Categories
व्यक्तिविशेष

पारधी समाजाचा परिवर्तनकार पन्नालाल रजपूत

मार्च - २०१२

-प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे

            पन्नालाल रजपूत, मु.पो.राजुलवाडी, ता.उमरेड, जि.नागपूर येथे राहतात. तसे म्हटले तर ‘पारधी’ समाज हा वंशपरंपरेने भटके जीवन जगणारा, पोटासाठी पाय जेथे घेऊन जातील तेच त्यांचे ‘निवासस्थान’. गेली 30-35 वर्षे पन्नालाल आपल्या अंधश्रद्धेने ग्रासलेल्या, आदिवासी अशिक्षित/अर्धशिक्षित, गरीब, भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नागपूर-अमरावती या विदर्भातील अत्यंत मागासलेल्या गावागावातून फिरून जनजागृती करून लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी तयार करीत आहेत व त्यांच्या अन्यायाला वाचा फोडीत आहेत. या अर्धशिक्षित सामाजिक कार्यकर्त्याकडे कोणत्याही वर्तमानपत्राची किंवा एखाद्या रेडिओ/टी.व्ही.माध्यमाची नजर गेली नाही. असा हा दुर्लक्षित राहिलेला, गरीब, भटक्या विमुक्तांचा, पारधी समाजाचा तारणहार पन्नालाल सदू रजपूत.

            पन्नालाल रजपूत यांच्या छोटेखानी कुटुंबात तीन मुले, सुना, नातवंडे व त्यांची पत्नी नंदा रजपूत या सर्वांनीच जणु सामाजिक कामासाठी वाहून घेतले आहे. पन्नालाल यांच्या सामाजिक कार्याची सुरवात देखील पारधी समाजावर होणार्‍या सामुहिक हत्येसारख्या प्रकारातून झाली. कुठेही दरोडा पडो, चोरी होवो, त्याचे खापर पार ब्रिटीश पूर्व काळापासून पारधी समाजावर फोडायला नागरी समाज तयारच आहे. आजही स्थिती फारशी वेगळी नाही. यासारख्या अनेक अन्यायांवर किंवा ‘पारधी’ समाजाने सामुहिक शेती केली तर तिला वरकड जमिनीवरील अतिक्रमण म्हणून संबोधून कधी गावचे सरपंच, कधी पोलीस पाटील, तलाठी/मामलेदार यांच्याकडे खोट्या केसेस घालून पारधी माणसांना सळो की पळो करण्याचा अन्याय असो किंवा गावच्या बाहेर ‘पालं’ टाकून वस्ती करून राहिल्यास त्याला हुसकावण्याचे प्रकार असोत. ह्यासारख्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी पन्नालाल रजपूत यांनी संपूर्ण मराठवाडा, विदर्भ पिंजून काढायला सन 1983 ते 85 मध्ये सुरवात केली. अशा तर्‍हेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राजुलवाडीत त्यांनी पारध्यांची न्यायहक्क परिषद(स्वाभिमान परिषद) सन 1995, 2001, 2002 मध्ये घेतली होती. ज्यावेळी गणेश पवार या तरूण कार्यकर्त्याची हत्या नागर समाजाने नाहक केली. त्यावेळी देखील स्वाभिमान परिषदेतर्फे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. व त्यातूनच हजारो पारधी एकजूट होऊन पुष्पा चौधरी, नंदा वन्चंडा, मूर्त्या पवार, कृष्णराव चव्हाण असे एक ना अनेक कार्यकर्ते, स्त्री-पुरूष नागेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नालाल रजपूत यांच्या खांद्याला खांदा लावून अन्यायाविरूद्ध लढाई लढत होते. आजही लढताहेत.

            आजही पारधी समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. शासकीय सोयी सवलती त्या समाजापर्यंत पोहचवण्यासाठी पन्नालाल सर्वोतोपरी झटत आहेत. शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता, रूढी परंपरा अशा एक ना अनेक समस्यांवर पन्नालाल रजपूत स्वत: लढे उभे करून जनजागृती करीत आहेत. समाजातील माणसांनी किमान गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा, नोकरी-धंद्यातून मिळावा तो सुशिक्षित व सुंदर स्वच्छ समाजासारखे जीवन जगावा ह्यासाठी  पन्नालालने उभी हयात खर्च केली.

            आजही निम्म्याहून अर्धी अधिक पारधी जनता ही ‘पालात’च राहते. अजूनही अनेकांना पक्के घर सोडाच; परंतु साधी झोपडीदेखील नाही. या सर्व राहणीमानातून पारधी समाजाला अनेक रूढी-परंपरा व अंधश्रद्धांना बळी पडावे लागते. आजही बहुसंख्य पारधी समाजातील गरोदर स्त्रियांची बाळंतपणं ही पालाच्या बाहेर झाडाझुडपांच्या आडोशाला लुगडं गुंडाळून केली जातात. नव्हे तर ही एक परंपराच आहे. म्हणजे पक्क्या घरात राहणार्‍या पारधी समाजातील स्त्रियांना देखील याच पद्धतीने बाळंतपणाला सामोरे जावे लागते. ही वस्तुस्थिती आहे.

