Categories
ज्योतिष

पुण्याच्या फलज्योतिष चाचणीचे काय झाले?

मे - २०१९

सन 2008 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंनिसने पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्यावतीने फलज्योतिषाचे सामर्थ्य तपासणारी एक शास्त्रीय चाचणी घेतली होती. या चाचणीचे काय निष्कर्ष निघाले? हे संयुक्त निवेदनाद्वारे त्यावेळी प्रसिद्ध केले होते. वाचकांच्या माहितीसाठी हे निवेदन पुन्हा आम्ही प्रसिध्द करीत आहोत. – संपादक

जन्मकालीन ग्रहस्थितीवरून भविष्य सांगण्याच्या फलज्योतिषाच्या सामर्थ्याची चाचणी अलिकडे महाराष्ट्रात झाली, या चाचणीत (अ) 100 हुशार आणि (ब) 100 मतिमंद अशा एकूण 200 शालेय विद्यार्थ्यांच्या जन्मासंबंधीचे तपशील अंतर्भूत केले होते. या माहितीचा उपयोग या मुलांच्या जन्मकुंडल्या तयार करण्यासाठी केला गेला. या तपशिलांची नोंद केल्यानंतर या कुंडल्या स्वैरपणे मिसळल्या गेल्या आणि ज्योतिषांना त्यांच्या भविष्य सांगता येण्याच्या क्षमतेच्या चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. या चाचणीत 51 ज्योतिषांनी भाग घेतला. यापैकी प्रत्येकाला 40 जन्मकुंडल्यांचा एक स्वैर संच पाठवला गेला आणि प्रत्येक कुंडली (अ) किंवा (ब) यापैकी कोणत्या गटाशी जुळते ते विचारलं गेलं. 51 ज्योतिषांपैकी 27 जणांनी त्यांचं मूल्यमापन पाठवून दिलं. मिळालेल्या परिणामांच्या संख्यशास्त्रीय विश्लेषणातून असं आढळलं की, भाकीत अचूक असण्याचा दर हा नाणेफेक केल्यानंतरचा अंदाज जितपत बरोबर येईल, त्याहीपेक्षा किंचित कमीच होता. सर्व 200 कुंडल्या एका फलज्योतिष संस्थेच्या प्रतिनिधींना ओळखण्यासाठी देण्यात आल्या. त्यांची स्थितीही वरच्यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. या चाचणीच्या मर्यादित; परंतु नि:संदिग्ध प्रक्रियेमुळे बौद्धिक क्षमतेबाबत भाकीत वर्तवण्याचं सामर्थ्य फलज्योतिषात नाही, असं लक्षात येतं. पुढील प्रयोगांसाठी या चाचणीची व्याप्ती वाढवण्याच्या मार्गासंबंधी विचार चालू आहे.

1. परिचय : लोकांच्या मनात बहुधा फलज्योतिष आणि खगोलशास्त्र याबाबत गोंधळ असतो. दोन्ही विषय तारे, नक्षत्रं, ग्रह, चंद्र आणि सूर्यासंबंधी सांगत असल्यामुळे, विश्वाशी संबंधित शास्त्राच्या या दोन शाखा आहेत, असा समज असतो. सन 2001 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशननं ‘विद्यापीठांतील अभ्यासक्रमात ‘वैदिक फलज्योतिष’ हा विषय ठेवावा’ अशी केलेली घोषणा हे या गोंधळाचं उदाहरण आहे.

फलज्योतिष एक शास्त्र आहे का? जवळून परीक्षण केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागतं. विज्ञानाचं अंग ठरण्यासाठी तो विषय विशिष्ट निकषांवर सिद्ध व्हावा लागतो. पहिला निकष म्हणजे तो विषय अढळ आणि एकमेव अशा गृहितकावर आधारलेला असायला हवा. दुसरं म्हणजे या गृहितकांमधून तो चाचणी घेता येण्याजोग्या आणि खंडन करता येण्याजोग्या अनुमानांपर्यंत (मग ती कोणीही काढो) यायला हवा. शिवाय एखादं विशिष्ट अनुमान सिद्ध झालं किंवा खंडित झालं हे ठरवण्यासाठी चाचण्याही असायला हव्यात.

