एस.के.शिंदे हे परांडा, जि.उस्मानाबादचे नागरीक. व्यवसायाने माध्यमिक शिक्षक. आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या ऑडिटर व शिक्षक या दोनही नोकरीचा मुदतपूर्व राजीनामा दिला. आदर्श गाव योजनेसाठीच्या अटींपैकी व्यसनमुक्तीचे क्षेत्र त्यांना आवडले व त्यांनी या क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यास सुरवात केली. अवती भोवती शेकडो कुटुंबे व्यसनामुळे उध्वस्त होत होती. ग्रामसभा, व्यसनी कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क, शाळा कॉलेजातून प्रबोधन इत्यादी मार्गांनी त्यांनी सतत 13 वर्षे व्यसनमुक्तीचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे. आज त्यांचे वय 70 वर्षे आहे. केवळ तुटपुंज्या पेन्शनवर साधेपणाने राहून त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात जे कार्य केलंय ते कौतुकास्पद आहे.
व्यसनमुक्तीचे प्रयत्न व प्रबोधन असे 35 च्या आसपास कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. 13 ग्रामसभा, 3 एन.एस.एस.शिबीरे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे 4 प्रबोधन कार्यक्रम, दवाखाने-2, तंटामुक्ती योजना-1, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान-1, अंधश्रद्धा निर्मूलन समिती-3, चित्रप्रदर्शन-1, एस.टी.कर्मचारी-1, पोलीस स्टेशन-1 सर्वंकष विकास योजना-1, आकाशवाणीवरील भाषण-1, उध्वस्त कुटुंबांना सावरणार्या घटना-2. हा त्यांच्या अथक व्यसनमुक्ती चळवळीचा आढावा सर्वांनाच प्रेरणादायी ठरावा.
शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व्यसनमुक्त झालेल्या एका कुटुंबाची कहाणी ऐकण्यासारखी आहे. शिवकन्या ही शिंदे सरांची विद्यार्थिनी. तिचे पती दत्तात्रय भोसले हे उल्हासनगर येथे पेट्रोल पंपावर काम करीत. ते दारूचे व्यसनी झाले. नोकरी सुटली. शिवकन्येला दोन मुले होती. वैतागून एके दिवशी शिवकन्या आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रूळावर दोन मुलांसह जाऊन बसली. ‘आई, आपण का मरायचे, आपण कष्ट करून जगू या’ या मुलांच्या शब्दांनी शिवकन्येने आत्महत्येचा विचार सोडून दिला. पती व मुलांना घेऊन ती माहेरी बार्शीला आली. पण नातेवाईकांनी तिला आधार देण्याचे नाकारले. एका धाब्यावर स्वयंपाकाचे काम करून ती कशीबशी दिवस काढू लागली. तिथे रात्री अपरात्री येणार्या लोकांच्या वाईट नजरा टपून असायच्याच. अशा परिस्थितीत तिने एकेकाळच्या आपल्या सरांना आपली करूण कहाणी ऐकविली. शिंदे सरांनी तिला मदत करण्याचा निश्चय केला व वेळोवेळी कठीण प्रसंगात तिला केवळ धीरच दिला नाही तर तिला स्वावलंबी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. बार्शी येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांना भेटून शिवकन्येला त्यांनी वस्तीगृहात स्वयंपाकिणीची नोकरी मिळवून दिली. भोसलेनी कर्ज काढून हॉटेल काढले. शिवकन्येची परिस्थिती बदलली. पण भोसले पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळले. सरांनी त्यांना प्रथम लातूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात व दुसर्यांदा सातारा येथील परिवर्तन केंद्रात दाखल केले. आता भोसले यांचे व्यसन सुटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते व शिवकन्या स्वावलंबी बनून मुलांचे शिक्षणाकडे लक्ष देऊन व्यवस्थित राहू लागलेत.
शिवकन्येच्या नवर्याला व्यसनमुक्त करून, साने गुरूजींच्या प्रेरणेने दुसर्याचे अश्रू पुसणारे एस.के.शिंदे यांचे हे व्यसनमुक्तीचे कार्य वाचकांना अशा कार्यासाठी प्रेरीत करणारे ठरावे.