प्रिय साथी,
येत्या 20 ऑगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पाचवा स्मृतिदिन आहे. त्या आधी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंनिसच्या त्रिदशकपूर्ती वर्षाची सुरुवात होत आहे. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही ‘कार्याध्यक्षाची डायरी’ लिहित आहे.
मित्रहो, या दोन्ही घटनांत आपण एक महत्त्वाचा टप्पा पार करीत आहोत. आपल्या नेत्याचा खून होऊन पाच वर्षेम्हणजे साठ महिने पूर्ण होत आहेत. हा कालावधी काही लहान-सहान नाही. एका बाजूला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून गेली पाच वर्षे अखंडितपणे खुनाच्या तपासाच्या मागणीसाठी दर महिन्याच्या वीस तारखेला होणारी सर्व संवैधानिक स्वरुपाची निषेध आंदोलने, धरणे, निर्भय मॉर्निंग वॉक, मोर्चे, निवेदने देणे, पत्रे लिहिणे इत्यादी. दुसर्या बाजूला डॉक्टरांच्या खुनानंतर संपूर्ण देशभर आणि जगभर त्या घटनेची दखल घेत सर्व प्रकारच्या माध्यमांनी त्याबाबत आग्रहीपणे चालविलेली कँपेन आणि दरवर्षी 20 ऑगस्ट स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मन:पूर्वक दखल घेणे, दरवर्षी 20 ऑगस्टला पुणे, मुंबई व दिल्लीतील संघटनास्तरावरील मोठे कार्यक्रम आणि देशभर समविचारींकडून होणारे निषेध कार्यक्रम, सीआयडी, सीबीआय, एसआयटी या सर्व यंत्रणांना न्यायालयाकडून वेळोवेळी फटकारणे, विधिमंडळाच्या आणि संसदेच्या प्रत्येक अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधीकडे प्रत्यक्ष भेटून केलेला पाठपुरावा आणि आणखी बरेच काही घडूनही खुनाचा तपास जरा देखील पुढे सरकत नाहीए. कॉ. गोविंद पानसरेंच्या खुनाला देखील साडेतीन वर्षेपूर्ण होत आहेत. त्यानंतरही प्रा. डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचेदेखील त्याच पद्धतीने खून झाले आहेत. विशेषत: या सर्व खुनाच्या पद्धतीतील साधर्म्य, चारही खुनांमध्ये सनातन आणि हिंदू जनजागरणसारख्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या साधकांवर आरोपपत्रात ठपका ठेवला जाणे, हे स्पष्ट असूनही अद्याप खुनी पकडले न जाणे याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे एकमेव कारण आहे आणि त्याचा जबाब मागण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार ठरते आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकनियुक्त सरकारवर त्याचे उत्तरदायित्व निश्चित आहे. याही वर्षी आपण 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2018 या कालावधीत ‘जबाब दो’ आंदोलन चालविणार आहोत. त्यासाठी सर्वच ठिकाणी आपापल्या आमदार-खासदारांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रही राहायचे आहे. जोपर्यंत खुन्यांचा तपास लागून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होत नाही व त्यामागील सूत्रधार मास्टर माईंडचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत, तोपर्यंत आपणही आपला आक्रोश जीवाच्या आकांताने करतच राहणार आहोत, अधिक तीव्र करणार आहोत आणि सध्याच्या देशातील असहिष्णू वातावरणाच्या पार्श्वभूमीवर “हिंसा के खिलाफ-मानवता की ओर’ हे आपले अभियानदेखील अधिक सहनतेने या कालावधीत चालवित आहोत. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे येत्या 9 ऑगस्ट रोजी संघटना 30 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या दोनच शब्दांत जिचे व्यापक उद्देश सामावले आहेत, अशा संघटित आणि अखंडित कामाची तीस वर्षेपूर्ण होणे, ही महाराष्ट्राच्या-देशाच्या सामाजिक इतिहासातील ठळकपणे नोंद घ्यावी, अशी बाब आहे. आपण ज्या समाजसुधारकांचा वारसा चालवू इच्छितो, त्यातील अनेकांनी त्या काळात एकटेपणाने लढा उभारला किंवा आपल्या लेखनातून प्रहार केले, तरी इतिहासाला त्यांची दखल घ्यावी लागली आहे. आपण सुरुवातीला ‘चमत्कारांचे सादरीकरण’ आणि ‘बुवाबाबांना आव्हान’ देण्यापासून सुरू केलेली ही चळवळ गेल्या 25-30 वर्षांत किती विविधांगांनी विस्तारली आहे, हे वेगळे सांगायला नको. या स्वरुपाचे संघटित काम करणारी देशातीलच नव्हे, तर जगातील महाराष्ट्र अंनिस ही एक प्रमुख चळवळ आहे, हे आता सर्वमान्य आहे आणि इतिहासात याची ठळक नोंद कायम राहील. असे असले तरी डॉ. दाभोलकर म्हणायचे तसे आपल्या उभ्या हयातीत अंधश्रद्धामुक्त समाज निर्माण होण्याची सूतराम शक्यता नाही. हे काम म्हणूनच दशकांचे नव्हे, तर शतकांचे आहे आणि म्हणूनच नेतृत्व म्हणून त्यात विस्ताराच्या अनेक संधी मला दिसतात. आपण आपल्या आजवरच्या कामाचे दस्तऐवज संकलन करावयाचे ठरवून देखील त्या कामाला गती देऊ शकलो नाहीत. हजारो कार्यक्रम, शेकडो मोहिमा, असंख्य उपक्रम, कितीतरी चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदा, शिबिरे, संमेलने, अधिवेशने, वार्तापत्र, पुस्तके हा दस्तऐवज संकलित झाल्यास तो एका नोबेल पुरस्काराला पुरेल यापेक्षा देखील जास्त आहे, असे म्हणताना मला अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही. त्यासाठी थोडी व्यावसायिक दर्जाची यंत्रणा उभी करावी लागेल.
