चळवळीत प्रत्यक्ष संघर्ष करत असताना कार्यकर्त्यांवर अनेक वेळा जीवघेणे प्रसंग गुदरत होते. अशा प्रसंगात दाभोलकर या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपली व संघटनेची संपूर्ण ताकत सर्व पातळीवर उभी करत.
अशाच काही जीवघेण्या प्रसंगात सापडलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत.
गणपतीला ओल्या वस्त्राने 21 प्रदक्षिणा घालणारा, सतत देवाचे नामस्मरण, पूजा-अर्चा करणारा देवभोळा माणूस एकदम देव-धर्म न मानणारा कसा होऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे माझे पती रवींद्र बोर्लीकर…..
तसं बघता माझ्या माहेरचे सर्वच लोक पुरोगामी. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे. माझ्या भावाने तर या कामासाठी स्वत:ला वाहूनच घेतलेले. यामुळे माझे पती माहेरच्यांना सतत नावे ठेवायचे. मी जर त्यांच्या कर्मकांडाला विरोध केला असता तर संसार मोडून पडला असता.
अशा कट्टर माणसाला बदलायचे कसे हा विचार चालू असताना दै. सकाळमध्ये ‘ठरलं डोळस व्हायचं’ ही लेखमाला वाचनात आली. याचे लेखक होते डॉ. नरेंद्र दाभोलकर. मुलगा नेहमी वडिलांना म्हणायचा की, ह्या निर्जीव गोष्टींसाठी(मूर्ती, देव) किती वेळ आणि पैसा वाया घालवता? या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की ते नास्तिक झाले.
त्यानंतर ते झपाटल्यासारखे दाभोलकरांची पुस्तके वाचू लागले. अंनिसचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोचावेत म्हणून सतत प्रयत्न करत राहिले. दाभोलकर किती बुद्धिमान त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं बिनतोड उत्तर मिळतं म्हणून दाभोलकरांची भाषणं कधीच चुकवत नसत. यासाठी त्यांनी स्वत:ला अंनिसच्या कामात झोकून दिले. बुवा-बाबांपासून आणि अंधश्रद्धेपासून लोकांना शहाणे करणे हे दाभोलकरांचे काम आपणच केले पाहिजे असा त्यांनी निश्चय केला.
पिंपरी चिंचवडमध्ये नरेंद्र महाराजांचं प्रवचन होते माझे पती व अरविंद पाखले नरेंद्र महाराजाचा पर्दाफाश करणारी पोस्टर्स लावत होते. त्यावेळी त्यांच्या भक्तांनी(गुंडांनी) माझे पती रवींद्र बोर्लीकर आणि अंनिस कार्यकर्ते अरविंद पाखले यांचं अपहरण केलं. त्यांना एका गोदामात डांबून ठेवले आणि दाभोलकरांचे काम करता म्हणून प्रचंड मारहाण केली. ते शिव्या देत होते. खूप प्रयत्नानंतर त्यांना सोडवण्यात आम्हाला यश आले. यावेळी अंनिस कार्यकर्ते श्रीराम नलावडे यांची मदत झाली. दाभोलकर लगेच येऊन भेटून गेले आणि त्यांनी खूप धीर दिला. दाभोलकरांनी आम्हाला सर्वतोपरी मदत केली. यामुळे खचून न जाता अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
दाभोलकरांचा पाठीवरचा हात म्हणजे त्यांच्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते असं माझे पती नेहमी म्हणतात. त्यामुळेच नरेंद्रबुवा प्रकरण कोर्टात चालू असताना त्यांनी गीतेची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतली होती. या विचारांमुळेच आम्ही दोघांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यावर कोणतेही कर्मकांड न करता त्यांचे दहन केले.
मला खूप बरं वाटतं की, दाभोलकरांमुळे माझा देवभोळा नवरा पुरोगामी झाला. कारण पुरोगामी बनायला विचारांची ताकद लागते ती फक्त दाभोलकरांमुळे मिळाली.
–राधिका रवींद्र बोर्लीकर