Categories
पुस्तक परिचय

नम्र झाला भूता। तेणे कोंडले अनंता।

फेब्रुवारी – २०१५

(नोव्हेंबर 1951मध्ये काशी विद्यापीठाच्या बनारस समाजशास्त्र संस्थेने महाराष्ट्रातील साधु संत या विषयावर व्याख्याने देण्यासाठी डॉ. वि. भि. कोलते यांना निमंत्रित केले होते. तेथे त्यांनी त्या विषयावर पाच व्याख्याने दिली. ही व्याख्याने हिंदीत होती. त्याचे हिंदीतच पुस्तक काढण्यात आले. त्या पुस्तकाचे भाषांतर डॉ. सुमती रमाकांत कोलते यांनी केले व 1983 मध्ये त्या भाषांतराची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन ऑगस्ट 2014 मध्ये लोकवाङ्मय गृहाने केले. त्या पुस्तकाचा परिचय आम्ही अनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.)

बाराव्या शतकात उदयास आलेल्या आणि सोळाव्या शतकापर्यंत कार्यरत राहिलेल्या वारकरी पंथाच्या संतांनी मराठी भाषिकांवर आपल्या आचार विचारांचा अमीट ठसा उमटवला आहे. मराठी संतांच्या कार्याबद्दल आजवर बरेच लिखाण झाले असले तरी या कार्याची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अंगे काय होती त्याची सखोल मीमांसा करणारे लिखाण फारच थोडे आहे. त्यातही दखल घ्यावे असे लिखाण तर फारच कमी आहे. संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हे गं.बा. सरदार यांचे पुस्तक महत्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर चक्रधर स्वामींच्या कार्याचा सांगोपांग अभ्यास केलेले सुप्रसिद्ध संशोधक डॉ. वि. भा. कोलते यांनी 1950 साली समाज-विज्ञान परिषदेत मराठी संतांचे सामाजिक कार्य या विषयावर हिंदीतून दिलेल्या पाच भाषणांचा संग्रह पुस्तक रूपाने लोकवाङ्मय गृहाने मागील वर्षी प्रकाशित करून एक मोठे काम केले आहे. गं.बा.सरदार यांच्या सारखीच व्यापक पुरोगामी दृष्टी घेऊन कोलते यांनी चक्रधरांपासून संत रामदासा पर्यंत संतांच्या कार्याचे निर्भीडपणे मुल्यांकन केले आहे.

1951 साली दिलेली ही भाषणे आशयाच्या पातळीवर आजही टवटवीत वाटतात. कोलते यांनी मांडलेले निष्कर्ष आजही प्रेरणादायी आहेत. आज देशात आणि महाराष्ट्रात ज्या जातिव्यवस्थेविरुद्ध आणि सनातन वैदिक संस्कृती विरोधात वारकरी पंथ आणि म. चक्रधरांचा महानुभाव पंथ झगडला तीच संस्कृती प्रमाण मानणारी मंडळी सत्तेवर आलेली आहेत. अशा वेळी या पुस्तकाची फार गरज आहे. पुन्हा एकदा आजच्या आधुनिक काळात सनातन वैदिक संस्कृतीचे वैचारिक-सांस्कृतिक आव्हान परतून लावण्यासाठी या पुस्तकातून आपल्याला बहुमूल्य सामग्री मिळेल.

