Categories
भांडाफोड

कथा अकलेच्या कांधाची की टोमॅटोची ?

जानेवारी - २०१५

२० ऑगस्ट २०१३, या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या झाली. हत्येनंतर वेगवेगळ्या लोकांची चौकशी चालू होती. त्यातूनच पुण्यामध्ये डायबेटीसवर उपचार करणाऱ्या लोहिया अ‍ॅॅक्युपंक्चर सेंटरमधील तथाकथित डॉ. सुषमा कोठारी हिला अटकही झाली. म.अं.नि.स., लोकांना उपचाराच्या नावावर गंडवणाऱ्या तथाकथित बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नेहमीच करत असते. जादूटोणा कायदा पारित होण्याआधी अशा लोकांवर ड्रग्ज आणि मॅजिक रेमिडीज ऑबजेक्शन अ‍ॅॅक्ट खाली गुन्हे दाखल होत होते. त्याच दरम्यान पुणे जिल्ह्यामधील राहू पिंपळगाव येथे एक तरूण कॅन्सरवर औषध देत असतो अशी माहिती समोर आली. भवानीनगर येथील म.अं.नि.स.चे कार्यकर्ते भारत विठ्ठलदास हे त्या बाबाकडे जाऊन तिथे दिले जाणारे औषध घेऊन आले. कॅन्सरवर रूग्ण कमी असल्याने येणाऱ्याची संख्या कमी होती. म्हणून नंतर नितीन थोरात (बाबाने) या अल्पशिक्षित तरूणाने ‘देऊळ’ सिनेमा डोळ्यासमोर ठेवून कमी कष्टात पैसे कमवण्याची कल्पना गावातील लोकांना दिली. सर्वांनी ती कल्पना उचलून धरत अशी अफवा पसरली की, नितीन थोरात यांना फिरंगाई देवीने दृष्टांत दिला असून ५२ आजारांवर उपचार करणारे औषध देण्याचे वरदान देवीने दिले आहे. तसेच देवीच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिरात दानपेटी ठेवण्यात आली. वनखात्याच्या जवळपास ३ एकर जागेवर अतिक्रमण करून बांधकामही केले.
बघता बघता या बाबाकडे महाराष्ट्रातील तसेच बाजूच्या राज्यातून लोकांची रीघ लागली. येणा-यांची संख्या लाखांवर गेली. त्यात शहरी सुशिक्षित होते. गावाकडची माणसे होती. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न उद्भवला. अपघातांचे प्रमाण वाढले. पण गमतीची गोष्ट म्हणजे पोलीस खाते, वन खाते, आरोग्यविभाग या पैकी कुणीही याची दखल घेतली नाही. उलट मा. शरद पवारांनी देखील औषध घेतले आहे आणि त्यांच्याच आशिर्वादाने वनखात्याची जागा बाबांना मिळाली आहे अशी अफवा पसरवण्यात आली. बाबांचा आणि त्यांच्या चेल्यांचा दबाव दिवसेंदिवस वाढतच होता. आता मात्र जागरूक पत्रकार राजेंद्र झेंडे, संतोष शेंडकर, विशाल पोखरकर यांनी बाबाचे प्रकरण उजेडात आणण्याचा चंग बांधला.
२० सप्टेंबरला डॉ. दाभोलकर यांचा खुनी सापडत नसल्याने पुलावर धरणे आणि निदर्शने करण्यासाठी मुक्ता दाभोलकर, नाशिकहून डॉ. गोराणे आले होते. सर्वांनी बाबाच्या विरोधात ग्रामीण अधिक्षक मनोज लोहिया यांना निवेदन दिले. याच काळात मीडियाच्या सोनावणे यांनी बाबांच्या कार्यपद्धतीचे स्टिंग ऑपरेशनदेखील केले. आता बाबाच्या लक्षात आले की, आपले बिंग लवकरच फुटणार म्हणून त्यानेच मंदिराच्या जागेवर बोर्ड लावला “भोंदू बाबा पासून सावधान ! येथे कोणतेही उपचार केले जात नाहीत. अफवांवर विश्वास ठेऊ नका.” आहे की नाही, चोराच्या उलट्या बोंबा….!
बाबाने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पत्रकार परिषद घेऊन एक कोटी रूपयांचा दावा अंनिस संघटनेवर करणार असल्याचे जाहीर केले. अंनिसच्या नलावडे यांची छावा संघटनेच्या पाटील या पदाधिकाऱ्याशी ओळख होती. तुम्ही बाबाचे का समर्थन करता असे नलावडे यांनी विचारताच त्यांनी अजब खुलासा केला. बाबा मराठा आहेत आणि अंनिस ब्राह्मण बुवाबाबांवर कारवाई न करता मराठा बुवाबाबांचेच मागे का लागतात? त्यांनी देखील बाबाचे औषधाने कॅन्सर बरा होतो असा दावा केला. ह्यावर मिलिंद देशमुख यांनी असा प्रती सवाल केला की, जगभरचे शास्त्रज्ञ या आजारावर ठोस औषध शोधण्यात अजून पूर्ण यशस्वी झाले नसताना आपल्या बाबाने असे काय संशोधन केले आहे हे तरी स्पष्ट करावे.

