Categories
अधिवेशन

त्रिदशकपूर्तीच्या अंतरंगात

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती निमित्ताने 9 ऑगस्टला होणार्‍या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि 10 व 11 ऑगस्टला होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी सप्टेंबर 2018 महिन्यातच सुरू झाली. पूर्वतयारीच्या आतापर्यंत एकूण 8 बैठका झाल्या. भूपेश गुप्ता भवन दादर, कॉम्रेड शामराव परुळेकर सभागृह ठाणे व कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे झालेल्या सर्व बैठकांना कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि इतर जबाबदारी घेतलेल्या सर्वच कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. साधारणतः मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इत्यादी जिल्ह्यांतील सर्वच लहान-मोठ्या कार्यकर्त्यांवर संयोजनाची जबाबदारी आपसूकच येऊन पडली. अर्थात, ही जबाबदारी पेलायला सर्व कार्यकर्तेपुढे आले आणि ‘दिवस आमुचा येत आहे,’ अशा थाटात सर्वच कार्यकर्तेसहभागी होऊ लागले. जबाबदार्याी घेऊ लागले, सूचना करू लागले, चर्चा घडू लागल्या, स्वतंत्र बैठका घेऊ लागले आणि हळूहळू वातावरणनिर्मिती होऊ लागली, हे सर्व करत असताना शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानाची तीव्रतेने आठवण होत होती आणि ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही,’ असा पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहर्याहवर स्पष्टपणे जाणवत होता.

पहिली बैठक 30 सप्टेंबर रोजी भूपेश गुप्ता भवन येथे साधारण तीस कार्यकर्त्यांसमवेत झाली आणि तारखा निश्चित करण्यात आल्या. तारखा निश्चित करताना थोडी मतमतांतरे देखील झाली. कारण मुंबईचा लहरी पाऊस. तो खूप झाला की, काही खरं नाही आणि सगळंच भरून काढेल, ही भीती मुंबईकरांच्या मनामध्ये होती; परंतु 9 ऑगस्ट हा समितीच्या निर्माणाचा दिवस असल्यामुळे कार्याध्यक्षांचा आग्रह 9, 10, 11 ऑगस्ट या दिवसांसाठी होता; शिवाय आंतर्राष्ट्रीय विमानतळ, प्रसिद्धी माध्यमांची सहज उपलब्धता, आर्थिक राजधानी, रेल्वे सेवा इत्यादी बाबींचाही विचार झाला. खूप चर्चा झाल्यानंतर या दिवसांवर शिक्कामोर्तब झाले आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली.

दुसरी बैठक कॉम्रेड शामराव परुळेकर सभागृह, ठाणे पश्चिम येथे झाली आणि कामाला एक दिशा मिळाली. कारण पूर्वनियोजनाचे तपशील प्रत्येकाच्या हातात पडले होते आणि त्यावर काही प्रमुख विभागही छापलेले होते आणि त्या विभागांतर्गत येणार्या जबाबदार्‍या, त्यामुळे प्रत्येकाने हाती पडलेल्या तपशिलाचे वाचन-मनन केले आणि स्वतःला पेलवणार्याग आवडीच्या क्षमतेच्या जबाबदार्‍या उचलल्या; विशेष म्हणजे उचललेल्या जबाबदारीवर कुणीही, ‘मीच हे का करू,’ अशी कुरकूर न करता कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील केली. कारण चळवळीच्या कार्यकर्त्यांना श्रेष्ठ-कनिष्ठ काम हे मूल्य मान्य नसल्यामुळे आपापल्या कामाला न्याय देण्याचा चंग दुसर्‍या मीटिंगमध्ये बांधला गेला.

