Categories
आठवणीतले दाभोलकर

केल्याने होत आहे रे!

वार्षिकांक – २०१३

वीस ऑगस्ट 2013 चा दिवस डॉ.नरेंद्र दाभोलकरांवर हल्ला झाला. मोटार सायकलवरून आलेल्या दोन मारेकर्‍यांनी गोळ्या झाडल्या. अखंड तेवणारा हा नंदादीप क्षणात विझला. झंझावात शांत झाला. पुन्हा कदाचित एवढा विचारवंत निर्माण होणार नाही. या खात्रीने प्रतिगामी शक्तीही शांत झाल्या. अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. राजकारणी, समाजकारणी, अभिनेते, बुद्धिवादी, सामान्यजन या सर्वांनी विविध मार्गांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. इंटरनेट, फोन, मोबाईल, सभा, धरणे, लेख, मुलाखती एवढ्या लोकांच्या एवढ्या माध्यमांनी आणि वार्ताहरांनी क्वचितच घेतल्या असतील. पण त्यातून एकच सार निघाले. विचारांच्या लढाईत दाभोलकर जिंकले. पण ज्यांचा पराभव झाला. त्यांनी दाभोलकरांचे जीवन संपविले. टी.व्ही. पाहताना, वृत्तपत्र वाचताना आणि एकमेकांशी बोलताना गेले दोन महिने पुन्हा पुन्हा हेच जाणवले. आणि माझ्या समोर त्यांच्या सोबत घालवलेले अनेक क्षण आठवले.

विदर्भात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू करण्याचे आम्ही ठरविले. प्रत्येक जिल्ह्यातील एका महाविद्यालयात विस्तार सेवा केंद्र (Extention Department) असते. त्या मार्फत माध्यमिक शिक्षकांची, वैज्ञानिक जाणिवांची शिबीरे आयोजित केली. दाभोलकर आणि मी विदर्भात गेलो. सोबत इचलकरंजी जवळच्या कबनूर गावचे सर्पतज्ज्ञ अनिल इंगवले होते.

भंडारा जिल्ह्याचे शिबीर संपवून 22/9/1994 च्या रात्री 10 च्या सुमारास अमरावतीच्या एस.टी.स्थानकावर आम्ही उतरलो. अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमध्ये पुढील तीन दिवस शिबीर चालू राहणार होते. बॅगा आणि पुस्तकांची ओझी घेऊन आम्ही रस्त्यावर आलो. जेवण करायला कुठे जावे याचा विचार करत उभे राहिलो. एवढ्यात वीस पंचवीस स्कूटर, मोटारसायकलीसह तरूणांनी आम्हाला घेरले. “तुम्ही विदर्भात का आलात? आल्या पावली परत जा!” म्हणून ते आरडाओरडा करू लागले. हे वातावरण पाहून मी तर गांगरून गेलो. कोणत्याही प्रसंगाला दाभोलकर शांतपणे सामोरे जात. दाभोलकरांनी ठाम शब्दांत त्या तरूणांना विनंती केली, “हे पहा! माझ्याबरोबर कुमार मंडपे आहेत. त्यांना डायबेटीस आहे. त्यांना भोजनाची सक्त गरज आहे. आम्ही पाहुणे म्हणून आलोय, तीन दिवस येथे राहणार आहोत. सर्किट हाऊसवर उतरणार आहोत. मतभेद असतील तर चर्चा करू! आम्हाला जवळचे एखादे हॉटेल सांगता काय?” तरूण शांत झाले. हॉटेलचा पत्ता सांगून निघून गेले. कोणत्याही कठीण प्रसंगात दाभोलकर शांतपणे विरोधकांशी असा संवाद साधत.

दुसर्‍या दिवशी शिवाजी कॉलेजच्या हॉलमध्ये शिबीर सुरू झाले. हॉल पूर्णपणे गच्च भरला होता. प्रतिसाद उत्तम होता. दाभोलकरांचे वैज्ञनिक दृष्टिकोनावर व्याख्यान सुरू झाले. शिक्षक मध्येच उभेे राहून आडवे तिडवे प्रश्न विचारू लागले. दाभोलकरांनी शांतपणे विनंती केली, “तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल माझा विषय मांडून संपला की, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. प्रश्न कागदावर लिहून द्या. म्हणजे एकाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे एकत्र देता येतील त्यामुळे आपला वेळ वाचेल.” या विनंतीला विरोधकांनी भिक घातली नाही. व्याख्यानात अडथळे आणणे सुरूच ठेवले त्यांनी आपले कार्यकर्ते शिक्षकात पेरून ठेवल्याचे लक्षात आले.

मधल्या वेळेत एक शिक्षक दाभोलकरांना भेटला. त्याने एक मोठी प्रश्नांची यादी बरोबर आणली होती. त्या शाळेतील शिक्षकांच्या खूप शंका होत्या. दाभोलकरांनी मधला वेळ योग्य रित्या कारणी लावण्यासाठी त्या शाळेचे स्टाफरूम जवळ केले. त्या शाळेतील शिक्षक-शिक्षिका हातात प्रश्नांची लिस्ट घेऊन दाभोलकरांच्या समोर बसले. प्रत्येक प्रश्नाला “व्वाऽऽ, व्वाऽऽ” म्हणून दाद मिळत होती. संगीतातील कार्यक्रमासारखी मैफल रंगत गेली. शिक्षक खुश झाले. दाभोलकर प्रत्येक क्षण लोकशिक्षणात खर्च करत.

शिबिरात माझा विषय सुरू झाला. विषय होता, ‘बुवाबाजीचे चमत्कार’ मला मध्येच थांबवून दाभोलकरांच्या विरोधातील पत्रके वाटण्यात आली. पत्रकात अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांचा विरोध मला नव्हता. विरोधकांचा कावा शिक्षकांच्या लक्षात आला. ते म्हणू लागले, “आम्हाला विषय समजून घेऊ द्या!” त्यामुळे विरोधाची धार थोडी कमी झाली.

रात्री नऊच्या सुमारास आमच्या मुक्कामाचा दरवाजा वाजला. 10-12 तरूण खोलीत घुसले. आम्ही झोपण्याच्या तयारीत होतो, “आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे.” तरूण म्हणू लागले, “तुमच्यावर आमचे आरोप आहेत.”

“ठीक आहे!” म्हणून दाभोलकरांनी एक फाईल घेतली. खुर्चीत बसले. फाईलवर कागद ठेवला. हातात पेन घेतला. म्हणाले, “एकेकाने आरोप सांगा, मी लिहून घेतो.” प्रत्येकाने खड्या आवाजात आरोप सांगितला. दाभोलकरांनी लिहून घेतले. पूर्ण कागद भरून गेला. यावर त्यांचा गटनायक म्हणाला, “तुम्हाला काय म्हणायचे आहे?”

दाभोलकर शांतपणे म्हणाले, “तुमचे म्हणणे मला मान्य आहे. मला काहीही म्हणायचे नाही.” अनपेक्षित उत्तराने तरूण खजील झाले आणि निघून गेले. संयमाचा महामेरू म्हणून डॉक्टरांची प्रतिमा माझ्या मनावर कायमची ठसली.

तिसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता शिबीर सुरू केले. तीन व्याख्याने झाल्यावर समारोपाचा कार्यक्रम सुरू केला. स्टेजवर आमच्याबराबेर मान्यवर होते. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी प्रशिक्षण शिबीर आवडल्याचे सांगितले. विरोधी कार्यकर्ते मध्ये घुसत. मनोगताच्या जागी भाषणे देऊन सर्वांचा वेळ खाऊ लागले. आम्ही दुपारच्या एकच्या गाडीचे रिझर्वेशन केले होते. महाराष्ट्र एक्स्प्रेसने आम्ही सातार्‍याला परत जाणार होतो. जेणेकरून आमची गाडी चुकेल याचे नियोजन विरोधकांनी केले होते. गाडी चुकली की आमचा छळ करायला त्यांना भरपूर वेळ मिळणार होता, हे आमच्या लक्षात आले.

समारोपानंतर सर्वांना भोजन होते. त्याचा खर्च यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी उचलला होता. दाभोलकरांनी स्टेजवरील मान्यवरांना विश्वासात घेतले. माझ्याशी दाभोलकर कुजबुजले “आपण जेवण करून येऊ या.” मला डायबेटीस, जेवण लांबवून चालणार नव्हते. आम्ही तिघेही भोजनगृहात आलो. जेवण केले. सामान बरोबर घेतले. रिक्षा केली. बरोबर दहा मिनिटे अगोदर अमरावती जवळच्या बडनेरा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आमची सुटका झाली. कदाचित आम्हाला त्याच वेळी मारहाणही झाली असती. मोठ्या संकटातून सुटण्याची क्षमता दाभोलकरांच्याकडे होती.

