Categories
अघोरी प्रथा

  नरबळीचा इतिहास

जुलै - २०१३

            नरबळी म्हणजे धार्मिक श्रद्धेतून किंवा जादूटोण्याच्या उद्देशानं माणसांनी माणसांची केलेली हत्या. माणसाकडून माणसाची हत्या अनेक कारणांनी घडते. पण सगळ्याच हत्यांना नरबळी म्हणता येत नाही. द्वेष, सूड, राग अशा भावनांमुळे केलेला खून, गुन्हेगारांना किंवा युद्धकैद्यांना दिलेला मृत्यूदंड, युद्धातील हत्याकांड या गोष्टी नरबळीहून वेगळ्या आहेत. बहुधा त्यांना धर्माचं अधिष्ठान नसतं. नरबळीचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी हत्येला असलेली धार्मिक श्रद्धेची आणि अर्थातच कर्मकांडं, विधी यांची जोड. आदिम अवस्थेत हिंसकता ही स्वाभाविक असते आणि जगण्या-तगण्याच्या प्रक्रियेचा ती एक अविभाज्य भाग असते. शत्रूंना नाहीसं करण्याचे मार्ग शोधणं आणि आपापसातल्या संघर्षातही जिंकायचा प्रयत्न करणं या प्रेरणा बहुतांशी सजीवांमध्ये आढळतातच. माणसांमधल्या अशा स्वार्थी प्रेरणेला हिंसकतेची आणि अंधश्रद्धेची जोड मिळाली की नरबळी आणि पशुबळी घडतात.

            नरबळीची प्रथा ही जगभरातल्या बहुतेक प्रदेशात आदिम काळातल्या टोळी समाजामध्ये रूढ होती असं इतिहास सांगतो. शिलालेख, थडग्यांवरची चित्रं आणि लेख, उत्खनन यामुळे प्राचीन काळात चालणार्‍या नरबळींचे अनेक पुरावे पुढे आले आहेत. पुराणकथा, लोककथा अशा प्राचीन साहित्यातून नरबळींचे संदर्भ येतात. काही ठिकाणी त्याला नरमांसभक्षणाची जोड दिल्याचंही दिसतं. शिवलीलामृतात श्रियाळ-चांगुणा त्यांच्या चिलयाबाळाचं मांस अतिथीरूपी शंकराला खायला घालतात(अध्याय 14) ही कथा आठवावी. ‘एका राक्षसाला नियमितपणे एका कुमारिकेला किंवा व्यक्तीचा बळी द्यायला लागायचा, शेवटी नायकानं पराक्रमानं राक्षसाला मारून हे थांबवलं, या अर्थाची कथा जगातील बहुसंख्य देशांतून आढळते. महाभारतातली बकासुराची गोष्ट आपल्याकडे सर्वश्रुत आहे.

उत्क्रांतीचा संदर्भ : नरबळीच्या कल्पनेचं मूळ इतिहासपूर्वकाळात, माणसाच्या वर्तनाच्या उत्क्रांतीत आहे. प्राण्यांच्या शिकारीच्या प्रेरणेतून माणूस हत्यारं बनवायला शिकला. प्राथमिक स्वरूपाची हत्यारं असण्याच्या काळात, टोळीला पुरेल इतकी शिकार मिळवण्याच्या प्रयत्नात एखादा माणूस मरणं क्रमप्राप्त होतं. असं घडणं आणि पुरेशी शिकार मिळणं यांच्यात कार्यकारणसंबंध जोडला गेला असावा. शिवाय वाघ-सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांनी एखादा माणूस ओढून नेला तरी बाकीची टोळी वाचते असंही लक्षात आलं होतं. यातूनच टोळीच्या सुरक्षिततेसाठी नरबळीची प्रथा रूढ झाली असावी. माणूस ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे असं एकदा मानल्यानंतर त्याचं बलिदान सर्वश्रेष्ठ ठरणं हे त्या विशिष्ट दृष्टिकोनातून सुसंगत आणि स्वाभाविक ठरतं. त्यामुळेच सुमारे पन्नास हजार वर्षांपूूर्वीच्या पुराश्म काळात माणसाच्या ‘धार्मिक वर्तना’चा उद्भव झाला तेव्हा नरबळीची प्रथा रूढ झाली होती.