तिसरी मीटिंग आम्ही ठरवून कालिदास नाट्यगृह, मुलुंड पश्चिम येथे घेण्याचे ठरवले. कारण आपल्या अधिवेशनाची नियोजित जागा ही कालिदास नाट्यगृह म्हणून ठरली होती. मुंबईत पाहण्यात आलेल्या इतर जागांच्या तुलनेत कालिदास नाट्यगृह हे सर्व सोयींनी उपलब्ध, तुलनेने भाडे कमी, पार्किंग स्लॉटची उपलब्धी, हॉलची स्वतःची सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, मुबलक शौचालय, आवश्यकतेनुसार स्टॉल लावण्यासाठी सोयीची जागा; शिवाय मुलुंड स्टेशनपासून चालत फक्त दहा मिनिटांवर आणि बाहेरून येणार्‍या, सर्वच गाड्या ठाणे रेल्वे स्टेशन, ठाणे बस डेपो, कल्याण रेल्वे स्टेशन, कल्याण बस डेपो येथे थांबत असल्यामुळे येणार्यान कार्यकर्त्यांची देखील सोय होणार होते. म्हणून कालिदास नाट्यगृह हे सगळ्याच अर्थाने सरस होते. कालिदास नाट्यगृहाची आंतररचना व बाह्यरचना ठाण्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी छोटे-छोटे तपशीलही वेळोवेळी पुरवले आणि कार्यकर्त्यांनी देखील नियोजित जागा ही सर्वार्थाने योग्य असल्याचे मान्य केले; परंतु जागा नक्की झाल्याचे समाधान नव्हते. कारण जागा बुकिंगसाठी तीन महिने अगोदर इथे रात्रीची रांग लावावी लागते, थोडाफार वशिला लावावा लागतो आणि महाराष्ट्र अंनिस संघटनेसाठी सलग तीन दिवस एखादे नाट्यगृह उपलब्ध करून देणे, हे तसे कठीण. कारण आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ही जागा निवडणूक आयुक्त ताब्यात घेण्याची देखील शक्यता होती. या दोलायमान स्थितीमध्ये कार्यकर्तेसंयमी परिस्थितीत घेतलेल्या जबाबदारनुसार वाटचाल करतच होते.

कार्यक्रमाची सर्व सत्रे झकास होती, बैठक व्यवस्था झकास, व्हीआयपी कक्ष होते, महिलांच्या निवासाची सोय होत होती, छोटी पॅन्ट्री होती, त्यामुळे रात्रीचा श्रमपरिहार देखील होणार होता, स्वच्छ शौचालये होती, बर्‍याच ठिकाणी मोकळी जागा होती, छोट्या बालकांना खेळण्यासाठी बाजूला सुसज्ज गार्डनही होते, विशेष म्हणजे स्टेज देखील 40 बाय 15 चा असा अवाढव्य होता, हॉलचे लाईट व्यवस्थापन अचूक होते आणि सुरक्षा व्यवस्थापनही त्यामुळे त्रिदशकपूर्तीनिमित्त होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी व अधिवेशनासाठी कालिदास नाट्यगृह हे एक नंबर आहे, असे सर्वांचेच मत पडले.

‘कालिदास’ पाहण्याची बैठक आटोपल्यानंतर आम्ही काही मंडळी निवासाची सोय आजूबाजूला ‘वॉकिंग डिस्टन्स’वर कुठे आहे का, हे पाहण्यासाठी बाहेर पडलो. काही ठिकाणी दर परवडले नाही, तर काही ठिकाणी दिवसाच थांबा; परंतु रात्री आम्ही थांबू देणार नाही, असा खाक्या होता. जवळच्या महानगरपालिकेच्या शाळांना देखील भेटी दिल्या. काही नोंदी घेतल्या आणि तिसरी बैठक संपवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्तेहे कृतिशील आणि कर्ते सुधारक आहेत, याचा अनुभव आम्हाला चौथ्या बैठकीत आला आणि कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. अशा प्रकारची इव्हेंट साजरी करण्यात संघटन मातब्बर आहे. आजवर झालेल्या सगळ्या भव्य सोहळ्यांमध्ये आयोजन-नियोजन- संयोजन महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केलेले होते. त्यामुळे अनुभवाची शिदोरी आणि जबर आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या ठायी होताच.

