त्सुनामीची लाट, धरण फुटून झालेला हाहा:कार, मोठा भूकंप यासारख्या घटना यामध्ये जीवित व वित्त यांचे प्रचंड नुकसान होते हे खरे; पण अशा घटनांमुळे निर्माण झालेले भय व चिंता अनेक अंधविश्वासांनाही जन्म देतात. 11 सप्टेंबर 2001 चा न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटर वरील हल्ला याला अपवाद नाही. हा हल्ला 9/11 या नावाने प्रसिद्ध आहे. 9/11 नंतर विविध प्रकारच्या अंधविश्वासाची लाट मृतांच्या नातेवाईकात पसरली. त्याचा हा परिचय.
11 सप्टेंबर 2001 रोजी अतिरेक्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटर आणि व्हर्जिनिया राज्यातील अर्लिंग्टन येथील पेंटॅगॉन इमारतीवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 3000 नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानावर केलेला प्रतीहल्ला व इतर कारवाया व त्या संदर्भात उपस्थित वाद विषय अजूनही संपलेले नाहीत.
या हल्ल्याचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांनी व मित्रांनी या घटनेमागे अति नैसर्गिक गूढ कारणे असावीत अशी करून घेतलेली समजूत. काहीजण या हल्ल्याच्या घटनेची पूर्वचिन्हे(Signs) आपल्याला दिसली होती असे सांगू लागले तर काहीजण आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची स्वप्नाद्वारे पूर्वसूचना मिळाल्याचे सांगत होते. काहीजण आपले मृत नातेवाईक प्रत्यक्ष भेटून गेल्याचे वर्णन करीत होते. बॉनी नामक एका बाईचा पती 9/11 च्या हल्ल्यात ठार झाला होता. या बाईंनी तिच्यासारख्याच इतरांना मृतात्म्याबाबत जे गूढ अनुभव आले त्याचे संकलन करून एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याने नाव आहे-Messages : Signs, Visits, and Premonitions from Loved ones Lost on 9/11
न्यूयॉर्क ही अमेरिकेची व्यापारी राजधानी. या शहराच्या मॅनहॅटन या गजबजलेल्या भागात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे जोड मनोरे दिमाखात उभे होते. ही इमारत अमेरिकेतील दोन नंबरची उंच इमारत स्टीलच्या या जोड मनोर्यापैकी एकात सर्वात वरच्या मजल्यावर रेस्टॉरंट तर दुसर्यात वेधशाळा होती. यांच्या तळाला अनेक इमारतींचे जाळे तर सर्वात तळाला पाच मजली वाहन तळ होता. ज्यात 2000 कार पार्क करता येतील. अमेरिका व मध्यपूर्वेतील अतिरेकी संघटना यांच्यातील संघर्षामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे नेहमीच अतिरेक्यांचे लक्ष्य राहिले. 9/11 च्या हल्ल्यापूर्वी साडे आठ वर्षे या इमारतीच्या वाहनतळात बाँबस्फोट घडवून आणण्यात आले होते. अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने या स्फोटाचा तपास करून चार दहशतवाद्यांना पकडले होते व त्यांना प्रत्येकी 240 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
9/11 च्या विमान हल्ल्यात 19 दहशतवादी सहभागी होते. त्यांनी चार विमाने वापरली. त्यातील दोन वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळण्यात आली तर एक वॉशिंग्टनजवळ पेंटॅगॉन इमारतीवर आदळले. चौथे विमान ज्याचे लक्ष वॉशिंग्टन असावे. इच्छित लक्ष्याजवळ पोचू शकले नाही ते दुसरीकडे कोसळले.
या हल्ल्याच्या तपासात अल कायदा व या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचे नाव जाहीर झाले. सूड म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीविरोधात युद्ध पुकारले. ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आले आहे. मधल्या काळात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे पुन:निर्माण जोरात सुरू झाले आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांची स्मारके उभी करण्यात आली.

