उदारीकरण व जागतिकीकरण यामुळे राजकारण, अर्थकारण व समाजकारणावर होणार्या परिणामांचा गेल्या वीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊहापोह करण्यात आला. पण या प्रक्रियांचे मानवी मनावर होणारे परिणाम मात्र काहीसे दुर्लक्षित राहिले आहेत. बदलत्या जीवनशैलीचा आपल्या मनावर होणार्या परिणामांचा एक दृश्य भाग म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाढलेला ताणतणाव.
एखादा संसर्गजन्य आजार पसरावा त्याप्रमाणे मानसिक ताणतणाव हे सध्या सार्वत्रिक झाले आहेत. विविध वयोगटांप्रमाणे या ताणतणावांची वेगवेगळी कारणे दिसून येतात. लहान मुलांकडून पालकांच्या वाढत्या अपेक्षा, किशोरवयीन मुलांना योग्य करिअर निवडण्याचे दडपण, तरूणांपुढे लग्नाच्या नातेसंबंधांमधील तणाव आणि नोकरी करताना होणारी ओढाताण असे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय ज्येष्ठांना एकाकीपणातून भेडसावणार्या समस्याही आहेत. वयाच्या विविध टप्प्यांवर विविध रूपांमध्ये हा ताणतणाव दिसतो. पूर्वीच्या काळी ‘देवीचा रोगी कळवा आणि एक हजार मिळवा’ अशी एक घोषणा होती. तसे आता ‘ताण न घेणारी व्यक्ती कळवा आणि एक लाख रूपये मिळवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. या वाढत्या ताणतणावांमागची बदलत्या जीवनशैलीतून येणारी कारणे समजून घेतली पाहिजेत.
त्यातील पहिले कारण म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्याता वाढलेला वेग! आपण सर्वच जण सध्या भोवळ येईल, अशा गतीने आयुष्य जगतो आहोत. दैनंदिन जीवनामधील विरंगुळा व विश्रांतीच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. दुसरे कारण म्हणजे असंख्य संधींची उपलब्धता. सातत्याने कष्ट करायची तयारी असलेल्या वर्गासाठी कधी नव्हे एवढ्या संधी सध्या दृष्टीक्षेपात आल्या आहेत. संधीची उपलब्धता हे एक दुधारी शस्त्र आहे. वैयक्तिक आयुष्यात एका मर्यादेपेक्षा जास्त संधी या मानवी मनाला गोंधळात टाकतात, तसेच संधी साधण्यासाठी मोठ्या जनसमूहात चुरस असल्यामुळे आयुष्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये टोकाची स्पर्धात्मकता दिसून येते. या बरोबरीनेच आयुष्यामध्ये सार्थकतेपेक्षा भौतिकतेला आलेले महत्त्व हे देखील बदलत्या जीवनशैलीचे महत्त्वाचे अंग आहे.
एका बाजूला आयुष्यात सातत्याने वेगाने धावणे, ते करीत असतानाच उपलब्ध असंख्य पर्यायांमधून आपल्याला हवे ते पर्याय निवडणे, हे निश्चितच ताण वाढविणारे आहे. त्यातच आयुष्याच्या सार्थकतेचे भानदेखील गमावले गेले असेल, तर जी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते ती सध्या आपण समाज म्हणून अनुभवतो आहोत.
जवळच्या नातेसंबंधांमधील विसाव्याच्या जागा या परिस्थितीत आधार देणार्या ठरतात. पण बदलत्या जीवनशैलीमध्ये नातेसंबंधांची वीणदेखील उसवू लागल्यामुळे या हक्काच्या जागादेखील कमी होत चालल्या आहेत.
सर्व थरांत ताणाचा शिरकाव
वाढत्या ताणतणावांच्या बरोबरीनेच मानसिक औदासिन्याचा आजार वाढत आहे. औदासिन्याचा आजार आणि वाढती व्यसनाधीनता यांचा संबंध आहे हे भारतातच नव्हे तर जगभरात आढळते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानव समूहाला त्रासदायक ठरणार्या पहिल्या पाच आजारांमध्ये या दोन्ही आजारांचा समावेश होतो. दर पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधी औदासीन्यासारख्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. भारतासारख्या देशामधील 10 टक्के ते 15 टक्के पुरूष हे कमी-अधिक प्रमाणात दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. गेल्या दोन दशकांमधील बदलत्या जीवनशैलीचा एक मोठा संदर्भ या आजारांना आहे. हे आजार व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम करीत असल्याने एकूणच समाजाच्या उत्पादकतेवर मोठा घाला घालतात.
टोकाच्या औसासिन्याचे रूपांतर व्यक्तीने स्वत:चे आयुष्य स्वत:च्या हाताने संपवून घेण्यामध्ये होते आणि जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षांमध्ये आत्महत्या करण्याच्या दोन लाटांना समाज म्हणून आपल्याला सामोरे जावे लागले आहे. एक शेतकरी वर्गाच्या व दुसर्या विद्यार्थ्यांच्या आणि तरूणवर्गांमधील आत्महत्या. जागतिकीकरणामुळे प्रभावित झालेल्या अर्थकारणाचा व शैक्षणिक धोरणाचा एक मोठा संदर्भ अनुक्रमे शेतकर्यांच्या व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना असला तरीही आत्महत्या करणे ही शेवटी एक मानसिक निर्णय प्रक्रिया असते. त्यामुळे मानसिकतेवर झालेला परिणाम निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. केवळ शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून अथवा विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून हे प्रश्न सुटत नाहीत, हे आपण अनुभवतोच आहोत. शेतकर्यांच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत आणि वृत्तपत्रात एका तरी तरूण अथवा तरूणीच्या आत्महत्येची बातमी आपण रोज वाचतो आहोत. त्यामुळे जगाच्या सपाट होण्याने मानसिकतेवर होणार्या परिणामांचे व्यवस्थित आकलन करून त्यावर उपचार केल्याशिवाय हे आत्महत्येचे संकट थांबेल असे वाटत नाही.