बळी देण्यामागे उद्देश : देवता किंवा इतर अतिमानवी शक्तींचा कोप शांत व्हावा आणि आयुष्य सुखकर व्हावं हा नरबळीमागचा मुख्य हेतु होता. देवतांपैकी विशेषत: ग्रामदेवता, जलदेवता, वृक्षदेवता, कृषिदेवता, भूमीदेवता इत्यादींना नरबळी दिले जात. भूत-पिशाच्च, दुष्ट शक्ती, मृत व्यक्ती, स्वत:ची तलवार इत्यादींनाही नरबळी दिले जात. दुष्काळ, साथीचे रोग अशी संकटं येऊ नयेत, आलीच तर ती टिकू नयेत, शत्रूवर विजय मिळावा, गुप्तधन मिळावं. भूतबाधा नाहीशी व्हावी, स्त्री आणि जमीन यांची जननक्षमता वाढावी, विहिरीला किंवा तळ्याला पाणी लागावं इत्यादी कारणं त्यामागे असत.

            एका नरबळीनं देवता एक हजार वर्षेप्रसन्न रहातात. नरबळीच्या रक्तानं वांझ स्त्रीला आंघोळ घातली तर तिला मूलं होतात, मुलांच्या रक्तानं आंघोळ केली तर कुष्ठरोग बरा होतो, जलाशयातील देवता विशिष्ट काळानंतर नरबळी घेतात, बळी हा देवतेकडे जाणारा दूत असतो आणि त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला तर आपलं पाप त्याच्यावर ढकललं जातं, अशा समजुती रूढ होत्या. धान्यदेवतेला नरबळी दिला की, जमिनीची सुफलता वाढून उत्तम पीक येतं अशीही दृढ समजूत होती. म्हणूनच मेक्सिकन लोक मका पेरताना लहान मुलांचा, तो अंकुरल्यावर जरा मोठ्या मुलांचा आणि या क्रमानं तो तयार झाल्यावर वृद्ध माणसांचा बळी देत.

            एखादं बांधकाम नीट पूर्ण व्हावं आणि दीर्घकाळ टिकावं यासाठी ते चालू करण्यापूर्वी, दरम्यान किंवा शेवटी नरबळी देण्याची प्रथा होती. असा बळी त्या वास्तुचा रक्षक बनतो अशी समजूत होती. चीनची जगप्रसिद्ध भिंत किंवा मेक्सिकोतील टेनॉश्टिट्लानचे महापिरॅमिड बांधताना हजारो लोकांचे(विशेषत: कैद्यांचे) बळी दिले गेल्याच्या वदंता आहेत.

            युद्ध जिंकण्यासाठी संबंधित देवतेची कृपा लाभावी यासाठीही नरबळी दिले जात. ग्रीक पुराणकथेनुसार ट्रोजन युद्धात विजय मिळावा यासाठी आर्टेमिस या देवतेचा कोप शांत करण्याच्या हेतूनं राजा अ‍ॅगामेम्रॉन यानं त्याची मुलगी इफिजेनिया हिचा बळी देण्याचा घाट घातला होता. बायबलमधल्या एका कथेनुसार(जजेस् 11) “अ‍ॅमन लोकांवर विजय मिळवून जर मी घरी सुखरूप पोचलो तर माझ्या घराच्या दारातून बाहेर येणार्‍या पहिल्या व्यक्तीचा बळी देईन” अशी शपथ जेप्थाहनं घेतली होती, त्याप्रमाणे तो घरी आला तेव्हा प्रथम त्याला त्याची मुलगी भेटली आणि शपथेला स्मरून त्यानं तिचा बळी दिला.

