भुतांच्या अस्तित्वावर विश्वास असणारी माणसे त्याबद्दल ज्या गोष्टी मान्य करतात त्या अशा-
1) मृत माणसांची भुते होतात. 2)माणसाची एखादी इच्छा अपुरी राहिली असल्यास ती पूर्ण करून घेण्यासाठी त्याचे भूत होते. 3) ते एखाद्या वेळी जिवंत माणसाच्या अंगात प्रवेश करते. 4) माणसाचा मृत्यू झाला असेल त्या जागी त्याचे भूत दिसते. 5) मांत्रिक लोक भूत उतरवू शकतात.
आता या एकेका बाबीची चिकित्सा करूया –
‘माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. आता मी सुखाने मरतो’, असे म्हणणारा कोणी तुमच्या पाहण्यात आहे का? 90 वर्षांची म्हातारीसुद्धा ‘एकदा पणतीचे हात पिवळे झालेले बघू दे, मग मी मरायला मोकळी’, असे म्हणत असते. त्यामुळे इच्छा अपुरी राहिलेल्या व्यक्तीचे भूत होत असते तर जगात जिवंत माणसांपेक्षा भुतेच जास्त झाली असती. (कदाचित आपण सर्व भुतेच असू; जिवंत माणसे कुणी वेगळीच असतील!)
इच्छा अपुरी राहिलेली अनेक मोठमोठी माणसे होऊन गेली. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य व्हावे असे वाटत होते. महात्मा गांधींना हिंदू-मुस्लिमांनी प्रेमाने राहावे असे वाटत होते. सुभाषबाबूंना भारत स्वतंत्र झालेला पाहावयाचा होता. यातले कोणी भूत होऊन आपल्या अपुर्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला नाही. याउलट नेहमी साधारण अशी गोष्ट ऐकण्यात येते की, एक मुलगा जिलेबी आणण्याकरिता बाहेर गेला होता, तो वाटेत अपघात होऊन मेला, तर तो आता भूत बनून त्या ठिकाणी जाणार्यांना अडवतो आणि ‘जिलेबी दे जिलेबी दे’ म्हणत त्यांच्या मागे लागतो किंवा त्यांच्या शरीरात संचार करतो. या माणसाला भरपूर जिलब्या खाऊ घातल्यावर भूत त्याला सोडते.(बहुतेक कोणी जिलब्या आवडणार्या माणसाने ही गोष्ट रचली असावी.) म्हणजे राष्ट्राच्या वा समाजाच्या दृष्टीने अतिशय उपकारक इच्छा भूत बनून पुर्या करता येत नाहीत, आणि फालतू मात्र करता येतात, हा अजब न्याय आहे.
काही वेळा खुनी सापडत नाही. प्राणघातक अपघात करून चालक पळून जातो. अशा वेळी मृत व्यक्तीचे भूत बनून खर्या अपराध्याला ते का पकडून देत नाही?
आपण माणसाचे भूत होते असे मानतो. तर कोकणात अनेक जण सापाचे आणि वाघांचेसुद्धा भूत होते असे शपथेवर सांगतात. त्याहीपेक्षा बहारदार सत्य कथा आहे, एका जिवंत माणसाच्या भुताची! गोष्ट आहे श्रीलंकेतील. एका स्त्रीचा नवरा सैन्यदलात होता. तो युद्धावर गेला असता मरण पावला. काही काळानंतर तिने पुन्हा लग्न केले. पण हे न आवडणारे तिच्या नवर्याचे भूत तिच्या अंगात संचार करे. तसे झाले की, ती काठी खांद्यावर टाकून, ‘क्विक मार्च, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट’ असे ओरडत संचलन करू लागे. काही दिवसांनी तिचा बेपत्ता झालेला नवरा जिवंत परत आला आणि ही भूतबाधा एका क्षणात बंद झाली. आपण केलेल्या कृत्याची खंत बाळगणार्या या महिलेच्या मनाचे खेळ म्हणजे ही भूतबाधा होती. भूतबाधेच्या सर्व प्रकारात असे काही मानसिक कारण लपलेले असते. थोडा शोध घेतल्यास ते समजू शकते.
जिथे एखादी व्यक्ती मरण पावते त्या ठिकाणी तिचे भूत दिसते ही कल्पना आता तपासून पाहूया. मी पुण्यातील एका मोठ्या रूग्णालयात शिक्षण घेतले. तिथे दर वर्षी दोनतीनशे लोक मरण पावत असत. आम्हा डॉक्टरांना दिवस-रात्र कुठल्याही वेळी शवागारापासून पोस्टमॉर्टेम रूमपर्यंत कुठेही जावे लागत असे. शंभराला एक असे भूत होण्याचे प्रमाण धरले तरी डॉक्टर मंडळींना वर्षाला तीन तरी भुते दिसायला पाहिजेत की नाही? सहा वर्षांत एकही भूत दिसले नाही. भुते बहुधा डॉक्टरांना घाबरत असावीत.
भुतांचा राहत्या जागेचा प्रश्न फार बिकट असावा. बिचारी पडक्या धर्मशाळेत, निर्मनुष्य वाड्यात, स्मशानात, वठलेल्या झाडावर, ओसाड माळावर, अशी दिवस(नव्हे रात्री) काढत असतात. मी भूत असतो तर ताजमहाल हॉटेलात एखाद्या ए.सी.रूममध्ये राहिलो असतो. बरे, दिवसा ही मंडळी कुठे गायब होतात कोण जाणे! गर्दीत एखादे भूत दिसले आहे का? फार कशाला, दोन माणसांना एकदम कधी भूत दिसले आहे का? माणसे भुताला घाबरतात हे ठीक आहे, पण असे दिसते की, भुतेच माणसांना जास्त घाबरतात. पुण्यातील अनेक भुतांचे वाडे बिल्डर लोकांनी घेऊन तेथे अलिशान संकुले उभारली आहेत. अनेक वर्षे राहणार्या भुतांना बांधकाम खर्चात एक खोलीसुद्धा दिलेली नाही. या निर्वासित भुतांनी जावे तरी कुठे?
भुते उतरवण्याचा प्रकार तर इतका अमानुष असतो की, भुतापेक्षा त्याचीच जास्त भीती वाटते. खरे म्हणजे याला अमानुष किंवा पाशवी म्हणणेही चुकीचेच आहे. कारण कोणीही पशू भूत उतरवता म्हणून दुसर्या पशूचे असे हाल करत नाही. यात भूतबाधा झालेल्या माणसाला जबर मारहाण करण्यात येते. त्याच्या तोंडून भुताचा बायोडेटा वदवला जातो. काय केल्यावर तो इथून निघून जाईल याचे सौदे केले जातात. तोंडात चप्पल धरून रांगण्यासारखे अपमानास्पद प्रकार करायला लावतात. अखेर जवळच्या झाडाची फांदी हलल्याची निर्वाणी देऊन भूत काढल्याचे सांगण्यात येते. थोडे दिवस माणूस बरा असतो, पण पुन्हा काही दिवसांनी भूत त्याचा ताबा घेते. यात भूत लागणे, ते काढणे, पुन्हा बाधणे हे सर्व प्रकार मनोविकार आणि संमोहन यांचे अविष्कार असतात. कोणीही व्यक्ती विचित्रपणे वागू लागल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे हे उत्तम.
-डॉ. शरद अभ्यंकर