मराठवाड्यात करणी-भानामती, चेटूक हा शब्द उच्चारला की, चविष्ट चर्चेला उधान येते; कारण लहान मुलांपासून म्हातार्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या कानावरून हे शब्द गेलेले असतात त्यात भर म्हणून त्याचे भयानक प्रकार घडतात. घडवून आणले जातात. मी प्रत्यक्ष पाहिले असे दावे केले जातात करणी-भानामती, चेटूक असतेच, हे कोणतरी करतो आणि कोणी तरी उतरवतो असा एक पक्का समज आहे. मी भानामती करतो असे कोणी म्हणत नाही पण मला भानामती उतरवता येते असं म्हणणारा चार दोन गावात एकतरी जाणता असतोच.
चेटकाबद्दलचे समज
ग्रामीण भागात चेटूक प्रसिद्ध आहे, चेटूक करून म्हशीचे दूध बंद केले जाते. दूध खारट केले जाते, एका खळ्यातील धान्य दुसर्यांच्या खळ्यात नेलं जाते. हे कोण्या व्यक्तीकडून केले जाते असा समज आहे. याबाबत चळवळीच्या वतीने माझे असे म्हणणे आहे की, “जर कोणी असा चेटूक करणारा असेल तर त्याच्या शोधात आम्ही आहोत. अशा चेटूक करणार्यांना लातूरला आणू, मी ज्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये काम करतो त्या कॉलेजमध्ये आणून त्याला बसवू, शाहू कॉलेलजमध्येच का? तर आमच्या शाहू कॉलेजच्या भोवताली को-ऑपरेटिव्ह बँकेपासून ते राष्ट्रीयकृत बँकेपर्यंत 6-7 बँका आहेत. त्या चेटूक करणार्यांनी चेटूक करून त्या सर्व बँकांतील पैसे मंत्रतंत्राच्या जोरावर कॉलेजमध्ये आणावेत. ते पैसे ग्रामीण भागात नेऊन झकास विकास करता येईल असं म्हटलं की, लोक म्हणतात, “अहो, पैशाच्या बाबतीत होत नाही. ते फक्त गायी-म्हशीचे दूध बंद, खारट करण्यात होते.” पण मित्रहो, जसे हे पैशाच्या बाबतीत होत नाही तसेच गायी म्हशीचे दूध बंद, खारट करता येत नाही. मग प्रश्न येतो म्हशीचे दूध बंद होते कसे आणि जाणत्याची दोरी घातल्यानंतर दूध हे येते कसे? आपल्या घरातील एखादी महिला खूप आजारी आहे. तापाने फणफणत आहे, तिच्या बाळाला दूध तिचं पाजलं जात नाही तर वरचे दूध पाजले जाते कारण तिला दूध येत नसते, तद्वतच जसा माणसाला आजार येतो तसाच जनावरालाही आजार येतो आणि मग त्याचे दूध बंद होते त्यात आपण जानत्यांकडे जातो पण जानत्यांने एक दोरी घातली तर दूध येत नाही तो म्हणतो 5 किंवा 7 दोर्या घालाव्या लागतात. त्यानिमित्ताने 5-7 दिवस त्याच्या चकरा मारव्या लागतात आणि वरील आजार हे बुहतांशी दुषित पाण्यामुळे, घाणीमुळे किंवा रोग जंतूमुळे होतात आणि ते आजार कुठेही न दाखवता 4-5 दिवसांनी बरे होतात. त्यातच दोरी घातली की, जानत्याच्या दोरीचा गुण आला असे म्हटलं जातं. वास्तविक दोरीचा व दुधाचा काहीही संबंध नसतो. आपण विचार करीत नाही म्हणून जानत्याचं फावते.