आजवर आपण करत आलेलो काम हे उत्स्फूर्ततेवर आधारलेले होते; पण काळाची आव्हाने ओळखून त्याला शास्त्रीय बैठकीची आणि मांडणीची जोड आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यत: संशोधनात्मक आणि विश्लेषणात्मक (Research & Analysis) कामाच्या परिणामांचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्या दर्जाची कौशल्ये, गुणवत्ता कार्यकर्त्यांमध्ये विकसित करावी लागेल. तसेच ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्याकडे कौशल्य नाही आणि कौशल्य आहे, त्यांना वेळ नाही; तेव्हा क्षमता व कौशल्य असलेल्या नवनवीन कार्यकर्ते, व्यक्ती आणि संस्थांना आपल्या कामाशी जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावयाचे आहेत. अशा शास्त्रीय परिभाषेतील विश्लेषण, आकडेवारी उपलब्ध करून दिल्यास आज आपणास ज्या स्वरुपाची मदत आणि अर्थसहाय्य मिळते, त्याच्या कितीतरी पटीने अधिक मदत विविध व्यवसाय, उत्पादन संस्था, शैक्षणिक, सामाजिक, शासकीय यंत्रणांकडून मिळू शकते. पुढील काळाचा वेध घेताना हे सर्व ध्यानात घेऊन धोरणांची आखणी करावी लागणार आहे.
यासोबतच बाह्य व अंतर्गत आव्हानांना सामोरं जाताना ‘जात-धर्म निरपेक्ष संघटन’ या ओळखीपलिकडे ‘व्यक्तिनिरपेक्ष संघटन’ हा व्यापक संघटनात्मक दृष्टिकोन विकसित करावा लागेल. नेता असो वा नसो, संघटनेच्या कामाचा पोतच आणि गती यात फरक पडणार नाही, अशी कार्यपद्धती गतिमान करावी लागेल. यावेळेची राज्य कार्यकारिणी ही तुलनेने अधिक चांगली आहे. आपापल्या आवडी व क्षमतेनुसार विभागांचे पदाधिकारी निवडस्थाने विकेंद्रित रचना प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली आहे.
डॉक्टरांच्या निधनानंतर ज्या परिस्थितीत आपण उभे राहिलो आणि आपल्या कार्यकक्षा रुंदावत आहोत, त्यावरून निश्चितच मी प्रचंड आशावादी आहे. सध्या राज्यभर सुरू असलेली संघटनात्मक शिबिरे हा व्यापक दृष्टिकोन देण्यासाठी आणि भविष्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त आहेत.
आपल्या कामाची उपलब्धी म्हणून जसे दोन कायदे पारित करून घेण्यात यशस्वी झालो, तसे यापुढील काळात आपल्या संघटनेचे विषय राज्य आणि केंद्राच्या धोरणात कसे प्रतिबिंबित होतील आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत या विषयांचा समावेश कसा होईल, हे देखील बघणे आवश्यक आहे.
मागील महिन्यात आपल्या समितीच्या प्रारंभीच्या काळातील एक ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक प्राचार्य डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने विदर्भ स्तरावरचा एक पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाचा पहिला पुरस्कार अकोला येथील प्रसिद्ध सर्पमित्र बाळ काळणे, अकोला यांना प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा दि. 21 जुलै 2018 रोजी पार पडला. या पुरस्काराच्या निमित्ताने विदर्भातील कार्यविस्तारास मदत होईल.
सर्वांत महत्त्वाचे व विशेष उल्लेखनीय घटना म्हणजे आपले संस्थापक-अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील सरांचा कृतज्ञता सोहळा. अंनिस चळवळीप्रमाणे अनेक सामाजिक संस्था, संघटना, आंदोलनाचा ‘आधारवड’. सरांच्या व्यक्तित्वाला साजेसा असा दिमाखदार सोहळा झाला. आपल्या कोल्हापूर आणि सांगलीच्या सहकार्यांनी कमी दिवसांत खूप मेहनत घेऊन हा समारंभ यशस्वी केला. एन. डी. सरांचे सर्व कुटुंबीय आणि महाराष्ट्रातील चळवळींचे अनेक प्रमुख कार्यकर्ते या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. सरांचं केवळ सोबत असणं हे देखील किती आधार देणं असतं, हे तुम्ही जेव्हा नेतृत्वाच्या भूमिकेत जाल, तेव्हा अनुभवाल. चळवळींचा ‘बापमाणूस’ म्हणून डॉ. दाभोलकर त्यांना ‘फे्रन्ड, फिलॉसॉफर आणि गाईड’ म्हणायचे. हा कार्यक्रम संघटनेलाही समृद्ध करणारा ठरला आहे.
शेवटी एकच सांगेन, आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. विजय आपलाच आहे, यात किंचितही शंका नाही, सध्या गाजत असलेल्या कवितेच्या दोन ओळींची या क्षणी आठवण होतेय…
भोवताली दाटला अंधार दु:खाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे…
–अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष)
संपर्क : 9370173651