            मृत माणसाच्या अंत्यविधीवेळी एक किंवा अनेक माणसांना बळी दिलं तर ती किंवा त्या व्यक्ती मृताला मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडतात अशीही एक समजूत होती. म्हणून मृत राजा किंवा सरदार यांच्या बरोबर त्यांच्या स्त्रिया, गुलाम, सेवक यांना पुरण्याची (इजिप्त, मेसोपोटेमिया, मंगोलिया, मध्य अमेरिका) किंवा त्यांनीच आत्महत्या करण्याची (चीन, जपान, कोरिया) प्रथा होती. भारतातील सती जाण्याच्या प्रथेला ‘सहगमन’ असं गोंडस नाव होतं असलं तरी एका अर्थानं तोही नरबळीच!

बलिदानानंतर : बळीच्या शरीराच्या भागांवरून भविष्य आणि शकून पहाण्याची पद्धतही रूढ हेती. शिरच्छेद करताना बळीच्या तोंडून बाहेर पडणारा आवाज म्हणजे देवतेनं बळी स्वीकारल्याचं चिन्ह मानलं जाई. त्याचं धड आणि डोकं कसं खाली पडतं यावरून, तसंच त्याचा आवाज, मृत्यू येताना होणारा मलोत्सर्ग यांवरूनही भाकितं वर्तविली जात. सेल्ट लोक बळीच्या शरीरात तलवार भोसकत आणि त्या वेदनांमुळे शरीर जे आचके देई त्यावरून भाकितं करत, असं स्ट्रॅबो या ग्रीक इतिहासकारानं लिहून ठेवलं आहे.

            दिलेल्या बळीचं किंवा मारलेल्या शत्रूचं शरीर समारंभ, जादूटोणा किंवा निव्वळ प्रतिष्ठेसाठी बाळगायची रूढ आदिम जमातीत आढळते. आपल्याकडची माणसांच्या मुंडक्यांची माळ धारण करणारी काली किंवा शंकर हे याच प्रथेचे अवशेष आहेत.

            नरबळी दिल्यानंतर देवतेच्या मूर्तीवर आणि लोकांच्या अंगावर रक्त शिंपडणं, मांसाचा अंश शेतात पुरणं, बियाणं किडू नये म्हणून त्यात मांसाचा अंश टाकणं किंवा ते रक्तात बुडवणं असे प्रकार केले जात. महत्वाची गोष्ट म्हणजे मेक्सिको, पेरू, भारत इत्यादी अनेक ठिकाणी बळीचं मांस खाण्याची प्रथा होती. बळी हे देवतेचं अन्न आहे या समजुतीमुळे प्रसाद म्हणून नरमांसभक्षणाची प्रथा सुरू झाली असावी. अनेक ठिकाणी बळीला मिरवणुकीनं बलिदानाच्या ठिकाणी नेलं जात असे. टोळीच्या(आणि नंतरच्या राज्याच्या) अभिवृद्धीसाठी करायच्या या ‘पवित्र धार्मिक कार्यात’ सहभागी समुदायावर बळीच्या रक्ताचं शिंपण केलं जात असे. आजच्या काळात मिरवणुकीत उधळला जाणारा गुलाल हे रक्त शिंपणाच्या बीभत्स प्रथेचं प्रतीक आहे.