या कसोटीवर फलज्योतिष नेहमी अपुरं पडत आलंय. जन्मकुंडली कशी तयार करावी, अशासारख्या पायाभूत तत्त्वातच तफावत दिसून येते. एकाच जन्मकुंडलीबाबत दोन ज्योतिषांच्या भाकितात फरक पडू शकतो. महत्त्वाचं म्हणजे बहुधा ही भाकितं संदिग्ध असतात आणि ती खोटी ठरवता येत नाहीत, तरीही फलज्योतिषीय भाकितांबाबत निश्चितपणे काही सांगता येईल अशा चाचण्या पाश्चात्त्य देशात घेतल्या गेल्या आहेत. यासंबंधीची दोन उदाहरणं आम्ही इथे देत आहोत. यातलं पहिलं उदाहरण वधू आणि वरांच्या जन्मकुंडल्या जुळल्या नाहीत तर त्यांनी लग्न करू नये, या(भारतातही रूढ असलेल्या) समजाशी संबंधित आहे.

बर्नी सिल्व्हरमन या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनं त्याच्या पीएच. डी.च्या प्रबंधाचा (1971) एक भाग म्हणून पुढील प्रयोग केला. त्यानं आपल्या अभ्यासासाठी (अ) आनंदी वैवाहिक आयुष्य असणारी 2978 जोडपी आणि (ब) विभक्त किंवा घटस्फाटित अशी 478 जोडपी निवडली, त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या आणि दोघा ज्योतिषांना दिल्या. एखाद्या जोडप्याच्या जन्मकुंडल्या त्यांच्याशी जुळतात की नाही ते त्यांनी आपापसांत ठरवायचं होतं. पण प्रत्येक जोडपं (अ) किंवा (ब) यापैकी कोणत्या वर्गात आहे, हे त्यांना सांगितलेलं नव्हतं. जो काही ज्योतिषीय निकष दोघांनी आपसांत ठरवला त्यानुसार त्यांनी वर्गीकरण केलं. त्यानंतर त्यांच्या वर्गीकरणाची संख्याशास्त्राच्या आधारे तुलना केली. या वर्गीकरणांमध्ये म्हणावा तसा ताळमेळ नव्हता, असं या चाचण्यांनी दाखवून दिलं. अशा तर्‍हेनं फलज्योतिषाआधारे जुळलेल्या कुंडल्या या प्रत्यक्ष आयुष्यातील जोडीदारांनी एकमेकांशी जुळवून घेतलं की नाही, या वास्तवाशी जुळल्या नाहीत. या अभ्यासाचे तपशील प्रसिद्ध झाले आहेत. (सिल्व्हरमन 1971, 1974)