संकटाची सांकेतिक पूर्वचिन्हे (Signs)
9/11 च्या घटनेबद्दलचे तर्कवितर्क व मतमतांतरे व्यक्त होत असली तरी या घटनेने कधीही न भरून न येणारे नुकसान झाले याबद्दल संदेह वाटायला नको. इतक्या मोठ्या संख्येने ठार झालेल्या नागरिकांच्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. त्यांच्यावरील आघात व वियोगाची भावना आपण समजून घ्यायला हवी. अशा भावनिक अवस्थेतून अंधविश्वासाची ओढ निर्माण होणे साहजिकच आहे. परिणामी बॉनीने ‘Messages’ हा मृतात्म्यांच्या अनुभवावर आधारीत ग्रंथ लिहिला.
या ग्रंथात बॉनीने तिच्या मृत नवर्याशी कसा संपर्क झाला याबाबतचे सांकेतिक पूर्व अनुभवकथन केलंय. अशाच प्रकारच्या अनेक अनुभवांचे वर्णन या ग्रंथात आहे. ईमन(Eamon) या आपल्या नवर्याबाबत तिने लिहिले आहे, “माझ्या सभोवताली सर्व कसं शांत होतं. हवेत वार्याची मंद लहर सुद्धा जाणवत नव्हती. मग अचानक वर वार्याच्या जोरदार झोताचा अचानक आवाज ऐकू आला. तो जोरदार होऊ लागला. झाडाच्या पानांची व फांद्यांची सळसळ स्पष्ट दिसू लागली. या झोताचे स्वरूप एखाद्या नदीच्या आकाराचे. होते.” बॉनीचा निष्कर्ष असा – “हा झोत कसा व कुठून आला ते मला कळेना… पण माझी पक्की खात्री झाली की, याचा संबंध माझ्या ईमनशी होता. त्याचाच निरोप घेऊन तो झोत आला होता.”
तीव्र मनोकामना (Wishful Thinking) व अपेक्षा सामर्थ्य (Power of expectation) याचे बॉनीचा अनुभव हे उत्तम उदाहरण आहे. बॉनीने पुढं काय लिहिलंय ते पहा – “माझ्या वडिलांनी त्याच्या मरणापूर्वी दोन वेळा मला वचन दिलं होतं की, बॉनी तू हे विसरू नकोस की माझा मृत्यू समीप आला की, मी तुझ्याशी वार्याच्या झोताच्या सपात बोलेन.” साहजिकच बॉनीने वार्याचा झोत हा मृतात्म्याचा आवाज ही धारणा मनाशी पक्की केली. तिच्या नवर्याच्या मृत्यूपूर्वी तिला जाणवलेला वार्याचा प्रवाह हा त्याच्या मरणाचा पूर्वसंदेश आहे असा अर्थ तिने लावला. जे शोकाकूल लोक अशा खुणा वा संदेशाच्या शोधात असतात किंवा अपेक्षा बाळगतात त्यांना भोलवतालच्या परिस्थितीत घटत असलेल्या घटना किंवा विविध वस्तू यामध्ये त्यांना हवा तो अर्थ सापडतो. काहीजण त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वापरातील वस्तूमध्ये मृतात्म्याचा संदेश शोधतात. या त्यांच्या विचार करण्याच्या करण्याच्या प्रकाराला पश्चात संबंध (Retrofitting) म्हणतात. असा संबंध जोडणे म्हणजे घटना घडून गेल्यावर तिच्याशी कशाचा तरी संबंध जोडणे होय.
बॉनीच्या ग्रंथात अशा सहसंबंध घटनांची अनेक उदाहरणे दिली आहेत. नाणे सापडणे, पक्षी किंवा फुलपाखरू दिसणे, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर इंद्रधनुष्य दिसणे इ.इ. या अगदीच सामान्य स्वरूपाच्या घटना आहेत.
