Categories
पुस्तक परिचय

खेळण्यांचा जादूगार अरविंद गुप्ता

सप्टेंबर - २०११

            कानपूरच्या आय.आय.टी.तून इंजिनियर झालेल्या, टेल्कोत पाच वर्षे नोकरी केलेल्या अरविंद गुप्तांनी नंतर तथाकथित ‘यशस्वी’ आयुष्याकडे पाठ फिरविली आणि ध्यास घेतला मुलांना खेळातून विज्ञान शिकविण्याचा.

            अरविंद गुप्ताबद्दल अगोदर ऐकून होतोच. त्यांच्याबद्दल कुतुहलही होते. एका पुस्तकालयांत लेखिका शोभा भागवत यांच्या ‘खेळण्यांचा जादूगार : अरविंद गुप्ता’ या पुस्तकाकडे नजर गेली. पुस्तक विकत घेतले आणि त्याच दिवशी रात्री एका बैठकीत वाचून संपविलेही. विज्ञान मुलांमध्ये लोकप्रिय करण्याचा मलाही छंद आहे. याच छंदाचा आयुष्यभर ध्यास घेऊन मुलांमध्ये रमणार्‍या अरविंद गुप्तांचे अलोैकिक कार्याने मी भारावून गेलो. आणि या खेळण्याच्या जादूगाराचा परिचय अं.नि.वार्तापत्राच्या वाचकांना करून दिलाच पाहिजे या जाणिवेने हा लेख लिहायला घेतला.

            ‘खेळण्यांचा जादूगार : अरविंद गुप्ता’ हे अवघे 40 पानांचे छोटेसेच पुस्तक आहे. पण यातील विषय वाचकांना गुंगवून ठेवणारा, उत्कंठावर्धक व ज्ञानवर्धक आहे. शोभा भागवत यांनी मोजक्या शब्दात अरविंद गुप्तांचे चरित्र व विज्ञान प्रसाराचे कार्य अधोरेखित केले आहे.

            अरविंद मूळचे उत्तर प्रदेशातील बरेली गावचे. त्यांचे आई-वडील अशिक्षित. वडील परंपरागत व्यापार करीत. आईने मात्र आपल्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला. एका ख्रिश्चन इंग्रजी शाळेत ते 11 वी पर्यंत शिकले. शाळा प्रमुख ‘मदर सुपीरियर’ यांनी त्यांच्या वहीत संदेश लिहून दिला. ‘If You want to love god, serve the poor’ परमेश्वरावर प्रेम करायचं असेल तर गरिबांची सेवा कर.

            अरविंद 1970 मध्ये 12 वी झाले. जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. कानपूय आय.आय.टी.मधून ते इलेक्ट्रीकल इंजिनियर झाले. पुण्यातील टेल्कोत इंजिनियर म्हणून काम करू लागले. पण नोकरीत मन लागेना. लोक गरीब का? अरविंदची राहणी साधी. नोकरीमुळे वाचायला वेळ मिळत नाही. झालं, दिली नोकरी सोडून.

            अरविंदच्या लग्नाचा किस्सा औरच आहे. त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली. “आय.आय.टी.कानपूरचा इंजिनियर, 5 वर्षे टेल्कोत काम केलं आहे. सध्या ट्रेड युनियनचं काम करतो. घटस्फोटीत, विधवा, मुलं असलेली, नसलेली, जात वय याची अट नाही. हुंडा नको” जाहिरात वाचून सुनिता पंधे ह्या मुलीने संपर्क केला व अर्ध्या तासात आर्य समाज पद्धतीनं लग्न झालं.

            टाकाऊ वस्तूपासून विज्ञान खेळणी बनवणं हा अरविंदचा छंद. या छंदातून खेल खेल में या पुस्तकाची निर्मिती झाली. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या 25000 प्रतीची विक्री झाली. आणि मग अरविंदाना जीवनाचे ध्येय गवसत गेले. विज्ञान मुलांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी साधी सोपी विज्ञानाची खेळणी बनवायची व त्यांची मुलांमध्ये आवड निर्माण करायची.

            मुलांना वेगवेगळ्या क्लासना पाठविण्याच्या साथीने पालकांना सध्या झपाटलंय. जॉन होल्ट म्हणतो की, ‘आता श्वास घेण्याचे क्लास सुरू करायचं राहिलंय, हा आजारी समाज आहे. मुलं आपल्या आपण खूप गोष्टी शिकत असतात याचा मोठ्यांना विसर पडला आहे.’ मुलांना मोकळा वेळ दिला पाहिजे. ती शांतपणे एखादी गोष्ट करतात, विचार करतात प्रयोग करतात, त्यातून शिकतात, पण सारखी धावाधाव केली तर त्यांच्यातील शांती नाहीशी होते.

            अरविंदांना हा विचार भावला. स्पर्धा नको. शिकण्यात मजा वाटली पाहिजे. मुलांच्या या गरजेचा विचार करून अरविंद खेळण्यांचा जादूगार बनला.

            मुलांसाठी गोष्टीरूप व विज्ञान सोपं करून सांगणारी अरविंदची 75 पुस्तकं प्रकाशित झालीत आजपर्यंत या पुस्तकांचा आठ लाख प्रती खपल्यात.

            सोपी, साधी विज्ञान खेळणी अरविंद गेली 25 वर्षे बनवित आहेत. काडेपेट्या, सायकलची व्हाल्व्ह ट्यूब, जुन्या रिफील, खोकी, कुंच्याच्या काड्या, जुन्या चपला, बटणं अशा गोष्टी वापरून. सहज उपलब्ध साधनं, पर्यावरणाचा विचार, मोडलं तर सहज दुरूस्त होणारे, मुलांनी स्वत: करता येण्यासारखी अशा खेळण्यातून मुलं विज्ञान सहजपणे शिकतात. अरविंदनं यासाठी कार्यशाळा घेतल्या. खेड्यातल्या मुलांचा विचार केला. आता शाळा त्याला बोलावतात. रिसोर्स पर्सन म्हणून.

            एक इंजिनियर नोकरीत रमत नाही, म्हणून फकिरी पत्करतो, देशातल्या गरिबीचं सतत भान ठेवून जगतो, मुलांसाठी  काम करतो, शिकण्यातल्या पोकळ्या त्याला अस्वस्थ करतात, पण तो नुसता व्यवस्थेच्या नावानं खडे फोडत न बसता या पोकळ्या भरून काढण्यासाठी प्रचंड मेहनत करतो व अनेकांना काम करण्याचं बळ देतो.

            असे हे अरविंद गुप्ता. अरविंद सध्या ‘आयुका’ या प्रसिद्ध संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे संचालक आहेत.

            त्यांच्या जीवन प्रवासाचे व कार्याचे सुरेख दर्शन शोभा भागवत यांनी आपल्या पुस्तकात घडवले आहे. विज्ञानाच्या शिक्षकांना व विज्ञान लोकप्रिय करणार्‍या संघटनांना त्यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा मिळेल. यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

प. रा. आर्डे

पुस्तकाचे नाव : खेळण्यांचा जादूगार : अरविंद गुप्ता
लेखक : शोभा भागवत
किंमत : रू.30