दिवस पुढे सरकत होते. एव्हाना एप्रिलचा पहिला आठवडा उजाडला होता. अनेक नवीन आव्हाने समोर येत होती. सुरक्षा व्यवस्थापन हेही एक आव्हानच होते. पूर्णतः नाट्यगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर अवलंबून राहणे आपल्याला महागात पडणार होते, हे पनवेलचे ज्येष्ठ कार्यकर्तेयांनी निदर्शनास आणून दिले आणि तिथेच सुरक्षा समिती स्थापन करण्याचा निर्णयही झाला. अनुभव गाठीशी होता. सुरक्षाव्यवस्थेवर चर्चा करताना वाईटात वाईट काय घडू शकते व त्यावर मात कशी करायची, याच्यावर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाहुणे व परराज्यातून येणारे पाहुणे या सगळ्यांची सुरक्षाव्यवस्था महत्त्वाची होती.कारण निमंत्रणे पोहचली होती.काही परदेशी व इतर राज्यांतून पाहुण्यांचे होकारही आले होते सामान्यातला सामान्य कार्यकर्ता व त्याचे कुटुंबीय हेही आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे इथे तडजोड नाही, हे चौथ्या बैठकीतच स्पष्ट केले गेले आणि पाचव्या बैठकीत सुरक्षा समितीचा ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ देखील दाखल झाला. कामातील तज्ज्ञता आणि चळवळीप्रती असलेली तळमळ कार्यकर्त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. 6 एप्रिल रोजी शिरवणे, नवी मुंबई येथे झालेल्या या चौथ्या बैठकीत बरेच तपशील पुढे आले. पाचवी बैठक 1 मे रोजी भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, दादर येथे झाली. यामध्ये सुरक्षाव्यवस्थेचा आणि आणि परिपूर्णतेचा भाग म्हणून डिजिटल नोंदणी कशी उपयुक्त ठरू शकते, यावर डोंबिवलीच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर माहिती दिली; तसेच अधिवेशनाला येणार्‍या पाहुण्यांना सशुल्क प्रवेश दिला जावा, हेही मान्य केले गेले. आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी रुपये पाचशे, तर राज्य अधिवेशनासाठी रुपये शंभर आकारण्याचे निश्चित केले गेले. कार्यक्रमाच्या सोहळ्याची पूर्वप्रसिद्धी व पश्चातप्रसिद्धी देण्यासाठी मीडिया विभाग स्थापन करण्यात आला होता आणि याची प्रमुख जबाबदारी डोंबिवलीचे कार्यकर्तेआणि जात पंचायत विभागाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे, नाशिक यांच्यावर सोपवण्यात आली, तर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद किंवा रिपोर्ट तयार करण्यासाठी नावे सुचविण्यात आली.

कामाला गती येत होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांना काय नावे द्यावीत, कोणाची द्यावीत, याबद्दलही चर्चा झडत होत्या. दिवंगत कार्यकर्त्यांची यादी एका फ्लेक्सवर लावण्याची कल्पना याच बैठकीत मांडण्यात आली. कालिदास नाट्यगृहाच्या परिसराचा इंच न् इंच उपयोग करून घेण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला होता. त्याच्यामुळे सुरुवातीलाच प्रथमोपचाराचा स्टॉल, नंतर नोंदणीचे स्टॉल, नंतर चौकशीचे स्टॉल व उर्वरित भागात पुस्तकांचे स्टॉल अशी रचना केली गेली. ठाणे, मुंबईचे व्यस्त जीवन सगळ्यांना माहीत; पण आम्हाला हे जमणार नाही, असा सूर कोणीच काढला नाही.

स्वतःला प्रत्येक जण सावरत होता व व्यक्तिशः शाखानिहाय, जिल्हानिहाय, उद्योजकनिहाय, राजकीय स्तरावरील व्यक्तीनिहाय देणगीदारांच्या याद्या तयार करण्याचे काम करू लागला. यासाठी वार्तापत्र विभागाचे सहकार्य मिळणे अपेक्षित होते.