भानामतीबद्दल पारंपरिक समज
आपल्याकडे भानामती होते, घरावर दगड पडायला लागतात, अंगावर बिब्याच्या फुल्या पडतात, रात्री जेवणात राख, शेण किंवा विष्ठा टाकली जाते, डोळ्यातून, कानातून, तोंडातून खडे, सुया निघतात, दातखीळी बसते, बायका घुमायला लागतात, न समजणार्या इतर भाषेत संवाद करतात, अंगात सुया टोचल्या जातात, खोड होऊन पडतात, सरसर झाडावर चढून छोट्याशा फांदीवर लटकतात, छोट्याशा देवळीत बसतात, केसाने छताला टांगल्या जातात, अक्राळविक्राळ रूप धारण करतात. त्या 5-10 लोकांना आवरत नाहीत, डोक्याचे केस आपोआप कापले जातात. कपडे आपोआप फाटले जातात, बंद कपाटातील कपडे फाटले जातात, जळले जातात, यासारखे अनेक प्रकार घडतात. आणि आमच्या मराठवाड्याची एक स्पेशल भानामती आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील बायकांच्या अंगात येते आणि बायका घुमायला लागतात. अंगावरच्या कपड्यांचे भान नसते. मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात आंध्र, कर्नाटकाच्या सीमा भागात म्हणजे लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक आहे.
समज असा आहे की, भानामती करणारा कोणी तरी असतो, तो बंगालला जाऊन आलेला असतो, तो काळी विद्या, बंगाली विद्या शिकून आलेला असतो. तो गावात आल्यानंतर सोमवती आमावस्येच्या रात्री 12 च्या नंतर नग्नावस्थेत स्मशानात जातो, हाताच्या पायाच्या हाडाचे तुकडे घेतो, डोक्याची कवटी घेतो. त्याच्याकडे काळ्या-पांढर्या बाहुल्या असतात, सुई, दाभण, बिब्बे, लिंबू, हिरवा, लाल कपडा, काळा कपडा असतो आणि मग तो आपल्या गावातील सुंदर मुली कोण आहेत? सुंदर बायका कोण आहेत? आपल्या गावात नवीन लग्न होऊन नांदायला आलेल्या मुली कोण आहेत? त्यांच्या साडीचा, बांगडीचा तुकडा, डोक्याचे केस, पायाखालची माती तो स्वत: किंवा इतरांच्या माध्यमातून मिळवतो. कुठेतरी झोपडीत डाव मांडतो, आणि हे मिळवलेले साहित्य त्याच्याकडे असलेल्या बाहुल्यांना लावतो व त्यावर आपली विद्या चालू करतो. आणि मग तो त्या बाहुलीला जसे करेल तसे तसे ज्या बाईच्या नावे केले जाते. ती बाई आटोळे-पिटोळे देऊन तिच्या घरात गडबडा लोळायला लागते. जर ही बाहुली त्यांनी देवळीत ठेवली तर ज्या बाईच्या नावे केले जाते ती बाई देवळीत बसते. बाहुली झाडाच्या फांदीवर ठेवली तर ज्या बाईच्या नावाने केले ती बाई सरसर झाडावर चढते आणि एकदम छोट्याशा फांदीवर बसते, “मी पाहिले” असेही लोक म्हणतात.
अशा बायकांना जाणत्याकडे(बुवा-बाबा-मांत्रिका)कडे दाखवले जाते. जाणता म्हणतो, “तिला कोणीतरी जब्बर करणी-भानामती केली आहे, तिला ज्यांनी भानामती केली त्याचे नाव तिच्या तोंडून सांगतो.” असे म्हणून तिच्या नाकात, डोळ्यात लिंबू पिळला जातो, तिला छडीने मारायला लागतो. (वेगवेगळ्या बाबाचे वेगवेगळे प्रकार असतात) समज असा आहे की, तिला मांत्रिक मारायला लागला तर तो मार त्या बाईस लागत नसून, तो तिला ज्यांनी भानामती केली त्याला लागतो.” त्यामुळे ती नाव सांगते. आता वास्तवात मार बाईलाच लागतो, बाबाचे बोल तिने ऐकलेले असले की, आता कोणाचे तरी नाव घेतल्याशिवाय आपली सुटका नाही. असे तिला वाटते त्यामुळे ती नाव घेते. नाव सरपंच, पोलीस पाटील, मामलेदार गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचे घेतले जात नाही तर गावातील कोणी अल्पसंख्यांक दलित, आदिवासी, कोळी, माळी, साळी, चांभार, कुंभार, स्वामी, महिला अथवा ज्यांच्या घराशी आपलं भांडण आहे त्या घरातील व्यक्तीचे नाव घेतले जाते. मग नाव फुटलं, नाव फुटलं म्हणतात. ज्याच्या घरात भानामती होते त्या घरातील लोक काठ्या-कुर्हाडी घेऊन ज्याचं नाव घेतले, त्याच्या घरावर चालून जातात. त्याच्या घरावर सामुहिक हल्ला करतात, त्या व्यक्तीचे हात, पाय तोडतात, घर गावाबाहेर काढतात. त्याला जगणं कठीण होतं. सारं गाव एकीकडे व ज्यांचं नाव घेतलं जाते तो एकीकडे होतो. किंबहुना खून केला जातो. यामुळे असे अनेक कुटुंब, संसार उद्धवस्त झालेले आहेत, होत आहेत. आर्थिक लूट होते, घरावर दारिद्य्राचे थैमान माजते. बुवा-बाबाकडून अशा कुटुंबाचे आर्थिक, मानसिक प्रसंगी स्त्रीचे लैंगिक शोषण होते.