सुसंस्कृतपणाच्या दिशेनं : लोखंडाचा वापर सुरू झाला (लोहयुगाचा प्रारंभ इ.स.पूर्व 1200) तसा भौतिक प्रगतीला वेग आला आणि धर्मकल्पनाही विकसित होऊ लागल्या. नरबळीतील क्रौर्याची जाणीव होऊ लागल्यानंतर आणि विशेषत: स्वत:चं किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचं बलिदान होऊ नये असं वाटू लागल्यानंतर त्याला पर्याय निघू लागले. स्वत:ऐवजी स्वत:च्या पुत्राला बळी देणं, हा पहिला पर्याय, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या अब्राहामिक परंपरेच्या धर्मात येणारी इसाकच्या बळीची कथा ही या दृष्टीनं महत्वाची मानावी लागेल. ईश्वराच्या आज्ञेनुसार अब्राहाम आपला मुलगा इसाक याचा बळी चढवायला तयार होतो, त्यावेळी एक देवदूत येऊन त्याला रोखतो आणि मुलाऐवजी मेंढ्याचा बळी चढवण्यास सांगतो. ही कथा नरबळीची प्रथा नाहीशी होण्याच्या मार्गावरचं उदाहरण आहे. पुढे याला सेवक, गुलाम, पशू असे आणखी पर्यायही निघाले.

            आपल्याकडचं वैदिक वाङ्मय अस्तित्वात येईपर्यंतच्या काळात नरबळी हा निव्वळ प्रतीकात्मक झाला होता असं दिसतं. ऋग्वेदातील पुरूषसूक्त, तैत्तिरिय, शतपथ, ऐतरेय ही ब्राह्मणं, कथासरित्सागर, महाभारत, कालिकापुराण यामध्ये ‘पुरूषमेध’ किंवा ‘नरमेध’ या नावानं नरबळीचे निर्देश आढळतात. नरमेध याचा अर्थ यज्ञात माणसाचा बळी देणं. आदिपुरूषरूपी विश्वव्यापी परमेश्वराच्या बळीतून(यत्पुरूषेण हविषा….. 14, 15) सृष्टीची उत्पत्ती झाली अशी धाडसी कल्पना पुरूषसूक्तात येते. माणसाचा बळी न देता ‘सर्वस्वाचं अर्पण करणं’ हाच पुरूषमेध, असं शतपथ ब्राम्हणात म्हटलं आहे. ‘प्राण्यांच्या ऐवजी दक्षिणा देत आहे’ अशा अर्थाच्या सोमयागातील उद्गारातून नरबळीला पर्याय दिल्याचं दिसतं. पुरूष या पहिल्या मेध्यातील मेध क्रमानं बैल, मेंढा, आणि तांदूळ यात शिरला आणि तिथेच स्थिर झाला, ही ऐतरेय ब्राह्मणातील कथा या पर्यायांचा इतिहास सूचित करणारी आहे.

            नंतरच्या काळात गवत, धातू, मेण, कणिक, लाकूड, माती इत्यादींच्या मानवी आकारातल्या बाहुल्याही बळी दिल्या जात. आपल्याकडे कोणत्याही कार्याच्या शुभारंभी किंवा अमावास्येला ‘राखण’ म्हणून नारळ फोडला जातो. हा विधी नरबळीचाच ‘सुसंस्कृत’ अवशेष आहे. नारळाचं मानवी मस्तकाशी असलेलं साम्य लक्षात घेतलं की ते ‘श्रीफळ’ नसून ‘शिरफळ’ आहे हे आपल्या लक्षात येईल. कर्मठ लोकांना अशा वेळी ‘शेंडी असलेला’च नारळ लागतो, शेंडी नसेल  तर तो ‘मुसलमान’ म्हणून चालत नाही, या मागची तर्कसंगती लक्षात घेण्यासारखी आहे.

            कालांतरानं बळीला प्रत्यक्ष न मारता मारण्याचा अभिनय करून सोडून देणं, हाकलून देणं, एखादा अवयव तोडून कायमचं व्यंग निर्माण करणं, पुरूषाचं पुरूषत्व आणि स्त्रीचं चारित्र्य नष्ट करणं, बळीचं थोडंसं रक्त अर्पण करणं असे पर्यायही आले. शपथ घेताना स्वत:च्या बोटावर धारदार शस्त्र चालवून आपलं रक्त देवाला अर्पण करणं हा नरबळीच्या पर्यायाचं अवशेष आहे. थोडक्यात सांगायचं तर समाज विकसित होत गेला तसतशी नरबळीतली हिंसकता कमी होत गेली.

