मुलांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक गोष्टीत सहभागी होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही; परंतु त्याची गुण कौशल्यांची सकारात्मक अभिव्यक्ती आणि त्यांच्या निरागसतेवर व बालपणावर नकारात्मक परिणाम करणारे धंदेवाईक शोषण यामध्ये एक रेषा आखली पाहीजे.
भारतातील कौशल्यांचा शोध-2 या लहान मुलांच्या हिंदी रिअॅलिटी शो मधील एक प्रसंग, साडेतीन वर्षांचा मुलगा. आपल्या पाठांतराचे कौशल्य दाखविण्यासाठी आपल्या वडिलांचा हात धरून स्टेजवर येतो आणि हनुमान चालिसामधील काव्यपंक्ती घडाघडा म्हणू लागतो. स्टेजवरील जज्ज त्याची वेळ संपल्यावर त्याला थांबविण्याचा बराच प्रयत्न करतात पण तो मुलगा आपल्या हातातील माईक आणि स्टेज सोडावयास अजिबात तयार होत नाही. निवेदक, जज्ज आणि वडील यांनी टाकलेल्या दबावामुळे तो मुलगा त्या काव्यपंक्ती म्हणतच सुटतो. शेवटी निवेदकाला अक्षरश: त्या मुलाला उचलून घेऊन बाहेर न्यावे लागते. तरीही तो मुलगा हनुमान चालीसा म्हणायचे थांबत नाही. स्टेजच्या पाठीमागून त्या मुलाचा चालीसा म्हणत असल्याचा आवाज ऐकू येतच असतो. समोरचा प्रेक्षकवर्ग हा प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगत न थांबता टाळ्या वाजवत राहातो, त्या प्रकाराला अचाट पराक्रम म्हणून जज्ज त्या मुलाचे कौतुक करतात आणि वडीलांच्या चेहर्यावरील आनंद तर ओसंडून वाहात असतो. कल्पना करा, ती घोकून घोकून घेतलेली हनुमान चालीसा म्हणताना त्या केवळ साडेतील वर्षांच्या छोट्या मुलाच्या छोट्याशा मेंदूवर किती ताण पडला असेल.
दुसर्या एका रिअॅलिटी शोमध्ये चार वर्षांची एक मुलगी आपला नाच संपवून जज्ज लोकांचे आभार मानण्यासाठी उभी राहिली. पण तिला त्यांचे आभार मांडण्यासाठी जे शब्द शिकवले होते तेच ती विसरली. त्यामुळे तिच्या चेहर्यावर प्रचंड तणाव आणि काळजी पसरली. त्यातूनही कशीबशी सावरत चेहर्यावर हसू आणत ती म्हणू लागली, “तुम्ही किती क्युट आहात…. नाही…. नाही…. तुम्ही किती हँडसम आहात!!”
हे तसे लहान प्रसंग आहेत. परंतु मनोरंजनाच्या आणि लोकप्रियतेच्या नावाखाली काहीही केले तरी योग्यच आहे अशा मनोवृत्तीचे ते भाग आहेत. ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ असे सोनी टेलिव्हिजनवरील एका मालिकेचेच नाव होते. त्यातच सर्व काही आले. त्वरित प्रसिद्धी, नायकत्व आणि पैसा यांच्यासाठीच्या भयानक स्पर्धेमुळे सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना या ‘कौशल्य’ शोधाच्या तथाकथित मनोरंजक कार्यक्रमांनी सारासार विचार करण्यापासून दूर नेले आहे.
