बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे यांच्या वतीने मगर संक्रांतीनिमित्त दि.18 जानेवारी 2015 रोजी ‘ज्योतिष: शास्त्र, श्रद्धा की अंधश्रद्धा’ या विषयावर सायंकाळी 6 वाजता भारतीय इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.श.ना.नवलगुंदकर, मा.कुलगुरू, पुणे विद्यापीठ हे होते. सदर चर्चासत्रामध्ये शास्त्र या अनुषंगाने बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष मा.नंदकिशोर जकातदार तर श्रद्धा या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे मा.लक्ष्मीकांत काण्णव मार्गदर्शन करणार होते. अंधश्रद्धा या अंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मला मांडणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं.
अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांशी यापूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान ज्योतिषांशी वादावादी केल्याची कल्पना देत संयोजकांबद्दल सतर्क केलेलं होतं. हा पूर्वानुभव लक्षात घेत स्टेजवर गेल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये माझे नाव प्रथम पाहून संयोजकांच्या हेतुविषयी सुरवातीलाच शंका आली. कारण माझ्या मांडणीनंतर पुढचे दोनही वक्ते आणि अध्यक्ष ज्योतिष विषयाशी संबंधित होते. पण संधी आलीच आहे तर सोडायची नाही असा विचार करत एल.सी.डी.प्रोजेक्टरच्या सहाय्याने मांडणी करायची असं ठरवलं. सूत्रसंचालिका अॅड.मालती शर्मा यांनी मला वीस मिनिटे मांडणी करण्यासाठी दिलेली होती. श्रद्धेला आमचा अजिबात विरोध नाही तर शोषणाला विरोध आहे. व्यक्तीचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण होत असेल तर मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हस्तक्षेप करणारच अशी ठाम भूमिका सुरवातीलाच स्पष्ट केली. ग्रह तार्यांच्या दृष्टीने आपलं अस्तित्व किती किरकोळ आहे हे स्पष्ट करणारा ‘पॉवर ऑफ टेन’चा स्लाईड शो सादर केला. ग्रह तार्यांच्या वैज्ञानिक माहितीचा आढावा घेतला तरी कोणी हस्तक्षेप केला नाही. या विवेचनानंतर कुंडली कशी मांडतात हे सांगत सूत्रसंचालिका अॅड.मालती शर्मा यांची रास सिंह कशी आणि नक्षत्र मघा कसे काढले जाते हे ज्योतिषाच्या अंगाने मांडल्यानंतर उपस्थित अचंबीत न होतील तरच नवल. त्यानंतर मग त्यांची कुंडली मांडत ज्योतिषी कडक मंगळ कसा ठरवतात, आठवा गुरू कसा काढतात, छत्तीस गुण कसे जुळवतात याची मांडणी केली. ज्योतिष हे वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि स्त्री पुरूष असमानतेचे समर्थन करत लोकशाहीविरोधी भूमिका घेत असल्याचे त्यांच्याच मांडणीतून सोदाहरण दाखवून देत होतो. राशींचा खडा किंवा मंगळाचा खडा अंगठीत घालणार्यांनी आज मंगळ आणि रास आकाशात पाहण्याची तसदी घेतली असती तर त्यांची आणि समाजाची ज्योतिषाच्या जोखडातून सुटका झाली असती हे ठामपणे प्रतिपादन केले. वास्तुशास्त्राच्या भंपकपणावर आपला वेळ आणि पैसा खर्च करणार्यांच्या फसवणुकीविषयी पृथ्वी स्वत:भोवती कशी फिरते आणि दिशांचं गणित कसं कोलमडतं हे स्लाईड शोच्या माध्यमातून उदाहरणासहीत दाखवून दिल्यानंतर हसून हसून उपस्थितांची पुरेवाट झाली. व्याख्यानाच्या मध्यंतरी अध्यक्षांना आणखी किती वेळ मी बोलू शकतो असं विचारल्यानंतर ‘आणखी दहा मिनिटं’ असा मला जादाचा वेळ दिला. तब्बल पन्नास मिनिटं मी मांडणी करत होतो. वीस मिनिटांचं रूपांतर पन्नास मिनिटांमध्ये केव्हा झालं हे श्रोत्यांना समजलही नाही. कारण संपूर्ण कालावधीत ज्योतिषांनी निर्माण केलेल्या फसवाफसवीच्या उदाहरणांमुळे श्रोते हसण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते. एकाही श्रोत्याने प्रश्न विचारायचं किंवा मला थांबवायचं धाडस केलेलं नव्हतं. कारण त्यांनीच केलेली मांडणी शोषणास कशी कारणीभूत होते हे मी उदाहरणासहीत दाखवून देत होतो. भाषण संपवून खुर्चीवर बसत असताना सूत्रसंचालिका अध्यक्ष आणि माझ्यानंतरचे वक्ते काण्णव यांनी भाषण खूप छान झाल्याचं सांगितलं.