फलज्योतिषाच्या चाचणीच्या दुसर्‍या उदाहरणात ‘डबल ब्लाईंड’ मार्ग वापरलेला आहे. जन्माच्या वेळी (फलज्योतिषाच्या गृहितकाप्रमाणे) असणार्‍या ग्रहस्थितीवरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातले गुण, स्वभाव व वागण्यातल्या प्रवृत्ती; तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात होणार्‍या महत्त्वाच्या घटना सांगता येतात, या दाव्याची चाचणी घेण्यासाठी कार्लसननं(1985) जन्मपत्रिका वापरल्या. या चाचणीत अभ्यासासाठी निवडलेल्या सर्व व्यक्तींच्या जन्मपत्रिकांवरून भाकितं तयार करण्यासाठी ज्योतिषांना बोलावलं. प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या मूल्यमापनानुसार यातली कुठली भाकितं कितपत बरोबर आहेत, यानुसार दहापैकी गुण देऊन क्रमवार लावण्यास सांगण्यात आलं. दुसर्‍या संबंधित चाचणीत या तंत्रात थोडा बदल करून भाकितांऐवजी कॅलिफोर्निया व्यक्तिमत्त्व प्रश्नावलीचा (उझख) वापर करण्यात आला. तिथे सहभागी ज्योतिषांना एक जन्मपत्रिका आणि तीन उझख देण्यात आले. यापैकी एक उझख जन्मपत्रिका ज्या व्यक्तीची, तिच्याशी जुळणारा होता तर इतर दोन स्वैरपणे निवडलेले. दिलेल्या जन्मपत्रिकेवरून निघणार्‍या भाकितांशी या तीनपैकी कोणतं जास्त जुळतं, यानुसार ते क्रमवार लावण्यास सांगितले होते. जर जन्मपत्रिका आणि व्यक्तिमत्त्व यांच्यात कोणताही संबंध नसेल, तर पहिल्या प्रयोगात, एक तृतीयांश भाकितं पहिल्या क्रमांकाची म्हणून निवडली जायला हवीत. ज्योतिषांचा दावा असा होता की, त्यांची निदान निम्मी भाकितं तरी अचूक असतील. ‘डबल ब्लाईंड’ पद्धती वापरल्यामुळे सहभागी व्यक्तींना आणि प्रयोग करणार्‍यांनाही कोणती भाकितं कुणाची हे माहीत नव्हतं. जन्मपत्रिका आणि त्या व्यक्ती यांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले होते. शेवटी झालं ते असं की, जेमतेम एक तृतीयांश-म्हणजे निव्वळ योगायोगाइतकी-भाकितंच बरोबर आली! या पार्श्वभूमीवर आम्ही आता आमच्या प्रयोगाकडे वळतो.

2. पुणे प्रयोग : योग्य चाचणीचा आराखडा करताना त्यातून निघणारं अनुमान नि:संदिग्ध असावं, या गोष्टीबाबत आम्ही सावध होतो. कार्लसनच्या प्रयोगाबद्दल कोणी असंही म्हणेल की, एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा लावलेला अर्थ हा निश्चित आणि स्पष्ट असेलच असं नाही आणि खरोखरच कार्लसनच्या प्रयोगाच्या ओघात असं लक्षात आलं की, ज्या माणसाची उझख आहे त्यालासुद्धा ती त्याचीच असं ओळखता येईल असं नाही. सिल्व्हरमनची विवाहसौख्य तपासण्याची पद्धती ही चांगली आहे, फक्त भारतीय संदर्भात घटस्फोटाचं प्रमाण हे तसं कमी आहे आणि मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा करणं कठीण जाऊ शकतं. या मुद्द्याकडे आपण या लेखाच्या शेवटी येऊ.

आमच्या प्रयोगासाठी आम्ही एक वेगळा; पण स्पष्ट निकष वापरला, तो म्हणजे एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे की, मतिमंद ते जन्मकुंडलीवरून ठरवण्याचा. हा फरक व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून सांगता येतो, असा ज्योतिषांचा दावा असतो. तेव्हा, शालेय विद्यार्थ्यांमधून आम्ही वर सांगितलेल्या दोन गटांचे प्रत्येकी शंभर विद्यार्थी याप्रमाणे 200 नमुने गोळा केले. (अ) गटात असणारी मुलं बुद्धिमान आहेत, असं त्यांच्या शिक्षकांनी शाळेतल्या नोंदींवरून प्रमाणित केलं. (ब) गटातली मुलं त्यांच्यासाठी असलेल्या विशेष शाळांमधून आली होती. या मुलांच्या जन्मकुंडल्या तयार करण्यासाठी आवश्यक अशी जन्मासंबंधातली तपशीलवार प्रमाणित माहिती त्यांच्या पालकांकडून मिळवली. हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं. यानंतरचं काम म्हणजे त्यांच्या जन्मकुंडल्या तयार करणं. हे आमच्यापैकी प्रकाश घाटपांडे यांनी प्रमाणित सॉफ्टवेअर वापरून केलं. काही वर्षांपूर्वी ज्योतिषी म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना फलज्योतिषासंबंधी पुरेसा अनुभव आहे. प्रत्येक कुंडलीला सांकेतिक क्रमांक देऊन ही माहिती संग्रहित करण्यात आली. या सांकेतिक क्रमांकावरून संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती कळत होती; पण अन्यथा ती अज्ञात होती. म्हणूनच ही ‘डबल ब्लाईंड’ प्रक्रिया होती. कारण प्रयोग करणारे किंवा प्रयोगात सहभागी होणारे यापैकी कोणालाच काही माहिती कळत नव्हती. याप्रमाणे संग्रहित केलेली माहिती आमच्यापैकी सुधाकर कुंटे यांच्या जबाबदारीवर पुणे विद्यापीठाच्या संख्यशास्त्र विभागाच्या ताब्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आली.

