कार्यकर्त्याच्या पाठीवर नेहमीच हात ठेवणारे व त्याला हिंमतीने घडवणारे डॉक्टर मला उभ्या आयुष्यात वेळोवेळी भेटले. माझी निवड पहिल्या वहिल्या राज्यकार्यकारिणीत कार्यवाह या पदावर, झाल्यानंतर आम्ही दोघे(डॉक्टर व मी) जवळ जवळ रोजच बाहेर शाखा-संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रभर सन 1990-92 दरम्यान फिरतीवर असायचो. एकदा दोंडाईचा(जि.धुळे) येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पुण्याहून बसने गेलो. मी एकदमच नवीन. फारशी ओळख नाही; परंतु चमत्कार करण्यात हातखंडा असल्यामुळे मी नेहमीच आघाडीवर.
एकाच वेळी दोन ठिकाणी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. याची कल्पना आम्हा दोघांना नव्हती. डॉक्टरांनी मला शांतपणे पाठीवर हात ठेवून धीर दिला व सांगितले भिऊ नकोस मी पुढेच उभा आहे. मंचासमोर 400/500 लोकांनी गर्दी केली होती. आणि मला एवढ्या मोठ्या जनसमुदायाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. मी स्टेजवर चढलो. प्रमुख पाहुण्यांची ओळख-सत्कार संपला आणि मी चमत्कार व बुवाबाजी या विषयावर बोलण्यासाठी धीर एकवटून उभा राहिलो. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि मी रिकाम्या हातातून बाबा-बुवा, तांत्रिक मांत्रिक भस्म कसे काढून देतात त्याचे सादरीकरण केले. पुन्हा एकदा टाळ्या!
तासाभरात कार्यक्रम संपला. त्यानंतर डॉक्टरांनी येण्याचे व पुढे त्यांचे भाषण करायचे असे ठरले होते. परंतु ते ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते, तेथे त्यांना उशीर झाला व निरोप आला की, प्रश्नोत्तरे देखील मीच घ्यायची. आता मात्र माझ्या छातीत धडधडत होतं. मी लोकांना आवाहन केलं की, तुम्ही प्रश्न विचारा. चार दोन प्रश्नांची उत्तरे मी दिली आणि अचानक एका स्त्रीने स्टेजवर येऊन माईकचा ताबा घेतला व मला प्रश्न केला की, आमच्या गावात संतोषी मातेचे व्रत करतात. त्या व्रतामध्ये स्त्रिया उपवास धरतात आणि या व्रत बंधनाच्या वेळी गावातील एका व्रत धरलेल्या प्रमुख बाईच्या घरी एक कार्यक्रम होतो. तेथे सर्वासमक्ष एका लाकडी छोट्या पेटीमध्ये गव्हाची एक पोळी ठेवली जाते. त्या पोळीवर बिना दुधाचा चहा(कोरा चहा) ओतला जातो आणि पेटी कडी कुलपात बंद केली जाते. पूजा केली जाते. आणि विशेष म्हणजे त्या पेटीची कुलपाची चावी दुसर्या स्त्रीच्या ताब्यात दिली जाते. दोन-तीन दिवसांनंतर व्रतबंधन संपल्यावर सर्वासमक्ष ही पेटी उघडली जाते. आश्चर्य म्हणजे देवीच्या कृपेने या पेटीत एका पोळीच्या दोन पोळ्या(चपात्या) झालेल्या असतात. शिवाय भरपूर खालून वरून पांढरे पीठ देखील लावलेले असते. मग मला सांगा संतोषी माता प्रत्यक्षात हा चमत्कार घडवते. आणि तुम्ही तर म्हणता की ही बुवाबाजी आहे. उपासाने प्रश्न सुटत नाही. मग हे कसे घडते?
विशेष म्हणजे ही सारी गंमत मंडपात समोर उभे राहून डॉक्टर साहेब स्वत: पहात होते. आणि माझ्यातील कार्यकर्त्याला धीर देत होते. ते तेथूनच मला धीर देत होते. त्यांना बघताच मला अधिक चेव चढला व मी प्रश्नाचे उत्तर दिले- ते येणेप्रमाणे.
उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तुमच्या दोंडाईच्या गावातील संतोषी मातेच्या व्रताबद्दल मला गर्व आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही माता भगिनी संतोषी मातेचे व्रत करता म्हणून एका पोळीच्या दोन पोळ्या होत नाहीत. तर तो एक नैसर्गिक चमत्कार साधी विषाणू-जिवाणूंची क्रिया आहे. म्हणजे असे की बुरशी ह्या वनस्पतीची वाढ परजीवी असल्यामुळे दुसर्या अन्नपदार्थावर होते हे तर आपणा सर्वांना माहीत आहे. तुम्ही एखादी चपाती(पोळी) लाकडी पेटीत बंद करता व त्यावर कोरा चहा म्हणजे साखरयुक्त म्हणजे ग्लुकोज ओतता. लाकडी बंद पेटीत एकाच वेळी कोर्या चहातील ग्लुकोज व पाणी यांचा मिलाप तयार(अन्नावर) चपातीवर बुरशीच्या वाढीस हातभार लावतो. चपातीला अगोदरच दोन पापुंद्रे असतात. दोन थरांमध्ये कार्बोहायड्रेट+आर्द्रता+ग्लुकोज या सर्वांच्या मदतीने बुरशीची(पांढरी भुकटी जणू) वाढ होते. व सुरवातीला चपातीचे काठ बुरशी फस्त करते त्यामुळे दोन थर एकमेकांपासून विलग होतात. दोन चार दिवसात दोन्ही थरांवर खालीवर बुरशी जमा होते. पेटी उघडताच एकाच चपातीच्या दोन चपाती दृष्टीस पडतात. ही साधी परजीवी बुरशीची किमया असते. यात संतोषी मातेचा तो रोल काय? प्रचंड टाळ्या! सभा संपली त्यावेळेपासून दोंडाईचा येथील संतोषी मातेच्या व्रत बंधनाची प्रथा बंद पडली. डॉक्टरांनी पाठीवर हात ठेवला. वाऽ वाहऽऽ असे म्हटले. यातच सारे आले.
पूर्वी डॉक्टर जेव्हा केव्हा मुंबई-ठाणे दौर्यावर असायचे तेव्हा ते हमखास बर्याच वेळा माझ्या घरी उतरायचे. त्यांच्या बाबत लक्षात आलेल्या काही बाबी म्हणजे – 1) ते कधीही 5 मजले म्हणजे 100 पायर्या (माझ्या घराच्या इमारतीला आहेत) चढल्यानंतर थकलेले जाणवले नाहीत. 2) कितीही चढ चढायचा असो की, पायी चालायचे असो त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांनी कितीही वेळा त्यांची जड प्रवासी बॅग हातात घेण्याची विनंती वारंवार करूनही कधीही दिलेली नाही. तसं करणं त्यांच्या मनाला पटत नसे. 3) जेव्हा केव्हा कार्यकर्त्यांच्या सभा, बैठका होत असत किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असे त्यावेळी भोजन मध्यान्ह मध्ये डॉक्टरांनी कधीही सुरवातीला ताट घेतलेले मी पाहिलेले नाही. सर्वांचे भोजन संपत आल्यानंतर शेवटी शेवटी जे उपलब्ध असेल ते ताटात घेत त्यातही मोजून मापून खाणं असे. सर्व लक्ष्य कॅलरीज नियंत्रणावर असायचे. 4) कितीही मोठी रांग जेवणासाठी उभी असली तरी गर्दी खूप आहे. कुणी तरी मला ताट भरून द्यावे अशी अपेक्षा धरली तर नाहीच परंतु कुणी ताट भरून आणत असेल तर त्याला सुद्धा ते नकार देत. थोडक्यात माझी प्रत्येक बाब मी स्वत:च करेन त्यात मला कुणी मदत करावी अशी अपेक्षा ते ठेवत नसत. 5) व्यायाम करणं त्यांनी कधी चुकवलं नाही परंतु खुपच घाई गडबड असेल तर मग आजची व्यायामाची भरपाई दुसर्या दिवशी करायची म्हणजे जादा व्यायाम करायचा हे ठरलेले असायचे. 6) जेवणात रात्री जास्त कॅलरीज जर खाल्ल्या असतील तर मग दुसर्या दिवशी व्यायामाची देखील चार आसनं वाढवायची अशी सारी धडपड उभ्या आयुष्यात त्यांनी जपली व संस्कारीत देखील केली. 7) डॉक्टर कधीही झोप लागत नाही म्हणून अंथरूणावर कुशी बदलताना कधी दिसले नाहीत; अंथरूणावर पडताच त्यांना तंद्री लागायची व काही क्षणातच ते गाढ झोपेत जायचे. 8) सकाळी ठरल्यावेळी आधी उठायचे. 9) आयुष्यात कितीही दु:खाचे क्षण आले कधी कार्यक्रम उधळण्याच्या धमक्या जरी आलेल्या असल्या तरी कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलाही ताण-तणाव मनावर न घेता धीट गंभीरपणे मंचावर जायचे व सभा संबोधित करायचे. 10) धमक्यांच्या फोनची कधीही तमा बाळगली नाही व कार्यक्रमात खंड पडू दिला नाही. 11) तसे आलेले दूरध्वनी(धमक्यांचे) कार्यकर्त्यांना देखील कधी बाऊ करून सांगितले नाहीत.
माझ्या घरी येणार म्हटल्यावर हमखास त्यांना आवडणारे जेवण म्हणजे मच्छी व तांदळाची भाकरी. त्यांना मच्छी फ्राय, मच्छी करी खूप खूप आवडायची. पुढे पुढे ते चपाती, भाकरी ऐवजी भात(मऊ म्हणून) पसंत करत असत. आता आता मागील दोन वर्षांपासून त्यांनी मांस-मच्छी-मटण सारे काही खाणं थांबवलं होतं कारण एकच ‘कॅलरी फोबिया’.
– मच्छिंद्रनाथ मुंडे