दिनांक 18 मे रोजी सहाव्या बैठकीचे आयोजन केले गेले. ही बैठक विशेष होती. कारण या बैठकीस संपादक मंडळाचे संपादक ; तसेच राज्याचे विभागांचे कार्यवाह व सहकार्यवाह यांनाही आमंत्रित केले गेले होते. त्रिदशकपूर्तीनिमित्त विशेषांक काढण्याची कल्पना होती. इंग्रजी व मराठी भाषेत विशेषांक निर्मितीची जबाबदारी अनुक्रमे प्रभाकर नानावटी व ‘अंनिवा’चे संपादक मंडळ यांनी स्वीकारली होती. या बैठकीत दोन टप्प्यांवर चर्चा झाली. एक तर विशेषांकासाठी काही रिपोर्ताज लिहिण्याचे ठरले. याचे विषयही ठरले व लिखाण चळवळीतल्या त्या-त्या विभागाच्या कार्यकर्त्यांनी करायचे ठरले, तर अंतिम स्वरुपात लिखाण करण्याचे काम साहित्य व पत्रकारिता करणार्‍या काही चळवळींच्या हितचिंतक मंडळींना देण्याचे ठरले. चळवळीच्या तीस वर्षांच्या कामाचा लेखाजोखा विशेषांकात प्रतिबिंबित होण्यासाठी संघटनेच्या 18 विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांना आपापल्या विभागाची जन्मकथा, ते विस्तारकथा असे मांडण्यास सुचवले गेले व त्यास 25 जूनपर्यंत मुदत देण्यात आली. या बैठकीत त्रिदशकपूर्ती निमित्ताने देणगीचे व जाहिरात संकलनाचे आवाहन देखील केले गेले. संबंधित आवाहन देणगीपत्राचे वितरण केले गेले. महाराष्ट्र अंनिसच्या या वर्धिष्णु कार्याला विविध साधनांची, मानवी तज्ज्ञांच्या कौशल्याची जशी गरज आहे, तसेच विस्तारासाठी आर्थिक सहयोगाची नितांत आवश्यकता असल्याचे या बैठकीत वारंवार सांगितले गेले.

प्रत्येक बैठकीला नवनवीन कार्यकर्त्यांची संख्या वाढत होती. कामाचे व घेतलेल्या जबाबदार्‍यांचे विकेंद्रीकरण होत होते. हळूहळू चोरपावलाने बजेट देखील समोर येत होते; परंतु समोर येणारे बजेट व जमा झालेली रक्कम यामध्ये कमालीची तफावत होती, तर दुसर्‍या बाजूला या दैदिप्यमान तीस वर्षांच्या कारकिर्दीत माझा वाटा आहे, याचे भान ठेवून कार्यकर्तेवेळेची व श्रमाची मदत करतच होते. प्रत्येक वेळी स्वखर्चाने मीटिंगला येणे, चर्चेत सहभाग घेणे, पडेल त्या कामाची जबाबदारी स्वीकारणे, असेही करत होते. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणं, त्यांना ‘मॉरल सपोर्ट’ करणे, हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. वाढणारी चळवळ असेल तर कार्यकर्त्याला हे बळ द्यायलाच हवे. असेही आपण कार्यकर्त्यांना काय देतो; किंबहुना त्यांच्याकडून कामेच करवून घेत असतो. भान हरपून निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता नेहमीच म्हणत असतो, ‘संघटनेत कार्यरत राहणं ही माझी गरज आहे.’

अलिकडे अनेक ठिकाणी बर्‍याच ‘इव्हेंट’मध्ये ‘सेल्फी पॉईंट’ची संकल्पना जोर धरत आहे. याचेच पडसाद चर्चेतही उमटले व त्या अनुषंगाने सभागृहाच्या आवारात ‘सेल्फी पॉईंट’ निर्माण करण्याचे काम सभागृह व्यवस्थापनाच्या मनात आलं. त्यानुसार ‘आम्ही विवेकी,’ ‘आम्ही मानवतावादी,’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया,’ ‘आम्ही सारे दाभोलकर’ अशी वाक्यरचना असलेले ‘सेल्फी पॉईंट’ तयार करण्याचे ठरले. 19 मे रोजी झालेल्या सातव्या बैठकीत बर्‍याच गोष्टी निर्णायक ठरल्या. यावेळी सुद्धा मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांतील बहुसंख्य कार्यकर्तेया मीटिंगला आले होते.

