सध्या महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या अंत:करणाला भिडणारे प्रबोधन करण्याचे कार्य करणार्या कीर्तनकारांमध्ये सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज अगदी आघाडीवर आहेत. सुस्पष्ट भूमिका, प्रभावशैली व सामाजिक बांधिलकी अशा विविध गुणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात ते लोकांची मने विधायक दिशेने वळविण्याचे काम अखंडपणे करीत आहेत. सात खंजिरी वाजविणारे कीर्तनकार म्हणून असलेल्या त्यांच्या प्रारंभीच्या प्रतिमेला आता अनेक नवी परिमाणे प्राप्त झाली आहेत. त्यांच्या कीर्तनाला खेड्यापाड्यातील लोक एखाद्या जत्रेला जावे त्याप्रमाणे अगदी बैलगाड्या जुंपूनही येत असतात. त्यांचे कीर्तन इतर परंपरागत कीर्तनकारांपेक्षा वेगळ्या धाटणीचे असते. आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करत असतानाच ते परिवर्तनाचा संदेशही देत असतात. त्यांनी आपली अभिव्यक्तीची एक खास शैली स्वानुभवाने विकसित केली आहे. त्यांच्या शैलीला प्रांजळ निवेदन, आवाहन यांच्याबरोबरच उपहास, उपरोध, वक्रोक्ती इत्यादींचा कौशल्यपूर्ण वापर ते प्रबोधनासाठी करतात. तथापि, त्यांच्या प्रबोधनामध्ये कुत्सितपणाचा लवलेशही नसतो. भुकेचा प्रश्न, जातीयवाद, ग्रामआरोग्य, भ्रष्टाचार, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा पुनर्विवाह, शेतकर्यांची दु:खे अशा अनेक प्रश्नांवर उपायही ते सांगत असतात. व्यसनांविषयी बोलताना देखील दारू, गुटखा यामुळे होणार्या हानीचे वर्णन करून व्यसने माणसाला कंगाल बनवतात, असा संदेश ते सर्वसामान्य जनतेला देतात, विज्ञानावर विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ते सातत्याने सांगतात. पक्ष, पंथ सारे विसरून आणि सर्व मिळून ग्राम सुधारा, या त्यांच्या संदेशातून त्यांची तळमळ दिसून येते.
अंधश्रद्धेविरुद्ध बोलताना ते रोखठोक शब्दात विचारतात, एखादा बुवा हवेतून अंगठी काढतो, तर शेतकर्यांसाठी ट्रॅक्टर का काढत नाही? चक्रधर स्वामी, संत रविदास, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च–नीच भावनेचे उच्चाटन केले, हा खरा चमत्कार होय, असे ते निक्षून सांगतात.
विविध संतांची उदाहरणे देताना श्रमाचे, कष्टाचे महत्त्व ते वारंवार सांगतात. नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून ते आधुनिक काळामधील गाडगेबाबा व तुकडोजी महाराज अशा विविध संतांची वचने ते पुन्हा–पुन्हा उधृत करतात आणि त्या वचनांच्या आधारे समतेची आणि न्यायाची मूल्ये लोकांच्या मनावर बिंबवतात. संतांप्रमाणेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या मानवांचा प्रेरक वारसाही ते लोकांसमोर मांडतात. अण्णा भाऊ साठे, वामनदादा कर्डक यांसारख्या साहित्यिक–कलावंतांचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. अशा संत गाडगेबाबांचे खरे मानसपुत्र असणारे, तुकडोजी महाराजांचे सच्चे प्रबोधनकार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांची मुक्त पत्रकार, लेखक नरेंद्र लांजेवार यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
– संपादक
प्रश्न : महाराज, तुमचे बालपण कसे गेले? तुमच्यावर आईचा जो प्रभाव आहे, तो कसा?
सत्यपाल महाराज : माझ्या वडिलांचे जन्मगाव बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे. माझे वडील विश्वनाथ किसन चिंचोळकर. माझी आई जळगाव जामोद तालुक्यातील सावरगावची. लक्ष्मणराव बोदडे यांची लेक सुशीलाबाई. आईला तीन बहिणी व एक भाऊ होता. आई लहान असतानाच तिचे आई-वडील वारले व वडील लहान होते तेव्हाच त्यांचे आई-वडील वारले. आईचं बालपण मामांच्या घरी गेलं. आमच्या दोन्ही घरची परिस्थिती ‘कमवा आणि खा,’ अशी होती. अकोट तालुक्यातील सिरसोली येथे माझ्या आईची मोठी बहीण राहायची. आमची परिस्थिती गरीब असल्याने तिने आईला मजुरी करण्यासाठी सिरसोलीला बोलावून घेतले. आम्ही तिथे गेलो तर स्वत:चे घर नाही, जवळ पैसा नाही, अठराविश्वे दारिद्य्र. शिंपी असल्याने वडील सिरसोली या गावात लोकांचे कपडे शिवू लागले, तर आई घरची व लोकांच्या शेतातील कामे करू लागली. माझा जन्म सिरसोलीचा. माझ्या आईला आठ मुलं-बाळं झाली. त्यातील पाच मरण पावली. ती शिकलेली नसतानाही खूप विचारी व चौकस बुद्धीची होती. आम्ही तीन भावंडं. मोठा भाऊ उकर्डा, मधला मी सत्यपाल आणि लहान बहीण वनमाला. बालपणापासूनच तिने आम्हाला कामाला लावलं. ती म्हणायची, ‘आम्ही दोघांनी कामं केली तर आपलं घर चालणार, तुम्ही पोरांनी साथ दिली तर आपल्या दारिद्य्रातून बाहेर येऊ.’ मग आम्हाला तिने गावामध्ये भजी-वडे, चहाचे हॉटेल सुरू करायला प्रोत्साहन दिले. गावात काही कार्यक्रम असला की, ती आम्हाला दवंडी द्यायला लावायची. त्यातून मग चार पैसे मिळकत होत असे. मी शाळेत जाण्याअगोदर व शाळेतून घरी आलो की, मला ती मोठ्या भावाला मदत करायला लावायची. गावात बाजाराचा दिवस असला की, आम्ही भावंडं बाजारात कोणताही उद्योग करत असू. त्यामध्ये भाजीपाला विकणे, हॉटेल चालविणे, चहा विकणे, गळ्यात पानठेला घालून चालविणे, आईसकांड्या विकणे, सकाळी उठून डबलरोटी-टोस्ट विकणे, उन्हाळ्यामध्ये आईसकांड्या-बर्फाची शीतपेये विकणे असे काम करत असू. आईने आम्हाला डोक्याच्या मालीशपासून जोड्याच्या पॉलीशपर्यंत कोणतेही काम करायला लाज बाळगू दिली नाही. त्यामुळेच आम्ही आजही न लाजता कोणतेही काम करतो. गेल्या काही वर्षांपर्यंत अकोटच्या बाजारात मी स्वत: कटलरीचे दुकान लावत होतो. काम करायची लाज बाळगली नाही. आमच्या आईने आम्हाला कष्टाने व काटकसरीने जगण्याची कला शिकवली. तीच खर्या अर्थाने माझी गुरू. शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती मला प्रोत्साहन देत होती. पण शाळेत बक्षिसे मात्र श्रीमंताच्याच मुलांना मिळायची. आमच्या गावातील एका शेतमालकाने मला, माझ्या आईला व बहिणीला मजुरीवरून हाकलून लावलं होतं. पुढे तेच शेत मी माझ्या मायसाठी विकत घेतलं, तेव्हा माझ्या मायला खूप आनंद झाला होता. माझ्या मायने माझा चुलतभाऊ, माझे पुतणे या सगळ्यांना लेकरासारखे जपले. तिच्या चारही सुनांना मायची माया लावली. माझी पत्नी सुनंदाताई 4 जून 2015 ला मरण पावली. तिचा देहदान केला. त्यातून आईने प्रेरणा घेतली व तिने देहदानाचा संकल्प केला. माझ्या वडिलांचा देहदानाचा संकल्प होता. त्यांचे 3 डिसेंबर 2016 ला निधन झाले. वैद्यकीय अडचणींमुळे त्यांचे देहदान न करता फक्त नेत्रदानच करता आले. आता माझी आई अंथरुणाला टेकली आहे. ती आजारी असते. अशावेळी आईला आंघोळ घालणे, तिचे लुगडे धुणे, तिला खाऊ घालणे आदी प्रकारची कामे करून तिची अधिकाधिक सेवा वेळ मिळेल तशी मी करीत असतो. माझ्या आईच्या नावाने सिरसोली या गावी माय सुशीला महाद्वार मी बांधलं आहे. आईच्या नावाची रुग्णवाहिका सुरू केली आहे. आतापर्यंत वीस हजारांपेक्षा जास्त गरजू रुग्णांना तिचा लाभ झाला आहे. सिरसोली गावातच एक भव्य प्रार्थनागृह उभारण्याचे काम सुरू आहे.
महाराज, तुम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम केव्हापासून सुरू केले?
मी चौथीमध्ये होतो. तेव्हा शाळेच्या नाटकात स्त्रीचा रोल केला. मी साडी घालून नाचत होतो, गाणं म्हणत होतो, ते लोकायले लय आवडायचं. लोक ‘वन्स मोर’ म्हणत… मी लोकगीत गायचो… लोकायले ते आवडे, कापूस वेचणार्या बाया मले गाणं म्हणायलं सांगत… मी मायसंगं कापूस वेचायलं, निंदायला जायचो. महा गाणं ऐकून लोकायलं बरं वाटे. ते चार आणे, आठ आणे देत. मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून शाळेत भाषण देत होतो, गाणं म्हणत होतो. आजूबाजूच्या झेडपीच्या शाळेत मला कार्यक्रमाला बोलवत. मास्तरलोक माझं कौतुक करत. मला प्रोत्साहन देत. त्याह्यचे लय उपकार आहेत. लय लोकांनी मला शाबासकी दिली. जनता जनार्दनाचं बालपणी मला खूप प्रेम भेटलं. पुढं मी नाटकात कामं केली, हजारो भजनं पाठ केली. नंतर खंजिरी वाजवायला शिकलो.
मी बालपणी भजनात जाऊन बसायचो. कोणी वाद्य वाजवू देत नसे. मग मी घरीच मातीच्या घागरीला कागद लावून वाजवून बघत असे. लय घागरी फुटल्या. मी स्मशानातून घागरी घरी आणायचो. त्यावर कागद लावून त्या वाजवून बघायचो. माझं घागरी वाजवण्याचं प्रेम बघून वडिलांनी मला एक खंजिरी आणून दिली. मंग मी ती उल्टी वाजवू लागलो… भजनं म्हणू लागलो… एक-दोन करता-करता एकाच वेळी सात-सात खंजिरी वाजवू लागलो. लोक कार्यक्रमाला बोलावू लागले. मी माझ्यातला कलाकार घडवत गेलो. घरच्या गरिबीमुळे खूप काबाडकष्ट करावे लागले. कसाबसा दहावी पास झालो. नंतर फुले, आंबेडकर, शिवाजी, तुकडोजी, गाडगेबाबा लय वाचले आणि सत्य काय ते समजले… पुढे आयुष्यभर गवसलेलं हेच सत्य माझ्या कीर्तनातून मांडत आलो. बावन्न वर्षांपासून लोक प्रबोधनाचं काम सुरू आहे. आज माझं वय 63 वर्षांचं आहे.
तुमच्यावर कोणाकोणाचा विशेष प्रभाव आहे?
मला माझ्या मायनं घडवलं. तसेच तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीते’ने घडविले. मी तुकडोजी महाराजांचे खूप साहित्य वाचले. ‘ग्रामगीता’ पाठ केली. भजनं पाठ केली. शाहू, फुले, आंबेडकर, शिवाजी, गाडगे महाराजांचा खरा विचार समजून घेतला. या महामानवांचे माझ्यावरच नाही, तर सगळ्या समाजावर लय उपकार आहेत. मी यांच्या शिकवणीतून शिकत गेलो… मी कोणालाच माझ्या पाया पडू देत नाही… माझी व्यक्तिपूजा करू नका, मला बुवा म्हणू नका, मला महाराज म्हणू नका, मी राम-रहीम किंवा आसारामसारखा मठाधिपती नाही, मी कोणाला गंडा बांधत नाही, कोणाला शिष्य करत नाही, कोणाचे कान फुंकत नाही. माझी ओळख जसा आहे तशीच राहावी, असेच मला वाटते. मी माझी वेषभूषा, केशभूषा बाबा महाराजांसारखी ठेवत नाही. मी अजूनही चिंधी बाजारातूनच माझ्यासाठी कपडे घेतो. भंगार वस्तूंवर माझं लय प्रेम आहे… कमी गरजा, कमी पैसा यातच लय समाधान आहे… मी जसा जगतो, वागतो तेच नंतर कीर्तनातून समाजाला सांगतो. ग्रामीण-शहरी समाजात आज खूप वाईट दिवस आहेत… एकाच मायचे दोन मुलं… एक देशासाठी मरतो, दुसरा देशीसाठी मरतो.. म्हणून जीव तुटतो…
आज अनेक बाबा–बुवा कीर्तनकार–प्रवचनकार जातीय–धार्मिक विद्वेषाची भावना वृद्धिंगत करतानाच मोठ्या प्रमाणावर दिसतात. काहीजण अशा प्रबोधनासाठी लाखो रुपयांची सुपारी घेतात… हे कितपत योग्य आहे?
