यांच्या कुटुंबांना वाळीत टाकण्याची शिक्षा देणारी संस्था म्हणजे जातपंचायत.

) समाजातून बाहेर काढणे याचा अर्थ सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकणे, समाजातून हकालपट्टी करणे असा आहे.

3) अधिनियमानुसार प्रतिबंध

जात पंचायतीची खालील कृत्ये प्रतिबंधित आहेत.

) वैवाहिक वाद जसे घटस्फोट, पोटगी किंवा विवाहाशी संबंधित कुठलेही वाद सोडवू नये.

ब) वैवाहिक वाद, सांपत्तिक वाद, जन्म व मृत्यू, जातीच्या विविध रूढी परंपरा, बंधने इ.बाबत वाद आणि तक्रारी.

क) जातीतील कोणत्याही व्यक्तीस बोलावणे, साक्ष देणेस भाग पाडणे, बळजबरी करणे इ. कृत्ये जात पंचायत वाद मिटविताना करू शकत नाही.

ड) जातीतील व्यक्तीच्या ताब्यातील कागदपत्र हजर करणे, पंचायतींच्या बैठकीस हजर रहाणे, पुरावे देणे इ.बाबतची बळजबरी जातपंचायत करू शकत नाही.

इ) तोंडी अथवा लेखी स्वरूपाचा पुरावा नोंदवणे.

फ) एखाद्यास शारीरिक अथवा मानसिक शिक्षा होईल अथवा मृत्यू होईल अशी शिक्षा देणे.

म) एखाद्यावर दंडाची आकारणी करून, वसूल करण्याची जबरदस्ती, बळजबरी करणे.

ह) एखाद्यास वाळीत टाकणे, समाजातून बाहेर काढणे किंवा तशा प्रकारची शिक्षा घोषित करणे.

4) गुन्ह्यांची शिक्षा

अ) जर कोणी व्यक्ती वा समूह या कायद्यानुसार प्रतिबंधित कृत्य करण्यासाठी त्याच्या जातीतील व्यक्तीची जात पंचायत आमंत्रित करेल किंवा तिचे आयोजन करेल. जे कोणी वरील प्रतिबंधित कृत्य करण्यास जातपंचायतीत सहभाग घेतील ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीखाली अपराधी ठरतील आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांपासून कमी नसेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा एक लाख रूपये किंवा दोनही शिक्षेस पात्र राहील. द्रव्य दंड न भरल्यास अधिकची कठोर कारावासाच्या तीन महिन्यांच्या शिक्षेस पात्र राहील.

ब) जात पंतायतीशी निगडित कुणीही व्यक्ती अथवा व्यक्तींचा समूह या अधिनियमाने प्रतिबंधित कृत्य करून किंवा या अधिनियमातील अनुसूचीमध्ये नमूद केलेली कृत्ये करेल त्यास पाच वर्षांची कठोर कारावासाची किंवा दोन लाख रू.द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील. द्रव्य दंड न भरल्यास अधिकची कठोर कारावासाची एक वर्षाच्या शिक्षेस पात्र राहील.

5) शिक्षेनंतरच्या शिक्षेत वाढ करणे :-

एखाद्यास यापूर्वीच या अधिनियमानुसार शिक्षा झाली असेल आणि त्याने पुन्हा असे कृत्य केल्यास दुसर्‍यांदा शिक्षा देताना त्यास एका वर्षापेक्षा कमी नसेल व अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील.

6) अपराधाची दखल :-

या अधिनियमानुसार गुन्हे दखलपात्र व अजामिनपात्र असतील.

7) फौजदारी प्रक्रिया संहिता लागू असणे

या अधिनियमानुसारच्या गुन्ह्यांचा तपास करताना तसेच सुनावणी प्रसंगी फौजदारी संहितेची तरतुदी लागू असतील.

