Categories
बालविभाग

तीन कथा

वार्षिकांक – २०११

            अठराव्या शतकांतले जीवन आजच्यापेक्षा फार वेगळे होते. आयुष्य खूपच साधे होते आणि नागरिकांना थोर नेत्यांची भेट दुर्लभ नसे. जॉर्ज वॉशिंग्टन(1732-1799) हे 1789 मध्ये अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. ते एक यशस्वी सेनापती होते आणि एक प्रभावी अध्यक्षही झाले. लहानपणी ते व्हर्जिनियातल्या शाळेत असताना पीटर मिलर नावाचा त्यांचा वर्गमित्र होता. मिलरने सैन्यात किंवा राजकारणात काही नेत्रदीपक कामगिरी केली नव्हती. तो इफ्राटा गावातल्या चर्चमध्ये पाद्री होता.

            त्या काळातले दळणवळण आजच्याप्रमाणे सोपे व झटपट नव्हते. आपल्या ह्या प्रसिद्ध मित्राला भेटण्यासाठी मिलरने तीन दिवस पायी चालत व रात्री विश्राम करीत, प्रवास केला. वॉशिंग्टनला फार आनंद झाला. मित्राचे स्वागत करून त्यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन झाल्यानंतर, वॉशिंग्टनने मित्राला विचारले, “बरं पण पीटर, तू एवढा त्रास घेऊन इथे काही खास कामासाठी आला आहेस का?”

            “होय जॉर्ज, खरं आहे. मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या  देशद्रोही मायकेल व्हिटमन, या गुन्हेगाराला माफी मिळावी, म्हणून मी इथे विनंती करायला आलो आहे.”

            “अरे मित्रा, तुझी ही मागणी मी मान्य करू शकत नाही, मला माफ कर! आपले राष्ट्र नवीन आहे आणि ज्यांनी राष्ट्राशी बेईमानी केली आहे. त्यांना कठोर शासन हे व्हायलाच हवे. तुझ्यासाठी मी दुसरं काही करू का?” अध्यक्षांनी विचारले.

            मिलरने आपली कैफियत सादर केली. व्हिटमन फाशी गेलां तर त्याची आजारी पत्नी व मुले अगदी निराधार होतील, असे त्याने विनवून सांगतले. पण वॉशिंग्टनचा निर्णय ठाम होता. त्यांची भेट संपली, परंतु वॉशिंग्टनच्या विनंतीवरून मिलरने त्या रात्री तिथे राहायचे मान्य केले. तासाभरानंतर राष्ट्राध्यक्षांनी तिथे आलेल्या दुसर्‍या एका पाहुण्याला हीच गोष्ट सांगितली व मिलरचा मित्र व्हिटमन याचा जीव वाचवता येणार नाही, हेही सविस्तर सांगितले. तो पाहुणा गेली काही वर्षे इफ्राटाला राहात होता, व मिलर व व्हिटमनला चांगला ओळखत होता. त्याने आश्चर्याने विचारले, “आपण काय म्हटलंत साहेब? व्हिटमन मिलरचा मित्र आहे, असं आपण म्हणाला कां?” “अर्थातच, मी तसंच म्हणालो. नाहीतर बिचारा पीटर इतक्या लांबून चालत चालत व कळवळून विनंती करण्यासाठी मला भेटायलां इथपर्यंत आला असता का?” अध्यक्षांनी प्रतिप्रश्न केला. पाहुणा हसला. “खरी गोष्ट सांगायची तर साहेब, पीटर मिलरला जगात एक शत्रू होता, आणि तो म्हणजे मायकेल व्हिटमन. त्याने मिलरला आतोनात त्रास दिलाय!” पाहुण्याने सांगितले.        वॉशिंग्टन क्षणभर गंभीर झाले. नंतर त्यांनी आपल्या चिटणीसाला बोलावले आणि व्हिटमनला शिक्षा माफ केल्याची आज्ञा लिहायला सांगितले. त्यानंतर त्यांनी पीटर मिलरला आपल्या दालनात बोलावले, “हे बघ पीटर, एखाद्याने मित्रासाठी केलेली क्षमेची याचना मी नाकारू शकतो, पण जो माणूस आपल्या कट्टर शत्रूला मृत्यूदंड होऊ नये, म्हणून इतका प्रयास करतो आहे, त्याच्या मनाच्या मोठेपणाचा मी अनादर करू शकणार नाही.” वॉशिंग्टननी प्रसन्नपणे सांगितले.