समारोप : स्वत:चं हित साधावं यासाठी दुसर्‍याची हत्या करण्यामागे आत्मसंरक्षणाची स्वार्थी भावना होती, देवतांच्या कोपाची भीती होती आणि महत्वाचं म्हणजे सृष्टीच्या कार्यकारण नियमांविषयी आत्यंतिक अज्ञान होतं. या सगळ्यातून नरबळीची निर्घृण प्रथा अस्तित्वात आली. बळी जाताना माणसाला किती यातना होतात याची जाणीवच बघणार्‍यांच्या मनात तेव्हा नसेल का? दया, करूणा, सहानुभूती, संवेदनशीलता, माणुसकी या भावनाच तेव्हा नव्हत्या का? समाजाच्या आदिम, रानटी अवस्थेत तशा त्या नसतील असं म्हटलं तरी आजच्या आपल्या प्रगत समाजाचं काय? आज अस्तित्वात असणारे सगळेच धर्म नरबळीची प्रथा नाहीशी झाल्यानंतर अस्तित्वात आले. त्यामुळे कुठल्याच धर्मात नरबळीचं समर्थन नाही. म्हणून तरी महाराष्ट्रात पाठोपाठ घडलेले नरबळीचे प्रकार आणि त्यामागची अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू मानसिकता समाजानं, सामाजिक संघटनांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्यानं घ्यायला हवी होती. तसं झालेलं दिसत नाही. याचा अर्थ आपण कितीही सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरला तरी प्रत्यक्षात आपण रानटी अवस्थेतील समाजासारखेच संवेदनाहीन आणि निर्दय आहोत असाच होतो…

An illustration of the ritual sacrifice by strangulation of 53 of young women (aged 15 to 25) at the Mound 72 burial of an important personage, now referred to as the “Birdman” because of the falcon shaped arrangement of beads around his body. Mound 72 is a ridgetop mound at the Cahokia Mounds Site, a large Mississippian culture mound center located in present day Madison County, Illinois.

14   नरबळीच्या दहा अतिविलक्षण पद्धती

10. वास्तुची ‘पायाभरणी’ : चीनमध्ये जशी पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी नरबळी देण्याची प्रथा होती, तशी एखादं बांधकाम किंवा इमारत मजबूत व्हावी यासाठीही नरबळी दिले जात. याबाबत प्रसिद्ध असणारं उदाहरण म्हणजे युद्धात पकडला गेलेल्या पराभूत साई राज्याच्या युवराजाचा एका धरणाच्या पायात दिलेला नरबळी.

9. हाराकिरी : जपानमधले सामुराई योद्धे शत्रूच्या हाती सापडून मानभंग होऊ नये यासाठी किंवा एखाद्या दुष्कृत्यामुळे गमावलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी ‘सेप्पुकु’चा अवलंब करत. हा त्या योद्ध्यांच्या आचारसंहितेचा भाग असे. सुरा किंवा छोटी तलवार स्वत:च्या पोटात खुपसून ते आपली आतडी बाहेर काढत. मग त्यांचे सहकारी(कैशाकुनिन) त्यांचा शिरच्छेद करत असत.

8. रूमालानं गळफास : कालीमातेला संतुष्ट करण्यासाठी भारतातले ‘ठग’ लोक आपल्या बळींना रूमालानं गळफास लावून मारत. प्रवासी लोकांमध्ये मिसळायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि रात्री त्यांना ठार करून त्यांच्याकडच्या चीजवस्तू लुटायच्या, असा त्यांचा व्यवहार असे. एकोणिसाव्या शतकात सुमारे दोन लाख लोक या वेडेचारात बळी गेले असा अंदाज आहे.

7. श्रद्धेचा ‘कडेलोट’ : चुनखडीच्या डोंगरांत असणारी मोठाली विवरं हे पवित्र पाताळाकडे जाणारे मार्ग आहेत आणि त्यात जाणारी माणसं मरत नाहीत, असा माया लोकांचा(मेक्सिको) समज होता. त्यामुळे या विवरांमध्ये ते आपल्याच माणसांना फेकून देत असत.