याबाबत संदर्भ काय आहेत? : आदिम अवस्थेत मानवला पाऊस का पडतो, विजा का कडाडतात किंवा ज्या काही क्रिया समोर घडतात त्याचे कारण त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे ज्या घटनामुळे मानवाच्या जीविताला धोका आहे, भीतीग्रस्त वातावरणात त्यांनी त्यात ‘यातू’ असे नाव दिले. मानवी जीवन सुकर करणार्या क्रियांना शुक्लयातू तर मानवी जीवनास इजा पोहचवणार्या क्रियांना कृष्णयातू मानले जाऊ लागले. यातू शब्दाच्या अपभ्रंशातून जादू हा शब्द आला, (जादू म्हणजे, “अनाकलनीय घटना घडवून आणणे”) यालाच पुढे करणी भानामती हा शब्द रूढ झाला. एकीकडे असेही म्हटले जाते की, “बहाणा करून लोकांची मती गुंग करणे म्हणजे भानामती व भानामती म्हणजे अतिशयोक्ती करून सांगणं.” काहीजण असे म्हणतात, “भानामती म्हणजे एक खरे खुरे बिन प्रेक्षकांचं नाटक असतं असंही म्हटलं जातं, हे काही प्रमाणात खरं असलं तरी त्या महिलेला दोष देऊन चालत नाही तिला तसं का करावं लागलं या कारणाचा शोध घ्यावा लागेल आणि त्या कारणाचे निराकरण करावे लागेल. स्वत: अशा घटना ऐकून त्याला आपलं काही जोडून इतरापर्यंत पोहोचविण्याचा प्रकार रूढ आहे. त्यापेक्षा त्या घटनेचा शोध घेणे गरजेचे असते. ‘शोधा म्हणजे सापडेल!’ याप्रमाणे भानामती घटनाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर ज्या घरामध्ये भानामती होते त्या घरातच त्याची उत्तरे कारणे दडलेली आढळतात.