समाजातील माणसं धार्मिक झाली तर योग्यच आहे. कारण सर्वच धर्म हे शाश्वत मानवी मूल्यांचा पुरस्कार करतात. माणुसकीवरच ते तरले आहेत. परंतु धर्माच्या आडून कट्टर धर्मांधता पसरविणे घातक आहे. जसे डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणत, “आमचा देवा-धर्माला विरोध नाही, देवा-धर्माच्या नावावर करण्यात येणार्या फसवणुकीला आहे.” समाजाला सात्विक धर्म हवा… कट्टरता नको. जसे सर्वच धंद्यात लुटारू घुसले, तसेच आज प्रबोधनाच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या क्षेत्रातही लुटारू लोक जास्त झालेत.. समाजाला उलटी दिशा देण्याचे काम हे राम-रहीमवाले करीत आहेत. या लुच्च्या लोकांना ऐषोआराम लागते, कोटी-कोटी रुपयांच्या गाड्या, आलिशान ए.सी.मठ, आश्रम, त्यांच्या देशोदेशीच्या शाखा आणि गोप-गोपिका… खरा भागवत धर्म, वारकरी पंथ असं करायला नाही शिकवत… पण ‘दुनिया झुकती है… झुकानेवाला चाहिए…’ लोकच हरामखोरांच्या पायावर डोकं ठेवतात, त्यायले नोटांचे बंडल देतात…पण गाडगेबाबा सांगत ते आचरणात आणत नाहीत. गाडगेबाबा नेहमी म्हणत, ‘भुकेल्याले अन्न द्या… तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, गरीब मुला-मुलींना शिक्षण, अंध-पंगू रोग्यांना औषध, बेकारांना रोजगार, पशु-पक्ष्यांना अभय, दु:खी व निराशांना हिंमत द्यावयास हवी… दान सुद्धा सत्पात्री करायले पाहिजे…’ तुकडोजी महाराज म्हणतात…
नाहीतर पैसा म्हणजे जहर,
शांती न लाभू दे क्षणभर…
मानवास बनविते वानर..
चंचल चित्त करोनिया…
संत तुकाराम महाराज म्हणतात- ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ – हरामाचं धन गोळा झालं की घर बिघडते.
मी मंदिराच्या, मठांच्या विरोधात बोलतो, कायले लागते देवासाठी पंचतारांकित मंदिर? मी तर अशी मागणी केली आहे की, देशातील प्रत्येक मंदिरात तरुणांसाठी व्यायामशाळा आणि वाचनालय सुरू करा… देव-देव करीत बसण्यापेक्षा तरुण पोरायले स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय उभारून द्या… मंदिरात पैसा दान करण्यापेक्षा गोरगरीब गरजवंतांना द्या… गावातील एका तरी माणसाले रोजगार उभा करून द्या… पैसे दान करण्यापेक्षा अवयव दान करा, रक्तदान करा – असं प्रबोधन मी करतो.
काही प्रवचनकार, कीर्तनकार एक-दोन लाख रुपये घेऊन ज्या जातीत आपण जन्मलो, त्यासाठी माती खा – असं सांगतात. मी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतो.. मी माणुसकीवर प्रेम करतो… ते एका विशिष्ट विचारांवरच अफूसारखी समाजाची मती गुंग करतात… मी गाडगेबाबांचा सैनिक आहे, म्हणून जे सत्य आहे तेच सांगतो.

महाराज, तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेमात कसे पडला? तुकडोजींचे वेगळेपण काय?
तुकडोजी बाबांनी भजनाच्या माध्यमातून सिनेमा चालीचे आवरण देऊन जनमानसाच्या तोंडी करून टाकले. लोक सहज बोलतात, ‘कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो’, जर तुम्ही बिडी पिता, तंबाखू खाता, दारू, मटण, गुटखा, खर्चा खाता मग कशाला पंढरी जाता? आई-बापाला वागवीत नाहीत. वृद्धाश्रमात टाकता; मग कशाला काशी, पंढरी जातो रे बाबा। संत म्हणे सत्य आचरणावाचुनी कोणीच ना मुक्त होतो। खंजिरीच्या आवाजावर लाखो लोक चार-चार तास कीर्तनात रंगून जायचे आणि पुढल्या वर्षीपर्यंत तुकडोजी बाबांच्या कीर्तनाची वाट पाहायचे. त्यांचे भजन म्हणजे एक नवीन आविष्कार, जसे चार चाकीचे जुन्या गाडीचे इंजिन 1 लिटरला 10 किलोमीटरचे अॅव्हरेज देत होते. आता डीआय मॉडेल 15 चा देते. त्यापेक्षाही अलिकडे टर्बोइंजिन निघाले, 20 चा अॅव्हरेज देते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन म्हणजे टर्बोइंजिनचे काम करीत आहे.
‘तारील पंढरीराव कसा तारील पंढरीराव।
मायबापाला लाथा मारी गेल्यावरी करी काव–काव,
कसा मज तारील पंढरीराव।
शक्ती हरल्या थर–थर कापे। उगाच म्हणे देवा पाव।
साध्या भाषेमधून माझ्या शेतकरी, मजूर, गावकरी, वारकरी, पुढारी, अधिकारी सर्वांना भजनातून तुकडोजींनी सावधान केले आणि चंद्रभागेतीरी ‘ग्रामगीता’ लिहिली. जग सुखी कसे होईल, दु:खाचा नाश कसा होईल, याचा मार्ग ‘ग्रामगीते’मध्ये दिला.