6. पारलौकिक सहजीवनासाठी : फिजी बेटांवर पुरूष मेला की, परलोकातही त्याला साथ मिळावी म्हणून त्याच्या बायकोला गळा घोटून ठार मारलं जात असे. एखादा टोळी प्रमुख मेला तर त्याच्या सगळ्याच बायकांना ठार केलं जाई. विशेष म्हणजे या हत्येचा ‘मान’ आणि जबाबदारी बायकोच्या भावाची असे.

5. वार्षिक शिरच्छेद : आफ्रिकेतल्या डाहोमे राज्याच्या(आजचा घाना देश) वार्षिक समारंभात राज्याची समृद्धी वाढावी या उद्देशानं गुलाम, गुन्हेगार आणि युद्धकैदी यांचे शिरच्छेद केले जात असत. या समारंभाचं त्यांच्या भाषेतलं नाव ‘ह्यून्टॅनू’ याचा शब्दश; अर्थ ‘वार्षिक मस्तक व्यवहार’ असा होतो.

4. मृत्यूनंतरच्या ऐषारामासाठी : इजिप्तमधल्या राजांच्या(फेरो) मृत्यूनंतर त्यांना दफन करताना वेगवेगळ्या ‘जीवनावश्यक’ वस्तूंबरोबरच त्यांचे सेवकही जिवंतपणे पुरले जात. मृत्यूनंतरच्या आयुष्यात राजाची सेवा करण्यासाठी या दास-दासींना मादक द्रव्यांच्या अंमलाखाली ‘पाठवलं’ जात असे. मेसोपोटेमियामध्ये तर सेवकांबरोबरच रक्षक, गायक-वादक, खुशमस्करे यांनाही विषप्रयोगानं ‘रवाना’ केलं जात असे.

3. सामुहिक दहन : इंग्लंड, फ्रान्स, स्पेन या भागातील केल्ट लोकांचे पुरोहित(ड्रुइड) जिवंत जाळून नरबळी देत. मालक मेला की, त्याच्याबरोबर त्याच्या गुलामांनाही जाळलं जात असे. ‘देवतांच्या आवडीनुसार’ बळींना फाशी देऊन किंवा पाण्याच बुडवून मारण्याची प्रथाही होती. पण या लोकांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते झाडांच्या फांद्या वापरून माणसाच्या आकाराचा एक मोठा पुतळा बनवत, त्यात जिवंत माणसांना कोंडत आणि मग त्याला आग लावून देत.

2. क्रौर्यातही वैविध्य : अ‍ॅझटेक लोक हे नरबळी देण्याच्या विविधतेबद्दल प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या सूर्यदेवतेला जिवंत माणसांच्या शरीरातील हृदयं कापून बाहेर काढून त्यांचे भोग चढवत. जलदेवतेला ‘रडणार्‍या’ मुलांचे बळी देत. बळीच्या अंगावर बाणांचा वर्षाव करून, नंतर त्याची कातडी सोलून तो सृजनदेवतेला अर्पण केला जाई. कातडी सोललेल्या स्त्रियांचे बळी पृथ्वीमातेला दिले जात.

1. क्रौर्याचा कळस : भूमध्यसागरी प्रदेशातल्या फेनिशियन आणि काथॅजिनियन संस्कृतीत लहान मुलांना बळी देणं हा धार्मिक कृत्याचा भाग असे. वस्तीच्या मध्यभागी असलेल्या ‘मोलॉक’ देवतेच्या मूर्तीच्या कललेल्या हातांवर मुलं ठेवली जात आणि तिथून ती घरंगळत जाऊन मूर्तीसमोर असणार्‍या अग्नीकुंडात पडत. यामुळे सगळ्या समाजाचं रक्षण होतं असा त्यांचा समज होता.

-डॉ. आशुतोष मुळ्ये