Categories
संपादकीय

भौतिक गुरूत्वबल भेदले पण…?

मे - २०११

पृथ्वीच्या जन्मापासून तिचे नैसर्गिक गुरूत्वबल अस्तित्वात आले. यालाच आपण पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण म्हणतो. वर फेकलेली वस्तू खाली येते ती याच बलामुळे.

            गुरूत्वाकर्षणाचे स्वरूप आपणास नीटपणे आकलन करून दिले न्यूटनने. त्याचा गुरूत्वाकर्षणाचा नियम क्रांतिकारी ठरला. कारण हा नियम समजल्यामुळे गुरूत्वाकर्षणाचा भेद करणे मानवाला शक्य झाले. 12 एप्रिल 1961 रोजी सोव्हिएट रशियाचा व्होस्टॉक-1 हा उपग्रह प्रक्षेपक अंतराळात झेपावला तो युरी गागरीन या अंतराळवीराला घेऊन. पृथ्वीचे बंधन तोडणारा युरी गागरीन हा पहिलाच मानव होय. या घटनेला 12 एप्रिलला पन्नास वर्षे पूर्ण झाली. या घटनेनंतर सहाच महिन्यांनी गागरीन मुंबईला आला होता. शिवाजी पार्क, दादर येथे त्याचा यथोचित गौरवही झाला होता.

            गुरूत्वाकर्षणाचा नियम व न्यूटनचे गतीचे तीन नियम यानी विज्ञानयुगाचा प्रारंभ झाला. त्याचाच परिणाम म्हणून उपग्रह अंतराळात झेपावू लागले. अंतराळयाने विश्वसंचार करू लागली. मंगळावर व्हायकिंग यान पोचले. हबल दुर्बिण अंतराळात फिरती राहून विश्वाची छायाचित्रे घेऊ लागली. अंतराळयुग अवतरले. माणूस पृथ्वीच्या बंधनाला भेदून अवकाशात संचार करू लागला.

            पृथ्वीचे गरूत्वाकर्षण पार करण्याला आपणास 50 वर्षे झाली. या निमित्ताने एप्रिल 2011 मध्ये अंतराळ भेदाचा सुवर्ण महोत्सव साजरा होतोय. त्या निमित्त मानवाच्या या गौरवशाली पराक्रमाला सलाम करताना काही विचार मांडावे वाटतात.

            पृथ्वीपासून काही अंतरापर्यंतच आपण झेप घेऊ शकत होतो ही एक प्रकारची आपल्यावर लादलेली गुलामीच होती. एखाद्या लाडक्याने आईच्या कुशीतून दूर जाताच पुन्हा तिच्याकडे परत झेप घ्यावी यात प्रेमभावना असली तरी तो कर्तृत्वाला अडसरच म्हणावा लागेल. अनोळख्या जागी, अनोळख्या लोकात, काळोखाला पार करून शौर्य गाजविण्याची आपली विजिगीषु वृत्ती आपल्या विकासाला आवश्यक असते. म्हणूनच लाडाने वाढलेली मुलं कर्तृत्वाच्या दृष्टीने दुबळी ठरतात. परावलंबी होतात. शरीर व बुद्धीचे परावलंबीत्व केव्हाही टाकून द्यायला हवे. भौतिक जगात वावरताना मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने शरीर व बुद्धीवरचे जोखड झुगारून दिले व गेल्या केवळ चारशे-पाचशे वर्षांत अभूतपूर्व प्रगती साधली. अंतराच्या सीमा ओलांडल्या, भूतकाळात काय लपले होते ते शोधून काढले. माणूस दूरवरचे पाहू लागला, ऐकू लागला. माहिती क्रांती अवतरली.

            न्यूटनने गुरूत्वबलाचा नियम दिला व या बलाला भेदून जाण्याचा पराक्रम आपण केला. या विजयाचा आनंद साजरा करताना दुसर्‍या एका गुरूत्वबलाच्या विळख्यातून आपण मुक्त होत नाही याची खंत वाटायला लागते. हे दुसरे गुरूत्वबल म्हणजे तथाकथीत गुरू, महागुरू, बुवा बाबा, माताजी यांच्या ढोंगी अध्यात्माच्या विळख्याचे बल.

            स्पुटनिक किंवा अंतराळयान आपणाला पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या बाहेर नेण्यास मदत करते. पण बुवा बाबांच्या ढोंगी गुरूत्वबलाच्या कचाट्यातून निसटणे फारच अवघड वाटते. कारण हे गुरूत्वबल माणसाच्या मनावर प्रभाव गाजवते. भोळसटपणा, भीती यांची बंधने झुगारून समाजमनाला बंधमुक्त करणारे स्पुटनीक कसे आणि कोण निर्माण करणार?

            निसर्गनिर्मित भौतिक, शारीरिक गुलामगिरीवर आपण मात करीत आलो. शरीररचना समजावून घेऊन अनेक प्रकारच्या साथीच्या रोगातून मुक्ती मिळविली, डोंगरावर पाणी चढविण्यात आपण यशस्वी झालो. समुद्राला पार करून दूरवरच्या प्रदेशात लीलया संचार करू लागलो. पण धर्माच्या नावावर अधर्माची मानसिकता म्हणजेच धार्मिक तेढ, जाती-जातीतील वैमनस्य स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक विषमता  अशा शक्तींच्या बंधनातून आपण बाहेर पडू शकत नाही. यासाठी न्यूटनसारख्या बुद्धिवंताने एखादा जालीम तोडगा सुचवला तर किती बरं होईल?

            मनाची गुलामगिरी किती चिवट असते याचा एक अनुभव पहा – कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात स्त्रियांना गाभार्‍यात प्रवेश मिळावा म्हणून काही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मीच्या गाभार्‍यात धडक मारली. पण प्रत्युत्तर म्हणून स्त्रियांना गाभार्‍यात प्रवेश नको म्हणून महिलांचाच मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर नेण्यात आला.

            धर्माचे अन्यायकारक बंधन व मानसिक गुलामगिरी बाबतची वरील घटना म्हणजे धर्माच्या ठेकेदारांच्या गुरूत्वबलाचा अस्सल नमुना होय. अशा प्रकारच्या अनेक गुलामगिरीचे गुरूत्वबल समाजाला मुक्त होऊ देत नाही. या खोट्या गुरूत्वबलाचा भेद करणे हे पुढील काळातील आव्हान आहे. हेही घडेल पण थोडी वाट बघावी लागेल. हे जेव्हा घडेल तेव्हा भेदिले गुरूत्वाला-अधर्माला-असमानतेला असा जयघोष निनादेल व समतेचा ध्वज उंच फडकेल.