Categories
नरबळी

नाशिक जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांचा नरबळी

फेब्रुवारी – २०१५

नुकतीच नाशिक जिल्ह्यात कौर्याची परीसीमा गाठणारी एक घटना घडली. घटना समजताच जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मी नाशिक पासुन सत्तर कि.मी वर असलेल्या हर्ष टाकेद या आदिवासी वाड्यावर पोहचलो.मांत्रिक बच्चीबाईला झोपडीवजा कौलारू घरात राहत होती. तीच्या अंगात देवीचा संचार येत असे.घरातील देव्हार्‍यातील देवांचा कौल घेत ती अघोरी उपचार करत असे.तीच्याकडे एक घोडा होता. घोडा म्हणजे जनावर नव्हे तर दुसरी एक महिला.त्या दुसर्‍या महिलेच्या अंगावर बच्चीबाई घोडयासारखी स्वार होत असे.घोड्याच्या अंगात आल्यावर प्रश्न विचारून लोकांना तोडगे सांगत असे. बच्चीबाईला शेजारी एक मठ बांधायचा होता परंतु सात महिलांचा बळी घेऊन त्या जागेत पुरण्याचा सल्ला मांत्रिक बच्चीबाईला तिच्या गुरूने दिला होता. घोडा बनलेल्या महिलेस तीची सासू काशीबाई वीर यांचा त्रास होता.सासुचा बळी घेऊन दुहेरी हेतू साध्य होणार होता.शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील दांडवळ येथील काशिनाथ दोरे आणि गोविंद दोरे यांची बहीण टाकेद हर्ष येथे राहते. या दोघांनी आपल्याला सुख मिळत नसल्याचे बहिणीला सांगितले होते. तिने गावातील मांत्रिक बच्चीबाईकडे जाण्यास सांगितले. मांत्रिक बच्चीबाईने तुमची आई आणि बहीण चेटकीण असल्याने तुम्हाला सुख लाभत नाही. त्यामुळे या दोघींचा बळी द्यावा लागेल,‘ असे सांगत त्या दोघींना आणण्यास सांगितले. दिवाळीच्या आमावशेला या दोघा भावांनी आई बुधीबाई आणि बहीण राहीबाई पिंगळे यांना तिच्याकडे नेले. मांत्रिक महिलेने दोघींना नग्न करून तीन दिवस उपाशी ठेवत मुलांसमोर अमानुष मारहाण केली. आणखी मार वाचविण्यासाठी बुधाबाईने करणी केली आहे, अशी शेवटी नाईलाजाने कबुली दिली.मग बच्चीबाईने बुधीबाईच्या मानेवर पाय देवुन मारून टाकले. नंतर पुजेसाठी डोळे काढण्यात आले.राहीबाई मात्र प्रसंगावधान राखून पळून गेल्याने वाचली. नग्न अवस्थेत रात्री डोंगरातून चाळीस किलोमीटर पायी चालत राहीबाई वेड्यागत घरी पोहचली. त्यानंतर ’तु पोलीसांत गेली तर तुझ्यावर करणी करून मारून टाकील’ ,अशी धमकी मांत्रिकाने दिली. परंतु दोन महिन्यांनंतर श्रमजीवी संघटनेच्या भगवान मधे या कार्यकर्त्याने हे प्रकरण उघडकीस आणले. महत्वाचे म्हणजे मांत्रिक ही त्यांच्या भावाची सासु असुनही नाते दुर ठेवून घटनेचा पाठपुरावा केला. पोलीसांना मांत्रिकाच्या घराजवळ दोन मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह विहिरी सारख्या उभ्या खड्ड्यात उभे करून पुरले होते. पायाशी नैवेद्य तर डोक्यावर करणी असणार्‍या पुरूष व स्त्रीयांचे कपडे व त्यावर माती टाकलेली दिसून आली. दिवसभर प्रसार माध्यमांच्या व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावास छावणीचे रुप आले होते.तपासाअंती आणखी बळी घेतले असल्याची भिती निर्माण झाली आहे.तशी शक्यता शेजारील एका महिलेने व्यक्त केली आहे.पोलीसांना सुरुवातीला या प्रकरणाची माहिती असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.अंधश्रद्धेची पालेमुळे समाजात किती खोलवर रुजली आहे, या घटनेमुळे समोर आले आहे.

कृष्णा चांदगुडे, नाशिक

संपर्क : 9822630378