            या व यासारख्या प्रथेला काल परवापर्यंत पन्नालाल सारख्या फुले-आंबेडकरी विचारांनी भारावलेल्या कार्यकर्त्याला स्वत:च्या घरातच सामोरे जावे लागत होते. आज मात्र ह्या परिस्थितीत झपाट्याने बदल होत आहे. त्याचे कारण म्हणजे पन्नालालसारखे कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन व प्रबोधन कार्य.

            पारधी समाजाचा ‘आदिवासी’ हा शिक्का मोडून त्यांना ‘हिंदू’ बनवण्याचा घाट अनेक हिंदुत्ववादी राजकीय/सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या 20-25 वर्षांत घातला. या समस्येविरूद्ध देखील पन्नालाल व इतर पारधी समाजातील तरूणांनी आवाज उठवला होता. त्याशिवाय ‘देवकारण’ किंवा ‘जवारणू’ यासारख्या प्रथांमध्ये बोकड कापून गाव पंगती घालण्याच्या दुष्ट प्रथेविरूद्धदेखील रजपूतांना लढावे लागते. हल्ली तर वर्षातून दोनदा/तीनदा देखील देवकारणाच्या नावाने कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीला नाहक त्रास द्यावयाचा व त्यानिमित्ताने जेवणावळी घालायची एक नवी फॅशनदेखील पारधी समाजात येऊ घातली आहे. त्यातून नाहक एखाद्या गरीब दुबळ्याव्यक्तीला आर्थिक भुर्दंड पडतो एवढेच होते.

            पारधी समाजावर अन्याय करणार्‍या समाजातील धनदांडग्या मंडळीला, पोलीसांना, सरपंच व राजकीय नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तर स्वाभिमान परिषदेत शेकडो पारधी बांधवांनी मुस्लीम समाजात जायची म्हणजे धर्मांतर करण्याच्या घोषणा केली. त्या सरशी हिंदुत्वाच्या ठेका घेतलेल्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी सरळ-सरळ पारध्यांच्या वस्तीकडे धाव घेतली व त्यांची मनधरणी करू लागले. त्यासरशी पारधी समाजाला शासनाने सोयी-सवलती जाहीर केल्या. इतर वेळी पारधी काय खातात, काय पितात, कुठे झोपतात, कसे जगतात याची साधी विचारपूसही न करणार्‍या नेत्यांना पन्नालाल रजपूत यांची ही  मात्रा लागू पडली. व पारधी समाजाला जीवन जगणं थोडे सोपे झाले. सनातन्यांचे अन्याय-अत्याचार कमी झाले. त्याचवेळी कुणाला सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर कुणाला आश्रमशाळा काढायला परवानगी मिळाली. कुणाला वैद्यकीय मदत मिळाली; तर कुणाला बँकांचे कर्ज सहज प्राप्त झाले.

            या व अशा सोई सवलती देत असतांना हिंदुत्ववादी मंडळीनी व्यवस्थितपणे पारधी समाजाच्या वस्तीत हिंदू-देवदेवतांची मंदिरे थाटली व एकदाचे पारधी देवपुजेला लागले. एका जाचातून सुटका करण्यासाठी हाती घेतलेल्या कार्यक्रमातून समाजातील काही स्वार्थी मंडळींनी स्वफायद्यासाठी समाजाला वेठीला धरून अशा प्रकारे सनातन्यांच्या सहाय्याने बाबा-बुवांच्या नादाने, पारधी समाजाला हिंदू समाजाच्या दावणीला बांधण्याचा घाट घातला आहे. या समस्येविरूद्ध लढणं ही एक दुसर्‍या क्रांतीची लढाई लढणं पन्नालाल सारख्यांना जड जात आहे. कारण ह्यात राजकीय हितसंबंधात अडकलेल्या ‘समाज गुंडांचा’ हात असतो. तरीसुद्धा जीवाची बाजी लावून काम करणार्‍या पन्नालाल रजपूत यांच्या कार्याला शुभेच्छा चिंतनासाठी महाराष्ट्र अंनिसचा हा द्विवार्षिक समाजसेवा पुरस्कार-2012 जाहीर झाला आहे. त्यांच्या पुढील कार्यास मन:पूर्वक साद!

(पुष्पा नागेश चौधरी लिखीत, ‘पारधी – जीवन आणि भाषा’ या पुस्तकावरून साभार)