डॉ. कोलते यांनी आपल्या प्रतिपादनाची सुरुवात म. चक्रधर स्वामींच्या कार्यापासून केली आहे. हिंदी भाषिकांसमोर भाषण करीत असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील संतांची हिंदी भाषेत जुजबी माहिती असल्यामुळे डॉ. कोलते यांनी प्रत्येक संताचा त्रोटक चरित्रपटही सांगितला आहे. म. चक्रधर यांचा जन्म गुजराथमधील भडोच येथे झाला आहे म्हणजे ते मूळ गुजराथी भाषिक. पुढे ते विद्या संपादन करण्यासाठी गोविंद प्रभू यांच्याकडे महाराष्ट्रात आले. चक्रधर हे नाव त्यांना गोविंद प्रभूनी दिलेले आहे. त्यांचे मूळ नाव हरीपाल देव असे होते. खरेतर म.चक्रधर संत परंपरेत बसत नाहीत. परंतु कोलते यांच्या मते ते पहिले संत होते. संत परंपरेची सुरुवात म. चक्रधरापासून व्हावी अशा मताचे ते आहेत. या दृष्टीने म. बसवेश्वर यानाही आपल्याला संत परंपरेत आणता येईल. त्यामुळ एरवी फरक पडत नसला तरी म.चक्रधर, म.बसवेश्वर यांच्या कार्य कर्तृत्व तत्वज्ञान यांची मांडणी पाहता ती संतांच्या कार्यापेक्षा चार अंगुळे वर जाणारी आहे. तिचे सामाजिक परिणामही खूपच सखोल आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या पंथांना निश्चित अशी एक विचारसरणी आणि कार्य दिशा आहे. याचा अर्थ संतांचे कार्य महत्वपूर्ण नाही असे नाही.

मराठी महाराष्ट्राचा आरंभकाळ हा बाराव्या शतकापासून सुरु होतो. म.चक्रधर यांचे कार्य याच काळातील आहे. या काळात वैदिक धर्म हा प्रस्थापित धर्म होता. डॉ. कोलते यांनी या सामाजिक स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, या महाराष्ट्रातच सर्व भारतभर वैदिक धर्मच प्रभावी होता. आणि या चातुर्वर्णधर्माची इमारत चातुर्वर्णावर आधारित होती. चातुर्वर्णाचा अर्थ आहे विषमतेचा व्यवहार. ते पुढे म्हणतात, सामाजिक उच्च नीचतेच्या दृष्टीनेही या विभिन्न वर्णांमध्येही समानता नव्हती. ब्राम्हणापेक्षा क्षत्रिय, क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैश्यापेक्षा शुद्र कनिष्ठ होता. उच्च वर्णीय लोक समाजाशी वाटेल तसा व्यवहार करु शकत होते. पण नीचवर्णीकडून होणारा उच्च वर्णीयांचा थोडाही स्वाभिमान दुखावणारा व्यवहार दंडास प्राप्त असे पाप समजले जाई. परिणामी समाजाच्या सर्व धार्मिक व्यवहारांचे तसेच ज्ञान-विज्ञानाचे ठेकेदार ब्राम्हण बनले, बाहुबलाने मिळालेल्या राज्याचे अधिपती क्षत्रिय बनले, समाजाचे सर्व आर्थिक व्यवहार वैश्या हाती सोपविण्यात आले आणि सर्व वर्णाचा सेवा करण्याचा अधिकार नि:स्पृह शूद्रांच्या वाट्याला आला. व्वा, काय अधिकार होता! या सामाजिक, धार्मिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. कोलते यांनी म. चक्रधरांपासून संत रामदासापर्यंत संत कार्याची परखड चिकित्सा केलेली आहे.

