“डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून हा धर्मांधांनी केलेला पहिला खून नव्हे आणि शेवटचाही खून नव्हे” असे वक्तव्य महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि आचारवंत कॉ.गोविंदरावजी पानसरे यांनी केले होते. कॉ.पानसरेंनी भविष्याचा केलेला सूचक निर्देश नेमका त्यांच्याबाबतच खरा ठरला. धर्मांधांनी कॉ.पानसरे दाम्पत्यावर त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला केला. ‘शाहूनगरी’ कोल्हापुरात झालेला हा हल्ला विवेकवादी पुरोगामी शक्तीवरचा ‘मर्माघात’ आहे.
घटना काय व कशी घडली?
कॉ.गोविंद पानसरे व उमा पानसरे हे दाम्पत्य कोल्हापुरातील शास्त्री नगरजवळील आयडीयल कॉलनी येथे राहतात. 16 फेबु्रवारी रोजी सकाळी दोघेही मॉर्निंग वॉक करणेसाठी सकाळी जरा उशिराच बाहेर पडले. घरासमोरीलच भागामध्ये फेरफटका मारून नऊच्या सुमारास तेथीलच एका गाडीवर चहा घेऊन आपल्या निवासस्थानाकडे परतत होते. नेहमी शांत असणार्या तोरणा कॉलनीतील चुनेकर विद्यामंदिरच्या मागील बाजूच्या रस्त्यावर आल्यावर दोघे हल्लेखोर मोटारसायकलवरून मागून आले. त्यांनी पिस्तुलमधून कॉ.पानसरे व उमाताईंवर गोळ्या झाडल्या. काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेले हल्लेखोर पसार झाले. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
आदल्या दिवशी म्हणजे 15 फेबु्रवारी रोजी क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. त्या आनंदात भरपूर फटाके वाजत होते. सकाळी कॉ.पानसरेंवर गोळीबार झाल्यावर फटाक्यासारखा आवाज वाटल्याने घटनास्थळाजवळ घर असलेले चंपालाल ओसवाल हे गृहस्थ बाहेर आले. पानसरे दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात न्हाताना त्यांनी पाहिले. कॉ.पानसरे पश्चिमकडे तोंड करून रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत बसले होते. उमाताई रस्त्यावरच पडल्या होत्या. ओसवालांनी ‘घात झाला, घात झाला’ असा ओरडा केला तेव्हा कॉ.पानसरेंच्या घराशेजारील शशिकांत जोग बाहेर आले. त्यांनी घटनास्थळी रक्ताने माखलेले पानसरे दाम्पत्य पाहिले तेव्हा तत्परतेने त्यांनी कॉ.पानसरेंची सून कॉ.मेघा पानसरे यांना हाक दिली. त्यांनी आपला भाऊ मुकुंद आणि मुलगे कबीर व मल्हार यांना घेऊन दोन मोटारींमधून तातडीने शेजारच्याच अॅस्टल आधार या हॉस्पिटलमध्ये दोघांना दाखल केले. साधारण दहा वाजता दवाखान्यात उपचाराला सुरवात झाली.
सुरवातीची प्रतिक्रिया
कॉ.गोविंद पानसरे व उमा पानसरे या दाम्पत्यावर झालेल्या खुनी हल्ल्याची बातमी त्सुनामीसारखी कोल्हापूर जिल्हाभर पसरली. कॉ.पानसरेंना आदरस्थानी मानणार्या सर्व कोल्हापूरकरांची रॉयल अॅस्टल आधार हॉस्पिटलकडे रीघ लागली. जिल्ह्यातूनच ही बातमी राज्यभर पसरली आणि बीड, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सावंतवाडी अशा सर्व ठिकाणाहून परिवर्तनवादी कार्यकर्तेकोल्हापूरकडे येण्यास निघाले. सुरवातीला घटना ऐकूनच सर्वजण सुन्न झाले. काही महिला कार्यकर्त्या ओक्सा बोक्सी रडायला लागल्या. प्रत्येकांचे डोळे पाण्याने डबडबले होते. काय चाललंय याचा सतत कानोसा घेऊन एकमेकांला धीर देण्याचा प्रयत्न सुरू होता. अशातच आधार हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून दुपारी 1.30 वाजता अधिकृत बातमी देण्यात येईल असे सांगितले.