8) तपासाधिकारी

पोलीस उपअधिक्षक दर्जा असलेली व्यक्तीच गुन्हाचा तपास करेल. त्यापेक्षा कमी दर्जा असलेल्या अधिकार्‍यास तपासाचा अधिकार राहणार नाही.

9) गुन्हा मानणे/समजणे

या अधिनियमाखालील गुन्ह्यांबाबत जातपंचायत, त्यांच्याशी निगडित व्यक्ती, व्यक्तींचा समूह यांनी इतर काही विसंगत कृत्य सिद्ध न केल्यास त्यांचे कृत्य या अधिनियमानुसार गुन्हा मानण्यात येईल.

10) प्रभावी अंमलबजावणीची शासनाची जबाबदारी

राज्यशासनास या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी राजपत्रातील अधिसूचनेनुसार आणि पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून या अधिनियमाचे प्रयोजन पार पाडण्यासाठी नियम करता येतील.

अनुसूची :-

1) जातीतील महिलेने जातीबाहेरील, धर्माबाहेरील पुरूषासोबत विवाह केल्यास किंवा तिचे कौमार्य व पावित्र्याबाबत शंका घेऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे.

2) जातीतील महिलेवर बलात्कार झाल्यास, तिचे परपुरूषाशी संबंध असल्यास जातीचे रितीरिवाज, रूढी परंपरा न पाळल्यास, जात पंचायत व गावकीचे आदेश न पाळल्यास

4) जातीतील व्यक्ती समाजातून बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे.

5) जातीतील महिलेस शिक्षा देणेसाठी तिचा लैंगिक वापर करणे.

6) जातीतील व्यक्ती समाजातून बहिष्कृत करणे, वाळीत टाकणे.

7) जातीतील महिलेस जातीबाहेरील पुरूषाशी लैंगिक संबंध ठेवणेस भाग पाडणे.

या प्रमाणे जातपंचायतीकडून केल्या जाणार्‍या गुन्ह्यांची स्वतंत्र यादी सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्र जातपंचायत कार्यवाही प्रतिबंधक

अधिनियम – 2015 : अंतर्गत येणारे गुन्हे.

1) जातपंचानी जातीच्या व्यक्तीसाठी नियम बनविणे, न्यायनिवाडे करणे, दंड करणे, खुशालीच्या नावाखाली पैसे घेणे, शिक्षा करणे.

2) बाळ पोटात असताना लग्न लावणे, पाळण्यात लग्न लावणे, अल्पवयीन लग्न लावण्याचा सल्ला देणे अथवा तशी जबरदस्ती करणे.

3) जन्मापासून ते मृत्यू नंतरचे विविध कार्यक्रम पंचाच्या उपस्थितीत करण्याची जबरदस्ती करणे.

4) समाजातील लग्न ठरवताना पाच कुळाच्या तपासातील खोट( गुन्हा, कलंक, वैरभाव, गोत्र, पोटजात, बोलीभाषा, प्रांतवाद आदी) दाखवत लग्न फेटाळून लावणे.अथवा लग्न जमविण्यासाठी खुशालीच्या नावाखाली पैशाची जबरदस्ती करणे.

5) समाजातील व्यक्तींनी प्रथा , परंपरा, रितीरिवाज मोडले असे सांगून आर्थीक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक करणे.

6) समाजातील मुला/ मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने मारहाण करणे, जीव घेणे अथवा जीव घेण्यासाठी परावृत्त करणे, विवाहित मुला-मुलीच्या नावाने मयताची विधी घालण्यासाठी परिवारास जबरदस्ती करणे, त्यांच्याशी संबंध तोडण्याची जबरदस्ती करणे.

7) महिलेला पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालण्याची जबरदस्ती करणे,न्याय निवाड्याच्या नावाखाली तोंडात तांदुळ चघळण्यास देत त्याच्या आधारे आरोपी जाहिर करणे. झाडाची पाने हातावर ठेवून त्यावर तप्त केलेली कुर्‍हाड ठेवणे. पाण्याची घागर डोक्यावर ठेवून एका दमात डोंगर चढणे किंवा अशाच प्रकारच्या अंधश्रद्धेवर आधारित, अघोरी व अनिष्ट न्यायनिवाडे करणे.