बॉनीने ‘Messages’ मध्ये केलेल्या अनुभव कथनात एकच मुद्दा पुन्हा पुन्हा लावून धरलाय की, अशा पूर्व सांकेतिक घटनांचे कारण आपणास कळत नाही. हवा शांत होती मग एकाएकी वार्याचा झोत कसा आला. बसल्या जागी खांद्याजवळ फुलपाखरू कसं आलं. इ.इ. ज्याचे कारण कळत नाही त्या अतिंद्रिय स्वरूपाच्याच असल्या पाहिजेत. हा चुकीचा युक्तीवाद आहे. अज्ञानमूलक कार्यकारणभावाची अनेक उदाहरणे पदोपदी दृष्टीस पडतात. मला कळत नाही म्हणूत ते दैवी आहे अतिंद्रिय आहे ही सहजप्रवृत्ती अंधविश्वासाला जन्म देते.
मृतात्म्याच्या भेटीचे भास – Waking Dreams
9/11 च्या हल्ल्यात ठार झालेल्यांची पूनर्भेट झाल्याचे असाधारण अनुभव ‘Messages’ मध्ये कथन केलेत. या अनुभवांचे सोपे स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. या दुर्घटनेतील एक बळी क्रॉसधर नावाचा नागरिक त्याच्या रूममेटला दिसला. तो सांगतो- “9/11 नंतर मला तो भेटला. मी तेव्हा जागा होतो. की झोपलो होतो हे नक्की आठवत नाही. पण मला जे नक्की आठवते ते म्हणजे वेल्स हा माझ्या बेडरूमच्या दरवाजाजवळ उभा राहिलाय व म्हणतोय, ‘अरे बाबा सगळं काही ठीक होणार आहे’ तो तेथे फक्त सेकंदमात्र उभा होता. लगेच तो म्हणाला, ‘मला आता जायला हवं.’ डेबोरा(Deborah) या बाईचा नवरा ज्यो हा उत्तरेकडील टॉवरमध्ये अकौंटंट म्हणून काम करत होता. ‘बेडरूममध्ये तो अचानक प्रगटला. त्याचा हात माझ्या उशीजवळ विसावला होता. त्याच्या चेहर्यावर शांत भाव होता. यावेळी मी झोपेत नव्हते तर जागीच होते.’
वर वर्णन केलेले अनुभव म्हणजे जागेपण व झोप यांच्या सीमारेषेवरील स्वप्नवत भास होत. याला थरज्ञळपस वीशरा म्हणतात. अतिंद्रिय शक्तीचे पुरावे म्हणून असे अनुभव प्राचीन काळापासून सांगितले जातात. अशा अनुभवांमध्ये सैतानाची भेट, भूत दिसणे, परग्रहावरील प्रवासी दिसणे इत्यादी भासांचा समावेश होतो.
वेलेसच्या दुसर्या एका मित्राचा अनुभव पहा- हा मित्र सोफ्यावर बसून टी.व्ही.पहात होता. डोळ्यावर पेंग असावा. याने वेलेसच्या पावलाचा आवाज ऐकला. नंतर तो त्याला चक्क दिसला. तो म्हणाला, ‘मित्रा, सगळं ठीक आहे. मी पण ठीक आहे.’ हा त्याचा अर्धजागृत अवस्थेतील भास किंवा स्वप्न होते पण यालाच तो खराखुरा अनुभव समजत होता. पुढं काय घडलं ते या मित्राला आठवले नाही. त्याने डोळे मिटले की तो तसाच बाहेर निघून गेला हेही त्याला आठवत नव्हते. अर्धजागृत अवस्थेतील स्वप्नाची ही वैशिष्ट्ये मानसशास्त्रज्ञ बेकर याने स्पष्ट केलीत. असा अनुभव म्हणजे स्वप्न किंवा भास यालाच ही मंडळी खात्रीपूर्वक खरा अनुभव समजतात. असा अनुभव घेणारा लगेचच पटकन निद्रावस्थेत जातो.