प्रशासनाच्या हालचाली
कॉ.गोविंद पानसरे दाम्पत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने पोलीस दलही हादरून गेले. एखादी महत्वाची घटना किंवा दंगल झाल्यास पोलिसांना सतर्क करण्यासाठी पोलीस वसाहतीमध्ये सर्वत्र फिरून बिगुल वाजवला जातो. कॉ.पानसरेंवरील हल्ल्याची बातमी समजताच पोलीस कर्मचार्याने बिगुल वाजवून वसाहतीमधील पोलिसांना ‘डबल कॉल’ दिला. रजेवर अथवा सुट्टीवर असणारे सर्व पोलीस मुख्यालयात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी सुत्रे हातात घेतली. घटनास्थळ आणि हॉस्पिटलला पोलीस छावणीचे स्वरूप आले. जिल्ह्याची नाकाबंदी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी प्रमुख तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे पोलीस यांची पंधरा पथके तयार केली. पुण्यातील बॉम्बशोधक पथक आणि पाच जिल्ह्यांची पोलीस यंत्रणा बोलावणेत आली. जिल्ह्याच्या नाकाबंदीबरोबरच तपास पथके गोवा, कर्नाटक आदि भागांकडे रवाना झाली. कोल्हापूरच्या टोलनाक्यावरील सी.सी.टी.व्ही.फुटेज ताब्यात घेतले. कॉ.पानसरेंच्या मोबाईलवरील फोन्सची चौकशी सुरू झाली. जवळच्या कार्यकर्त्यांजवळून माहिती गोळा केली जाऊ लागली. घटनास्थळाजवळच्या शाळेच्या सी.सी.टी.व्ही. फुटेजबरोबर शिवाजी विद्यापीठ, शास्त्रीनगरसह वीसहून अधिक सी.सी.टी.व्ही.फुटेज मिळवले गेले. तपासाची चक्रे फिरू लागली.
उपचारादरम्यानचे चित्र
सकाळी दहाच्या सुमारास कॉ.पानसरेंना रूग्णालयात दाखल केले. कार्यकर्त्यांची घुसमट वाढत होती. प्रशासनावर तणाव वाढत होता. ‘ब्रेकिंग न्यूज’ साठी मीडियाची धडपड सुरू होती. काय झालं? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रत्येकजण आतुरलेला होता. दरम्यान दीड वाजला. रूग्णालय प्रशासनाकडून कॉ.पानसरेंची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं. कॉ.पानसरेंवर उपचार करणार्या डॉक्टरांनी अधिक माहिती पुरवली. कॉ.पानसरेंवर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक मानेतून आरपार गेली. दुसरी पायाला चाटून गेली आणि तिसरी गोळी त्यांच्या छातीत डाव्या बाजूला लागून पोटात अडकली होती. उमाताईंना डोक्याला गोळी लागल्याने कवटीला तडा गेला होता. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. दोघांनाही अतिदक्षता विभागात हलवले होते. पानसरे दाम्पत्याची प्रकृती स्थिर असल्याची बातमी ऐकून सर्वांनाच जरा हायसे वाटले. काही निवडक जवळच्या कार्यकर्त्यांना हॉस्पिटलतर्फे नेमकी स्थिती सांगण्यात आली. बाराच्या सुमारास कॉ.पानसरेंवर पहिली शस्त्रक्रिया सुरू झाली. साधारण दोनच्या सुमारास ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा निरोप आला. दुपारी अडीचच्या सुमारास उमाताईंना मेंदूच्या स्कॅनिंगसाठी हलवले गेले. दुपारी साडेचारच्या दरम्यान कॉ.पानसरेंवरील दुसरी शस्त्रक्रियाही यशस्वी झालेची बातमी आली. आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. डॉक्टरांनी सायंकाळी 7 वाजता तिसरी शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्याची बातमी दिली आणि कॉ.पानसरे दाम्पत्य पहिल्या धोक्यापासून वाचवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. आणि ही बातमी ऐकताच सुरवाती डबडबले डोळे पुन्हा एकदा आनंदाश्रूंनी डबडबले. सर्वत्र बातमी सांगण्यात आली. डॉक्टरांच्या आठ तासांच्या अथक परिश्रमांनी आणि पानसरे दाम्पत्याच्या ‘जगण्याच्या जिद्दीला’ यश आल्याचे वाटू लागले.