हे कौशल्य प्रदर्शन करण्यासाठी ही तीन ते चार वर्षांपासून पुढची मुले अतिशय धोकादायक, विचित्र, मृत्यूलाही सामोरे जाणारे स्टंटस् करत असतात. ही मुले काय करीत नाहीत? तलवारीने खेळतात, उंचावरून नाच करतात, आयटम साँग्जवर नाचतात, त्यांच्या वयाला न शोभणारे न समजणारे लैंगिक हावभाव चेहर्यावर दाखवत शारीरिक हाचाली करतात, मानवी वर्तुणुकीच्या चुकीच्या बाजूचे वर्णन करणारे विनोद सादर करतात आणि अशी प्रत्येक गोष्ट ज्यामुळे जज्ज, प्रेक्षक आणि कार्यक्रम पाहणारे स्तंभित, अचंबित तर होऊन जातीलच पण त्याचबरोबर त्यांचे मनोरंजनही होईल. परंतु सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे फक्त त्या कार्यक्रमात भाग घेणारे आणि त्यांचे कुटुंबिय एवढेच नव्हे तर प्रेक्षक, जज्ज, बॉलिवुडमधील खास पाहुणे आणि सेलिब्रेटीज्, फोनवरून मते देणारे आणि कार्यक्रम पाहणार्यांतील बरेचजण या भ्रामक जगालाच सत्य समजून त्यात मग्न होऊन जातात. तसेच या कार्यक्रमातून सतत लाखापासून कोटी रूपयांपर्यंतच्या रोख रकमेच्या आकर्षक बक्षिसांच्या घोषणा आणि स्टार, आयडॉल, लिटील चँप बनण्याच्या स्वप्नांची आणि आकांक्षांची विक्री सतत चालूच असते.
या कार्यक्रमांच्या निर्मात्यांच्या, वितरकांचा दावा आहे की, या कार्यक्रमाद्वारा ते केवळ देशातील कौशल्ये प्रदर्शित करून प्रेक्षकांचे हितकारक मनोरंजन करीत आहेत. हे कितपत खरे आहे? की चॅनेल्सचे मूल्य वाढविण्यासाठी आणि पर्यायाने निर्मात्यांचे आणि जाहिरातदारांचे फायदे वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे आणि प्रभावीपणे बांधलेले हे कार्यक्रम आहेत? या रिअॅलिटी कार्यक्रमातून कोणती मूल्ये आणि जीवनमान यात भाग घेणार्या लहान मुलांपुढे ठेवली जात आहेत? हा प्रश्नही आहेच, हे रिअॅलिटी कार्यक्रम त्या लहान मुलांची कौशल्ये खरोखरच उपयोगात आणत आहेत की, त्यांच्या कौशल्यांचा उपयोग आपल्या व्यावसायिक फायद्यांसाठी करून घेत आहेत? आणि त्या मुलांच्या वास्तव जीवनातील संधींचा नाश करीत आहेत?
ह्या काही कंगोर्याबाबत गंभीरपणे विचार केला पाहिजे. जरी या लहान मुलांच्या सहभागामुळे या रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांचे आणि जाहिरातदारांचे फायदे वाढत असले तरी या कार्यक्रमांच्यामुळे मुलांवर पडत असणारा प्रचंड शारीरिक आणि भावनिक ताण, त्यांच्या नेहमीच्या जीवनमानात आणि मानसिकतेत होत असलेला प्रचंड बदल या सत्यांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत घातक ठरेल. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की भ्रामकतेचे घातक परिणाम जे यशस्वी होऊन स्टार बनले आहेत आणि यशस्वी न होता सुरवातीच्याच फेर्यांमधून बाद होतात अशा दोघांवरही होतात. प्रसिद्धीचे काही अंगभूत परिणाम आहेतच आणि त्यात ही प्रसिद्धी जर जीवनाच्या अगदी सुरवातीच्या काळात ज्या काळात मुलांना ती हाताळायची कशी ह्याची काहीच कल्पना नसताना मिळाली तर त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. ही मुले आपण केलेल्या कामगिरीच्या जोरावर एका रात्रीत स्टार बनतात आणि तो स्टारपणाचा काळ ओसरल्यानंतर वास्तव जगाशी जुळवून घेणे त्यांना खूपच अवघड बनते. परिणामी नैराश्यातून स्वत:ला इजा करून घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते. दुसरीकडे आवश्यक त्या पातळीपर्यंत न पोहचू शकलेल्या मुलांच्या मनात नाकारले गेल्याची भावना निर्माण होऊन ती आपल्या परीने व्यक्त होऊ लागते.