द्विदशकपूर्ती निमित्त होणार्‍या बैठकांची वारंवारता वाढत होती, त्याची गरजही होती. अजून खूप कामे बाकी होती. बजेट सादरीकरण फारसे झाले नव्हते. छोट्या-छोट्या किरकोळ गोष्टींची देखील यादी होणे बाकी होते. उदाहरणार्थ, पावसाळा असल्यामुळे बॅग द्यावी की फोल्डर द्यावं, डॉक्टरांचा फोटो व त्रिदशकपूर्तीचा लोगो असलेला टी-शर्ट विक्रीस ठेवावा किंवा नाही, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची अंतिम यादी येणे देखील बाकी होते. एकच दिलासा देणारी बाब म्हणजे नियोजित कालिदास नाट्यगृहाचे आपण बुकिंग केले होते व त्याची पावतीही आपल्याला मिळाली होती. यावेळच्या बैठकीस संपादक मंडळाने देणगी व जाहिरात यांचे दरपत्रक व आवाहनपत्रक वितरणासाठी आणले होते. कार्यकर्त्यांना ते वितरित केले गेले व कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या गेल्या.

या बैठकीच्या वेळेला एकूण तीन विशेष अतिथी आले होते. एक राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे अध्यक्ष शरद कदम व 2013 मध्ये जादूटोणाविरोधी कायदा पारित करतेवेळी महाराष्ट्र अंनिसच्या भूमिकेचे खंदे समर्थक श्याम सुंदर महाराज आणि तिसरे अतिथी होते विष्णू फॅकल्टी, जे मुंबई आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतात, नेदरलँड येथून पीएच. डी. प्राप्त केलेले आहेत. शरद कदम यांनी एक तरी वारी का अनुभवावी, अंनिसने या वारीत का आले पाहिजे, याबद्दल विश्लेषण केले, तर श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी समतेचे नातं; तसेच संतांची सातशे वर्षांपूर्वीची शिकवण आणि अंनिसची शिकवण ही एकसमान आहे, असे सांगितले; तर इथून पुढे संविधान जागर दिंडी काढण्याचा मानस व्यक्त केला. तिसरे विशेष अतिथी जे मुंबई आयआयटीमध्ये प्रोफेसर आहेत, त्यांचे नाव आहे विष्णू फॅकल्टी संघटनेस वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी; तसेच फेक न्यूज पसरवण्यात माहीर संघटनांची काळी बाजू काय आहे? याचा प्रसार करणे, ‘स्युडोसायन्स’बद्दल जनमानसात वस्तुस्थिती सांगणे, अशा कामी त्यांना विशेष रुची असल्याचे, त्यांनी सांगितले.

30 वर्षांच्या दमदार वाटचालीत ‘अंनिस’ने महाराष्ट्राच्या संस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक जडणघडणीत जो विशेष ठसा उमटवला त्याचे प्रतिबिंब संस्कृतिक माध्यमातून करण्याचे ठरले. त्रिदशकपूर्ती कामाच्या आढाव्यासाठी जो ग्रुप स्थापन केला, त्यावर सर्व तपशील येतच होते; पण आम्ही पडेल ते काम करू इछितो, हे सांगणार्‍यांत 20 वर्षांपासून ते 80 वर्षांपर्यंतच्या कार्यकर्त्यांची नावे होती. हे सगळं नक्कीच आश्वासक होते, इवलेसे रोप लवियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. कमालीचे सातत्य आणि चिकाटी याची शिकवण डॉ.दाभोलकरांकडून मिळालेलीच होती.