दरम्यान काय घडले
कॉ.पानसरेंवरील हल्ल्याची बातमी वार्यासारखी पसरली. या भ्याड हल्ल्याचा सर्व समाजघटकांनी जाहीर निषेध केला. व्हॉटस् अॅपवर दिवसभर कॉ.पानसरेंच्या मृत्यूची बातमीसारखी फिरत होती. अफवांना ऊत आला होता. सजग व जबाबदार नागरिकांनी व्हॉटस् अॅपवर आपल्या गु्रपचा आयकॉनही ‘निषेध’ नावाने नोंदवून घटनेचा धिक्कार केला आणि कॉ.पानसरेंच्या तब्बेतीची ‘खरी’ माहिती देऊ लागले. सामान्य कार्यकर्त्यांबरोबर अनेक मान्यवरही रूग्णालयाकडे धाव घेऊ लागले. दिवसभरात कोल्हापूरचे शाहू महाराज, बाबा आढाव, भारत पाटणकर, भाई वैद्य, राजू शेट्टी, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, चंद्रदीप नरके, भालचंद्र कांगो, राजेश क्षीरसागर, जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, डी.बी.पाटील, न्यायमूर्ती कोळसे पाटील, राजन गवस असे अनेक मान्यवर भेट देत होते. त्याचबरोबर स्थानिक वृत्तपत्रांचे प्रमुख संपादक, बातमीदार यांचेबरोबर इले.मीडिया यांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान राज्यभरात निषेधाचे आवाज उमटू लागले. दिल्लीमध्येही धिक्काराच्या घोषणा झाल्या. वातावरण तणावपूर्ण होत होते. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे हे राज्य सरकारच्या वतीने भेटीवर आले. कार्यकर्त्यांच्या संतापाचा बांध तुटला. घोषणाबाजी झाली. या आधीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून उपचारामध्ये मदतीचे आश्वासन मिळवले गेले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे हॉस्पिटलशी फोनवरून माहिती घेत होते. पानसरेंवरील हल्ल्याच्या बातमीने कोल्हापूरकरही हळहळले होते. उत्स्फूर्ततेने दुकाने बंद झाली. रिक्षा बंद झाल्या. कोल्हापूर शांत झाले.
उष:काल होता होता काळरात्र आली आणि जे घडू नये ते घडले. शुक्रवार दि.20 फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विचार करून पानसरे सरांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला. विमानाने त्याच दिवशी ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना कॉम्रेड पानसरेंची जीवनज्योत मालवली. दुसर्या दिवशी त्यांचे शव विमानाने कोल्हापूरला आणण्यात आले. शाहू स्मारक मंदिर येथे हजारो चाहत्यांनी त्यांचे दर्शन घेतल्यावर बिंदू चौक मार्गे त्यांची प्रेतयात्रा पंचगंगाकाठी नेण्यात आली. तेथे त्यांना हजारो कार्यकर्त्यांनी साश्रूपूर्ण निरोप दिला व पानसरे सरांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्याच्या घोषणा दिल्या.