हे चॅनेल्स या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने मुलांसाठी जी अतिशय खडतर प्रशिक्षण शिबीरे आयोजित करतात ती काही फारशी चांगली कल्पना नाही असे मानसशास्त्रज्ञांचे आणि तज्ञांचे मत आहे. ती शिबिरे माहिनो न् महिने चालू असतात आणि त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक वाढीला आणि विकासाला अडथळा निर्माण होतो, त्यांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत होतेच शिवाय खाण्याच्या सवयी, शाळेच्या अभ्यासाबरोबरच इतर सामाजिक संबंधांवरही परिणाम होतो. या तरूण मुलांना या शिबिरातून झोप न येणे, अपचन, भावनिक आघाताने मोडून पडणे, भयानक स्वप्ने पडणे, स्वत:ला इजा, त्रास करून घेणे यासारख्या गंभीर मानसिक-शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते. बर्याच वेळा त्यांचे मार्गदर्शक प्रतिस्पर्धांपेक्षा वेगळे गाणे अगर नाच सादर करण्याकरिता अगदी अखेरच्या क्षणी गाण्यात अगर नाचात बदल करतात. अशा वेळेस त्या बिचार्या लहान मुलांची अवस्था खूपच बिकट होते. परंतु मोठ्यांच्या मनात काहीही करून फक्त शो जिंकण्याचाच विचार असल्यामुळे याच्या परिणामांचा ते काहीच विचार करीत नाहीत.
या चँपियन बनविण्याच्या आणि त्वरित प्रसिद्धी देणार्या घातक शर्यतीत या लहान मुलांना ढकलण्यास मोठमोठ्या रकमांची बक्षीसे आणि अनेक आकर्षक आमिषे याबरोबर आपल्या घराचा नावलौकिक वगैरे बाबी तर कारणीभूत आहेतच. पण या गुंत्यात अडकवणारी आणखी एक मोठी शक्ती यामागे आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. ती शक्ती म्हणजे जागतिक बाजारपेठेची आणि बड्या कॉर्पोरेटस्ची. याच शक्ती आज हे ऐषआरामी राहणीमान आणि आक्रमकता, संवेदनहीनता, संपत्ती, शारीरिक सौंदर्य आणि प्रसिद्धी हीच मूल्ये व्यक्तीला आणि समाजाला सुखसमाधान आणि आनंद देणारे खरेखुरे स्त्रोत आहेत असे आपल्यावर बिंबवत आहेत.
अनेक कार्यक्रमात या मुलांकडून प्रक्षोभक नाचाची अपेक्षा करण्यात येते. ती मुले जी भाषा बोलत असतात आणि जे हावभाव करीत असतात ते त्यांच्या वयाला अजिबात साजेसे असत नाहीत. आंध्र प्रदेशाच्या मानवी हक्क आयोगाने नुकत्याच एका निकालात नमूद केले आहे, “मुलांनी जे सिनेमाच्या गाण्यांवर नाच केलेले होते ते दुहेरी अर्थाचे, असभ्य हावभाव असणारे होते, काही वेळेस तर मुलींना हवेत उंच उडवले गेले आणि कुरवाळले गेले. थोडक्यात सांगायचे तर हे मुलांचे असलेले रिअॅलिटी शोज् म्हणजे मुलांच्या मानवी हक्कांचे सरळ सरळ उल्लंघन आहे.”