दुसर्‍या वर्षी शासनाच्या स्काऊट व गाईड खात्यामार्फत पुन्हा विदर्भात शिबीरांची आखणी केली. दाभोलकर, अनिल इंगवले आणि मी, अकोले येथे गेलो. दाभोलकर शिबीराची सुरवात करून देत. पहिले व्याख्यान घेत. पुढचे शिबीर माझ्या ताब्यात देऊन ते स्थानिक कॉलेजमध्ये जाऊन प्रश्नोत्तरे घेत, तरूणांशी बोलत, व्याख्याने देत. शक्य झाल्यास संध्याकाळी जाहीर व्याख्यान देत. त्या दिवशी संध्याकाळी 6.30 वाजता स्थानिक हॉलमध्ये दाभोलकरांचे जाहीर व्याख्यान होते. गर्दी खूप झाली होती. व्याख्यान झाले, अंधार झाला. लोक बाहेर पडले. मान्यवरांच्याबरोबर दाभोलकर चालले. मागे थोड्या अंतरावर मी व इंगवले चालत होतो. इतक्यात ओरडा झाला. अश्लील टीका सुरू झाली. काही कळण्याच्या आत समविचारी संघटनेच्या स्थानिक नेत्याने दाभोलकरांवर हल्ला केला. गर्दीला संभ्रमित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडून अश्लिल आरोप करण्याची नेहमीचीच चाल त्यांनी खेळली. दाभोलकरांचा चष्मा बाजूला उडाला. दाभोलकरांनी तो गोळा केला. लोकांच्या लक्षात येण्याच्या आत हल्लेखोर पळून गेला. मारणार्‍या व्यक्तीला वाटले की, दाभोलकरांवर हल्ला केला की विचार थांबेल. पण हल्ला करणार्‍या व्यक्तीचे हे केविलवाणे अज्ञान असते. ज्यांना विचारांचा सामना विचारांनी करायचा नसतो, त्याच व्यक्ती ही असली कृत्ये करत असतात. तोंडाला काळे फासणे, अ‍ॅसिड फेकणे, हात पाय तोडण्याची भाषा करणे. अशी कृत्ये ही भ्याडपणाची असतात.

आम्ही मुक्कामावर आलो. पोलीस केस करावी काय? याची चर्चा झाली. सारा वेळ तारखा खेळण्यात जाईल. घेतलेला वसा बाजूला पडेल. ही काळजी दाभोलकरांना वाटली.

स्थानिक लोक चिडले होते. दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रांत त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्थानिक मान्यवरांनी डॅडी देशमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दाभोलकर मला म्हणाले, “आपण लोकांना विवेक शिकवतो, नीतीचे धडे देतो. तेव्हा आपली चळवळ विवेकी नैतिक आणि अहिंसक राहिली पाहिजे, याबाबत भविष्यात आपण सतर्क राहिले पाहिजे.” दाभोलकरांच्या खुनानंतर तरूणाई रस्त्यावर आली. कोणताही आतताईपणा त्यांनी केला नाही. कोठेही दंगा धोपा झाला नाही. कोठेही जाळपोळ झाली नाही. म्हणजे विवेकी समाज बनविण्यात आपण यशस्वी होत आहोत. असे मला वाटते.

यवतमाळमध्ये प्रकाश डब्बावार हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एकटेच कार्यकर्ते होते. लोकांमध्ये फिरून, रेल्वेमध्ये, बसमध्ये फिरून महाराष्ट्र अंनिसची प्रकाशने खपवत असत. वार्तापत्राचे वर्गणीदार दरवर्षी शेकड्यांनी करत असत. दरवर्षी ‘शतकवीर’ म्हणून त्यांचा सत्कार होत असे. विदर्भात शिक्षकांची शिबीरे घेऊन डब्बावार यांना मदत होईल, असे कार्यकर्ते साथीदार, मिळवावेत अशी चर्चा झाली. अकोल्याचा हल्ला होऊन नऊ वर्षे झाली होती. एकदा मला दाभोलकर म्हणाले, “विदर्भात काम उभे करायला मला विरोध आहे. तुम्हाला नाही. एक दोन कार्यकर्ते घेऊन तुम्ही यवतमाळला जा.” सातारा जिल्ह्यातील तरडगावचे सुरेंद्रकुमार घाडगे या प्राथमिक शिक्षकांना घेऊन मी यतवमाळला गेलो. प्रकाश डब्बावार व त्यांची पत्नी ज्योती डब्बावार, प्रकाश आंबीलकर यांनी शासकीय डी.एड.कॉलेजमध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. शिबीर उत्तम पार पडले. शिक्षकांना खूप आवडले. दिनांक 10/11-2-2013 ला पुन्हा यवतमाळला दुसरे शिबीर आयोजित केले. बरोबर आर्डेसर होते. 11 फेबु्रवारीला दाभोलकर येणार होते. शिबीर उत्तमरित्या पार पडले.

संध्याकाळी 6.30 वाजता, यवतमाळच्या टाऊन हॉलमध्ये डॉ.दाभोलकरांचे व्याख्यान झाले. त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. टॉऊन हॉल भरून वाहिला. डॉ.दाभोलकरांविषयीचा विरोध मावळला. विदर्भात खर्‍या अर्थानं शाखा उभ्या राहिल्या. ‘केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।’ असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला. आजही तोच विश्वास घेऊन शेकडो हात कामाला लागले आहेत.