            तुम्ही मॅसेडोनियाचा राजा फिलीप आणि त्याचा जगप्रसिद्ध मुलगा अलेक्झांडर यांच्या गोष्टी वाचल्या आहेत. अलेक्झांडर अगदी तरूण वयातच गादीवर बसला.(इ.पू.336 साली) आणि लौकरच इतर देश जिंकायला घराबाहेर पडला. त्याने पर्शिया व इजिप्त हे देश जिंकले आणि हिंदुस्तानावर स्वारी केली. पण तो अ‍ॅरिस्टॉटल या सुप्रसिद्ध तत्ववेत्याचा शिष्य होता. त्यामुळे त्याला युद्ध आणि जिंकणे यातच फक्त स्वारस्य नव्हते. अभ्यासक व ज्ञानी लोकांच्या सहवासासाठी तो नेहमीच आतूर होता. अथेन्स या शहराजवळच डायोजिनिस हा विचारवंत राहात होता. तो एका मोठ्या घमेल्यात राहात होता. गर्विष्ठ किंवा शक्तीशाली लोकांची तो टर उडवीत असे. त्याच्या कडवट वृत्तीबद्दल तो प्रसिद्ध होता. पण त्याचे ज्ञान आणि चतुरपणा हा अनेकांना मोहवीत असे.

            एकदा अलेक्झांडर ह्या तत्ववेत्त्याला भेटला आणि त्याने काही प्रश्न त्याला विचारले. डायोजिनीसने त्यांची उत्तरे दिली. ती ऐकून अलेक्झांडर फारच प्रभावित झाला. त्याने डायोजिनिसला बक्षीस म्हणून धनदौलत द्यायचे किंवा एखादा वाडा बांधून द्यायचे ठरवले. त्याच्या डोक्यावर साधे छप्परदेखील नाही हे बघून अलेक्झांडरला त्याच्याबद्दल फारच कीव वाटायला लागली.

            “मला सांगा, डायोजिनिस, मी तुमच्यासाठी काय करू?” बलाढ्य राजाने प्रश्न केला, त्या विद्वानाने काहीच उत्तर दिले नाही. राजाला वाटले की, बहुधा त्याच्या मनात विचार आला असावा की, आपण किती धन मागावे! राजा उत्तरासाठी आतुरतेने वाट बघत होता. पण ह्या ज्ञानतपस्वीने काहीही उत्तर दिले नाही. राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्याला शांतपणे डायोजिनिसने उत्तर दिले, “तू सूर्याच्या प्रकाशाची वाट अडवतो आहेस. जरा बाजूला सरकशील का, म्हणजे तो प्रकाश माझ्यापर्यंत पोचेल?”

            राजाच्या पाठीमागे उभे असलेले सरदार व इतर अधिकारी हे उत्तर ऐकून सुन्न झाले, या उद्धटपणाबद्दल राजा त्या विद्वानाला चांगली शिक्षा करील असे सर्वांनाच वाटले. परंतु त्याऐवजी राजा फक्त जरा बाजूला सरकला आणि आपल्या सहकार्‍यांना उद्देशून इतकंच म्हणाला, “मी अलेक्झांडर नसतो ना, तर डायोजिनिस व्हायला मला फारच आवडले असते.” डायोजिनिसचा एक गरीब चाहाता रोज ह्या तत्ववेत्त्याबरोबर आपले जेवण वाटून घेत असे. आता ते भोजन गरीबाचे होते, साधे, स्वस्तातले होते. एक दिवस अथेन्सच्या दरबारात गौरव झालेला आणखी एक तत्वचिंतक अरिस्टिपस्, जो अगदी आरामात राहात होता, तो डायोजिनिसला भेटला. पातळ पेज खाणार्‍या डायोजिनिसला तो म्हणाला, “अरे मित्रा, जर फक्त राजाला कसे खूष ठेवावे हे तुला समजलं असतं ना, तर तुला या पेजेवर जगायची पाळी आली नसती.”

