वाघणगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. गावची वस्ती 1500. सुमारे 500 माणसं मुंबईत. गावात वाड्या चार, कुणबी समाजाच्या डोंगरेवाडी आणि नेमणेवाडी या दोन वाड्या; एक सुतारवाडी आणि एक बुद्धवाडी.
सुमारे 300 वर्षांपूर्वी विशाळगडावरून लांज्याला जाणार्या रेडीज नावाच्या खबर्याचा खून झाला. त्याचा शोध घेत आलेल्या त्याच्या पत्नीला वाघणगावाजवळ प्रेत सापडलं. अग्निसंस्कारासाठी अपरात्री तिने गावाला हाका मारल्या, तेव्हा कोणीच आलं नाही म्हणून सर्व गाव निर्वस (ओसाड) होईल, असा तिने शाप दिला. दरम्यान, गावकुसाबाहेरील दलित समाजातील जाधव कुटुंबाने तिला मदत केली, तेव्हा त्यांच्याकरिता तिने वर्षाकाठी तीन महिने गावपळत केल्यास शाप बाधणार नाही, असा उ:शाप दिला व ती सती गेली. तेव्हापासून गावपळतीची प्रथा चालू झाली. गावदेवी वाघजाईचा कौल घेऊन गावातील सर्व लोक गुराढोरांसह वेशीबाहेर जाऊन राहू लागले.
या काळात गावात दिवा लागत नाही, चूल पेट नाही की कचरा काढला जात नाही. या काळात गावात राहणार्या व्यक्तीला काहीतरी त्रास सहन करावा लागतो, असा समज. सध्या ही प्रथा तीन वर्षांतून तीन आठवडे (21 दिवस) अशी चालू आहे.
मअंनिस रत्नागिरी शाखेला 1999 साली ही प्रथा समजली, तेव्हा गावपळत चालू झाली होती. त्यामुळे काही केले नाही. यावेळी मात्र या प्रथेला विरोध करण्याचे ठरवले. 19 जानेवारीला विनोद वायंगणकर यांनी गावात जाऊन वरील कथा समजून घेतली व ग्रामस्थांच्या मानसिकतेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. गावच्या सरपंच सौ. सुलोचना डोंगरे या लांजा येथे कुणबी समाजाच्या छात्रालयाचे काम पाहतात. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून सोमवार, दि. 28 जानेवारीला पाचच्या सुमारास मी, आदिती, विनोद वायंगणकर, ज्ञानेश म्हात्रे, आतीष कीर, संतोष पावसकर, रवींद्र साळुंखे असे सातजण गावात पोचलो. शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली. शाळा तीन ठिकाणी भरते. त्यामुळे एक-एक वर्ग तीन ठिकाणी विभागला जातो आणि शिक्षकाचा बट्ट्याबोळ होतो, हे त्यांनीच सांगितलं. कोणीच शिक्षक स्थानिक नाहीत. त्यांचीच मन:स्थिती द्विधा; शिवाय गावाच रोष कोण घेणार? ‘ग्रामस्थांच्या कलाने घ्या,’ असं पूर्वीच्या जिल्हाधिकार्यांनी सांगितलेलं. त्यामुळे ते गप्प. दरम्यान लांज्याच्या ‘भाकर’ संस्थेच्या अरुणा पाटील आल्या. त्यांनी पूर्वी देवरूखला आमचा कार्यक्रम बघितलेला, त्यामुळे त्यांना रत्नागिरीचे अंनिसवाले परिचित. त्यांचे सरपंचबाईंबरोबर कामानिमित्ताने सख्य. त्यामुळे सरपंचबाई मनाने आमच्या बाजूला; पण त्यांचे सासरे मुख्य ‘गावकर’ (मानकरी). त्यामुळे बाई सुरुवातीला ठाम नव्हत्या. अरुणाताई व आम्ही बोलून-बोलून त्यांना समजावलं. सहानंतर एक-एक गावकरी येऊन पाव्हण्यांचा ‘अंदाज’ घेऊ लागले. आम्हीही त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या मनाचा अंदाज घेऊ लागलो. तोपर्यंत आठ वाजून गेले. एव्हाना सुमारे शंभर ग्रामस्थ ‘सभेसाठी’ जमले. आम्ही मात्र टेबल-खुर्च्या नाकारून सारवलेल्या अंगणातच बैठक मारली.