खूनी हल्ल्याची संभाव्य कारणे
कॉ.गोविंद पानसरेंवर हल्ला का झाला? या गोष्टीची चर्चा सुरू झाली. काही संभाव्य कारणेही पुढे आली. ती अशी की, कॉ.पानसरे हे टोल विरोधी आंदोलनाचे नेते आहेत म्हणून गोळीबार झाला. कौटुंबिक अथवा आर्थिक कारणावरून हल्ला झाला असावा असाही ‘तर्क’ काहीजण बांधत होते. खरं तर एका कारणावर बहुतांश जनमानसाचे एकत्र होत होते ते कारण म्हणजे कॉ.पानसरेंनी धर्मांध शक्तीविरोधी उठवलेला कृतीशील आवाज, नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न सुरू झाल्यावर कॉ.पानसरेंनी ह्याविरोधात जोरदार आवाज उठवला. ‘नथूराम हा आर.एस.एस.चा स्वयंसेवक होता आणि आर.एस.एस.च्या विचारांचे राज्य केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे.’ अशा आशयाचे विधान कॉ.पानसरे प्रत्येक भाषणांतून ठिकठिकाणी करत होते.
शिवाजी विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांच्या या मांडणीवर ए.बी.व्ही.पी.चा कार्यकर्ता असणारा गुरव नावाच्या विद्यार्थ्याने जाहीरपणे आक्षेप घेतला. तुम्ही खोटा इतिहास सांगत आहात अशा आशयाचा वितंडवाद त्याने घातला. कॉ.पानसरेंना बर्याच वर्षांपासून धमकीची पत्रे यायची. कोल्हापुरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौक येथील ऑफीसवर वारंवार पत्रे यायची. प्रस्तुत लेखकानेही अशी दोन पत्रे पाहिली होती. कॉ.पानसरेंना याबाबत माहिती दिली असता ‘या पत्रात कशाला गुंतून पडायचे त्यापेक्षा कामं करा.’ असं म्हणून कॉ.पानसरे या पत्रांना केराची टोपली दाखवायचे. ही दोन्ही पत्रे पुण्याहून आली होती हे विशेष. कॉ.पानसरेंच्या चेहर्यावर धमकीच्या पत्रांचा प्रभाव जरासुद्धा जाणवायचा नाही. संभाव्य कारणांमध्ये आणखी एका कारणाची चर्चा जोरात होती. 30 डिसेंबर 2014 रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शमसुद्दिन मुश्रीफ लिखीत ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकावर व्याख्यान आयोजित केले होते. कोल्हापूरच्या इतिहासातील बरेच गाजलेले व उत्तुंग प्रतिसादांनी भरलेले हे व्याख्यान. कॉ.पानसरेंनी पुढाकार घेतलेल्या या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला होता, पण कॉ.पानसरेंनी हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी करून दाखवला होता. थोडक्यात संघवाद, नथुराम विरोध, हु किल्ड करकरे ला समर्थन अशा एकत्र गोष्टींनी हल्ला घडवला असावा हाच तर्क बहुतेकजणांच्या मनात होता आणि तोंडातूनही व्यक्त होत होता.
डॉ.नरेंद्र दाभोलकर खुनाशी साम्य
कॉ.पानसरेंवरील हल्ल्याने सर्वांना प्रथम आठवण झाली ती दीड वर्षांपूर्वी झालेल्या डॉ.दाभोलकरांच्या खुनाची. दाभोलकरांच्या खुनाचीच पुढची पायरी धर्मांधांनी ओलांडली अशीच भावना सर्वांच्या मनात होती. डॉ.दाभोलकरांचा खून आणि कॉ.पानसरेंवरील खुनी हल्ला यातील साम्यस्थळे विचारात घेण्यासारखी आहेत. दोघेही सकाळच्या प्रहरी ‘मॉर्निंग वॉक’ निमित्ताने बाहेर पडले होते. दोन्ही ठिकाणी हल्लेखोरांनी मोटारसायकलाचा वापर केला होता. दोघांवरील गोळीबार 5-7 फुटांवरून झाला होता. दोन्ही प्रकरणात मानेच्या बाजूला कानाजवळ गोळी मारणेत आली. पिस्तुलाचा वापर दोन्हीकडे होताच. कारण अस्पष्ट होतं. सर्वात मोठं साम्य म्हणजे दोघेही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची पताका आपल्या विवेकी खांद्यावर कृतीशीलपणे घेत होते. दोघांचेही संघटन जबरदस्त होते. स्पष्ट व खुले विचार मांडण्याची दोघांचीही पद्धत सारखीच. जनजागृतीसाठी दोघेही महाराष्ट्रभर अखंड फिरत होते. व्याख्याने देण्याबरोबरच आपले विचार पुस्तक रूपातून मांडून समाजमंथन घडवण्यात दोघेही अग्रेसर होते. ‘समाज बदलतो’ या तत्वावर दोघांचा प्रचंड विश्वास. महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे. प्रिंट मीडिया व इले.मीडियामध्ये दोघांचाही आश्वासक व दबदबापूर्ण वावर. ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र घडवण्याचे दोघांचे स्वप्नही सारखेच.