या कार्यक्रमातील निवेदक आणि प्रशिक्षक जेव्हा मुलांच्या सादरीकरणाच्या आधी मुलांची ओळख करून देतात तेव्हा आणि सादरीकरणानंतर जज्ज, खास पाहुणे जेव्हा संपूर्ण प्रेक्षकांसमोर त्यांचे मूल्यमापन करतात तेव्हा त्या मुलांची गाण्याची अगर नाचाची तुलना मूळ कलाकाराशी किंवा नटाशी तरी करतात किंवा त्या सादरीकरणाबाबत अशी कठोर शेरेबाजी करतात की, निराशेमुळे त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू तरळतात. जज्जनी मारलेल्या कठोर शेर्यांमुळे कोलकोत्याच्या एका मुलीला एवढा प्रचंड धक्का बसला की, तिला अर्धांगवायूचा झटका आला ही घटना सर्वश्रुतच आहे. दुसर्या एका घटनेत प्रचंड सराव केल्याने त्या स्पर्धकाला स्लिप डिस्कचे दुखणे सुरू झाले. दुसर्या फेरीत प्रवेश करता न आल्याने अनेक जण निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. अनेकजण नाकारले जाण्याच्या भितीने तर अनेकजण चांगली कामगिरी करण्याच्या दबावामुळे तणावाखाली येतात. जी रिअॅलिटी मनोरंजन न करता धक्का देते, निराशेच्या गर्तेत ढकलते त्या रिअॅलिटीचा हे संयोजक, पालक, मित्र, हितचिंतक सर्व मिळून आनंद उपभोगत असतात असे हे एक दुष्टचक्र आहे. पण पैसा पाण्यासारखा वाहत असताना कोण कशाला कसल्या परिणामांचा विचार करणार?
आणि कोणती रिअॅलिटी ह्या रिअॅलिटी शोमधून चितारलेली असते? चमत्कारिक स्थळे, भडक मेकअपसह खास भडक पोषाख, उच्च दाबाचे विजेचे बल्ब, कानठळ्या बसविणारी ध्वनी यंत्रणा याला काय आपण रिअॅलिटी म्हणणार? हे सर्व कृत्रिम, खास सनसनाटी परिणाम साधून जास्तीत जास्त प्रेक्षक खेचण्याच्या व्यावसायिक हेतुनेच तयार केलेले असतात. अनेकजणांना असे वाटते या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे प्रसिद्धी, यश आणि आनंदातील क्षणभंगुरता या मुल्यांची जाणीव निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल. मात्र प्रत्यक्षात अशा कार्यक्रमातून मुलांच्यावर अतिशय चुकीच्या वागणुकीचा प्रभाव पडताना दिसून येतो. ते पैसा हाच यशस्वी होण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे समजू लागतात. मग या प्रक्रियेत मेहनत, सहनशीलता, सोशिकता, सहभागिता या मुल्यांना घातक तडे जातात. रिअॅलिटी शोमधून साकारलेली परिस्थिती प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा आणि दैनंदिन अनुभवांपेक्षा वेगळीच असल्याने प्रत्यक्ष जीवनात दुसर्याशी जुळवून घेणे अवघड जाते. आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. स्वभाव आक्रमक आणि स्व-केंद्रित होऊन जातो.