अंधश्रद्धा कोणत्या, विज्ञानाच्या प्रगतीबरोबर आणि गतिमान जीवनपद्धतीमुळे त्या कशा गळून पडतात, सतीची प्रथा वाईट का, ती बंद होऊन किती वर्षेझाली, तिचा दैवी शक्तीशी काही संबंध नाही अशा गोष्टींबद्दल सोप्या पद्धतीने बोललो. स्थलांतरासाठी, विशेषत: स्त्रियांना डोक्यावर सामान घेऊन नदी ओलांडत रोज सुमारे पंचवीस खेपा पडतात. हातावर पोट असताना गावातल्या पाचशे ग्रामस्थांचं सरासरी रु. 70 प्रमाणे पाच लाखाहून अधिक रुपयांचं उत्पन्न बुडतं. सुमारे सव्वाशे कुटुंबाच्या स्थलांतरामुळं एकाच नदीचा उपयोग सर्व कारणांसाठी होतो. तात्पुरत्या झोपड्या बांधण्यासाठी झाडं तोडली जातात. या सर्वांमुळे पर्यावरण आणि ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येतं. हे सगळं पटवण्याचा प्रयत्न केला. वेळ, श्रम, बुद्धी, पैसा यांचा अपव्यय होतो आणि सगळ्यांनाच अडचणीची वाटते, तरीही ही प्रथा का सोडत नाही, असंही विचारलं. त्याऐवजी गावात देवीचा मोठा उत्सव भरवण्याचा पर्यायही त्यांच्यापुढे ठेवला. हे ऐकल्यानंतर आलेली मंडळी देवाधर्माविरोधी नाहीत, याची खात्री पटल्यामुळे बहुधा हळूहळू गावकरी बोलू लागले. बहुतेक सगळ्यांच्याच मनात भीती असल्याचं जाणवलं. बुद्धवाडीतील तरुण पिढी ही प्रथा सोडायला उत्सुक दिसले; पण कौल मागायचा मान त्यांच्या गावकर्यांकडे असल्यामुळे आणि बहुधा खरोखरीच्या भीतीमुळे, त्या वाडीतील बाकीची मंडळी विरोधात वाटली. ‘बाबासाहेब असते, तर त्यांना काय वाटलं असतं?’ असं विचारलं. यावर ‘56 साली दीक्षेच्यावेळी ही प्रथा सोडून द्या,’ असं सांगण्यात आलं होतं; पण ‘गावाला काही झालं तर जबाबदार तुम्ही,’ असं बाकीच्या गावानं सांगितल्यामुळे प्रथा चालूच राहिली. त्यानंतर “हे चांगलं नाही असं सांगणारी तुम्हीच मंडळी आलात,” असं एका सत्तरीच्या वृद्धानं सांगितलं. ‘पुढच्या वेळेस बघू’ असं गंगाराम डोंगरे (कुणबी गावकर) व दत्ताराम जाधव (बुद्ध गावकर) यांनी सांगितलं. ग्रामस्थांनी त्यांच्या मनातील भीती अनेक उदाहरणं देऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही राहून दाखवा मग बघू’ असा एकंदर सूर दिसला. आमचीही तीच इच्छा होती. या चर्चेनंतर पहिले तीन दिवस, गावातील कोणत्याही घरात न राहता, स्वत:च्या जबाबदारीवर, उघड्या जागेवर, कचरा काढून, दिवे लावून वस्ती करायची, चूल व गॅस पेटवून स्वयंपाक करायचा, अशा अटींवर गावात राहण्याची परवानगी ग्रामस्थांनी दिली. गावकर डोंगरे यांनी त्यांच्या घरासमोरील खळ्यात वस्ती करण्यास सर्वांसमक्ष परवानगी दिली. त्यांच्याकडेच जेऊन आम्ही कार्यकर्तेउत्साहात परतलो.