या दरम्यान, जाहीर घोषणा आणि पुण्यात 12 मे 2008 या दिवशी घेतलेली पत्रकार परिषद; याद्वारे ज्योतिषांना या प्रयोगात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि त्याची प्रक्रियाही सांगण्यात आली. प्रत्येक सहभागी ज्योतिषाला आमच्याकडे असलेल्या दोनशे पत्रिकांपैकी स्वैरपणे काढलेल्या चाळीस जन्मपत्रिकांचा संच त्यांच्या जन्मनोंदीसह देण्यात येणार होता. सहभागी ज्योतिषानं एका निर्धारित कालमर्यादेत प्रत्येक पत्रिका (अ) किंवा (ब) यापैकी कुठल्या गटात आहे, ते ओळखून आपला निष्कर्ष सुधाकर कुंटे यांच्याकडे पाठवायचा होता. सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी संच पाठवण्यासाठी तिकीट लावलेलं पाकीट पाठवायचं होतं. याशिवाय, आम्ही प्रस्थापित ज्योतिषविषयक संघटनांना संस्था म्हणून सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं, त्यांना सर्वच्या सर्व 200 पत्रिका उपलब्ध करून द्यायचं ठरलं.

आम्ही जाहीर केलेलं संख्याशास्त्रीय चाचणीचं स्वरूप सोपं होतं. आमच्याकडे तुलनेसाठी दोन गृहितकं होती. योगायोगाचं गृहितक कज असं की (अ) आणि (ब) गटातील निवड ही नाणेफेकी सारखी आहे-दोन्ही बाजूंची संभाव्यता सारखीच-निम्मी-निम्मी. पर्यायी गृहितक क1असं की फलज्योतिषाद्वारे केलेल्या भाकितांमुळे निम्म्यापेक्षा जास्त वेळा वर्गीकरण बरोबर येईल. क1 गृहितक स्वीकारण्यासाठी आणि कज नाकारण्यासाठी यशाचा दर सरासरीपेक्षा ‘2.32 सिग्मा’ इतक्या किमतीनं जास्त असायला हवा. यामुळे चूक होण्याची संभाव्यता जवळजवळ उरतच नाही. थोडक्यात सांगायचं तर फलज्योतिष हे योगायोगापेक्षा अधिक काहीतरी आहे, हे सिद्ध होण्यासाठी चाळीस पत्रिकांच्या संचातील अठ्ठावीस पत्रिकांबाबत वर्गीकरण बरोबर ठरायला हवं, तर संस्थांना दोनशे पत्रिका दिल्या असल्यामुळे त्यांना एकशे सतरा पत्रिकांबाबत तरी यश मिळायला हवं.

3. ज्योतिषांचा प्रतिसाद : चाचणीचा आराखडा जाहीर केला, तेव्हा ज्योतिषांचा प्रतिसाद वेगवेगळा होता. काहींनी आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली, काहींनी चाचणीच्या स्वरूपाशी संबंधित नसलेल्या शर्ती घातल्या तर काहींनी ‘सर्व ज्योतिषांनी या चाचणीवर बहिष्कार घालावा’ असं आवाहन केलं. आम्ही काही ज्योतिषांना व्यक्तिश: भेटलो. त्यांच्या चर्चासत्रात सहभागी होऊन चाचणीचं वस्तुनिष्ठ स्वरूप सांगितलं आणि लबाडी टाळण्यासाठी आम्ही कोणती खबरदारी घेणार, तेही सांगितलं. फलज्योतिष हे शास्त्र आहे असा जर ज्योतिषांचा दावा असेल तर त्यांना अशा प्रकारच्या चाचण्यांना सामोरं जावं लागेल, हेही त्यांच्या निदर्शनास आणलं. एकंदरीत प्रतिसाद सकारात्मक असला तरी काही नावाजलेल्या ज्योतिषांनी या चाचणीपासून दूरच राहायचं ठरवलं.