‘तुझं गावचं नाही का तीर्थ।
कशाला रिकामा फिरतं। गाव हा विश्वाचा नकाशा।
गावावरून देशाची परीक्षा।
गावची भंगता अवदशा येईल देशा।
म्हणुनी आपल्या गावाची सेवा करा।
डोळे मिटुनी घेण्यापेक्षा, रस्त्याचे काटे उचला. वाटेवरी काटे वेचीत चाललो। वाटले जसा फुलाफुलात चाललो।’
राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी हजारो अभंग तयार केले आणि भंगलेल्या माणसांना जिवंत केले आणि शेवटी पांडुरंगाच्या पायाजवळ खंजिरी ठेवली की, पांडुरंगा आयुष्यभर वारी केली.
जातो माघारी पंढरीनाथा।
तुझे दर्शन झाले आता।
आपला देह ठेवण्याअगोदर एक भजन लिहिले, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला। विठ्ठल आले मज नेण्याला।
गुरूदेवाची आज्ञा झाली। आज्ञेस्तव मी घाई केली।
दु:ख कशाला मुक्त क्षणाला देह आसक्ती नसे जिवाला।
जीर्ण शरीर या त्यागिता। रम्य रूप मजला॥’
बालपणी भजनात पाठ केलेले अभंग पुढे आयुष्यभर मी तसा जगलो-म्हणून मी अधिकारवाणीत तुकडोजींचे बोल लोकांना सुनवतो…
देशात साधू–बुवांचा सुळसुळाट आहे. तुम्ही नेहमी कीर्तनातून त्यावर कशाप्रकारे भाष्य करता?
भोंदूबांना तुकडोजी आणि तुकाराम यांनी अभंगातून उघडं केलंय.
अंगी नाही ज्ञान
म्हणे साधू मला मान
साधू नावाने साधू होत नाही रे
साधू हॉटेलचा चहापाणी नाही रे
तुकडोजी महाराज म्हणतात, मायबाप हो, साधू होणं महाकठीण आहे. त्यासाठी त्यांनी अभंगच लिहिला-
कठीण आहे साधूपणा
यात कोणीच टिकेना
विरळे चालतीया वाटे
सावलीत काटे–कुटे
तुकड्या म्हणे आधी मरा
तरीच साधूवेश धरा
आता आजची परिस्थिती पाहाली तं काय दिसते? टीव्हीवर आपण रंगेल बाबांच्या बातम्या पाहूनच राह्यलो ना आज-काल! मंग यावर तुकाराम महाराज मोठं गोड लिहितात…
ऐसे कैसे झाले भोंदू
कर्म करोनी म्हणती साधू
अंगा लावूनिया राख
डोळे झाकूनिया करिती पाप
तुका म्हणे ऐसे संत
जीते घालावे मातीत
म्हणून मायबहिणीनं, या समाजानं या चमत्कारी बाबांच्या मागं न लागता, जे ज्ञान देतात त्यांची कास धरावी. जसे तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, तुकाराम महाराज यांनी जो विचार दिला, तो अंगीकारला पाहिजे. साधू म्हणजे माणसाले माणूस बनविण्याचा कारखाना हाये. तुकाराम महाराज-शिवाजी महाराज ही जोडी लक्षात घेतली पाहिजे. स्वामी विवेकानंदानं समाजाला विचार दिला, तो आपण विचारात घ्यावा. नाही तं आजकाल ‘चल संन्यासी मंदिर में’ अशी अवस्था दिसते. केवढी भयानक परिस्थिती? भोंदूबाबा लोकांनी आज देवा-धर्माचा नाश केला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात-
काळ पडला साधू झाला
कापड काढून केली झोळी
भिक्षा वाढा मायबाई
भिक्षा खाऊनी लठ्ठ झाला
मग ताटी उघडायाशी गेला
तुका म्हणे सांगो किती
जळो तयाचि संगती
तुकोबारायांच्याही पुढं सुंदर मुलगी आली होती. तुकोबानं त्या मुलीला सांगितलं. ‘पराचिये नारी रूख्माई समान… आम्ही विष्णुदास न हो तसै…’ पण, अलिकडच्या साधू-बाबांनी पार कहरच करून टाकला. याच्यात माणसाचीही गलती. माणसाच्याही लक्षात येत नाही. आपल्यासमोर गाडगेबाबा हाये. भगवान बुद्धाचं जीवन हाये आपल्यासमोर…
आपण त्यायचा विचार न घेता भोंदू लोकांच्या चमत्कारांना भुलतोच कसे? अनेकांनी चमत्कारांच्या मागं लावून कित्येक पोरीबाळीचं जीवन उद्ध्वस्त केलं. जगात ‘साधू नव्हे चमत्कार, ह्य तो चालत आला गारूड्याचा व्यापार…’ “आपण पाहतो ना साधू असा हात वर करतात तं अंगठी काढतात. गरिबाले ते आंगठी देत नाहीत, नेत्याले काढून देतात. काऊन बाँ? यांच्याकडे जर एवढा चमत्कार हाये, तं पुण्याचा-मुंबईचा बॉम्बस्फोट यायनं रोका लागत होता; पण हे काही करू नाई शकले. लेकरं जास्त झाले मंग संसार झेपला नाई, तं मंग साधू झाला। बस्स झालं। अन् असे लोकं एकदम निवांत ठिकाणी जाऊन राहतात अन् तिथे महिलांवर अन्याय करतात.” म्हणून महिलांमध्ये जागृती झाली पाहिजे. मी असे ऐकले की, कमी वयाच्या मुलीवर विषयवासना शमविली की महाराज 150 वर्षे जगतो म्हणून दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती, दिवसा धूप बली, रात्री विद्या भारती.
मत रमो सच्चारो पत्ता
भ्रष्ट व्हय बुद्धिमत्ता
हे ते पत्ताती कंगाल हे रे
छोडो–छोडो दारू पत्ता
छोडे भ्रष्ट व्हय बुद्धिमत्ता
हे संत सेवालाल महाराजांचं भजन किंवा स्वामी चक्रधरांचा त्याग, संत रविदासांचा त्याग हा खरा चमत्कार या उच्चनीच भावनेचे उच्चाटन त्यांनी केले. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी…
कोयृला छुपकर भी खाओगे
तो मुँह काला होकर ही रहेगा
पाप कहीं भी करो
एक दिन ओपन होकर ही रहेगा,
म्हणून बाबा-बुवाले विरोध करावा लागतो, मी तो प्रवचनातून उघड-उघड करतो.