वैदिक संस्कृतीचा मुख्य आधार म्हणजे वेद प्रामाण्य. बुध्द, महावीर, चार्वाक यांच्याप्रमाणेच चक्रधरांनी वेदांवर हल्ला चढवला आणि ईश्वरप्राप्तीसाठी वेदांचा काही उपयोग नाही असे सांगितले. वेद हे विषमतेचे मूळ आहे, वेदांच्या शास्त्राचे उद्दिष्ट ब्राम्हण तसेच क्षत्रियांद्वारा इतर समाजाचे शोषण करणे हेच होते. वेदांचा हा अधिकार आणि त्या आधारावर विषमता पसरवणार्‍या चातुर्वर्ण्याला नष्ट करण्याचा प्रयत्न म.चक्रधरानी केला. बौध्द आणि जैन धर्मानंतर स्त्री आणि पुरुष समानतेची भूमिका म. चक्रधरांनी घेतलेली दिसून येते. त्यांच्या मते स्त्री आणि पुरुष दोघेही संन्यास घेऊ शकतात. तसेच अस्पृश्यतेला म.चक्रधरांनी नकार दिला आहे. अन्य कोणत्याही बाह्य अस्पृश्यतेला ते मानत नव्हते. डॉ. कोलते यांनी म. चक्रधरांच्या या अस्पृश्यता विरोधी विचारांबद्दल लिहिताना असे म्हटले आहे, मी तर असे म्हणायला तयार आहे की, अस्पृश्यता उद्धाराचा श्री गणेशा चक्रधरांनीच केला. त्या काळात चक्रधरांनी बाईला विटाळ येतो या कल्पनेचा अगदी वैज्ञानिक म्हणता येईल असा अर्थ लावून विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे, सर्वज्ञ म्हणितले; वाइ; ये नवद्वारे; जैसी नाकी सेंबुड ए; डोळ्यो चीपूड; काना मळ; तोंडा थुंका ए; गुदिव्दारा मळ एति; एसी हे एकि धातू स्त्रवे; मग निवर्ते; याचा विटाळ धरु नए; अशा प्रकारच्या विषमतेचा आणि अस्पृश्यतेचा विरोध करीत म.चक्रधरांनी, स्वत:ला श्रेष्ठ मानून इतरांना कनिष्ठ म्हणणार्‍या पवित्र-अपवित्रतेचे अवडबर निर्माण करणार्‍या ब्राम्हणांना ‘सर्वांधम’ म्हटले आहे.

चक्रधरांच्या तत्वज्ञानामुळे वैदिक संप्रदाय, अद्वैत सिद्धांत, चातुर्वर्ण्य व्यवस्था, सामाजिक विषमता, स्पृश्यास्पृशता, सनातन्यांचे तीर्थक्षेत्र व व्रतदानादी आचार, वेदपुराण आदी शास्त्रांचे महत्व, तसेच धार्मिक कृत्यांचे ठेकेदार ब्राम्हण यांचेही महत्व केवळ शूद्रातिशूद्र जनतेतच नव्हे तर विद्वानांमध्येही कमी व्हायला लागले. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या उपजीविकेत आणि सुखसाधनामध्येही विघ्न निर्माण होऊ लागले. त्यामुळे हेमाद्री पंडितांकडून यांनी म.चक्रधरांची हत्या घडवली. पण चक्रधरांच्या तत्वज्ञानाला बहुजनांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्यामुळे चक्रधरांच्या नंतरही महानुभव पंथ उत्कर्ष पावत राहिला.

म.चक्रधरांच्या हत्येनंतर एक वर्षाने ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. वडिलांनी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे ब्राम्हणाच्या पोटी जन्म घेऊनही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावडांना ब्राम्हणानी जातीत घेतले नाही. ज्ञानेश्वरानी 21व्या वर्षी समाधी घेतली. या थोड्या आयुष्याच्या काळात त्यांनी आपल्याला जातीत सामवून घ्यावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण सनातन्यांनी त्यांना बहिष्कृतच ठेवले. उपनयनचा अधिकार न मिळाल्यामुळे ते धर्म शात्रानुसार ‘शूद्र’च राहिले. ब्राम्हणी धर्मशास्त्राकडून इतका छळ होऊनही ज्ञानेश्वरानी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर ही सनातनी धर्मशास्त्रे बळकट करण्यासाठी केला. या गोष्टीवर डॉ. कोलते यांनी ज्ञानेश्वरांचे मूल्यमापन करताना बोट ठेवले आहे. शास्त्र म्हणोल सांडावे। ते राज्यही तृण मानावे। जे घेवनी ते न मानावे। विष ही वीरु। म्हणजे शास्त्र जर म्हणेल तर सारे राज्य तृणवत समजून त्याचा त्याग केला पाहिजे, शास्त्र जर विषपानाची आज्ञा देईल तर तीही मानली पाहिजे. अशी भूमिका घेऊन ज्ञानेश्वरांनी आपण परंपरावादी असल्याचे सिध्द केले आहे. ज्या बंधनामुळे ते त्रस्त आणि अपमानित झाले होते ते तोडण्यासाठी ते पुढे आले नाहीत. उलट त्यांना अधिक दृढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञानेश्वरीत जुन्या शास्त्रांचे, वेदांचे, चातुर्वर्ण व्यवस्थेचे, व्यावहारिक जातीभेदाचे सर्वत्र समर्थन केलेले आहे. मुळात गीता ही चातुर्वर्ण आणि विषमतेची समर्थक आहे. यज्ञाची व्याख्या त्यांनी स्वधर्म अशी केली. ब्राम्हणांना त्यांनी वर्णामाजी छत्रचामर। स्वर्ग ज्याचे अग्रहार। मंत्र विद्येशी माहेर। ब्राम्हण जे जे पृथ्वी तळीचे देव। असे गौरविले. एकंदरीत म.चक्रधरांनी जे ब्राम्हणवर्ण वर्चस्वविरोधी तत्वज्ञान जन्माला घातले होते त्याच्या बरोबर उलट भूमिका ज्ञानेश्वरांनी घेतली. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यासाठी वारकरी संप्रदायात प्रवेश करून त्याचाही वापर त्यासाठी केला. कारण नामदेवाने स्थापन केलेला वारकरी पंथ विठठल भक्तीखेरीज काहीच मान्य न करणारा होता. त्यात ज्ञानेश्वरांनी सनातन धर्मशास्त्रे, वेद आणि कर्मकांडे घुसविली.