या कार्यक्रमातून सहभागी असणार्या मुलांवर ज्या प्रमाणे याचा प्रभाव पडतो त्याचप्रमाणे हे कार्यक्रम बघणार्या मुलांच्यावरही पडणारच. या कार्यक्रमाच्या प्रसारणाच्या वेळेस मुले अभ्यास, खेळ, आराम किंवा मित्रांबरोबर अथवा कुटुंबियांबरोबर गप्पागोष्टी या सगळ्या गोष्टींना फाटा देतात. कार्यक्रम बघितल्यानंतर त्यातील नाच, भाषा यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न जर पालकांनी केला तर त्यांची प्रतिक्रिया आक्रमक बनलेली दिसते. लैंगिकता दर्शवणार्या मोठ्यांच्या शारीरिक हालचालींची नक्कल मुले जेव्हा सतत करू लागतात तेव्हा ती केवळ आपल्या बालपणापासून निरागसतेपासून दूर जातात एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या असभ्य भाषा, स्पर्श, वर्तन समजण्याच्या अगर त्यांना प्रतिकार करण्याच्या क्षमतेवरच घाला पडतो. कौशल्य शोधाच्या नावाखालील मनोरंजनाचा हा नवा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विविध टेलिव्हिजन चॅनेल्सद्वारा मुलांचे चालू असलेले धंदेवाईक शोषण आहे असा आरोप करीत हे शोषण त्वरीत संपविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि बालहक्क गटांनी, व्यक्तींनी कायदेशीर संस्थांकडे आणि मानवी हक्क आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
आता प्रश्न असा आहे की, ह्या सर्वच रिअॅलिटी शोजवर संपूर्ण बंदी आणायला पाहिजे का? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 8 वर्षांच्या खालील मुलांना अशा कार्यक्रमात काम करायला सक्त बंदी घालण्यात आली आहे आणि 14 वर्षांखालील मुलांना मजकूर आणि त्यांचे कामाचे तास यावर कडक लक्ष ठेवीत काम करायला परवानगी देण्यात आली आहे. जे पालक अशा कार्यक्रमांना पाठींबा देत आहेत त्यांचा दावा असा आहे या कार्यक्रमांमुळे मुलांचे शोषण होत नसून उलट त्यांच्यातील सुप्त गुणांना व कौशल्यांना वाव मिळत आहे आणि त्याचा त्यांना भविष्यातील त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल. परंतु हे रिअॅलिटी कार्यक्रम योग्य दृष्टिकोन सामोरा ठेवून आखले गेले पाहिजेत तरच हा हेतू सिद्ध होईल या मताशी ते पालक निश्चितच सहमत होतील. आंध्र प्रदेश मानवी हक्क आयोगाच्या निर्णयानुसार, “प्रत्येक मुलाला नाच, गाणे, चित्रकला यासारख्या त्याच्या विकासाला सहाय्यभूत ठरणार्या सांस्कृतिक गोष्टीत भाग घेण्याचा संपूर्ण हक्क आहे. पण त्यासाठी यात सभ्यता, शिस्त आणि सखोलता असणे आवश्यक आहे आणि टेलिव्हीजनवरून जे रिअॅलिटी शोज् प्रदर्शित केले जातात ते सभ्यता, शिस्त व सखोलतेच्या मर्यादेत बसणारे नसल्यामुळे त्यावर बंदी आणणे योग्य ठरते.”

मुलांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक गोष्टीत सहभागी होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही; परंतु त्याची गुण कौशल्यांची सकारात्मक अभिव्यक्ती आणि त्यांच्या निरागसतेवर व बालपणावर नकारात्मक परिणाम करणारे धंदेवाईक शोषण यामध्ये एक रेषा आखली पाहीजे. या टेलिव्हिजन कार्यक्रमांपासून स्फूर्ती घेऊन काही शाळांनीही अशा पद्धतीचे नाचाचे कार्यक्रम आयोजित करणे सुरू केले आहे. हे अतिशय घातकच आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राजकीय इच्छाशक्ती दाखवून अस्तित्वात असलेले कायदे आणि मार्गदर्शक तत्वे कठोरपणे अंमलात आणली पाहिजेत आणि या कायद्याची खिल्ली उडवणारे संयोजक, प्रसारण करणारे आणि प्रायोजित करणारे त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली पाहिजेत. आज एका सर्वसमावेशक कायद्याची गरज आहे ज्यामुळे व्यावसायिक उपयोगासाठी मुलांच्या होत असलेल्या शोषणाला प्रतिबंध करता येईल. तोपर्यंत जे चॅनेल्स मुलांच्या संदर्भात आक्षेपार्ह चित्रण करताना आढळतील त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली गेली पाहिजे. मुलांसाठी असे वातावरण निर्माण केले पाहिजे जिथे ते ‘स्टार’ होण्याआधी प्रथम ‘माणूस’ व्हायला शिकतील.
-मनजीत राठी
(अनुवाद राजीव देशपांडे)