निवडणुकांचा मोसम आणि ग्रामस्थांची द्विधा मन:स्थिती यामुळे हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील कोणी नवीन विघ्न निर्माण करू नये, म्हणून प्रेसला आधी न सांगण्याचं ठरवलं. तरीही ‘तरुण भारत’ला 29 जानेवारीला ‘अंनिसने आव्हान स्वीकारल्या’ची बातमी लागली. यानंतर मात्र आम्ही ‘ही आव्हान प्रक्रिया नसून, ग्रामस्थांच्या सहकार्यावर आधारित, सत्यशोधनासाठी, रुढीचे भ्रामकत्व दाखविण्यासाठी आखलेली मोहीम आहे,’ असं जाहीर केलं. अधिक सहभागासाठी देवरुखला युयुत्सु आर्ते(जनता दल) यांच्याशी संपर्क साधला. 1 फेबु्रवारीला लांज्याला चंद्रकांत परवडी (बहुजन विकास आघाडी) यांच्या कार्यकर्त्यांची एक बैठकही कुणबी छात्रालयात घेतली. निवडणुकांच्या धामधुमीमुळे पूर्वतयारीला फारसं सहकार्य मिळालं नसलं, ती वातावरण निर्मितीला मदत झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक, लांजा व सरपंच, वाघणगाव यांची गावपळतीचे पहिले तीन दिवस गावात राहण्यासाठी परवानगी घेतली. दि. 3 फेबु्रवारी 2002 ला सरपंच डोंगरेबाईंचा फोन आला… “देवीचा कौल मिळाला आहे, गाव उद्या संध्याकाळी फुटणार आहे, येताय ना?…” सोमवार दि. 4 फेब्रवारी 2002 ला सायंकाळचे साडेपाच. उरलेसुरले गावकरी गुरांना घेऊन जाताहेत. सतीच्या देवळासमोर मारुती व्हॅन उभी राहते. पावलं थबकतात. कोकण टीव्हीचा कॅमेरामन व्हिडीओ कॅमेरा काढून परिसराचं शूटिंग घ्यायला लागतो. आम्ही त्याची गावकर डोंगर्यांशी ओळख करून देतो आणि आदिती व आशा सावंत त्यांना घेऊन विस्थापित डोंगरेवाडी दाखवायला जातात. आम्ही टेम्पोची वाट पाहत ठरलेल्या जागेची सफाई करायला लागतो. टेम्पो आणि भाकरची जीप येतात. जनरेटर, गॅस शेगडी, दिवे, तंबू, भांडी, बॅटर्या, काठ्या, सगळं उतरवलं जातं. जागेची आखणी करून शूटिंग करून सगळे परत येतात. आल्या-आल्या गावकर गरजतात,
“असां काय कोनपन राहाल.. ह्या सगलां हितुनं हलवां.. गाव माझ्या गल्यात चपला घाललं… तां तितं शालंच्या मागच्या मालावर जा, पालकी नाचते तितं, हितं राह्याचं नाय…”
सासर्यांच्या या सरबत्तीला सरपंचबाईपण थांबवू शकत नाहीत, तिथं बाकीच्यांच्या ‘पूर्वी असं ठरलं होतं…’ वगैरेचा काय पाड? निमूटपणे टेम्पो पुन्हा भरून साडेसहाला आम्ही माळावर पोचतो, तेव्हा अंधार पडलेला असतो. तंबू लावणं शक्यच नसतं. उघड्यावर झोपायचं ठरतं. ‘आज तरी संख्या जास्त असायला हवी होती’ असं म्हणतोय तेवढ्यातच देवरूखची कंपनी जीप घेऊन येते. इकडे जनरेटर चालू होतो. चार हॅलोजनच्या प्रकाशात सारा माळ झगमगून उठतो. कामं वाटली जातात. चुलीसाठी दगड शोधण्यापासून तयारी. साधारण 200 बाय 200 मीटरच्या माळाच्या एका बाजूला शाळा, एका बाजूला दोन घरांची वई (कुंपण), एका बाजूला बाग, म्हणजे एकच बाजू सुरक्षित-दगड येणार असतील, तर सगळ्या बाजूंनी कामं चालू होतात. नऊच्या सुमारास सरपंचबाईंच्या हस्ते चूल पेटते आणि मनापासून टाळ्या वाजतात. स्वयंपाक सुरू होतो. सगळेच जरा सुखावतात. पोलीस स्टेशनला द्यायच्या नावांची यादी करू लागतो. मअंनिसचे डॉ. आशुतोष मुळ्ये, आदिती मुळ्ये, विनोद वायंगणकर, ज्ञानेश म्हात्रे, आतीष कीर, संतोष पावसकर, रवींद्र साळुंखे, रत्नागिरी तालुक्यातील सडामिर्याची आशा सावंत, गोळपचा उदय गोगटे, आंबेशेतचे पंकज आणि वैभव वायंगणकर, ‘संकल्प’ रत्नागिरीचे गजानन गुरव आणि प्रकाश गावडे ‘भाकर’ संस्था (लांजा) च्या अरुणा पाटील, जया कांबळे, सुहासिनी सोड्ये, देवरूखचे युयुत्सु आर्ते, आयुब कामडी, नमीद कापडी, प्रदीप गुरव, मंगेश संसारे, जगदीश घोसाळकर, शिपोशीचे शिक्षक हनुमंत कोरे आणि लांज्याजवळच्या जानकीबाई निवेदकर (वय वर्षे62) चक्क दोन डझन.