काही लोकांना जागृत व निद्रा अवस्थेत स्वप्ने दिसतात. लिसा या बाईचा असा अनुभव आहे. तिचा नवरा टिमी हा 9/11 च्या हल्ल्यात ठार झाला होता. लिसाला असं वाटतं की, तिचा नवरा अधूनमधून तिच्या बेडरूममध्ये येतो. तो तिच्याशी रात्रीच्या वेळी भेटतो व बोलतो. कधी कधी झोपेत तर कधी कधी जागेपणी सुद्धा. लिसाला टिमी भेटत असल्याचे अनुभव रात्रीच येतात. तिचे टिमीला पूर्ण जागेपणी व दिवसा इकडे तिकडे हिंडताना कधीच पाहिले नाही. याबाबत ज्यो निकेल या संशोधकाचे स्पष्टीकरण असे- जागेपणी ज्या लोकांना आत्मा-भूत पिशाच्च यांचे अनुभव येतात ते बहुधा थकलेल्या अवस्थेत, कंटाळवाण्या कामात असताना किंवा वाचनासारख्या लक्ष पूर्णपणे केंद्रीत केलेल्या अवस्थेत किंवा अर्धजागृत अवस्थेत स्वप्न पहाताना.
पूर्वसूचक स्वप्न –Premonitions
पुढं काही वाईट घडणार याची जाणीव स्वप्नाद्वारे होणे म्हणजे झीशोीळींळेप. अशा अनुभवांचे वर्णन बॉनीच्या ‘Messages’ मध्ये भरपूर आढळते. यातील पहिला अनुभव आहे अब्राहम लिंकनचा. ‘लिंकनने एक स्वप्न पाहिले त्याने अनेक सहकार्यांना या स्वप्नाबद्दल सांगितले आणि त्याने या अनुभवाची आपल्या डायरीत नोंदही केली.’ बॉनीने पुढं लिहिलंय – ‘लिंकनला Catafalque वर एक प्रेत दिसलं. त्याभोवती मिलिटरी गार्डस उभे होते व इतर अनेक लोक शोक करत होते. व्हाईट हाऊसमध्ये कोणाचा मृत्यू झालाय? मी गार्डला विचारले. ‘प्रेसिडेंट’ त्याचे उत्तर दिले. त्याचा एका माथेफिरूने खून केला.’ नंतर लोकांच्या गर्दीतून मोठा हुंदका ऐकू आला व मी लगेचच जागा झालो. पुढे मला झोपच येईना आणि ते केवळ स्वप्न होते तरी तेव्हापासून माझी विचित्र अवस्था झालीय.’
वर वर्णन केलेल्या लिंकनच्या स्वप्नात अनेक असत्य गोष्टी आहेत. प्रथम चूक म्हणजे या स्वप्नाबद्दल लिंकनने कोठेही लिहून ठेवलेले नाही. मात्र त्याने या स्वप्नाबाबत कुणाला तरी सांगितले असावे पण स्वप्नातील प्रेसीडेंट लिंकन स्वत: नव्हता तो दुसरा कोणीतरी होता कारण तसे त्याने आपला सुरक्षारक्षक वार्ड हिल याला सांगितले होते. यानंतर 30 वर्षांनी लिंकनचा खून झाला. त्यावेळी लिंकनचा एक सहकारी लामन याला या स्वप्नाची आठवण झाली व ते स्वप्न लिंकनच्या खुनाशी जोडले गेले.
लिंकनला मृत्यूचे स्वप्न पडणे किंवा त्यांचा खून होणे या घटना त्या काळच्या परिस्थितीचा विचार करता असाधारण समजता येणार नाहीत. कारण तसं घडणं अशक्य नव्हतं. यादवी युद्धाच्या काळात त्याच्या आजूबाजूला मृत्यूचे थैमान सुरू होते. 1861 ला अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी त्याच्या खुनाचा कट उधळला गेला होता. नंतरही त्याला खुनाच्या धमकीचे संदेश येत होते. एकदा तर त्याच्या खुनाच्या प्रयत्नात एक गोळी त्याच्या हॅटमधून आरपार गेली होती. लामन व इतर सहकार्यांनी लिंकनला स्व संरक्षणाबद्दल वारंवार सुनावले होते.