मिलिंद देशमुख, संजय बनसोडे, दिपक गिरमे, शालिनीताई ओक, सुयश तोष्णीवाल, मंगेश कोकरे, निखील शिंदे, नलवडे काका, अक्षय, अतुल सवाखंडे, संदीप शिंदे आदि पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसरातील कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
* गुण जुळवणे हा प्रकार खरं तर आकड्यांचा खेळ आहे. आणि आकड्यांचा खेळ बहुजनांनी खेळला तर त्याला मटका (बेकायदेशीर धंदा) म्हणतात, आणि यांनी खेळला तर मात्र त्याला संस्कृती आणि परंपरेचं अधिष्ठान आहे, त्यांच्या शब्दाला किंमत आहे असा दुटप्पीपणा अजिबात चालणार नाही.
* कडक मंगळ ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला. का मंगळानं एजंट नेमलेत?
* कडक मंगळाच्या माध्यमातून मंगळाला, साडेसातीच्या माध्यमातून शनीला तर कालसर्पयोगाच्या माध्यमातून सापाला यांनी बदनाम केलं. मंगळ, शनी अथवा सापाला खरोखरच भावना असत्या तर त्यांनी कोट्यावधी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा यांच्यावर दाखल केला असता. पण भावना असणार्या माणसाला कळत नाही तिथं यांचं काय चालणार म्हणा!
* मंगळाचा खडा विकणार्यांनी खडे काय मंगळावरून आणलेले आहेत काय? ज्या मंगळावर भारताचं यान पोहोचायला 300 दिवस लागतात त्या मंगळाच्या नावाने खडे विकणार्यांच्या भंपकपणाची कीव वाटते.
* पृथ्वी स्वत:भोवती चोवीस तासात एक चक्कर मारत असेल तर तथाकथीत वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं शौचालयसुद्धा चक्कर मारणारच. आणि शौचालय पश्चिमेला बांधलं तर शौचाला जास्त होतं काय? सुशिक्षितांनी किती खुळेपणा करायचा याचा धरबंधच राहिलेला नाही.
अशी वाक्यं उच्चारूनसुद्धा एक अवाक्षरही बोलायचं धाडस ज्योतिषांच्या बालेकिल्ल्यात या कार्यक्रमाला उपस्थित असणार्यांच्यामध्ये नव्हतं. कारण सोपं होत त्यांचीच मांडणी मी फक्त त्यांच्यापुढे चिकित्सेच्या रूपामध्ये ठेवलेली होती.

माझ्या भाषणानंतर त्र्यंबकेश्वरचे पुरोहित लक्ष्मीकांत काण्णव हे ‘ज्योतिषासंदर्भातील श्रद्धा’ या विषयावर मांडणी करण्यासाठी आले आणि शिंदे सरांनी ज्योतिषशास्त्राबद्दल इतकी माहिती दिली आहे की, मी आता काय बोलणार?’ अशी सुरवात करत काय बोलावं हे सुचत नसल्याचे स्पष्टपणे जाणवून दिले. चारपाच पानं लिहून आणलेल्या भाषणातही काही उतारे वाचत त्यांची गाडी ‘श्रद्धा ऐवजी श्राद्ध’ या विषयावर मांडणी करत सुटली. खरं सांगायचं तर ते अक्षरश: गोंधळलेले होते. वीस मिनिटांऐवजी पंधरा मिनिटांतच त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.