जेवण तयार होतं. पाव, रस्सा आणि भात पत्रावळीत घेऊन पंगत बसते. सगळेच शिणलेले, त्यामुळे त्या जेवणाची गोडीच न्यारी. जेवणात सहभागी व्हायला येतात गावपळतीचा कृतिशील निषेध करणारी कुत्री, जेवण झाल्यावर पथार्या पसरल्या जातात. आडवं होणार्यांना बाकीचे उठवतात आणि सुरू होतात नेहमीची चळवळीची गाणी. केवळ या मोहिमेसाठी आलेले देखील समविचारी बनून जातात. निपाणीकर सरांच्या ‘बोला आज मिळून सारे’च्या शेवटी मी सकाळीच सुचलेल्या ओळी जोडतो.
…वाघणगावा सती शापते, गाव पाहा पळते,
गावकर्यांचा भ्रम घालविण्या, जमति कार्यकर्ते।
रात्रीच्या गस्तीच्या पाळ्या ठरतात. साडेअकरानंतर जनरेटर बंद करून गस्त सुरू होते. कुत्र्यांची इमानी साक्ष असतेच. बॅटरी घेऊन अधून-मधून, लपत-छपत येणार्या कुणाच्या तरी दिशेने सर्चलाईट मारले जातात. (दुसर्या दिवशी कळलं की, ते दूर डोंगरातल्या रस्त्यावरून जाणार्या वाहनांचे दिवे होते!) सहा-सात जण सोडून बाकीचे सगळे तास-दोन तासच झोपलेले, त्यामुळे रात्र केव्हा संपते कळतच नाही.
मंगळवार दि. 5फेबु्रवारी 2002 : सकाळ होते, पाण्याची पंचाईतच. कारण पंप बंद (पळतीच्या काळात गावाचाच विद्युतपुरवठा बंद करवतात.) नदीवर सगळं आटपून आल्यावर चहा होतो. उरलेले पाव संपतात. मग तंबू उभारायला सुरुवात, तोपर्यंत ग्रामस्थांची वर्दळ सुरू होते. सगळेच आश्चर्यचकित. तोंडाने बोलण्याहूनही जास्त बोलके. एक चमत्कार ऐकायला मिळतो. ‘रात्री बाराला दिवे ग्येले का नाय?’ आम्ही केलेल्या रॉकेलच्या काटकसरीचा परिणाम! ते पेटवून द्यायचा आमचा खटाटोप. दुपारी जेवणाची तयारी होता-होता दूरदर्शन व ‘अल्फा’ साठी कव्हर करायला अभिजित हेगशेट्ये दाखल होतात. त्यांच्याबरोबर ‘तरुण भारत’चे उदय पाटोळेही असतात. गरम-गरम खिचडीचा आस्वाद घेत छान गप्पा होतात. दिवसभर सगळ्या वाड्यातील माणसं येत राहतात. शंका फेडून घेतात. प्रबोधन चालू राहतं. तरुणांचा ‘घरून पाठवलं तर येतोच राहायला’ असा उत्साही प्रतिसाद. काही अजूनही साशंक, ‘आज मंगळवारची देवीची वारी होऊन गेली तर खरं.’ संध्याकाळी बुद्धवाडीतील सुनील कदम आमच्याबरोबर राहायला हजर होतो. रात्रभर जनरेटर चालू ठेवायचा असं ठरतं. एका दृष्टीने ते बरंच. कारण आज वस्तीला फक्त बाराच जण. काल नसलेल्या जयश्री बर्वेआणि भाकरची वंदना माईल आज सामील होतात. काहीही न घडता रात्र पार पडते.