लिंकनप्रमाणेच वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांना भविष्यात येऊ शकणार्या संकटाची पूर्वकल्पना असणार यात आश्चर्य नाही. 1993 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर मोठा हल्ला झाला होता. ओसामा बिन लादेनने 1996 साली अमेरिकेवर हल्ला करण्याचे फतवे काढले होते. 1998 मध्ये त्याने अमेरिकेविरोधात जिहादची हाक दिली होती. अशा परिस्थितीत भविष्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होईल ही भीती तेथील कर्मचार्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण न करेल तरच नवल. अशा मानसिक अवस्थेबाबत व मोठ्या अपघाताबाबत मार्टीन गार्डनर लिहितात- प्रसिद्धी माध्यमात झळकलेल्या मोठ्या अपघाताबद्दल किंवा संकटाबद्दलचा इशारा देणार्या स्वप्नांना एवढे महत्व का द्यावे? अशा तर्हेची स्वप्ने लाखो लोकांना पडतात हे आपण लक्षात घेत नाही. त्यांच्या स्वप्नाबद्दल काहीच घडताना आढळत नाही. विविध हेतूंनी अशा स्वप्नांचा बाऊ केला जातो व त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. अशी स्वप्ने अतिशयोक्तीपूर्ण व मुद्दाम रचलेली असू शकतात. अंधविश्वासाचा फायदा उठवू इच्छिणार्यांना आपले महत्व वाढविण्यासाठी असे उद्योग करण्याची हौस असावी. मात्र काही प्रामाणिक माणसं सुद्धा नेणीवेच्या प्रभावाखाली अशी अतिशयोक्तीपूर्ण स्वप्ने सांगत असावीत.
गार्डनर याबाबत स्पष्टीकरण देतात –
एखाद्या संकटाबाबत पूर्वकल्पना देणारे स्वप्नाबद्दल लोक हजार वेळा फुशारकी मारून बोलतात पण अशा स्वप्नांबद्दलचा पूर्ण तपशील विचारला तर तो त्यांना आठवत नाही विशेषत: स्वप्न बर्याच काळापूर्वीचे असेल तर. जागे झाल्यावर केवळ दहा मिनिटानंतर सुद्धा आपणास पडलेल्या स्वप्नांचा तपशील आपणास आठवत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग बर्याच काळापूर्वीचे स्वप्नांचे काय घेऊन बसलात? अनेक वेळा सांगत असताना अशा स्वप्नाबाबतची चित्रे मनावर कोरलेली रहातात व तीच आपण पुन्हा पुन्हा सांगत असतो. सूचक स्वप्न तेव्हाच खरं मानावं लागेल जेव्हा या स्वप्नाचा तपशील ते संकट येण्यापूर्वी तपशिलात लिहून ठेवला असेल व त्या तपशीलानुसार त्या संकटाचा पडताळा घेता येत असेल तरच. यासाठी स्वप्नाचे वर्णन करणारे एखादे तपशीलवार पत्र किंवा रेडिओ टॉक किंवा टी.व्ही. मुलाखत याचा उपयोग करता येईल. मात्र हे पुरावे संकट घडून येण्याअगोदरचे व वस्तुनिष्ठ असले पाहिजेत.
वरील कारणानुसार बॉनीने लिहिलेल्या after the fact stories (घटना घडल्यानंतरच्या कथा) या विश्वसनीय मानता येणार नाहीत. एका बाईच्या स्वप्नाची चिकित्सा करू या. या बाई वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये दक्षिण टॉवरमध्ये पूर्वी काम करीत होत्या. त्यांना पडलेले एक स्वप्न. त्या मॅनहॅटनच्या दक्षिण टोकाकडे पहात होत्या.(वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दिशेने) एवढ्यात एक मोठा स्फोट तिने पाहिला आणि त्यानंतर मशरूमच्या आकाराचा एक मोठा ढग संपूर्ण शहरावर पसरल्याचा दिसला. स्वप्नात ती तिच्या नवर्याला म्हणते, ‘बिन लादेनने न्यूयॉर्क बेचिराख केले. आपल्या कुत्र्याला खिडकीपासून आत आणा खिडक्याच्या काचा जर फुटल्या तर त्याला जखमा होतील.”