शेवटी एक्कावन्न ज्योतिषांनी पत्त्यासह तिकिटं लावलेली पाकिटं पाठवली आणि त्यांना संच पाठवण्यात आले. यापैकी फक्त सत्तावीस जणांनी त्यांची उत्तरं पाठवली. गोळा केलेल्या माहितीच्या आधारे ती तपासली गेली. यातली सर्वाधिक बरोबर उत्तरं देणारा ज्योतिषी चाळीसपैकी चोवीस बाबतीत बरोबर ठरला आणि तरीही निर्धारित किमान संख्येपेक्षा (28) तो कमीच पडला. सहभागी झालेल्या सर्व 27 ज्योतिषांनी वर्तवलेल्या उत्तरांची एकंदर सरासरी संचामागे 17.25 एवढीच होती-नाणेफेकीच्या संभाव्यतेपेक्षाही कमी! संस्थांबाबत सांगायचं तर दोन संस्थांनी सहभागी व्हायचं ठरवलं आणि फक्त एकीनेच उत्तरं पाठवून प्रतिसाद दिला. त्यांची 200 पैकी फक्त 102 उत्तरं बरोबर आली -किमान निर्धारित 117 पेक्षा कमीच!

अशा तर्‍हेनं या चाचणीच्या आधारे आपल्या लक्षात येतं की ज्योतिषांनी वर्तवलेली भाकितं ही नाणेफेकीसारख्या निव्वळ योगायोगाहून वेगळी खास नसतात.

4. उपसंहार : आम्हाला असं वाटतं की, आम्ही चाचणीत एक नेमका प्रश्न विचारला आणि ज्योतिषी त्याचं नि:संदिग्ध उत्तर देऊ शकले नाहीत. गमतीची गोष्ट म्हणजे बर्‍याच ज्योतिषांनी त्यांना मिळालेलं यश (नाणेफेक केल्यानंतरच्या 50टक्के संभाव्यतेपेक्षाही कमी असून) हे त्यांच्या भाकीत करण्याच्या क्षमतेचं प्रमाणपत्रच मानलं. पण जर या भाकितांना खर्‍या अर्थानं यशस्वी म्हणायचं असेल तर 70 टक्के उत्तरं बरोबर यायला हवी होती, हे त्यांना समजावून सांगण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले.

या चाचणीनं फलज्योतिषाच्या पायाभूत दाव्यातला पोकळपणा दाखवून दिला. अर्थात कट्टर श्रद्धाळूंचं मतपरिवर्तन कशानंच होणार नाही. पण तरीही फलज्योतिषाच्या इतर बाजू तपासण्यासाठी अशा प्रकारच्या ‘डबल ब्लाईंड’ चाचण्या घेणं फायदेशीर ठरेल. यातलीच एक महत्त्वाची बाजू म्हणजे बर्नी सिल्व्हरमननं घेतलेल्या चाचणीचा विषय. आपल्याकडे वधू-वरांची जन्म कुंडली ‘जुळते’ का यावर विवाह ठरणं अवलंबून असल्यामुळे या विषयाचा संख्याशास्त्रीय अभ्यास खूप उपयोगी ठरेल. माहिती संकलित करण्यात अनेक अडचणी येऊ शकतील; पण हे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.
आभार : संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ आणि आयुका यांनी प्रयोग चालू असताना दिलेल्या पायाभूत सुविधांच्या मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

डॉ. जयंत नारळीकर, आयुका, पुणे

सुधाकर कुंटे, संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

डॉ. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

प्रकाश घाटपांडे, फलज्योतिष चिकित्सा मंडळ, पुणे