8) लग्न झाल्यावर मुला-मुलीने पांढर्‍या वस्त्रावर झोपून त्यावर रक्ताचा डाग असेल तरच लग्न ग्राह्य धरण्याची कौमार्याची परीक्षा करण्यासाठी अवलंब करण्याची जबरदस्ती करणे.

9) परपुरुषाच्या स्पर्शाने महिला बाटल्याचे, जात भ्रष्ट केल्याचे सांगून तिला जातीबाहेर काढणे, शरीराला चटका देणे, झाडाला बांधणे, वैद्यकीय उपचारापासून रोखणे,तीची आर्थीक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक करणे.

10) जातपंचायत बसवून महिलांना तोंडी घटस्फोट देणे, पेपरवर घटस्फोट करणे, पारंपारिक पद्धतीने रुमाल फाडून घटस्फोट देणे, तिला न विचारता अथवा जबरदस्तीने घटस्फोट देण्याची जबरदस्ती करणे.

11) महिलांच्या पुनर्विवाहात अडसर आणणे अथवा पुनर्विवाह केलेल्या व्यक्तींना बहिष्कृत करणे.

12) प्रेताला खांदा देण्यापासुन इतरांना रोखणे, समाज बांधवांना तेथून पळवून लावणे, प्रेतयात्रा रोखणे, प्रेताला दंड करणे व ती रक्कम नातेवाईकांकडुन वसुल करणे अथवा त्यासाठी छळ करणे, मयताच्या विविध विधीमध्ये दारू व मटनाची सक्ती करणे. मयताचे विविध विधी न केल्याने बहिष्कृत करणे.

13) बहिष्कृत केलेल्या व्यक्तीसोबत बोलल्याने बोलणार्‍यास बहिष्कृत करणे अथवा दंड करणे.

14) जातीत परत घेण्यासाठी अनिष्ट, अघोरी प्रथांचा अवलंब करण्याची जबरदस्ती करणे.

15) सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक कार्यक्रमात येण्यावर बंदी आणणे.

16) मूलभूत अथवा सार्वजनिक सोईंच्या वापरावर बंदी आणणे.

17) बालकांना, मुलींना, महिलांना एकत्र येण्यापासुन रोखणे.

18) जनावरांना जाणिवपुर्वक एकत्र येण्यापासुन रोखणे.त्याना एकत्र चरण्यास अथवा पाणी पिण्यास बंदी आणणे.

19) यात्रा- जत्रा मध्ये सहभागी होण्यापासुन रोखणे,देवाची पालखी जाणिवपुर्वक दारावरुन न नेणे.

20) जातीवर आधारित व्यवसाय करण्याची सक्ती करणे व नकार दिल्यास आर्थिक , मानसिक त्रास देणे अथवा बहिष्कृत करणे.

21)देवाची शपथ देवुन एखाद्या व्यक्ती अथवा राजकीय पक्षाला मतदान करण्याची सक्ती करणे, मतदाना पासून रोखणे, निवडणूकी साठी उभे राहण्या पासून रोखणे विशिष्ट उमेदवाराला विजयी करण्याचा जातीच्या लोकांसाठी फतवा काढणे.

22) विशिष्ट उमेदवाराचा प्रचार करण्याची सक्ती करणे याचे पालन नाही केल्यास अथवा विरोध केल्यास मानसिक त्रास देणे अथवा बहिष्कृत करणे.

23) खाजगी अथवा सरकारी वाहन व्यवस्थाचा वापर करण्या पासुन रोखणे.

24) किराणा, भाजीपाला, गिरणी, वीज, पाणी, व तत्सम सोईपासुन रोखणे.