हे सपाटीकरण आणखीच निसरडे करण्याचे काम गेल्या दोन दशकांमध्ये समाजात वाढणारी व्यसनाधीनता करते आहे. ‘निम्हांस’ या भारतातील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा नुकताच प्रसिद्ध झालेला व्यसनाविषयीचा अहवाल असे सांगतो, की गेल्या दोन दशकांमध्ये भारतामधील व्यसनाचा पहिला अनुभव घेण्याचे वय 35 वर्षांवरून 18 पर्यंत आले आहे. दारूसारख्या व्यसनापासून नैसर्गिकदृष्ट्या दूर राहणारा भारतातील महिला वर्ग सहजी व्यसनाचा स्वीकार करू लागला आहे आणि समाजामध्ये व्यसन करणे ही बाब चुकीची न ठरता प्रतिष्ठेची झाली आहे. हे कमी की काय म्हणून आपले शासन समाजामध्ये जास्तीत जास्त दारू कशी उपलब्ध होईल, असे व्यसनाला धार्जिणे धोरण राबवते आहे. महाराष्ट्र शासनाला दारूपासून गेल्या वर्षी मिळालेला महसूल हा 5,900 कोटी रूपये असून येत्या वर्षी तो 8,500 कोटी करण्याचा संकल्प सरकारने जोडला आहे. दारूच्या सेवनाने होणारी एकत्रित हानी ही दारूच्या वाढत्या महसुलातून मिळणार्या करापेक्षा कायमच जास्त ठरते. उदारीकरणाच्या कालखंडामध्ये व्यसनाला प्रभावी प्रतिबंध घातला नाही तर उदारीकरणातून येणार्या सुबत्तेचा एक मोठा भाग व्यसनाकडे वळतो हा रशिया, मेक्सिकोसारख्या देशाचा धडा आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो आहोत.
पोकळी बुवांच्या पथ्यावर
एका बाजूला वाढते मानसिक अस्वास्थ व दुसर्या बाजूला त्यावर उपचार करणार्यांची अत्यंत तोकडी संख्या यामधून निर्माण झालेली पोकळी तथाकथित आध्यात्मिक बाबा-बुवांनी भरून काढल्याचे धोकादायक वास्तव गेल्या काही वर्षांमध्ये दिसले आहे. पारमार्थिक कल्याणाबरोबरच हे बाबा-बुवा आता ‘अलविदा तणाव’ची देखील भाषा बोलू लागले आहेत. लोकांना बदलत्या सामाजिक वास्तवांविषयी सजग करून स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवायला सक्षम करण्याऐवजी त्यांची विचार करण्याची क्षमता पंगू करण्याचे काम हे तथाकथित आध्यात्मिक पंथ इमाने इतबारे करीत आहेत.
बदलत्या परिस्थितीचे आपल्या मानसिकतेवर होणारे परिणाम पूर्णत: टाळणे हे अवघड असले तरी त्यांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्यामध्ये अति वेगवान, टोकाची, स्पर्धात्मक व केवळ भौतिकतेच्या मागे धावणारी जीवनशैली जाणीवपूर्वक बदलण्याचा प्रयत्न करणे व कौटुंबिक नातेसंबंधांची वीण उसवू नये म्हणून नात्यांमध्ये गुंतवणूक करणे हे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे कलंकाच्या भावेनेने न पाहता अधिक निरोगी पद्धतीने पाहायला शिकणे व मानसिक अस्वास्थ्य आल्यास तातडीने मदत घेणे हेदेखील महत्त्वाचे आहे. व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा तोडणे व स्वत:चे ताण हाताळण्यासाठी व्यसनांचा आधार न घेणे अशादेखील काही गोष्टी करता येतील. संपूर्ण भारतामध्ये मानसिक आरोग्याच्या सुविधा पुरविणार्या तज्ज्ञांची एकत्रित संख्या ही चार ते पाच हजारांच्या आतमध्ये आहे, ही एकच संख्या समाज म्हणून या विषयाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष दर्शविते.
शासकीय पातळीवर समाजामध्ये मानसोपचारतज्ज्ञ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक व सातत्याने प्रयत्न होणे हेदेखील अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या पातळीवर मानसिक आरोग्याच्या सुविधा प्राथमिक आरोग्याच्या पातळीपासून लोकांसाठी सहजी उपलब्ध व्हाव्यात, असे प्रयत्न व्हायला हवेत. बहुतांश मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे नातेसंबंधातील व्यक्तींना सहज ओळखता येतात व थोड्याशा भावनिक प्रथमोपचाराने आटोक्यात देखील येऊ शकतात. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामधील ही वाढती गरज पाहता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘मानसमित्र’ नावाने भावनिक प्रथमोपचार शिकविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. अशा उपक्रमांना समाजाचा हार्दिक सहभाग मिळाल्यास बदलत्या जीवनशैलीला सहकार्याच्या व मैत्रीच्या भावनेतून एक विधायक पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
–डॉ.हमीद दाभोलकर
‘दै.सकाळ’ वरून साभार