बुधवार, दि. 6 : सकाळपासूनच ग्रामस्थांची वर्दळ वाढते. आज आमच्या बरोबर चहा पिण्याइतपत त्यांची भीती कमी झालेली. आंघोळीला नदीवर गेलेले वायंगणकर, ज्ञानेश, आतीश व संतोष यांना बुद्धवाडीतले तरुण भेटतात. राहायला आलेले लोक ‘भारून’ आलेले आहेत. त्यांच्याकडे सापही आहेत, त्यानंतर माळ भारून टाकलाय, अशी चर्चा गावात चालू आहे, अशी माहिती देतात. संध्याकाळी वाडीत चमत्काराचा कार्यक्रम केला, तर घरचे लोक आमच्याबरोबर राहायला परवानगी देतील, असं त्यांना वाटतं आणि कार्यक्रम ठरतो. अडीचच्या सुमारास गटविकास अधिकारी भेट द्यायला येतात व उपक्रमाची स्तुती करतात. साडेतीनला चहा होतोय. तेवढ्यात सकाळ, पुढारी, भैरव टाईम्सचे प्रतिनिधी येतात. एकंदर अनुभवावर चर्चा चालू होते. साथ द्यायला गावातले तरुण असतातच. तेवढ्यात बहुजन विकास आघाडीचे चंद्रकांत परवडी आपल्या कार्यकर्त्यांसोबत येतात. बरोबर सरपंचबाई असल्यामुळे गप्पा छान रंगतात. सर्व मंडळी गेल्यावर आम्ही बुद्धवाडीत जातो. तिथे शिवसेनेची प्रचारसभेची तयारी चाललेली. आमच्या मागून तरुण मुलं राहायला येतील म्हणून त्यांना धाकाने आमच्यासमोरून ओढून नेतात. त्यामुळे थोडे चमत्कार व थोडे साप दाखवून आम्ही कार्यक्रम आटोपतो. परत येईपर्यंत अंधार पडतो. शाळेच्या कोपर्यावर दोन पोलीस जीप उभ्या. माळावर जाऊन पाहतोय, तर अरुणाताई डीवायएसपी सुरेश मेंगडे व लांज्याचे इन्स्पेक्टर अर्जुन राणे यांच्याशी बोलत बसलेल्या. आम्ही घाईनेच जनरेटर चालू करतो. चहा होईपर्यंत छान गप्पा होतात. डीवायएसपी फारच आपल्या विचारांचे, अतिशय कठोरपणे अंधश्रद्धांवर झोड उठवतात. कामाचं कौतुक करतात. जाताना इन्स्पेक्टर राणेंना आम्हाला लागेल ते सहकार्य द्यायला सांगतात. जरा वेळानं पोलीस पाटील आणि दोन गावकरी साडेदहा वाजता आमचं जेवण होईपर्यंत बोलत बसतात. ‘तसं काही’ नाही अशी खात्री पटल्याचं कबूल करतात. तोपर्यंत लांजा कुटीर रुग्णालयाचे डॉक्टर्स येतात. ‘थेट धडक मोहिमेमुळे प्रभावित झालो,’ असं सांगतात. त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रबोधन केलं, तर का काम खूप सोपं होईल, असं आम्हीही त्यांना सांगतो.