भानामतीची कारण मिमांसा
ज्या घरात भानामती होते त्या घरातील वातावरणच त्याला जबाबदार असते. वस्तुस्थिती अशी असते की, वैफल्यग्रस्त, तिरस्कृत, अपयशी व्यक्ती बहुधा भानामतीच्या मागे असते. हे वैफल्य अपयश पचवण्याची त्या व्यक्तिमत्वाची कुवत नसते. हे अपयश प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीच्या चुकीमुळे आलेले असते, असेही नाही, त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण किती त्रासात आहोत, हे दाखवून लोकांची सहानुभूती मिळावी. ही भावना स्वाभाविक असली तरी मिळवण्याचा हा मार्ग विकृत आहे. अशा व्यक्ती बहुधा मानसिकदृष्ट्या माल अॅडजेस्टेड किंवा विकृत(अॅबनॉर्मल) असल्याने त्या-त्या स्वरूपाचा मार्ग चोखाळतात. आपल्याकडे भानामती विशेषत: कोणास होते स्त्रियांना की पुरूषांना? उत्तर येते स्त्रियांना भानामती होते! आमचं म्हणणं आहे की, बाईला भानामती होऊ नये, कारण बायका नित्यनियमाने देव देवतांची पूजा करतात, नवस करतात, ते फेडतात, व्रतवैकल्ये करतात, त्याचे उद्यापन करतात, एवढं करूनही, बायकांनाच भानामती का व्हावी? याउलट पुरूष मंडळी यापैकी काहीच करत नाहीत म्हणून पुरूषांना भानामती व्हायला पाहिजे पण बायकांनाच भानामती होते याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर बाईला घरात कुठलं स्थान असतं? उत्तर येते दुय्यम! आमचे म्हणणे असे की, “दुय्यम असले तरी बरे परंतु वस्तुस्थिती अशी की, बहुतांश ठिकाणी पायातील पायतनांना किंमत असते पण घरात बाईला किंमत नसते. ज्या-ज्या ठिकाणी असं असते, तिथे तिथे भानामती होते.” एवढेच नव्हे तर भानामती घडविण्यामागे सकृतदर्शनी पुढील काही कारणे असतात. घरात नवरा, सासू, सासरे, नणंद, भावजय यांचा होणारा त्रास, नवरा पसंत नसला, नवरा व्यसनी असला, नवरा बाहेरख्याली असला तर, घरातून वेगळे व्हावयाचे असले तर, कामजीवन भावनेची पूर्तता होत नसेल तर, किंवा भानामती ग्रस्त महिलेचे इतरांशी संबंध असतील तर, घरात कामाचा बोजा त्या व्यक्तीवर वाढला तर, शहरी वातावरणातील मुलगी ग्रामीण भागात दिली आणि घरातील वातावरण मनमोकळे नसेल तर, घरात तिला दिलेले दुय्यमस्थान, तिच्या भावना, मन समजून घेतले नाही तर, तिच्या इच्छेच्या विरूद्धच होत असेल तर आशा-आकांक्षाची पूर्तता होत नसेल तर, तिच्या मनास लागेल असे कोणी बोलले तर, अपवादात्मक वेळी कुठलेही कारण नसतानाही हा प्रकार होण्याची शक्यता असते. वरील पैकी कोणतेही जाचक कारणांची पुनरावृत्ती होऊ लागली की, ती महिला हाताने कपाळावरचं कुंकू पसरवते, केस मोकळे सोडते आणि दोन्ही हात हातात घट्ट पकडून घुमायला लागते. ती नुसतं घुमत नाही तर कोणत्यातरी देवाचे किंवा देवीचे नाव घेते. मग घडते काय? तिला घरात त्रास देणारी सासू घरात जाते, हळदी कुंकवाचा करंडा घेते, तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावते तिच्या पाया पडते, तिचा मुलगा घरी असेल तर त्याची आई त्याला म्हणते भाड्या जरा तिच्या पाया पड! मग नवरा पाया पडतो, सासू, सासरे घरातील सर्वजण पाया पडतात. मग तिला वाटते की, “हा मार्ग जरा चांगला आहे” कारण होणारा त्रास कमी झाला आणि सर्वजण पाया पडू लागले म्हणजेच प्रतिष्ठा मिळू लागली आणि संस्काराने असे सांगितले जाते की, “अमावास्या-पौर्णिमेला अंगात येते. त्यामुळे अमावास्या-पौर्णिमेला अंगात येण्याचे प्रकार जास्त आढळतात. वास्तविक अमावास्या व पौर्णिमेला अंगात येण्याचा काहीही संबंध नाही. हे अंनिस सिद्ध करून दाखवते. अमावास्या पौर्णिमेला ज्या व्यक्तीच्या अंगात येते वा भानामती होते अशा व्यक्तीला काही दिवसांसाठी शहरात ठेवावे. घरात अमावास्या व पौर्णिमा कोणत्या दिवशी आहे याची त्यांचेसमोर चर्चाच होऊ नये त्यामुळे अमावास्या पौर्णिमा कोणत्या दिवशी हे माहीत नसेल तर अंगात येणार नाही वा भानामती होणार नाही. अंगात येणे संस्कृती बंधीत आजार आहे किंवा सौम्य मानसिक आजार आहे. काही वेळा तो ढोंगाचा प्रकार असतो. एकूणच भानामती म्हणजे तिच्या मनातील सुप्त भावनांचा उद्रेक(हुंकार) असतो. जसे धरण फुटू नये म्हणून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी धरणाला सांडवा असतो तद्वतच स्त्रियांच्या मनातील भावनांचा या मार्गाने निचरा होतो. दैनंदिन जीवनापेक्षा ती व्यक्ती वेगळे वर्तन करते, वागण्यात बोलण्यात बदल दिसतो त्याला आपण भानामती म्हणतो.
भानामतीबाबत अंनिसने काढलेले निष्कर्ष
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निष्कर्षानुसार करणी, भानामती, भूत या जगात अस्तित्वात नाही. करणी, भानामती कोणी करूच शकत नाही जर कोणी अशी करणी, भानामती करण्याचा दावा करीत असेल त्याला समितीचे रू.21 लाखाचे जाहीर आव्हान आहे. त्यांनी समितीच्या महिला किंवा पुरूष कार्यकर्त्यांवर भानामती करून दाखवावी. भानामती सिद्ध झाली तर भानामती करून घेऊन त्यास 21 लाखांचे बक्षिस दिले जाईल आणि अशा भानामती करणार्या बाबांना पाकिस्तानच्या बॉर्डरवर बसवले जाईल. घुसखोर आले की, त्यांनी भानामती करून देशाचे संरक्षण करावे वा अतिरेकी समुद्रमार्गाने आले आणि रेल्वेस्थान, हॉटेल, दवाखाने अशा सार्वजनिक स्थळी अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला अशा सर्व सार्वजनिक स्थळी अशा भानामती करणार्यास बसवू, त्यांना मुबलक वेतन देऊ. अशा भानामती करणार्यांनी अतिरेकी अमानवी कार्य करणार्यांना भानामती करावी. परंतु आजपर्यंत हे आव्हान अद्याप कोणीही स्वीकारले नाही. असे काही होऊ शकत नाही आणि डोक्यातील भानामती जात नाही ही समाजाची दुटप्पी भूमिका घातक आहे.
ज्यास आपण भानामती म्हणतो त्यावर अंनिसने अभ्यासांती तीन निष्कर्ष काढले आहेत.
1) ढोंगाची भानामती : घरावर दगड पडणे, कपडे जळणे, फाटणे, अंगावर बिब्याच्या फुल्या पडणे, डोळ्यातून, तोंडातून, कानातून खडे बाहेर पडणे, संध्याकाळी जेवणात विष्ठा, शेण, राख कालवणे यासारखे प्रकार ढोंगाचे प्रकार आहेत.
2) सौम्य मानसिक आजार : प्रत्येक माणसाला मन असते इतर अवयवासारखे ते दाखवता येत नाही. मेंदू हे मनाचे कार्य करतो, बुद्धी, भावना, स्मरणशक्ती सारासार बुद्धीचा समावेश त्यात असतो. फ्राईंड या शास्त्रज्ञाने अलिकडच्या काळात त्यावर संशोधन करून ढोबळ मनाने मनाचे दोन भाग पाडले आहेत. (1) जागृत मन (2) सुप्त मन. दैनंदिन जीवनात सभोवतालच्या वातावरणातून निर्माण झालेला राग, भीती, द्वेष, घृणा, भावना व जागृत पातळीवर व्यक्त न करता येण्यासारखे ताण सुप्त मनात दडपले जातात हे ताण जागृत पातळीवर न येण्याचे अनेक कारणे असतात उदा.सासूबद्दलचा संताप, व्यसनी नवर्याबद्दलचा वैताग, आर्थिक विवंचना, नाराजी या सुप्त मनात साठवल्या जातात. एका विशिष्ट मर्यादेनंतर हे साठवून ठेवण्याची त्या व्यक्तीच्या मनाची क्षमता संपते व भानामती द्वारे ही दु:खे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ओरडणे, लोळणे, खिदळणे, घुमणे, भुंकणे, रडणे ही क्रिया ताण कमी करण्यासाठीअसते अशावेळी ती व्यक्ती दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे लक्ष वेधून घेणारे वर्तन करते. या प्रकाराला हिस्टोरिकल हायपर व्हेंटिलेशन(उन्मादवस्थेतून अति मन मोकळेपणा) म्हणतात आणि संस्कारामुळे अमावास्या/पौर्णिमेला हा प्रकार होतो असे म्हटल्यामुळे ते अमावास्या व पौर्णिमेला झाल्याचे आढळून येते. वास्तविक अमावास्या/पौर्णिमेचा यांचेशी काही संबंध नसतो. सूचनावर्तन स्वीकारल्यामुळे तसे घडले म्हणून मराठवाड्यातील भानामतीला संस्कृतीबंधीत आजार म्हणतात. नवरात्रात देवी बसवली जाते, रोषणाई होते. स्पिकरवरून देवीची गाणी ऐकू येतात, झांज वाजतात मग बाईच्या अंगात येते हे संस्कृतीने तिच्या मनावर लादलेले आहे.
(3) तिसरा प्रकार म्हणजे गंभीर मानसिक आजार हे सर्व प्रकार मराठवाड्यात अंनिसच्या लातूर, नांदेड, पूर्णा, औरंगाबाद शाखेसह महाराष्ट्रात हजारावरून अधिक प्रकरणे हाताळून दुरूस्त केले आहेत. त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार आज चांगले चालत आहेत. त्यांचे सर्व रेकॉर्ड आज समितीकडे उपलब्ध आहे. समिती प्रकरणे हाताळते म्हणजे काय करते? तर ज्या हाताने भानामती होते तो हात शोधते आणि ज्या कुटुंबामध्ये भानामती होते त्या घरातील गुंता काढते. उदा.दिपावळीस करदोरे आपण बाजारातून आणतो. आपण ज्या दुकानातून करदोरे आणले त्या दुकानात खूप करदोरे असतात पण तेथे गुंता होत नसतो तो अलगदपणे मागणीप्रमाणे करदोरे काढून देतो. पण आपण घरी आणलेल्या चार करदुर्यांचा एवढा गुंता होतो की तो निघता निघत नाही. अंनिसने भानामती शोधण्याचे एक तंत्र विकसित केले आहे. वैयक्तिक मुलाखती मधून तो गुंता काढला जातो. ज्या घरात भानामतींचा प्रकार घडतो त्या घरातील कुटुंब प्रमुखाकडून एक लेखी निवेदन समितीच्या नावाने घेतले जाते. त्यात आमच्या कुटुंबातील —— यांना असा असा प्रकार एवढ्या दिवसांपासून होतो. तो प्रकार अंनिसने तपासावा व आम्हाला मानसिक स्वास्थ्य द्यावे. यासाठी आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची मुलाखत घेण्यास आमची संमती आहे. यापुढे आम्ही त्या भानामतीग्रस्त व्यक्तीला कोणत्याही बुवा, बाबा, मांत्रिक यांचेकडे दाखवणार नाही व अंनिसने सांगितलेले उपाय आम्ही मान्य करू हा मजकूर त्या निवेदनात घेतो.
प्रत्यक्ष केस हाताळणे व घ्यावयाची काळजी
कार्यकर्ते घटनेशी संबंधित प्रश्नावली तयार करून प्रत्यक्ष कुटुंबियांच्या एकेकाची बंद खोलीत मुलाखती घेतात. मुलाखत घेताना एक दोन लेडीज कार्यकर्त्या सोबत असणे आवश्यक व एकाने विचारलेले प्रश्न व त्यांनी दिलेली उत्तरे याचे नीटपणे टिपण करणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीला भानामती होते त्यांची शेवटी मुलाखत घ्यावयाची असते. भानामतीग्रस्त व्यक्तीला विश्वास द्यावा की, या मुलाखतीत जे जे आपण सांगाल ते फक्त उपस्थित कार्यकर्त्यातच राहणार आहे. कुटुंबियांना सांगितले जाणार नाही, न सांगण्यासारख्या काही गोष्टी असतील तरी त्या सांगणे आवश्यक. तुमचा प्रश्न निश्चित सुटेल. कारण आम्ही सांगितलेले उपाय कुटुंबप्रमुखांनी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे असे सांगून मुलाखतीस सुरवात करावी. मुलाखत संपल्यावर भानामतीग्रस्त व्यक्तीला भावी परिणामांची जाणीव करून द्यावी. वा तडजोड स्वीकारून आनंदाने जगण्याचा सल्ला द्यावा. तिच्या प्रश्नाबाबत कुटुंबप्रमुखांना तिचा संशय येणार नाही याप्रमाणे प्रश्न सांगावा, तो सोडवण्यासाठी सांगावे. भानामती केस हाताळताना पुढील गोष्टींची दक्षता पाळावी. 1) भानामती प्रकरण नीट तपासून कोणती व्यक्ती ते करत आहे याची खात्री करून घ्यावी. 2) संबंधित व्यक्तीस हे प्रकार न करण्याबद्दल योग्य त्या प्रकारे समज द्यावी. अनेकदा ही समज पुरते. 3) आवश्यक वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञाला तिला दाखवावे. त्यांच्यामार्फत तिचे मनोपृथ्थकरण करून त्या व्यक्तीला योग्य ती समज, सूचना देता येते. संमोहनाचा वापरही यासाठी करता येतो. 4) भानामतीचे प्रकार करणारी व्यक्ती कोण हे समजल्यानंतर या प्रकरणात त्रास सोसावा लागणारे जवळचे कुटुंबीय त्या व्यक्तीबद्दल रागाची, उपहासाची, छळवणुकीची भूमिका घेण्याची शक्यता असते. यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता निर्माण होते, त्यासाठी संबंधित व्यक्तीशी असे वागावे याबाबत मानसशास्त्रीयदृष्ट्या कुटुंबियांना सूचना देणे गरजेचे व उपयुक्त असते. 5) भानामतीचे प्रकार थांबविण्याचे आश्वासन देणारी व्यक्ती क्वचितप्रसंगी ते आश्वासन मोडून पुन्हा तेच वा अन्य प्रकार सुरू करण्याची शक्यताही घरच्यांना सांगून ठेवावी. 6)भानामतीचे प्रकार करणार्या व्यक्तीच्या नावाचा गाजावाचा वृत्तपत्रांतून झाल्यास त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे भानामतीचे प्रकार थांबवत असतानाच त्याची सनसनाटी प्रसिद्धी टाळणे योग्य ठरते. घरात समज दिली जाते. तेथील भानामती संपते. यास गरज आहे ती व्यापक प्रबोधनाची.
भानामती प्रबोधन धडक मोहिमा
महाराष्ट्र अंनिसने लातूर जिल्ह्यात 1 मे ते 7 मे 1997 या कालावधीत लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, चाकूर या पूर्वीच्या सात तालुक्यासाठी सात आणि जिल्ह्यासाठी एक अशा आठ गाड्या ठरवून जिल्ह्यातील भानामती प्रबोधन धडक मोहिमेचे नियोजन केले. त्यामध्ये जि.प.मुख्याधिकारी यांचे पत्र ज्या गावी मोहीम जाणार आहे त्या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात आले. त्यांच्याकडे कोणत्या दिवशी मोहीम येणार आहे त्यांनी काय पूर्वतयारी करावयाची आहे याबाबतची संपूर्ण कल्पना दिली. त्या सर्व गावामध्ये पूर्व तयारीसाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांची एक फेरी झाली. त्यानंतर दिनांक 1 मे 1997 रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते निळूभाऊ फुले यांच्या हस्ते व डॉ.जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन झाले. आणि त्याच दिवशी सर्व गाड्या आपापल्या तालुक्यामध्ये व नियोजित गावामध्ये भानामती प्रबोधनासाठी निघाल्या यात एक मानसोपचारतज्ज्ञ, एक भानामतीवर व्याख्यान देणारा व चमत्कार करणारा, दोन महिला कार्यकर्त्या आणि इतर तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. याचे नियोजन एवढ्या नेमकेपणाने केले होते की, कोणती गाडी कोणत्या तालुक्यात कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला कोणत्या गावात आहे. हे जिल्ह्याच्या ठिकाणी बसून सांगता येणे शक्य होते. दर दिवशी किमान 4-5 कार्यक्रम घेऊन 300 गावातून ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर भानामती उपचार शिबीर घेऊन या जिल्ह्यातील भानामतीला आळा घालण्यात मानसिक आजाराबद्दलची भीती दूर करून डॉक्टरपुढे जाऊन उपचार करून घेण्याची मानसिकता प्रबल करण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यात दिनांक 6 मे ते 14 मे 1999 अशीच मोहीम तीन तालुक्यातील 60 गावांमधून वरीलप्रमाणे नियोजन करून राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन दि. 6 मे 1999 रोजी नटराज रंगमच, परभणी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अमिताभ गुप्ता यांचे हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू चारूदत्त मायी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर व बुवाबाजी संपर्क विभागाचे राज्य सचिव माधव बावगे हे होते या मोहिमेत डॉ.मोहन मावलगे, माधव बावगे, प्रा.ओमप्रकाश मदनसुरे, प्रा.शिवदास हमंद, अशोक एंगडे, प्रा.सुनिल मोडक, रणजीत कारेगावकर, प्रसन्न भावसार यांनी सहभाग नोंदवला.
भानामतीवर उपचार करणार्या बुवा-बाबांचे अमाप पीक मराठवाड्यात आहे त्यापैकी अनेकांचा भांडाफोड समितीने केला आहे ते कबुली देतात, “की भानामती करण्याची कोणतीही विद्या, तंत्र, मंत्र अस्तित्वात नाही.” लोकांना आधार हवा असतो अज्ञानात आनंदी राहण्याची मानसिकता मानवी मनाची असते त्यांना मंत्र तंत्राचा, गंड्या-दोर्यांचा आधार देऊन त्यांचा प्रश्न सुटो वा ना सुटो बाबांचे पोट भरते त्याच्या पोटाचा प्रश्न सुटतो व लोक सूचना वर्तन पाळतात, त्यामुळे काहींना बरं वाटल्यासारखे वाटते. यासाठी अंनिसचे मला बरे का वाटते? डोकं कसं चालतं, मनोमनी डोकावताना, श्रद्धा अंधश्रद्धा, भानामतीचा भुलभुलैय्या, भ्रम आणि निरास पुस्तके वाचावीत. केवळ भानामती झालेल्या व्यक्ती व नातेवाईकांचे समुपदेशनाच्याद्वारे समाधान करून त्यास परिणामाची जाणीव करून द्यावी लागते. प्रसंगी डॉ.मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेण्याचे सुचवावे.
समाज व शासनाकडून अपेक्षा
भानामतीबाबत सुशिक्षित, अधिकारी व सामाजिकदृष्ट्या मान्यता प्राप्त व्यक्तीचा भानामतीवर असलेला विश्वास ही एक चिंताजनक बाब आहे. सुशिक्षितांची अंधश्रद्धा ही अशिक्षितांपेक्षा अधिक घातक असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी, शिक्षक, सरकारी नोकर, आरोग्य, गृह, शिक्षण या शासनाच्या विभागातून त्याचे प्रबोधन करण्यासाठी शासनाने अनुकूलता प्राप्त करून दिली तर अंनिस ही प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. या बाबत जनतेने वास्तवाचे भान स्वीकारण्याचे भान ठेवले तर यावर आळा बसू शकतो. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थने मानसिक आजारावरील उपचारासाठी कम्युनिटी सायकीअॅट्री नावाचा एक प्रकल्प राबवला होता. तेव्हा शासनाने एका भानामती कमिशनची स्थापना करून याबाबत सार्थ सहकार्य केले आणि जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला तर मराठवाड्यातील भानामती हद्दपार करण्याचा संकल्प समिती करते आहे.
– माधव बावगे