या प्रश्नावर मात्र नलावडे निरूत्तर झाले. त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
दरम्यान, देशभर रामपाल बाबाचे प्रकरण उघडकीस आले. एका टी.व्ही.चॅनलने राजकारणी लोकांमुळे बुवाबाबांचे प्रस्थ वाढत आहे का असा सवाल चर्चेला घेतला होता. तेव्हा मिलिंद देशमुख यांनी नितीन थोरात या बाबाचे उदाहरण देऊन, त्याने मा.शरद पवार यांचे नावाचा कसा दुरूपयोग केला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर लगेचच बाबाने स्वतःहून काही दिवसांसाठी औषध देण्याचे बंद केले. नंतर टप्प्याटप्प्याने उसाचे हंगाम संपेपर्यंत औषध देण्याचे बंद केले आहे. आतापर्यंत पत्रकारांनी बाबाच्या जमा झालेल्या पैशाबाबत, वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या पॉपर्टीची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच देण्यात येणाऱ्या औषधामध्ये स्टेरॉईड असण्याचा अंदाज केला आहे. ज्यामुळे रोग्याला तात्पुरते बरे वाटे. पण पोलिसांनी औषधाचे नमुने बाबाच्या नकळत न घेता बाबाकडूनच मागून घेतले त्यामुळे त्यामध्ये काही आक्षेपार्ह निघाले नाही. वनखात्याने सुद्धा बाबालाच अतिक्रमण काढण्याची विनंती केली. त्यामुळे बाबाने थोडे अतिकमण काढल्यासरखे केले पण वनखाते अशा प्रकरणात गुन्हा का दाखल करत नाही? यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज करण्याची तयारी नंदिनी जाधव या अंनिस कार्यकर्तीने केली आहे. या जागेवर २ लहान मुलांचे मृतदेह सापडल्यावर आणखीनच खळबळ उडाली आहे. औषधाचे रांगेत उभे थांबून काही रूग्ण दगावले आहेत त्याची देखील नीट नोंद पोलिसांनी घेतली नाही. मागच्या महिन्यातच कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याने. नवीन आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला अंनिसचे शिष्टमंडळ भेटले आहे. बारामतीचे उपअधिक्षक मा. रवींद्रसिंह परदेशी यांना देखील जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा महाजन आणि जिल्हा पदाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. स्थानिक कार्यकर्ते भारत विठ्ठलदास कारवाईसाठी पोलिसांकडे तगादा लावत आहेत.

विश्वास पेंडसे, पुणे
लेखक संपर्क : मोबा. ९४२०४२८७७५