तुमच्या प्रवचनासाठी येणार्या बालगोपाळांशी सुद्धा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने संवाद साधता, तो कसा?
तुकडोजी महाराज म्हणतात-
या कोवळ्या मळ्यामाजी, लपले रवींद्र, शिवाजी
विकसता प्रगटतील, हजारो महापुरुष
म्हणून मी कीर्तनात लहान मुलांना समोर बसवतो. 3 जानेवारीले सावित्रीबाईची जयंती असते. 12 जानेवारीले जिजामाता जन्मोत्सव अन् विवेकानंद जयंती असते अन् 19 फेब्रुवारीले शिवजयंती, 14 एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती असते.
मी लेकरायले विचारत असतो, ‘का रे, बाबू शिवजयंती कोण्या तारखेची?’ तं मंग पोरं सांगते ‘19 फेब्रुवारी.’ ‘गाडगेबाबाची जयंती कधी?’ तं ‘23 फरवरी’ अन् ‘तुकडोजीबाबांची जयंती?’ तं ‘30 एप्रिल,’ असे लेकरं सांगते बरोबर तारीखवार.. मंग विचारतो, तुह्या बापाची जन्मतारीख तुले काहून मालूम नाई बाप्पा? तुले कपडे तुह्या बाबाने घेतले. तुया आईनं जेवायची व्यवस्था केली. सर्व्या गोष्टीत मायबाप तूही कदर करतात अन् तुले बाबाची नं आईची जन्मतारीख माईत नाही? मंग महापुरुषायच्या जयंत्या-पुण्यतिथ्या काऊन मालूम हायेत? मंग मी थ्या लेकरायचे सांगितले, ‘भावांनो जे इतरांसाठी जन्मतात, जगतात, मरतात, त्यांचा ‘जय अंती’ होत असते. म्हणून त्याची जयंती करा लागते. पण, आमी जयंतीचा सत्यानाश केला. जयंतीच्या दिवशी तमाशाचे नाचवण्याचे कार्यक्रम घेतो. त्यामधून घाण-घाण दृश्ये अशी आम्ही जयंती साजरी करून रायलो.”
महापुरुषाची अन् त्याच्यामध्ये…
नाही तरी आपले मनोरंजन
त्यासाठी जावे दुसर्याचे प्राण
ऐसे करील जो उत्सव सण
तो–तो हीन या लोकी
उत्सवाचा व्हावा परिणाम
म्हणून प्रभावी ठेवावे कार्यक्रम
थोरांचे भाषण भजन उत्तम करावे तेथे
अशावेळी रक्तदान, नेत्रदान, तरुणांचं संघटन करावं. जयंतीच्या माध्यमातून संघटित होऊन आपण आपल्या गावाचं, देशाचं रक्षण केलं पाहिजे. जयंतीचे वळण राष्ट्रीय भावनेनं व्हावं.
जयंती असो वा पुण्यतिथी
सप्ताह असो वा हवने, पंगती
पहावी गावाची, राष्ट्राची स्थिती
तैसेचि करावे पुण्यकर्म…
लेकरायले मी म्हनत रायतो की, शिवाजी महाराज की… मंग लेकरं म्हणतात जय! महात्मा गांधी की… लेकरं म्हणतात जय! अन् आपल्या बापाची म्हटलं की ‘जय’ निघतच नाई. म्हणून आपल्या मुलांनी आपली आठवण करावी, असं काही तरी आपल्या हातून घडलं पाहिजे मायबापहो!
ना हम रहे अपने लिए
हमको सभी से गर्ज है
गुरूदेव यह आशिष दे
जो सोचने का फर्ज है
आपण ऐकत आलो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आजकाल माणूस पैशाभोवती फिरून राह्यला. पण, समाजाचा विचार कोण करंन? महापुरुषायचं दर्शन व्हावे अन् आपलं ‘करेक्शन’ व्हावं. हा जयंतीचा उद्देश असतो. नाई तं आज फक्त ‘डेकोरेशन’ चालू हाये अन् ‘करेक्शन’ काईच नाई. आपण भगवान बुद्ध मानतो. शिवाजी राजे मानतो, गाडगेबाबा मानतो…
आपण भाषणबाजीतून कोणीई महापुरुष मांडत रायतो, अन् वागणं वेगळं होय.
बोले तैसा चाले तो थोर म्हणावा
सांगे परिं न वागे तो चोर म्हणावा.
हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून मी जास्तीत जास्त वेळ कीर्तनात लहान मुलांशी बोलतो…त्याचे कौतुक करतो, कोणाले पुस्तक, कोणाले ग्रामगीता, कोणाले पैसे भेट देतो. ज्यांना-ज्यांना मी स्टेजवर अशा काही भेटी दिल्या, ती माणसं आयुष्यभर निर्व्यसनी राहिली.
तुम्ही सप्त खंजिरीवादक लोककलावंत आहात. लोककला जिवंत ठेवण्यासाठी काय करावे लागेल?
ग्रामीण भागातील साधी-भोळी माणसं, शेतकरी, शेतमजूर, मायबहिणी जागृत होण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून कलाकारांनी अनेक उपाय केलेत. लोककवी वामनदादा कर्डक यांच्यासारखे शाहीर, अण्णा भाऊ साठे यांनी देशातच नव्हे, तर विदेशात आपल्या लोककलेचा आविष्कार दाखविला. लोककला संपण्याच्या मार्गावर आहेत, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. क्रीडाक्षेत्रावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. लोककलेला कमी क्रिकेटला हमी, लोककलेमध्ये लाखो लोकांना एकत्रित करण्याची ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रभावना जागविली जाते. शिवकाळात शाहिरांनी ‘गोंधळ’ करून मावळ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले. लोककला रडविते, हसविते, व्यसनमुक्त करते, महिलांत बचत गटाविषयी जागृती करते. आज भारतात लोककलेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी खंजिरी वाजवून लोककलेचा वाव देत जनजागृती केली. देशात 40 हजार गुरुदेव सेवा भजनमंडळांची स्थापना केली. विदर्भात राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हातात दगडाचे टाळ वाजवून लोककलेच्या माध्यमातून शिक्षणाविषयीची जागृती केली. तुकडोजी महाराजांनी इंग्रज राजवटीत 1942 मध्ये चिमूर व आष्टी येथे भजन करून
‘पत्थर सारे बॉम्ब बनेगे॥
भक्त बनेंगी सेना।
झाडझडुले शस्त्र बनेंगे॥’
अशी ललकारी ठोकली। ‘अरे तयार हो जाओ जमाने का पुकारा है’ या कीर्तनामुळे सर्व लोक जागृत झाले आणि पोलीस ठाणे जाळले. यात कित्येक शहीद झाले.