25) सार्वजनिक कार्यक्रमासाठी पैसे न दिल्यास त्याचा मानसिक छळ करणे अथवा बहिष्कृत करणे.

26) पंचाच्या परवानगी शिवाय लग्न जमविणे अथवा लग्न करणे.लग्नात मानपान, दारू, मटन अथवा खुशाली (पैसे) न मिळाल्याने मानसिक छळ करणे अथवा बहिष्कृत करणे.

27) एखाद्याच्या लग्नात सहभागी न होण्याचा तोंडी अथवा लेखी फतवा काढणे अथवा जबरदस्ती करणे.

28) लग्न अथवा इतर कार्यक्रमात एखाद्याला टिळा(गंध) न लावणे अथवा एखाद्यास जाणिवपुर्वक अपमानास्पद वागणूक देणे.कार्यक्रमातुन बाहेर काढणे.

29) बहिष्कृत व्यक्तीला शेतीची साधने अथवा मजुर मिळण्यापासुन रोखणे.उत्पादित माल खरेदी- विक्री करण्या पासुन रोखणे.

30) विविध कारणांसाठी पंचांनी बोलविलेल्या बैठकीस उपस्थित न राहिल्याने बहिष्कृत करणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न झाल्याने अथवा त्याची कामे निकृष्ट केल्याने बहिष्कृत करणे.

31) अंगात कोणते कपडे घालावे याची सक्ती करणे अथवा वेगळे पेहराव केल्याच्या कारणाने मानसिक त्रास देणे अथवा बहिष्कृत करणे.

32) पंचानी ठरवुन दिलेले रितीरिवाज मोडले म्हणून एखाद्यास अन्न पाणी रोखणे अथवा देऊ न देण्याचा जबरदस्ती करणे अथवा छळ करणे.

33) विविध कार्यात गावजेवण दिले नाही, यावरून छळ करणे अथवा गावजेवण देण्याची जबरदस्ती करणे अथवा त्यामुळे बहिष्कृत करणे.

34) पंचाच्या मर्जीच्या संस्था, संघटना, मंडळे यात सहभाग घेतल्याने अथवा न घेतल्याने अथवा हिशोब विचारल्याने मानसिक त्रास देणे अथवा बहिष्कृत करणे.

35) एखाद्या विशिष्ट ठिकाणी नोकरी अथवा व्यापार न करण्याची जबरदस्ती करणे, तसा फतवा काढणे अथवा तसे केल्यास मानसिक त्रास देणे अथवा बहिष्कृत करणे.

36) न्यायनिवाड्याचा निकाल मान्य न केल्यास देव कोपेल अथवा करणी करण्याची अथवा वाईट होण्याची भिती घालणे.

37)जातीतील व्यक्तींना पोलीसांत अथवा न्यायालयात जाण्यापासून रोखणे.

38) मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखणे. तिला इतर समाजात सहभागी होण्यापासून रोखणे.

39) परपुरुषाच्या स्पर्श झाल्याने महिला बाटते , असे सांगून तीला वैद्यकीय उपचार व डॉक्टरांकडून करुन बाळंतपण करुन न घेण्याची सक्ती करणे. बलात्कारीत महिला परपुरुषाच्या स्पर्श झाल्याने महिला बाटली असे सांगून तीचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करणे.

40) लग्न झालेल्या महिलेने बोलीभाषेत न बोलता मराठीत बोलल्यास तिला घटस्फोट देण्याची पंचांनी सक्ती करणे.

41) एखाद्या ठिकाणी न राहण्याची अथवा गाव सोडून जाण्याची पंचानी जबरदस्ती करणे.

42) पंचानी विविध कारणांसाठी एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक मालमत्तेची तात्पुरती अथवा कायमस्वरुपी मागणी करणे. ती नंतर दिल्यास छळ करणे अथवा बहिष्कृत जातपंचायत निर्मुलन विधेयक 2015 अंतर्गत येणारे गुन्हे.