विवेकवाद्यांवर हल्ला का होतो?
डॉ.दाभोलकर व कॉ.पानसरेंवरील खूनी हल्ल्यानंतर एकच प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, महाराष्ट्रात विवेकवाद्यांवरच हल्ला का होतो? हे “जग बदलू” पाहणार्या जबाबदार लोकांना बेदरकारपणे का संपवले जातेय? का?

असा कोणता गुन्हा यांनी केला ज्याची शिक्षा यांच्या वाट्याला आली? अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर सरळ आहे. ज्यांची लोकशाही पद्धतीवर निष्ठा आहे, भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे, ज्यांना समाज अंधश्रद्धामुक्त विवेकवादी विज्ञानवादी बनवायचा आहे, या विधायक हेतुंसाठी जे समाजपुरूष स्वत:ला तन-मन-धनाने झोकून देतात. समाजबदलाचा ध्यास घेतात. ज्यांच्या कार्यमग्नतेने विरोधकांचे हितसंबंध संपुष्टात येऊ शकतात अशा ध्येयवेड्यांना ‘पुरोगामी’ म्हणवणार्या महाराष्ट्रात जगू द्यायचे नाही अशा घातक विचारांच्या प्रवृत्तींना हत्तीचे बळ आले आहे. डॉ.दाभोलकरांच्या खुनानंतर कॉ.पानसरेंनी भविष्याचे केलेले सूचन त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते. समाजात विवेकवाद रूजवू पाहणार्यांचे ‘शत्रू’ वाढत आहेत. तरीही कॉ.पानसरेंच्याच भाषेत बोलायचे तर ‘संघर्ष’ हा जीवनातील सर्वोत्तम शब्द आहे’ आणि संघर्षाशिवाय समाज बदलणार नाही.
आवाहन
डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे ही नररत्ने म्हणजे समाजात विवेकाचा आवाज बुलंद असण्याची सुचिन्हे आहेत. ही सुचिन्हे मिटवून समाजाला अंधाराच्या, अंधश्रद्धांच्या खाईत लोटू पाहणार्या समाजघातक प्रवृत्तीविरोधात आता सर्वसामान्य जनतेतूनच ‘आवाज’ उठायला हवा. डॉ.दाभोलकर, कॉ.पानसरेसारखी असामान्य माणसे गमावणे हे समाजहिताला परवडणारे नाही. उद्याच्या भावी पिढ्यांना चांगले, आनंदी जीवन द्यायचे असेल तर ही माणसे जपायला हवीत. ही विवेकवादी माणसे ‘उज्वल भविष्याची श्वसनकेंद्रे’ आहेत. त्यांना जपणे म्हणजेच समाजहित जपणे आहे. यासाठी सर्व पातळ्यांवर एकमेकांच्या साथीने लढा उभारायला हवा. संघर्ष करायलाच हवा. गोळ्या घालून विचार संपवू पाहणार्या गोडसे प्रवृत्तीला कॉ.पानसरे आणि डॉ.दाभोकलरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोचवणे हेच उत्तर आहे.
–उमेश सूर्यवंशी
लेखक संपर्क : मोबा.9922784065