ज्युलिया नामक दुसर्या बाईचे स्वप्न पहा – तिने हे स्वप्न 9/11 च्या घटनेच्या अगोदर फक्त काही दिवसांपूर्वी पाहिले. स्वप्नाचा विषय होता तिचे अगोदरचे ग्रामीण क्षेत्रातील घर एक मोठा ट्रक मुख्य रस्ता सोडून आमच्या घरात घुसला. भिंतीला एक मोठे भगदाड पडले व काळा धूर आणि आगीचा झोत दिसू लागला. या स्वप्नांचा संबंध नंतर तिने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याशी लावला.
आणखी एक उदाहरण -या हल्ल्यात बळी पडलेल्या एकाची ती स्वप्नाची डायरी होती. त्यामधील एका स्वप्नात एक अॅटमबाँब दिसला. ज्याचा आकार पेपरच्या विमानासारखा होता. हे स्वप्न 1 महिन्यापूर्वीचे होते. पण ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात अॅटम बाँब नव्हताच आणि स्वप्नातील बाँबचा स्फोट दिसला नव्हता. हे स्वप्न या बाईला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये अपघातापूर्वी 1 महिना आधी काही तात्पुरत्या कामासाठी येऊन गेल्यानंतर पडले होते. आणि ट्रेड सेंटरवर पूर्वी झालेल्या बाँबस्फोटाच्या माहितीची धास्ती तिला हे स्वप्न पडण्यास कारण ठरली असावी. हा पश्चात संबंधाचा(Retrofitting) प्रकार असला पाहिजे.
ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा या स्वप्नाशी जुळवून आणलेला हा संबंध खात्रीशीर पुरावा कसा? असेच आणखी एका बाईचे स्वप्न ते असे – तिला दोन शिकारी पक्षांचे स्वप्न पडले होते पण बॉनीच्या मते या स्वप्नाचा अर्थ तिला ट्रेड सेंटर घटनेनंतर कळला. ते दोन पक्षी म्हणजे ट्रेड सेंटरवर आदळलेली दोन विमाने.
बुवा मांत्रिकांची चलाखी
वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या घटनेनंतर 1 महिन्याच्या आतच मृतांच्या कुटुंबियांपैकी काहींनी, बुवा-बाबा व मांत्रिक-तांत्रिकांच्या दरबारी जाणे सुरू केले. ही मंडळी मृतांचे नातेवाईक व मृतात्मे यांच्यात संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी मध्यस्थी करीत. मृतात्म्याच्या जगातील टेलिफोन कार्यालय म्हणजे यांचा दरबार. पूर्वी ही मंडळी आपला दरबार अंधार्या खोलीत भरवीत व तेथे प्रत्यक्ष मृतांना बोलावीत किंवा त्यांचा आवाज किंवा त्यांनी घडवलेल्या वस्तूंच्या हालचाली इ.चे प्रयोग करीत. हे प्रयोग म्हणजे चलाखी किंवा फसवेगिरी असे. हौदीनी किंवा रँडीसारख्या जादूगारांनी भौतिक अशा बनवेगिरीचा पर्दापाश सुरू केल्यावर हे प्रकार कमी होत गेले पण त्यांची जागा आता मानसिक बनवेगिरीने घेतली ज्यात कमी धोका असतो.