‘दिल–मन से गाऊंगा तेरा भजन।
ऊँचा उठा दे मेरा प्यारा वतन।’
‘म्हणून एकतरी अंगी असू दे कला॥
नाहीतर काय फुका जन्मला।’
या कलाकारांना सरकारने भरपूर मदत करावी. कलाकाराला 3000 रुपये ‘समाज कल्याण’कडून द्यावेत; जेणेकरून लोककला जिवंत राहील.
आजच्या एकूणच शिक्षण पद्धतीबाबत तुमचे काय विचार आहेत?
महात्मा जोतिबा फुले म्हणायचे…
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना क्षुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले!
गोरगरिबांची, शेतकर्यांची, कामगारांची मुले-मुली शिकली पाहिजेत आणि त्यांच्या जीवनाचे कल्याण झाले पाहिजे म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी मुलींची सुरुवातीला शाळा काढली. त्यानंतर केवढा त्रास सहन करावा लागला त्यांना! त्यावेळी त्यांच्यावर लोकांनी शेण, दगड मारले; पण त्या माऊलीने धीर सोडला नाही. शाहू महाराजांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन व्यवस्था केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, तर राष्ट्रसंतांनी गुरुदेव सेवा मंडळाच्याद्वारे शिक्षणाचा वेलू आकाशी पोचवला. भारतरत्न बाबासाहेबांनी ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ असा संदेश दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे-ते दूध प्या, असे ते सांगत. कर्मयोगी संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून सांगायचे, “अर्धपोटी राहा, जेवायचे ताट मोडा, लुगडं कमी भावाचं घाला, पण मुलाला शाळेत शिकवा.”
कुणी न राहावे खुळे अडाणी।
शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी।
मी जातीचा धोबी देवा।
धुईन कपडा मळलेला।
गोपाला गोपाला।
देवकीनंदन गोपाला॥
जो शिकला नाही, त्याचे जीवन बैलासारखे आहे. आजच्या संगणकीय काळात दहावी जरी शिकला तरी तो अडाणी आहे. कारण त्याला ‘एसएमएस’ कळत नाही, संगणकाचा पत्ताच नाही. अशा या परिस्थितीत विनाअनुदानित खासगी शाळांनी भरपूर फी वाढ करून सर्वसामान्यांची मनमानी पिळवणूक सुरू केली आहे. आजच्या काळात बारावीनंतर हॉटेलवर वेटर, सायबाच्या गाडीवर ड्रायव्हर अशी कामं करावी लागत आहेत. कंपनीत 18 तास काम करून पगार पाच हजार रुपये महिना. मग गरिबाचा पोरगा बुद्धिवान इंजिनिअर होईल कां? त्याचा बाप चोरी करून एवढी फी देईल का? कुणाचा हा देश? कुणाचे येथे शिक्षण? गरिबाच्या पोटी येणे येथे खरे अवलक्षण! 20 ते 60 लाखांची फी देऊन गरिबांनी डॉक्टर, इंजिनिअर कसे व्हावे?
रोग न जाणे डॉक्टर
तो भी एम.बी.बी.एस. बनते देखा
इंजेक्शनसे मरे रोगी तो भी पैसे छिनते देखा।
गरिबाच्या मुलाला मार्क चांगले असूनसुद्धा पैशाअभावी त्याला शिक्षण घेणे कठीण झाले. म्हणून फी वाढीविरुद्ध सर्व पालकांनी संघटित होण्याची वेळ आलेली आहे.
संघटित होगा तो तर जायेगा। न होगा तो अकेला डूब जायेगा।
आज उच्च शिक्षण पैशासाठी मौताद झाले आहे. गरिबाघरची विद्वान पोरं रिकामे आहेत.
सतीच्या दारी कुत्ती
पाप्याच्या दारी हत्ती
गुणवान निजला अंधारात
घरात ना दिवाबत्ती
विद्वानाची चालली माती
जोर भारी अज्ञानाला।
संस्थेमध्ये प्राध्यापक, शिक्षक, नोकरीवर लावायचे असल्यास लाखो रुपये घेतल्याशिवाय नोकरी नाही. कर्मचार्याने 7 लाख रुपये देऊन 1 वर्ष नोकरी केली-त्याला कमी करण्यात आले. काही कर्मचार्यांना जीवे मारण्यात आले आणि आपल्या घरातील नोकरीवर लावण्यात आले. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, बायकोची बहीण सचिव, चिव-चिव-चिव… कसले शिक्षण? कसली संस्था? प्रायव्हेट कंपनीसारखे झाले!
शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला रे…
खरा गुणवंत येथे पुरा फेल झाला रे…
आज एज्युकेशनचे मॉल्स तयार झालेत आणि डिग्र्यांची फॅक्टरी झाली. विद्यार्थी ग्राहक झाला. शिक्षण बिकाऊ वस्तू झाली… म्हणून जुन्या महामानवांची आठवण येते, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील यांनी शिक्षणासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वत:च्या जीवनसुखाचा तिळमात्र विचार केला नाही. म्हणून आम्हाला वंदनीय आहेत…
महाराज, तुमच्या मते धर्माचे खरे स्वरूप तुम्ही कीर्तनात कसे विषद करून सांगता?
कर्मयोगी गाडगेबाबा, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रोकडा धर्म मानव समाजाच्या कल्याणाकरिता सांगितला. मानवधर्माचे तत्त्वज्ञान जगदगुरू तुकाराम महाराजांनी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, शाहू महाराजांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे आम्हा दिली. भुकेल्यास अन्न, तहानलेल्यांना पाणी, अशिक्षितांना शिक्षण, बेसहारा असलेल्यांना सहारा, मुक्या प्राण्यांना अभय आणि गोरगरिबांना सहारा देण्यास गाडगेबाबांनी सांगितले. काही लोकांनी धर्माची-जातीची-देवांची-भाषेची-प्रांताची भांडणे लावून धंदा सुरू केला. साध्याभोळ्या लोकांना भुलवून
‘माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा।
करी भांडाभांडी हा अधर्मची सारा तुकड्या दास म्हणे॥’
जगाची सुधारणा करण्याच्या हेतूने धर्माधर्मामध्ये वाद घालून अनेक ठिकाणी रक्त सांडले. रक्ताची गरज धरतीला नसून पेशंटला आहे. मंदिर-मस्जिद, चर्च मूर्तीची विटंबना या वादात अनेक जीव गेले. कित्येक महिला विधवा झाल्या. हजारो मुले अनाथ झाली. आता तरी वागण्यात बदल पाडा, तरच आपले कल्याण आहे –
लोगजिंदगी बिताते है एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते झोपडीया जलाने में
पामल हो न पाये मस्जिद की आब्रु
यह फिक्र मंदिर के निगेबान को हो
काम मेरे मुल्क में ऐसी फिजा बने
घर जले हिंदू का तो दर्द मुसलमान को हो।
म्हणून तुकडोजी महाराज भजनातून लिहितात–
नांदोत सुखे गरीब–अमीर एकमतांनी।
मग हिंदू असो वा ख्रिश्चन हो इस्लामी॥
स्वातंत्र्य सुखाया सकला माजी असू दे।
या भारतात बंधू भाव नित्य असू दे, दे वरची असा दे।
धर्म माणुसकीशी म्हणते
माणुसकी न्यायावरी शोभते
न्याय कोणाच्याही प्रती।
एकचि राहतो सर्वदा
लोक धर्म ओरडती।
संतांच्या विचाराने गेलात तर कल्याण होईल, महात्मा फुले अभंगातून लिहितात.
सर्व धर्मांमध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ
कोणी नाही भ्रष्ट, ज्योती म्हणे।
खरी नीती हाचि मानवाचा धर्म।
बाकीचे अधर्म, ज्योती म्हणे।
सत्यविना नाही जगी अन्य धर्म
कळवावे वर्म ज्योती म्हणे।
सत्य पडत आहे कमजोर
म्हणोनी असत्य होई शिरजोर।
साने गुरुजींनी धर्माचे वर्णन केले–
खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात–
सच्चा धर्म नहीं जाना तुने रे भाई॥1॥
सच्चा धर्म नहीं जाना।
गेहूं में कंकड, पेढे में आटा।
दूध में पाणी मिलावे।
मिठी बाते कहकर बेचे।
कसम धर्म की खाये।
माणुसकी हाच धर्म आणि ज्याने-त्याने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हेच त्याचे कर्म…असा विवेकी धर्म आणि प्रामाणिक कर्म एकत्र आले की, माणुसकीचे दर्शन घडते. मला विवेकी माणूस घडविणारा विचार हवा आहे, गाडगेबाबांनी सांगितलेला रोकडा धर्म हवा आहे.

आज समाजामध्ये वाचन कमी होत आहे. याबाबत तुमचे निरीक्षण…
अण्णा भाऊ साठे म्हणत… वाचाल तर वाचाल. वाचनाने मन, मनगट, मस्तक, मेंदू, मणका सशक्त होतो. वाचाल पुस्तक तर होईल सशक्त मस्तक. पुस्तक तर वाचायला पाहिजे. आपण पेपरमध्ये वाचतो ना की, सोन्याच्या दागिन्याले पॉलिश करायच्या बहाण्यानं फसविले, मंग हे घरच्या बाईंले समजलं, पाहिजे ना? वर्तमानपत्रातून ते कळते. गाडगेबाबा म्हणत असत, लिहिता-वाचता येत नाही, त्याचं जीवन बैलासारखं आहे, तुकडोजी महाराजांनी तर ‘ग्रामगीते’त चाळिसावा अध्यायच ‘ग्रंथ अध्याय’ लिहून ठेवला. ते म्हणतात…
गावोगावी ग्रंथ लावती। त्याहूनी आपली वेगळीच पोथी॥
आमच्या उद्धारासाठी दृढ गावाचे? यासाठी ग्रंथपोथी वाचावी।
जनता सगळी जागृत करा।
गावे संस्काराने भरावी। सहकार्याच्या या मार्गे॥
पण, ग्रंथ वाचताना आजच्या काळाची गरज कोणती, तेही लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर मग… ‘ब्रह्म ब्रह्म’ बोलत गेला सभोवताली समाज दु:खी बुडाला। वनी तीर्थी फिरूनी आला। त्याने आपला गाव नाही सुधारिला। तो म्हणावा कसा महाभला?
मुलंही ज्याची गरज नाही तेच वाचत राहतात. प्रेमकहाण्या, भूतपिशाचा गोष्टी वाचून काय मिळणार? त्यापेक्षा शिवचरित्र वाचावं. भगतसिंग वाचावा. तेवढं वीरत्व आपल्याही अंगी येईल. वाचनातून आपल्या जीवनात परिवर्तन आले पाहिजे. थोरांचे विचार रूजविण्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. वाचनातून उन्नत माणसं निर्माण व्हावीत.
मनुष्य निरोगी सात्विक बनवा।
त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा।
त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा। कोणासही॥
पण, वाचनाचा व्यासंग जोपासतानाही काय वाचावे, याचं भान ठेवलं पाहिजे. उगीच वाचल्याने जीवनाची खराबी होऊन जाते. अनेकदा काय होते की…
प्रसादासाठी पोथी लावली
चमत्कार ऐकता वेळ गेली
आपली बुद्धी गहाण पडली
ऐसे न व्हावे यापुढे पदोपदी।
ऐसे उदाहरण ग्रंथ वाचूनी बिघडे मन।
अर्थ न लागता वेडावून। जाती जनभाविकही.
आणखी एक गोष्ट ध्यानी ठेवली पाहिजे. नुसते ग्रंथ वाचून उपयोग नाही. त्यातले विचार समजून घेतले पाहिजेत. म्हणून महाराज निर्वाणीचा इशारा देतात…
ग्रंथ वाचताही तारतम्य ठेवावे
कोणत्या ग्रंथातून काय घ्यावे
काय सोडावे, काय आचरावे उन्नतीसाठी आपल्या॥
ग्रामीण भागात वाचनाची प्रक्रिया कमी आहे. तेथेच ती वाढली पाहिजे. जोतिबांनी, साने गुरुजींनी पुस्तकांवर प्रेम केले. बाबासाहेब तर बाहेरदेशात गेले, तेव्हा त्यांनी कुटुंबासाठी काही नाही आणलं; पण पुस्तकांचं जहाज भरून आणलं. माणसापासून माणूस घडत गेला पाहिजे, तरच वाचनाची फलश्रुती होईल. आज घराघरांत संवादालाच घरघर लागली आहे. जो-तो कानात बोळे टाकून मोबाईललाच चिकटून राहतो. ‘तंत्रस्नेही’ पिढीला वाचनाकडे वळविणे, हे शिक्षण खात्याचं प्रथम काम हवं; तसेच ते आपल्या सर्वांचे काम आहे. पुढील काळात ‘वाचनाकडे वळा’ अशा जनचळवळीच उभाराव्या लागणार आहेत. तंत्रज्ञानाचा जसा फायदा हवा आहे, तसेच काही तोटेही आहेत. मुळात तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे आहे. काही बदलांना सामोरे जावेच लागणार…
सत्यपाल महाराजांना प्रस्थापित कीर्तन संमेलनांपासून दूर का ठेवण्यात येते?
मी गुरू करा, कान फुका, पाय धुवा, तीर्थ प्या, गंडा बांधा, आरती करा, पूजापाठ करा, पाया पडा, गुरुपौर्णिमा साजरी करा हे सांगत नाही, साईड बिझनेस म्हणून मी कोणता मठ, आश्रम उभारला नाही. पुढच्या पिढीसाठी मी गादी निर्माण करून ठेवली नाही. मी काही नारदीय कीर्तन करीत नाही. मी तुकडोजी, गाडगेबाबा, शाहू-फुले-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे अशा महामानवांचे दाखले देतो… त्यामुळे मला ते लोक त्यांचा समजत नसतील, मला काही फरक पडत नाही. समाज वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून मी कीर्तनातून प्रबोधन करतो. माझे विचार, माझी मतं ठरलेली आहेत. ती काही लोकांना आवडत नसतील म्हणून मला कोणी कीर्तन संमेलनात निमंत्रित करो अगर ना करो; माझ्या कामावर काहीच फरक पडत नाही. जनता-जनार्दनाला माझे विचार आवडतात, म्हणून मला लोक आग्रह करून करून गावोगावी बोलवतात. कधी-कधी माझ्याच हातानं स्वत:ची हजामतही करून घेतात. तरी ते माझ्यावर प्रेम करतात. माझ्या कीर्तनाच्या सी.डी. विकत घेतात, फेसबुक-यू-ट्यूबवर माझे कीर्तन पाहतात, माझे पुस्तक विकत घेतात. आजपर्यंत अनेक विचार संमेलनाची मी उद्घाटने केली, प्रमुख पाहुणा म्हणून गेलो. तुमच्यासारख्यांच्या प्रेमाने मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन-तीनदा सन्मानाने बोलविले. डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र फौंडेशनसारखा मोठा पुरस्कार दिला. जवळपास प्रत्येक टी.व्ही. चॅनलवर माझे कार्यक्रम झालेत. तीन डझनपेक्षा जास्त राज्यस्तरीय प्रतिष्ठित पुरस्कारांनी लोकांनी मला सन्मानित केले, अजून काय पाहिजे? मला मिळणारे कीर्तनाचे मानधन, पुरस्कार मी गोरगरिबांच्या कामाला वाटून देतो. ज्यांचा पैसा त्यांच्याच कामाला आला की, समाधान वाटते. माणसाचा हात नेहमी देता राहिला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणून मी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करीत असतो.
मध्यंतरी तुमच्यावर भर कार्यक्रमात जीवघेणा हल्ला का करण्यात आला?
मी सामाजिक विसंगतीवर बोलणारा माणूस आहे. तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठास कसे काय पाठविले? यावर बोलताना मी शंका घेतली-की ते खरंच वैकुंठात गेले की त्यांचा कुणी ‘गेम’ केला? मी असं का बोललो, म्हणून एक माणूस चाकू घेऊन जाब विचारायला आला आणि मी स्पष्टीकरण द्यायच्या आधीच त्यानं माझ्यावर वार केला. थोडक्यात वाचलो. पुढं पोलीस म्हणाले, ‘तो दारू पिलेला होता…’

एकदा ‘मंदिर वही बनाऐंगे…’ यावर बोलताना ‘गावात धड शाळा नाही, व्यायामशाळा, ग्रंथालय नाही, गावात अनेकांच्या घरी संडास नाही.’ मी म्हणालो, ‘पहिले आपल्या गावात जे नाही ते बांधू, नंतर पैसा उरला तर मंदिरालं देऊ’… लोक म्हणतात-‘महाराज, तुम्ही आमच्या भावना दुखावल्या’… मी म्हणतो-‘भावना नावाचं इंद्रिय शरीरात कुठं असते ते मला दाखवा?’ एकाने मोठा गोटा फेकून मारला होता…
एका गावात एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर उभा राहून कीर्तन करीत होतो. एक दारू पिलेला जवळ उभा होता. त्याला म्हटलं ‘बाजूला हो… येथून चालता हो.’ तर तोच म्हणाला-‘माझ्या मालकीचं ट्रॅक्टर आहे, महाराज तुम्हीच चालते व्हा…’ मीच ट्रॅक्टरच्या खाली उतरलो. तो म्हणाला, ‘सगळ्या गावासमोर तुम्ही माझा अपमान केला. तुमच्या अंगावर ट्रॅक्टरच टाकतो…’
मार खाण्याचे प्रसंग बरेचदा येतात. कीर्तन ठेवणारेच सांगतात-‘महाराज जरा जपून. गाव तसं बरं नाही…’ आपण काय करावं? आलिया भोगासी, असावे सादर…
तरुण पोरं देवदर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहतात. गणपती, दुर्गा उत्सवात लोकायचा भक्तिभाव वेडापिसा झाल्यासारखा दिसतो. बायका चप्पल न घालता देवीला जातात. समाज कसा कर्मकांडाच्या आहारी जाईल हेच राजकारणी लोक पाहतात. मी तरुणांना कर्मकांडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, हेसुद्धा काही लोकांना आवडत नाही. सध्या खरे बोलणार्याला वाईट दिवस आले आहेत, हे मात्र खरे! पण मी तर असं म्हणतो, मले कीर्तन करतानाच मरण यावं… असं मरण आलं तर मी म्हणेल, माझी पुण्याई कामाला आली.

सत्यपाल महाराज चिंचोळकर
‘गुरुवंदन’, जिजामाता चौक,
स्टेशन रोड, अकोट, जि.अकोला-444 101
संपर्क : 9423128143/ 9881415076
मुलाखतकार : नरेंद्र लांजेवार
संपर्क : 9422180451