अकराच्या सुमाराला पहिल्या पाळीचे सोडून इतर सगळे झोपतात. साडेअकरा नंतर वायंगणकर, साळुंखे व गावातला सुनील पहिल्या पलितायात्रेला निघतात. माळावर मी एकटाच गस्तीसाठी फिरत असतो आणि अचानक एक सुमो भरवेगाने माळावर येऊन थांबते. सुमोजवळ जाईपर्यंत तीन-चार जण उतरतात, विचारतात ‘अंगात येण्याचा अनुभव घ्यायचाय का?’ सुमोजवळ जाऊन बघतो तो काय आतला माणूस थयथयाट करत असलेला. एका नजरेत कळतं की हे ढोंग आहे. मी बाकीच्या सगळ्यांना उठवतो. तो विचारतो, ‘कुणाच्या परवानगीनं इथं राहिलात? आताच्या आता मुक्काम हलवा, नाहीतर बघा काय होईल ते.’ त्याच्याबरोबरचे लोक त्याच्या अंगात शंकर आल्याचं सांगतात आणि वर विचारतात की, ‘गावात शंकराचं ठाण नाय मग हा शंकर आला कोठून?’ क्षणभर विचार करून सांगितलं ‘शंकर असशील तर तिसर्या डोळ्याने समोरचा पाचोळ्याचा ढिगारा पेटवून दाखव, नाहीतर साप गळ्यात घे’ तोपर्यंत ज्ञानेश, आतीष व संतोष साप आणायला तंबूत जातात. तिसरा डोळा आणि सापाची भाषा ऐकताच ‘शंकर’ ड्रायव्हरला गाडी वळवायची ऑर्डर देतो. तोपर्यंत पलितायात्रेची पहिली फेरी परत येते. नंतरची रात्र अशा फेर्या आणि गप्पा मध्येच सरते.
गुरुवार दि. 7फेबु्रवारी : सकाळी गावकर डोंगरे निरोप देऊन जातात; मात्र परत येण्यासंबंधी बोलत नाहीत. इतरही काही गावकरी ‘तुम्ही जिंकलात’ असं सांगून जातात. आदल्या रात्री येऊन गेलेले पोलीस पाटील तानाजी माईण आवर्जून सांगतात की, ‘पुढच्या वेळी गावपळत होणार नाही. सगळं आवरून आम्ही दहा वाजता गाव सोडतो.’ निवडणुकांचा मोसम असूनही अनपेक्षित अशी प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यामुळं पत्रकारांनीच शंका फेडून घेण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करायला सांगितलं. पुन्हा मिळालेल्या प्रसिद्धीमुळे बहुधा, सामान्यत: अंनिसविरोधी असणार्या एकाच दैनिकानं “गावात राहून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात होऊन 4 ठार, 2 जखमी” अशी अफवा असल्याची बातमी लावली. लगेच निर्णय घेतला की, उरलीसुरली शंका मिटवण्यासाठी अमावस्या आणि मंगळवार असा ‘भयानक’ मुहूर्त साधून 12 तारखेला गावात जायचं. पूर्वीसारखी कोणतीही तयारी न करता, माझ्यासह ज्ञानेश, आतीष, संतोष हे आधीचे यशस्वी कलाकार, प्रशांत पावसकर हा जुना कार्यकर्ता; तसेच करूणेश मयेकर, महेेंद्र बोरकर, गजानन कदम व आशीष कदम हे नवे सदस्य असे संध्याकाळी पोलीस स्टेशनला कल्पना देऊन सहा वाजता गावात शिरलो, त्यावेळी या पळत झालेल्या गावातल्या ग्रामपंचायतीसमोर सुमारे पंचवीस ग्रामस्थांची निवडणुकीत कुणाला मत द्यायचं, यासंबंधी चर्चा चालू होती. आम्ही रात्री गावात राहणार आहोत, असं त्यांना सांगितलं तेव्हा ‘रात्री फिरताना खूण द्या’ यापलिकडे कसलीच चर्चा झाली नाही. यावेळी गावात तर फिरलोच; शिवाय स्मशानातही फेरी मारून उघड्यावर निवांत झोपलो. सकाळी रत्नागिरीला परतलो. मोहीम यशस्वी झाली की, नाही म्हणाल, तर सांगायचं एवढंच की, गाव 20 तारखेलाच-सोळाव्या दिवशी-परतला. या निश्चयानं की, पुन्हा पळणे नाही. शिकलो काय विचाराल तर परिवर्तनासाठी, सामंजस्यानं आपण दोन पावलं मागं सरकून योग्य मार्गानं दिशा दिली, तर यश हमखास. या सगळ्यांपलिकडचा आनंद असा की, गाववाले म्हणतात, ‘अधून-मधून येत राहा…’
(पूर्वप्रसिद्धी ः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, एप्रिल 2002)