एका बाबाने बॉनीला कसे प्रभावित केले पहा- ‘तुझ्या नवर्याचे नाव ए या अक्षराने सुरू होते. बरोबर? तो एाळश्रश असे आहे का?’ तिच्या नवर्याचे खरं नाव एरोप असे होते. तरी बॉनीला त्या बुवाचे ज्ञान कौतुकास्पद बरोबर वाटले. आपल्या नवर्याच्या नावाचे पहिले अक्षर ए आहे हे त्याला अचूक कसं काय कळलं? कदाचित या योगायोग असेल. कदाचित बॉनीचा मित्र या बाबाला भेटला तेव्हा त्याने दोघाची नावे त्याला सांगितली असतील.
या बुवाची चलाखी व तंत्र याबाबत बिचारी बॉनी अनभिज्ञ असावी असं दिसतं. मांत्रिकाच्या उेश्रव ठशरवळपस तंत्राचा विचार करू या. प्रश्न विचारण्याचे कौशल्य वापरून मृत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून माहिती मिळवायची व तीच माहिती मृतात्म्याकडून मिळाली असं भासवायचं असं हे कौशल्य आहे. प्रश्नांना प्रतिसाद देताना समोरच्या व्यक्तीचे शारीरिक व चेहर्यावरील हावभाव, त्याचा अनुकूल वा प्रतिकूल प्रतिसाद आणि इतर सूचक शब्द व घटना यांचा वापर हे बुवा करतात. त्यांची तुलना कुशल जादूगाराशी करता येईल. फरक इतकाच की, जादूगार हस्त लाघवाचा(Slight of hand) वापर करतात तर ही मंडळी जिव्हा कौशल्याचा(Slight of tongue) वापर करतात.
या प्रकारच्या Cold Reading चा उपयोग भोळ्या लोकांसाठी करता येतो; जे केवळ जे खरे असेल त्यावरच जोर देतात.(hits) पण चुकीचे निष्कर्ष सोयीस्कररित्या दुर्लक्षित करतात किंवा विसरतात. हेही retrofitting च होय.
अशा दरबार भरविणार्या मांत्रिक बाबांची जी अनेक तंत्रे असतात त्यापैकी सर्व संबंधितांना एकत्र बसवून प्रश्न विचारायचे. हा प्रश्न अनेकांपैकी एखाद्याला लागू झाला तर तो प्रतिसाद देतो मग हीच माहिती त्याच्या मृत व्यक्तीकडून आली असं भासवायचं असं हे तंत्र आहे. हे तंत्र एवुरीव हा तांत्रिक वापरीत होता. तो hot reading चे तंत्रही वापरी. या तंत्रात संबंधित माहिती इकडून तिकडून इतर मार्गांनी मिळविलेली असे व ती आताच मृतात्म्याकडून मिळाली असं भासवीत असे. हा एडवर्ड एका टी.व्ही.वरील कार्यक्रमात हे तंत्र वापरून फसवणूक करताना पकडला गेला होता. जर मृतात्म्याकडून माहिती मिळविण्याचे कौशल्य या मंडळींना खरोखर असते तर त्यांनी जेम्स रँडीचे वैज्ञानिक कसोटी वापरून डॉलर्सचे आव्हान स्वीकारले असते व मांत्रिकाचा धंदा सोडून मजेत जीवन जगत बसले असते.
उपसंहार
9/11 ची भयानक घटना अनेकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या निधनाने मोठ्या दु:खात लोटून गेली. त्यांची भावुकता आपण ध्यानात घ्यायला हवी. त्यांचे दु:ख, मृत व्यक्ती पुन्हा भेटेल का याची ओढ, त्यांना अंतिम निरोप देण्याची आस इ. बद्दलची पूर्वचिन्हे, भास, स्वप्न दृष्टांत किंवा मांत्रिकामार्फत आलेले संदेश हे त्यांना तात्पुरते समाधान देतीलही; पण त्यासाठी काय किंमत मोजावी लागेल? हे भ्रम अखेर त्यांना अंधश्रद्धेत बुडवतील ज्याचा शेवट ते बुवाबाजीला बळी पडण्यात होऊ शकेल. बॉनीच्या Messages द्वारे हाच निष्कर्ष निघतो.
-प्रा.प.रा.आर्डे