या संदर्भात भाष्य करताना डॉ. कोलते यांनी महाराष्ट्रात इ. स. 1196 ते 1212 या कालखंडात तीन धार्मिक संप्रदाय असल्याचे म्हटले आहे. एक विदर्भात आणि गोदावरीच्या दोन्ही तटावर ज्याचे सूत्रसंचालन नागदेवाचार्यांच्या हाती होते. जो चातुर्वर्ण, स्पृश्यअस्पृश्यता, ब्राम्हण पुरोहितांचे श्रेष्ठत्व यांना विरोध करणारा म चक्रधरांचा महानुभाव संप्रदाय, दुसरा पैठण आणि नेवासे विभागात जो वेद, देवता, ब्राम्हण, चातुर्वर्ण, इत्यादीचे महत्व वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता, असा ज्ञानेश्वरांचा संप्रदाय आणि तिसरा महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर पंढरपूरच्या आसपास जो प्रामुख्याने वैदिक यज्ञयाग तीर्थक्षेत्रे आणि देवांच्या उपासनेचा त्याग करून विठ्ठल भक्तीचा प्रचार करीत होता असा नामदेव आदींचा संप्रदाय.

डॉ. कोलते यांच्या मते महानुभाव आणि वारकरी सांप्रदायात बरेच साम्य आहे. फक्त ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी वेदाचे प्रामाण्य मानले नाही. पण वारकर्‍यांनी ते अप्रत्यक्षपणे मानले. डॉ.कोलते यांनी हा ज्ञानेश्वरांचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे. कारण डॉ. कोलते यांच्या मते, महानुभावपेक्षां वारकरी संतानाच वर्ण विषमतेचे दु:ख जास्तच सहन करावे लागले आहे. बहुतेकांनी आपल्या काव्यात आपल्या हीन जातीचे आणि तिच्यामुळे भोगाव्या लागत असलेल्या छळाचे रडगाणे गायिले आहे. आपले जीवन नष्ट करणारी जीवन व्यवस्था त्यांनी ठोकरून का लावली नाही? मला वाटते हे सर्व परंपरा निर्मित दास मनोवृत्ती आणि त्याचे पोषक ज्ञानेश्वरांचे कर्तृत्व आहे. थोडक्यात डॉ. कोलते यांनी महानुभाव पंथाला अटकाव करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाला हातीशी धरून पुन्हा ब्राम्हणी वर्णवर्चस्व आणि त्याचे समर्थन करणारी वेद इत्यादी शास्त्रे यांचे समर्थन केले. नाहीतर मग न लगे करावे यज्ञयाग। न लगे आणि मंत्रलाग। एक सेवलिया पांडुरंग। अनंत तीर्थेघडतील। असे म्हणणारे नामदेव प्रतिपादली वेदी जे जे धर्म। ते ते आचारावे विहित क्रीयाक्रर्म। जे जे वर्णाश्रमे आले जमा। असावा विश्वास वेद वचनी। असे वेदांचे समर्थन करताना दिसतात.

