Categories
कार्याध्यक्षांची डायरी

कालसुसंगतता आणि उपयोगितेवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे अस्तित्व

जून – २०११

देवा-धर्माच्या नावावर बुवाबाजी शोषण, दिशाभूल करणार्‍यांच्या विरोधात प्रबोधन व शक्यतेनुसार संघर्ष करण्याचे काम  महाराष्ट्र अंनिस करीत आलेली आहे. त्यामुळे आमचं अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम देवा-धर्माच्या नावावर चालणार्‍या काळाबाजारापुरतं मर्यादित असलं, तरी त्याच्यातून रुजविण्याच्या दृष्टिकोनाचा परिघ फार व्यापक आहे. त्यामुळे बुवाबाबांकडून होणार्‍या दैवी-चमत्कारसदृश दाव्यांच्या आणि फसवणुकीच्या बाबत माणसांना तर्कसुसंगत विचारांची मिळणारी दृष्टी जीवनाच्या सर्व क्षेत्रात मार्गदर्शक व उपयोगी ठरत असते असा आमचा अनुभव आहे. अशा मूलगामी, पायाभूत, दिशादर्शक दृष्टीकोनांची कालसुसंगतता आणि उपयोगिताही वेळोवेळी सिद्ध करण्याची आवश्यकता असते, त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे अस्तित्व अबाधित ठरणार आहे.

मानवी जीवनात जन्मापासून मृत्युपर्यंत, एवढेच नव्हे तर जन्माआधीही आणि मृत्युनंतरही अनेक कर्मकांड, रुढी-प्रथा-परंपरांचा समावेश अविभाज्य झाला आहे.  कारण माणसाने त्याच्या त्या त्या वेळच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती आणि त्यांचे आपापल्या जीवनातील स्थान निश्चित केले आहे. असे असले तरी त्यातील कालबाह्य, शोषण करणार्‍या, गतानुगतिक बाबींना कालौघात टाकून देणे मानवी समुहांना जमलेच असे नाही. त्यासाठी त्याला स्वतंत्र व विशेष विचार, कार्य आणि संघर्ष करावा लागला आहे. त्यातूनच त्याची आधुनिक माणूस असण्याची ओळख निर्माण होत गेली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे संघटीत कार्य त्याच अर्थाने समाजोपयोगी व माणसाला मानव म्हणून जगण्याला समर्थ करणारे आहे. महाराष्ट्र अंनिसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सृजनशील व उपक्रमशिल नेतृत्त्वात गेल्या वीस वर्षाच्या वाटचालीत समाजाला पुढे नेणारे, कालसुसंगत आणि कालोपयोगी विविध उपक्रम देण्याचा  प्रयत्न केला आहे. त्यामध्ये यात्रा-जत्रातून होणार्‍या पशुहत्येला गोडाच्या नैवेद्याचा पर्याय असो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रामुख्याने पाणी प्रदूषण टाकण्यासाठी विसर्जित मूर्ती व निर्माल्य दान करा मोहीम असो, होळीची पोळी दान करा- होळी लहान करा-कचर्‍याची होळी करा असे आवाहन असो की फटाके मुक्त दिपावलीचा उपक्रम असो हे सर्व आता महाराष्ट्राने अधिकृतपणे स्विकारलेले आहे. कारण त्याच्या पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यातून पर्यावरणाच्या र्‍हासापासून वैयक्तिक व सामुहिक वेळ-श्रम-पैशाच्या अपव्ययापर्यंत अनेक कालबाह्य व शोषण करणारे प्रश्न निर्माण झालेले होते. त्यावर अंनिसने त्याला दिलेले उपक्रमांचे पर्याय महाराष्ट्राच्या समाजमनाला उपयोगी वाटले म्हणून स्विकारले गेले. अशाच प्रकारची कालसुसंगत आणि उपयोगी उपक्रमांच्या पर्यायांची साखळी व्यापक प्रमाणात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण तो धर्माची विधायक आणि कृतीशील चिकित्सा करण्याबरोबर त्याला आधुनिक, मानवतावादी पर्याय देण्याचाच प्रयत्न आहे, असे आम्ही मानतो. अर्थात् हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अत्यंत प्रतिभेने, सृजनशिलतेने प्रयोगशिल राहण्यातून शक्य होणार आहे हे देखिल आम्ही जाणतो.  ते करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास आता आपण सगळ्यांनी मिळविण्याची आवश्यकता आहे.  

अविनाश पाटील