रावणाची पूजा करा अन्यथा…

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील चिखली हे गाव. या गावात दसर्याच्या दिवशी रावणाची पूजा केली नाही तर संपूर्ण गाव जळून बेचिराख होईल अशी येथील गावकर्यांची समजूत आहे. म्हणूनच दसर्याच्या दिवशी गावात रावणाची पूजा तर केलीच जाते, परंतु त्याचसोबत त्या दिवशी राम-रावण युद्धाचे आयोजनही केले जाते. रावणाच्या पुजेनिमित्त या दिवशी या गावात जत्राही भरते.
बाबूभाई हे पुजारी रावणाची पूजा करतात. रावणाची पूजा केल्याने त्यांचे नावही बाबूभाई रावण असे पडले आहे. रावणाची आपल्यावर कृपा असल्याचा त्यांचा दावा आहे. गावावर कोणतेही संकट ओढवते त्या दिवशी आपण उपवास करतो. गावात दुष्काळ पडला असेल तर आपल्या उपवासानंतर गावात जोरदार पाऊस पडतो असाही बाबूभाईंचा दावा आहे.
सरपंच कैलाशनारायण व्यास यांनी रावणाची पूजा करण्याची येथील प्रथा अत्यंत जुनी आहे, असे सांगितले. एकदा गावात कधीकाळी रावणाची पूजा कोणीच केली नाही, आणि जत्राही भरवण्यात आली नाही. त्यामुळे गावात मोठी आग लागल्याचे व्यास यांचे म्हणणे आहे.
रावणाची पूजा शेजारच्या श्रीलंकेतही केली जाते. परंतु, उत्तर भारतात तशी कुठे प्रथा नाही. उलट रावण हा दुष्ट प्रवृत्तीचा मानला जातो. पण मग रावणाची पूजा करण्याच्या प्रकाराला काय म्हणावे श्रद्धा की अंधश्रद्धा? आम्हाला जरूर कळवा.
देवीला घालतात रक्ताचा अभिषेक
परमेश्वराच्या पूजेचे अनेक मार्ग आहेत. पण शरीरावर काटेरी फांद्या बांधून रक्ताळलेल्या शरीराने देवीची पूजा करणार्या मंडळींविषयी तुम्हाला माहिती आहे? द्रविडी संस्कृतीत आजही अशी एक पूजा पद्धती आहे. केरळमध्ये ‘अडवी’ नावाच्या प्रथेअंतर्गत लोक कालीमातेची अशी पूजा करतात.
केरळची राजधानी तिरूवनंतपुरमपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या ‘कुरमपला देवीच्या मंदिरात’ ही प्रथा दर पाच वर्षांनी पाळली जाते. ही प्रथा सुरू होण्यामागेही एक कहाणी आहे. अडवी वेलन नावाचा पुजारी अडवी देवीचा भक्त होता.
एकदा वेलन पूजा करण्यासाठी मंदिराजवळून जात होता. त्याचवेळी देवीने त्याला आपल्याकडील सर्व विद्या, शक्ती दिली. पुढे गावकर्यांना ही बाब कळाल्यानंतर या शक्तींची आराधना करण्यासाठी ते नरबळी द्यायला लागले. पुढे या प्रथेचे नाव अडवी प्रथा असे पडून गेले.
आज बळी दिला जात नसला तरीही ही प्रथा अंगावर काटे आणणारी आहे. भाविक काटेरी फांद्या आपल्या अंगाला बांधून जमिनीवर लोळण घेतात. आणि देवीला आपले रक्त अर्पण करतात. पणयानीच्या नवव्या दिवशी गावकरी मंदिरात जातात आणि काटेरी फांद्या, नारळाच्या फांद्या अंगाला बांधतात. पणयानी संध्याकाळी सात वाजता सुरू होते. मध्यरात्री मंदिराचे मुख्य पुजारी भाविकांना प्रसाद वाटतात.
हा प्रसाद मिळाल्यानंतर भाविक विविध ठिकाणांहून काटेरी फांद्या एकत्रित करतात. त्यानंतर त्या फांद्या आपल्या अंगाला बांधून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा केवळ उत्तर दिशेनेच केली जाते.
प्रदक्षिणेनंतर काटे काढून टाकले जातात आणि शरीरातून येणारे रक्त एकत्रित करून काली मातेची पूजा केली जाते. अगदी नरबळीची आठवण यावी अशी ही प्रथा आहे. भाविकांना मात्र, या प्रथेत काहीही हिंस्त्र असल्याचे वाटत नाही. आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रथेविषयी काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.
एक गाव भुतांचे…
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्याच्या गायबैडा नावाच्या गावातील पाच ग्रामस्थांना अचानक एका अज्ञात आजाराची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा ग्रामस्थांना या आजाराचे कारण समजू शकले नाही. तेंव्हा त्यांनी जवळच्या मांत्रिकाची मदत घेण्याचं ठरविलं. मांत्रिकाने सांगितलं, की गावावर एका भूताची वक्रदृष्टी आहे आणि त्यामुळेच लोक मरताहेत. मग ग्रामस्थांच्या आग्रहावर मांत्रिकाने भूत पळविण्याची योजना बनविली.
मांत्रिकाच्या सांगण्यावरून अशी घोषणा केली गेली की, गावाबाहेरून आलेल्या लोकांनी त्वरित गाव सोडून निघून जावे. आणि केवळ गावातील लोकांनीच गावात राहून भूत पळविण्यासाठी होणार्या पूजा-पाठ आणि यज्ञ कार्यात सहभागी व्हावे. या आदेशानुसार सर्व धार्मिक विधी पूर्ण केले गेले.
दरम्यान भूताला पळवून लावण्याचा दावा करणार्या मांत्रिकाने भूत पळविण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी संपूर्ण गावाच्या सीमेवर दूध टाकून सीमांकित केले गेले. यानंतर आता गावात भूत नसल्याचे मांत्रिकाने पटवून दिले.
माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टीला तो चमत्कार, देव-देवता किंवा मग भूत-बाधा अशा संकल्पनांमध्ये बांधून ठेवत असल्याचे नेहमीच घडते. त्याच्या याच अज्ञानतेचा फायदा काही लोक उचलतात. आणि लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची पिळवणूक करीत असतात. पदोपदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणार्या आजच्या या शिक्षित व्यवस्थेत भुताच्या गोष्टीवर विश्वास ठेवून मुर्ख बनणे कितपत योग्य वाटते? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा.