Categories
भूताटकी

पुण्यातील शाळेत भुताटकी : त्याचा शोध

मे - २०११

समाजसुधारकांच्या पुण्यात शाळेत भूत प्रगटले. अजूनही भुताचा शोध घ्यावा लागतो. अंनिसच्या चळवळीची गरज किती आहे हे लक्षात घ्या. – संपादक

            दि. 14 मार्च 2011, मारूती कारने निगडीहून कोंढव्याकडे कूच केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुखांसमवेत भगवान काळभोर, नलवडे व अस्मादिक असे पाचजण होतो. कोंढव्यातील ज्या उर्दूशाळेत 5 दिवसांपूर्वी पाचवीच्या वर्गात शिकवताना काही मुलांना फळ्यावर भूत दिसले होते त्या शाळेत पोचलो. दुपारचे 12 वाजले होते. शाळेच्या चेअरमनच्या केबिनमध्ये आमचेप्रमाणे दिल्लीच्या एका प्रसिद्ध दूरदर्शन वाहिनीचे प्रतिनिधी होते. इंडियन पॅरॅनॉर्मल सोसायटीचे तिवारी नावाचे गृहस्थ होते.

            त्यादिवशी काय घडलं…. चेअरमन सांगू लागले. पाचवीच्या वर्गातील कुणा एका मुलाला फळ्यावर भुतासारखी काळी प्रतिकृती दिसली. त्याच्याबरोबर वर्गातील आणखी चार-सहा जणांना तशीच प्रतिकृती दिसली. मुलं घाबरून रडायला लागली. कावरी बावरी झाली. मग सर्वच मुलं एका पाठोपाठ वर्गातून बाहेर पडली. वर्गशिक्षिकेला ती आवरेनाशी झाली. जिन्यावरून खाली उतरताना चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये भरीस भर म्हणून आणखी एक विद्यार्थी चक्कर येऊन पडला. बातमी ऐकून जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस व्हॅन घटनास्थळी आली. शाळेच्या व्यवस्थापनाने दुपारी लवकर शाळा सोडून दिली. त्या इमारतीतील काही खोल्यांत वर्ग भरविणे बंद केले. चार दिवस शाळा देखील बंद होती. टी.व्ही.वर बातमी आली. मुलांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला भंडावून सोडले. शाळा पूर्ववत सुरू झाली पण ज्या खोलीत भूत दिसले तो वर्ग बंद होता. ह्या संदर्भात मुलांना भूत या संकल्पनेमागील तथ्य किती ह्याचे प्रबोधन करण्यासाठी, शाळेच्या व्यवस्थापनेने अंनिसचे राज्यकार्यवाह मिलिंद देशमुख यांना पाचारण केले. म्हणून आज आम्ही तिथं उपस्थित होतो. टी.व्ही.च्या दूरदर्शन वाहिनीचे प्रतिनिधी/इंडियन पॅरॅनॉर्मल सोसायटीचे प्रतिनिधी सुद्धा आले होते. शाळेच्या व्यवस्थापनाचे असेही तर्क होते की, काही समाज कंटकांनी-ज्यांचे विरूद्ध शाळेच्या व्यवस्थापकानी, शाळेतील मुलींना शाळेत येताना/जाताना टिंगल टवाळीला तोंड द्यावे लागते म्हणून पोलिसांत तक्रार केली होती, त्यानीच हा बनाव घडवून आणला असावा. भूत वगैरे काही नाही पण मुलांच्या मनात त्याविषयी फार भिती आहे. त्यामुळे चार दिवस शाळा बंद ठेवली.

