Categories
संपादकीय

या हत्येचा अर्थ काय?

मार्च - २०१५

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या झाली. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर जनसामान्यासाठी आयुष्य वेचणारा सच्चा माणूस मारला गेला. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे पानसरे’ अशा घोषणा देत आपली छाती मारेकर्‍यांच्या गोळ्या झेलण्यास तयार असल्याची निर्भयता दाखविली. पण मुख्य योद्धा धारातिर्थी पडला त्याचं काय?

सामाजिक परिस्थिती इतिहास घडविणारे महापुरूष जन्माला घालतात की, महापुरूष प्रथम जन्माला येतो आणि तो नवा इतिहास घडवून परिस्थिती बदलतो? परक्या जुलमी राजवटीमुळे गांधी निर्माण झाले की, गांधीजीमुळे स्वातंत्र्याची चळवळ आकाराला आली? अन्याय, अत्याचार यांना जन्म देणारी परिस्थिती जेव्हा जनसामान्यांचे जगणे कठीण करते तेव्हा त्यांच्या बाजूने आवाज देणारा योद्धा निर्माण होतो हे खरं आहे. पण अशी नेतृत्व करणारी लढाऊ व्यक्तीमत्वं तयार करणारी निसर्गाची मूस पुन्हा निर्माण होत नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे नामक मूस पुन्हा निर्माण होणार नाही. हे वेदनादायी सत्य आपणाला स्वीकारावेच लागेल.

पिचलेला कष्टकरी वर्ग, घरेलू कामवाल्या स्त्रिया, भूमिहीन मजूर यांच्या वाईट अवस्थेच्या जाणिवेने आपणही अस्वस्थ होतो. थोडे फार कृतीशील बनतो. पण प्रचंड करूणेने अस्वस्थ होऊन, संवेदनशीलतेचा झरा होऊन पीडितासाठी माझे स्वत:चे आयुष्य पणाला लावायला हवे अशा भूमिकेतून प्राणाची पर्वा न करता संग्राम छेडणारे व्यक्तीमत्व एखादे दुसरेच. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण त्या दोन हाताचे हजार हात बनतो खरे. पण त्याचे हात आणि त्याची वज्रमूठ याचे सामर्थ्य अलौकिकच होय.

गरीबीची चटके बसलेली काही माणसं गुन्हेगार होतात, निर्दय व संवेदनाहीन बनतात. पण उलटही घडते. आपल्या वाट्याला आलेले दु:ख दुसर्‍यांनी भोगायला नको या करूणेचा उत्कट अविष्कार काही व्यक्तींमध्ये घडतो. अशा व्यक्ती, अधिक संवेदनाशील बनतात व अन्याय, अत्याचाराच्या विरोधात कशाचीही तमा न बाळगता संघर्ष छेडतात. त्यांना व्यक्तीगत आयुष्य रहात नाही. कॉम्रेड गोविंदराव पानसरे हे असं व्यक्तीमत्व होतं. ते स्वत: त्यागी कॉम्रेड होतेच पण त्यांचे सगळं कुटुंब त्यांच्या साथीला होते. कॉम्रेड पानसरेंच्या पत्नी त्यांच्या कार्यात सहभागी होत्या. त्यांनाही अतिरेक्यांची गोळी लागली. महाराष्ट्र अंनिसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पानसरे कुटुंबियाच्या दु:खात सहभागी आहेत. उमाताईंना लवकर आराम पडो अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा अर्थ काय? ही हत्या कोणी केली? कोणी घडवून आणली? महाराष्ट्रातील सर्व सुजाण विचारवंतांनी जे मत व्यकत केलं तेच आमचंही मत आहे. पोलीस पानसरेंच्या हत्येचा शोध घेतीलच व मारेकरी सापडले तर वरील प्रश्नांची उत्तरे मिळतीलच. पण कॉम्रेड पानसरे यांच्या वैचारिक आणि संघटन सामर्थ्याची ज्यांना भीती वाटली त्यांनीच पानसरेंवर भ्याड हल्ला केला असावा.

कॉम्रेड पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हे अहिंसक मार्गाने, लोकशाही पद्धतीने, विवेकाच्या मार्गाने समाज परिवर्तन करणारे विचारवंत होते. हे दोघेही आपल्या अमोघ वक्तृत्वाने, लिखाणाने व संघटन कौशल्याने महाराष्ट्रात समताधिष्ठीत परिवर्तन करू पहाणारे नेते होते. त्यांच्या विवेकवादाला फळे लागलेली दिसत होती. हेच काही शक्तींना नको होते. त्यांना लोकशाही मान्य नाही. त्यांचा धर्मवाद कडवा आहे. त्याची वाट हिटलर-मुसोलिनीची आहे. त्यांनीच डॉ.दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या घडवून आणली असावी. भविष्यकाळात येऊ पहाणार्‍या भीषण अराजकाची ही नांदी आहे. भारत भविष्यात धर्मनिरपेक्ष लोकशाहीप्रधान रहाणार की, त्याचा पाकिस्तान होणार याचा सर्वांनी विचार करायला हवा. पाकिस्तान नावाच्या धर्मराष्ट्राचे काय झाले ते दिसतेच आहे. दाभोलकर आणि पानसरे यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारीत विचारस्वातंत्र्य जपणार्‍या लोकशाही व्यवस्थेचे प्राणपणाने रक्षण करण्याचे धैर्य आपण दाखवायला हवे.