ज्ञानदेव वारकरी पंथात आले. नामदेव आणि ज्ञानदेव एकत्र येण्याचा परिणाम डॉ. कोलते म्हणतात या प्रमाणे महानुभाव पंथामुळे जी सामाजिक प्रगती जलद गतीने होत होती ती थांबली. महानुभावांशी संघर्ष वाढत गेला आणि सनातन प्रवृत्तीच्या लोकानी पुन्हा आपले आसन स्थिर केले. यालाच धर्म जागृती म्हटले जाते.

नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या नंतर दोन अडीचशे वर्षात अनेक संत होऊन गेले. त्यात एकनाथांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर काही वर्षातच म्हणजे तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचे महाराष्ट्रावर आक्रमण झाले. त्याच्या बरोबर मुस्लीम धर्मही आला. मुस्लीम राजे सत्तेवर आल्यामुळे हिंदू संस्कृतीपुढे आपले अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले. कारण ब्राम्हणासकट अनेक जातीतील लोक मुस्लीम धर्म स्वीकारून सत्ता मिळवू लागले होते. एकनाथासमोर ही परिस्थिती होती. त्यामुळे त्यांच्या अभंग रचनेत, भारुड धर्मगुरुना निरुत्तर करणारा आहे, हिंदू-मुस्लीम दोई। खुदाने पैदा किये भाई। तुर्ककि निष्ठा पाई। हिंदुको पकडकर मुसलमान करो। हिंदुकरीता खुदा चुकला। त्याहून थोर तुमच्या एकला। हिंदूस मुसलमान केला। गुन्हा लाविला देवासी।