            आम्ही सर्वजण आमचे बरोबर पो.इन्स्पेक्टरसुद्धा होते- तिसर्‍या मजल्यावरील पाचवीच्या वर्गात जिथे भूत दिसले होते- तिकडे मोर्चा वळवला. तिसरा मजला असल्याने वारे जरा जास्तच घोंगावत होते. त्यामुळे वातावरणात आणखीनच गूढता निर्माण झाली होती. सोबत आलेल्या इंडियन पॅरॅनॉर्मल सोसायटीच्या सदस्यांनी फळ्यावर खडूच्या चुन्याच्या सहाय्याने भूताच्या कवटी सदृश्य चित्र काढले. त्यामुळे मुलांना त्यादिवशी फळ्यावर भूताची कवटी कशी दिसली असेल याची कल्पना आली. मिलिंदने आपल्या प्रयोगांची व्यवस्था केली. दूरदर्शन वाहिनीच्या प्रतिनिधींनी कॅमेरे योग्यजागी लावले. ज्या वर्गातील मुलांनी भूत बघितले होते. त्यानाच वर्गात बोलावण्यात आले. जेणेकरून त्यांची त्या वर्गाच्या खोलीसंबंधी असणारी भीती दूर व्हावी. सर्वजण आपापल्या जागेवर बसली. त्या सर्वांना फळ्यावर काही भूत दिसते का म्हणून विचारले तर सर्वांनी भुताची कवटी दिसत असल्याचं सांगितले. जी आर्धी आम्ही आधीच चितारली होती. अशाच प्रकारची थोडीशी कमीजास्त आकाराची भुताची कवटी त्यादिवशी फळ्यावर दिसल्याचा मुलांनी खुलासा केला. ज्या मुलाला प्रथम ती दिसली तो गैरहजर होता, त्याला बोलावले. मिलिंदने तर त्यालाच प्रयोगात सहभागी करून घेतले. वेगवेगळ्या प्रयोगातून भूत ही कल्पना कशी काल्पनिक आहे हे मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले. स्वयंपाक/घरकाम करत असताना कधी कधी आईने लहान मुलाने रस्त्यावर जाऊ नये म्हणून भूत/बागुलबुवा यांची भीती दाखवलेली असते तीच मनात घर करून बसते आणि हीच मनातली भीती अधून-मधून डोकं वर काढते. मुलांना हे पटलं. त्यांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होता. ह्या सर्व घटनांमधून खालील प्रश्न मनात येतात.

            1) आजही 21 व्या शतकांत भुते नसतात-तो एक मनाचा खेळ आहे. ह्या गोष्टीचा शिक्षक वर्गातसुद्धा संभ्रम आहे का? नाहीतर त्या दिवशीच त्या वर्गशिक्षिकेने बाकी शिक्षकवर्गाच्या साहाय्याने मुलांना गप्प केले असते. मुलांना वर्ग सोडून जाण्यास प्रतिबंध केला असता.

            2) लहान मुले टी.व्ही.वरील हॉरर सिरियल्स, अंधविश्वास वाढवणार्‍या सिरियल्स नको त्या वयात बघून जास्त संवेदनाशील तर बनली नाहीत ना?

            मात्र त्यादिवशी आमचे बरोबर जे पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी भूत वगैरे थोतांड आहे. कुणी समाज कंटकांनी मुलांना फूस लावून शाळेची बदनामी व वर्ग उधळून लावण्याचा डाव केला असावा. त्या दिशेने पोलीस योग्य तो तपास थोड्याच दिवसांत करतील. त्यादिवशी रात्री दीड ते पहाटेपर्यंत अंनिसचे कार्यकर्ते नलावडे, काळभोर, सोनटक्के, खरोटमल, पॅरॅनॉर्मल सोसायटीच्या सदस्यांसमवेत जागत होते. टेंपरेचर, इंडिकेटर, गॉसमीटरच्या सहाय्याने पॅरानॉर्मल सोसायटीच्या लोकांनी भूत नसल्याचा निष्कर्ष काढला.

            हे सर्व चालले असताना मला मात्र माझ्या लहानपणी, मी भुताच्या गप्पा मारत असताना, वडिलांनी(जे तेव्हा शिक्षणाधिकारी होते) धपाटा घातल्याचे आठवलं. ह्या पार्श्वभूमीवर हे नक्कीच की, आज सर्वच गोष्टी सुपर सेन्सिटिव्ह झाल्या आहेत. प्रत्येक घरात लहान सहान गोष्टीचा बागुलबुवा करून धंदा केला जातो. नाहीतर दिल्लीहून काही हजारो रूपये खर्चून कुणी प्रतिनिधी आले नसते खासच!

            मोहिमेत गेलेले कार्यकर्ते – श्रीराम नलावडे, भगवान काळभोर, निशाद माने, संदीप शिंदे, विनोद खररोटमल, मिलिंद सोनटक्के, मिलिंद देशमुख पॅरानॉर्मल सोसायटीचे सदस्य व दिल्लीच्या आजतक चॅनेलचे प्रतिनिधी अहम्मद अजिम, पंकज केळकर व कॅमेरामन योगी – यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर समितीची भूमिका सांगण्यात वेळ गेला. शेवटी मात्र आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास असणारी ही मंडळीसुद्धा ह्या शाळेत हा कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे. या निष्कर्षावर आली.