            त्यावर डायोजिनिसने तात्काळ उत्तर दिले, “अरे मित्रा, पेजेवर कसे जगावे हे जर तुला ठऊक असते ना, तर राजाला खूष ठेवायची वेळ तुझ्यावर आली नसती.”


            आज जी आपण उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणतो, ती अमेरिका 1861 ते 1865 पर्यंत दोन पक्षात विभागलेली होती. गुलामगिरीच्या मुद्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांशी लढत होते- ही जुलमी पद्धत ठेवावी किंवा हटवावी यावर लढाई झाली. उत्तरेकडच्या ज्या राज्यांना गुलामगिरी हटवायची होती त्यांना ‘युनियन’ म्हणत, आणि दक्षिणेतली राज्ये ‘कॉन्फेडरेसी” म्हणून ओळखली जात होती. दोन्ही पक्षांमध्ये लढाई चालू राहिली. अखेरीस दक्षिणेतल्या संस्थानांचा, कॉन्फेडरेसीचा पराभव झाला.

            पण या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख निराळ्या कारणासाठी केला आहे. त्यावेळी कान्फेडरेसीचा अध्यक्ष जेफरसन डेव्हिस आणि त्यांचा सेनाप्रमुख जनरल रॉबर्ट ली यांच्या एका छोट्या संवादाचा किस्सा प्रसिद्ध आहे. एके दिवशी अध्यक्ष डेव्हिसने सेनापतीला बोलावून सांगितले की, एका महत्वाच्या खात्यांतली सर्वात वरची जागा रिकामी होती. त्या जागेवर एका ‘क्ष’ यांची नेमणूक करायची अध्यक्षांच्या मनात आले. म्हणून त्यांनी त्या गृहस्थासंबंधी सेनापतीचे मत घ्यावे म्हणून जनरल ली यास विचारले, “तुम्हाला माहीत आहेच की, त्या खात्याचा प्रमुख अत्यंत प्रामाणिक, निडर, आणि नेकीचा असायला हवा. त्या जागेसाठी ‘क्ष’ योग्य ठरेल का? तुमच्या मतामुळे मला जरा मार्गदर्शन मिळेल. जर तुम्हाला हे मान्य असेल, तर त्यांना नेमणुकीचे पत्र पाठवायची मी व्यवस्था करीन.”

            अध्यक्षांचा चिटणीस जनरल लीकडे बघून हसला. त्याला ठाऊक होते की या नेमणुकीला जनरल ली काही मान्यता देणार नाही. पण ‘क्ष’ याच्यासाठी मात्र या जागेवर नेमणूक झाली तर त्यासारखा दुसरा सर्वोच्च बहुमान नव्हता.  “खरं सांगायचं तर, सर, या जागेसाठी ‘क्ष’ हा सर्वात चांगला ठरेल यात शंकाच नाही. तो अत्यंत लायक आहे. सध्याच्या या आणीबाणीच्या काळात आपल्याला त्याच्यासारखा निष्ठावंत, बेडर अधिकारी हवाच आहे. तो आपल्या ध्येयाशी बांधिलकी कधीही विसरणार नाही.” जनरल लीने आपले मत दिले.

            “अरे बापरे!” अध्यक्षाचा चिटणीस अभावितपणे उद्गारला. “काय झालं?” जनरल लीन चमकून विचारले. अध्यक्ष डेव्हिस आपल्या चिटणीसाकडे बघतच राहिला. “नाही  म्हणजे जनरल, ‘क्ष’ हा गृहस्थ तुमच्याविषयी कधीही चांगला शब्द काढत नाही. केव्हाही संधी मिळाली, की तो तुमच्यावर आग पाखडतो. हे मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे, तुम्ही गर्विष्ठ, भंपक आणखी अकार्यक्षम आहात, असं तो नेहमी म्हणत असतो! आणि या अशा इतक्या उच्च प्रतिष्ठेच्या जागी त्याच्या नावाला तुम्ही संमती देता आहात!” चिटणीसाने खुलासा केला.

            “मला ते माहीत आहे, चिटणीस. पण अध्यक्षांनी ‘क्ष’ याच्याबद्दल माझं मत विचारलं होतं; त्यांनी माझ्याबद्दल ‘क्ष’चं मत विचारलेलं नव्हतं!” अत्यंत नेकदार व शूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जनरल लीने उत्तर दिलं!