वर्ण व्यवस्थेबाबत एकनाथ परंपरावादीच होते. पण व्यवहारात ते एक सज्जन गृहस्थ म्हणून पुढे येतात. अस्पृशाच्या घरी जेवण, अंत्यजाच्या मुलाला कडेवर घेणे या गोष्टीतून त्यांचा लोकव्यवहारातील सज्जनपणा दिसून येतो.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहारावर ज्यांच्या कार्य कर्तृत्वाची लखलखीत मोहोर उठलेली आहे ते संत म्हणजे संत तुकाराम. एकनाथ आणि तुकाराम यांचा कालखंड मुसलमान सत्तेचा असल्याने त्याचा हिंदू धर्मावर काही एक परिणाम होणे साहजिकच होते. ब्राम्हणी पुरोहितांनी मुस्लीमाशी सहकार्य करून आपली स्थाने आणि अधिकार शाबूत ठेवले. परन्तु शूद्राअतिशुद्रा वरील निर्बंध अधिकच कडक केले त्यामुळे धर्मांतर करण्याची प्रवृत्ती या जनतेत वाढीस लागली. डॉ.कोलते यांनी याची सविस्तर मांडणी केली आहे. डॉ.कोलते यांनी लिहिले आहे, इस्लामी धर्म त्यांनी का स्वीकारू नये? हिंदू धर्मात सदैव उच्च वर्णीयांचे गुलाम राहावयाचे, अस्पृश्य म्हणून समाजात हीन राहावयाचे हेच जर त्यांच्या भाग्यात असेल तर त्यांनी यवनी धर्म स्वीकारला तर त्यांची फार मोठी चूक झाली असे नाही. उलट त्यामुळे त्यांना सामाजिक श्रेष्ठ पद मिळत होते. या काळातील ब्राम्हणावर टीका करताना तुकारामांनी म्हटले आहे, सोडिले आचार। व्दिज चाहाड जाले चोर। तिले लपविती पातडी। लेती विजारा कातडी॥ बेसोनिया तक्ता अन्नेवीण पीडिती लोका। मुदलख लिहिणे। तेल तुपावरी जिणे। निचांचे चाकर। चुकलिया खाती मार। या अभंगाच्या शेवटी, तुका म्हणे देवा। काय निद्रा केली धावा। म्हणजे ब्राम्हणानी आता रूढ आचार सोडून दिला आहे, ते चोरी चुगली करतात, मुसलमानांची चाकरी करतात, त्याच्यासारखा वेश परिधान करतात, स्वत: तुप पोळी खाऊन लोकांना अन्नावाचून मारतात, राजा हेच करतो, त्यामुळे राजाचे आणि ब्राम्हणाचे हे अत्याचार देवा तू कसे पाहतोस तू झोपला आहेस काय? असा प्रश्न तुकोबांनी अखेर विचारला आहे. ब्राम्हणाच्या नीती भ्रष्टतेवर तुकारामांनी ठिकठिकाणी चांगले जोडे हाणले आहेत. खोटे काम करणे, शेतकर्‍यांना लुटणे, कोर्टात खोटी साक्ष देणे, जसे बाजारात घोडे विकले जातात तसे आपल्या कुमारी मुलीना विकू लागले आहेत अशा प्रकारची कडवट टीका तुकारामांनी केली आहे. स्वधर्माचे त्यामुळे वाटोळे झाले आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. डॉ. कोलते यांच्या मते धर्म परिवर्तनाला थांबवण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे वर्ण विषमतेला नष्ट करणे. तुकारामांनी हे ऐतिहासिक काम आपल्या परीने केले आहे. ब्राम्हणानी स्वत:च्या अधिकारा पलीकडे समाजाची काळजी केली नाही. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था टिकविण्यातच त्यांचे हितसंबंध असल्यामुळे हीन समजल्या जात असलेल्या जातीतून उदयाला आलेल्या संतांनीच हे काम केले आहे. नामदेव आणि तुकाराम यांच्या जीवन कार्यातून हेच दिसून येते. तुकारामांचे सर्व अभंग हे गोरगरीब जनतेच्या हिताची काळजी वाहणारे आहेत. न देखे डोळा ऐसा हा आकांत। परपीडे चित्त दु:खी होते। भीत नाही आता आपल्या मरणा। दु:खी होता जना न देखवे। तुकारामाच्या अवघ्या जीवनाचे सार वरील अभंगात आहे. लोकांची सेवा आणि विठ्ठल भक्ती यात ते फरक करीत नाहीत. उलट ते संतांची वैशिष्ट्य सांगताना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टती उपकारे। भूतांची द्या हे भांडवल संता। आपुली ममता नाही देही। तुका म्हणे सुख प्रराचीये सुखे।अमृत हे मुखे स्त्रवतसे।

डॉ. कोलते यांनी तुकारामाच्या सर्व वैशिष्ट्याची बारकाईने मांडणी केली आहे. त्यांच्या समाजजागृतीमुळेच छ.शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली असा निष्कर्ष काढला आहे. तो मुळातूनच वाचावयास हवा.