काण्णव यांच्यानंतर मा.नंदकिशोर जकातदार हे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनीसुद्धा शिंदे सरांनी अत्यंत चांगली मांडणी गेली. ज्योतिषाबद्दल त्यांचा अभ्यास फारच चांगला आहे. खरं म्हणजे आपण त्यांना ज्योतिषरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे’ अशी मांडणी करत सुरवातीलाच आपली असहायता स्पष्ट केली होती. मी उपस्थित केलेल्या शोषणविषयक बाबींचा त्यांनी स्वीकार केला आणि ज्योतिषामध्ये जी चुकीची कर्मकांडे आहेत त्यांचं होमहवन आपण करायला पाहिजे असा सल्ला त्यांनी आपल्या ज्योतिषबांधवांना दिला. ‘ज्योतिष फक्त ब्राम्हणांनीच सांगायचा पाहिजे असं नाही तर बहुजनांनीसुद्धा सांगितलं पाहिजे’ असं त्यांना सांगण्यास भाग पडलं. कारण माझ्या भाषणामध्ये ज्योतिष ब्राम्हणवर्गाला कसं वरचं स्थान देतं हे आकडेवारीनुसार मांडलेलं होतं. ज्योतिष हे शास्त्रच आहे याचा कोणताही पुरावा न देता ते शेवटपर्यंत सांगत राहिले एवढं मात्र नक्की. ज्योतिषामध्ये जकातदार कुटुंबियांचं किती महत्वाचं योगदान आहे याचा ते उहापोह करत होते. माझ्या वडिलांनी आणि मी वर्तवलेलं भविष्य कसं खरं ठरायचं, हे ते वारंवार सांगत होते, फक्त विना पुरावा.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ.नवलगुंदकर यांनी श्रद्धा या विषयाच्या अनुषंगाने विवेचन केलं. अध्यक्षीय भाषण केवळ पंधरा मिनिटातच आटोपतं घेत श्रद्धेला कोणीही तडा देऊ नये एवढाच त्यांनी उहापोह केला. भाषणादरम्यान ज्योतिषाबद्दल एक अवाक्षरही ते बोलले नाहीत. खरंतर अध्यक्षांनी वक्त्यांच्या मांडणीचा समाचार घेत आपली मतं व्यक्त करायची असतात याचा कोणताही संकेत डॉ.नवलगुंदकर यांनी पाळलेला नव्हता.
आभार प्रदर्शनानंतर श्रोत्यांपैकी एकाने जकातदार यांना ‘ज्योतिष शंभर टक्के बरोबर असतं का? आणि ज्योतिषाला ग्राहक कायदा लागू करावा का?’ असा प्रश्न स्टेजवर असतानाच विचारला. तेव्हा कायदा जरूर लागू करावा त्याला आम्ही घाबरत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यांचं उत्तर झाल्यानंतर ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान देणारा पहिला ज्योतिषी’ अशी बिरूदावली स्वत:च लावून घेणारे आणि शर्टवर जाहिरातीच्या बोर्डसारखी बदलत जाणारी डिजीटलची पट्टी मिरवणार्या छाजेड यांनी माझ्याकडे बोट करत ‘मेरा इनसे एक सवाल है’ असं म्हटलं आणि ते मला प्रश्न विचारणार एवढ्यात जकातदार यांनी त्यांना खाली बसवलं. बहुतेक ज्योतिषाची आणखी अब्रु निघण्यात काहीच अर्थ नाही असा विचार जकातदार यांनी केला असणार. हे एव्हाना उघड झालेलं होतं. कार्यक्रमानंतर श्रोते कम ज्योतिषी’ ‘तुमचं भाषण चांगलं झालं’ असं हातात हात देत आवर्जून सांगत होते आणि सांगणार्यांच्यामध्ये जकातदार कुटुंबीयपण सामील झालेलं होतं हे विशेष.
कार्यक्रमानंतर दुसर्याच दिवशी दि.19 जानेवारीला जकातदार यांचा फोन आला. ‘तुमचं भाषण उत्तम झालं. इथून पुढे आपण नेहमी भेटत राहू आणि दोघे मिळून काम करू’ त्यांना फक्त ‘हो’ म्हणण्याशिवाय मी काहीच बोललो नाही. कारण एका भाषणाने ज्योतिषीही विचारप्रवण बनले होते याचे ढळढळीत उदाहरण होते, आणि याची सुरवातही ज्योतिष्यांच्या बालेकिल्ल्यातून झाली होती. शेवटी संवाद हे दरी कमी करण्याचे फार मोठे माध्यम आहे. प्रामाणिक हेतुने मानवी कल्याणासाठी जकातदारांसारखे लोक भूमिका सोडून पुढे यायला तयार असतील त्यांचे आम्ही स्वागतच करतो. डॉक्टरांच्या जाण्याने अंनिसची चळवळ अजूनही संपलेली नाही किंबहुना तोडीस तोड उत्तरं देणारी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे याची प्रचिती देण्यात आपण पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत याचा मला विशेष अभिमान वाटतो.
– प्रा. डॉ. नितीन शिंदे
लेखक संपर्क : 9860438208