संत तुकारामानंतर महाराष्ट्रात उदयास आलेल्या प्रमुख संता पैकी एक संत रामदास होते. डॉ. कोलते यांनी संत रामदासाच्या जीवनकार्याचे वर्णन करीत ते केवळ ब्राम्हण जातीची उन्नती साधू इच्छित होते, त्यांचा सगळा उपदेश ब्राम्हणासाठीच होता. वर्ण विषमतेचे समर्थन आणि ब्राम्हणी वर्ण वर्चस्वाचे गुणगान हे त्यांच्या एकंदर कार्याचे अंग होते. बहुजनाना तुच्छ लेखण्याची वृत्ती त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दिसून येते. संत रामदासांच्या कार्याचे वर्णन करण्यासाठी डॉ. कोलते यांनी न्यायमूर्ती रानडे यांचेच उद्धरण दिले आहे. त्या उध्दरणातून संत रामदास यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र धर्माचे कसे वाटोळे झाले हेच दिसून येते. रानडे म्हणतात, या शतकाच्या(सोळाव्या) पूर्वार्धात वर्ण आणि जाती व्देषाचा पूर्ण अभाव होता. पण उत्तरार्धात तीच एकता असंभव झाली. ते पुढे लिहितात, या वेळी ब्राम्हण वर्ग आपल्याला शासक मानायला लागला आणि त्याने सर्व विशेष अधिकारायुक्त सवलती प्राप्त केल्या. त्या शिवाजीच्या राज्य व्यवस्थेतही नव्हत्या. राज्याच्या कचेर्‍या, कार्यालये, आणि दरबाराच्या कारभारात सर्व ठिकाणी कोकणस्थ ब्राम्हणानीच कारकुनाच्या जागा घेऊन टाकल्या. त्यांना मोठाले पगार मिळत होते. ते पुढे लिहितात, या सवलती बरोबर आपल्या कथित पावित्र्यामुळे त्यांना दान धर्माचे सर्व अधिकार प्राप्त होते…. सर्व ब्राम्हणांना मोठमोठ्या धार्मिक उत्सवात जे संख्येने तीस तीस हजार असत त्यांना सरकारी खर्चाने पंच पक्क्वानाच्या मेजवान्या दिल्या जात. केवळ जातीवर्चस्वाचे हे उदाहरण अठराव्या शतकाच्या काळाची विशेषता होती. यामुळे समाजाचे जे अध:पतन झाले त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही……रामदास पुरस्कृत महाराष्ट्र धर्माचा प्रभाव एवढा पडला की व्यवहारात याचा अर्थ ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ एवढाच मर्यादित राहिला. खरे गुण नष्ट झाले आणि महाराष्ट्रात त्याचे स्वाभाविक दुष्परिणाम दिसू लागले.

न्यायमूर्ती रानडे यांच्या या वास्तव टीकेवर डॉ. कोलते यांनी उपहासात्मक मल्लीनाथी करताना म्हटले आहे, आपले ध्येय आणि महत्वाकांक्षेला पेशव्यांच्या राज्यात फळ आलेले पाहून रामदासांचा आत्मा संतुष्ट झाला असेल यात शंका नाही.

अशा पद्धतीने डॉ. कोलते यांनी म.चक्रधर ते संत रामदास यांच्या काळाचा सामाजिक दृष्ट्या मागोवा घेतला आहे. यात एकच त्रुटी आहे ती म्हणजे, या सर्वांचा त्या वेळच्या अर्थकारणाशी काय संबंध होता याचा उहापोह केलेला नाही. त्यांनी त्या काळाच्या बहुजनांच्या शोषणाचा उल्लेख केला आहे, परंतु विचारांच्या क्षेत्रातील लढाई ही अखेर आर्थिक हितसंबंधाच्या जोपासण्यासाठी लढाई असते. त्याची परस्पर परिणामी पद्धतीने संगती लावणे गरजेचे असते. बुध्द ते तुकारामा पर्यंत जातीव्यवस्थेवर, ब्राम्हणीवर्ण वर्चस्वावर अनेक कोरडे ओढले गेले पण तरी जातीव्यवस्था टिकून राहिली. इतकेच नव्हे तर बळकट होत गेली. याचे कारण जाती आधारित उत्पादन व्यवस्थेला या काळात कोणीही धक्का लावला नाही आणि ते त्या काळाच्या मर्यादेत शक्यही नव्हते. भांडवलशाहीनेच जाती आधारित उत्पादन व्यवस्थेवर अखेरचा घाव घालून तिची कबर खोदली. पण ती अजून पूर्ण गाडली गेलेली नाही. आणि आता वर्तमान काळी पुन्हा रामदास पंथी सत्तेवर आलेले आहेत. ते जुने मुडदे उकरून काढण्याचे काम करीत आहेत. पुन्हा एकदा बुद्धापासून चालत आलेली जात-वर्ण-स्त्रीदास-विषमतेच्या विरोधातील लढाई लढणे गरजेचे बनले आहे.

सुभाष थोरात

संपर्क : 9869392157

पुस्तकाचे नाव : मराठी संतांचे सामाजिक कार्य
लेखक : डॉ. वि. भि. कोलते
प्रकाशक : लोकवाडःमय गृह
पत्ता : भुपेश गुप्ता भवन, 85, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई - 25
किंमत : रुपये 200/-
पृष्ठे : 129