महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, अंनिसच्या आजपर्यंतच्या वाटचालीचे साक्षीदार, मदतनीस आणि नेतेही. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या भाषेत सांगायचे, तर ‘फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड!’ अशा प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांचा 15 जुलै हा 90 वा जन्मदिवस!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निर्णय घेतला यावर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा; पण वाढदिवस वगैरे समारंभापासून एन. डी. सर नेहमीच दूर. जेव्हा सरांना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची कल्पना सांगितली, तेव्हा प्रथम त्यांनी ती नाकारली; पण महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना आपल्या विषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करायची असल्याने हा वाढदिवस ‘कृतज्ञता सोहळा’ म्हणून वाढदिवसाची कोणतीही कर्मकांडे न करता साजरा करायला, त्यांनी काहीच हरकत घेतली नाही!
“पण मग 15 तारीखच कशाला पाहिजे? दुसरी घ्या!” सरांची शंका. “नाही सर, त्या दिवशी रविवारी आहे. दुसर्या शनिवारला जोडून सलग दोन दिवस सुट्टी मिळतेय. लांबच्या कार्यकर्त्यांनाही यायला सोयीचं आहे.” यावर सर निरुत्तर झाले.
एकदा तारीख ठरल्यावर कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. कोल्हापूरचे ‘शाहू स्मारक भवन’ बुक केले. दिवसभर सरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दोन परिसंवाद ठरवले गेले. वक्त्यांशी संपर्क केला गेला. निमंत्रण, निवास, भोजन, स्टेज अशा विविध कमिट्या केल्या. कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वत: मीटिंग घेऊन कामे वाटून दिली. पुढे कोल्हापूर जिल्ह्यात फिरून प्रमुख मान्यवरांना निमंत्रणेही दिली.
वार्तापत्राच्या संपादक मंडळाने खास विशेषांक काढला. आजारपणाच्या कारणामुळे सरांची मुलाखत तेवढी घेता आली नाही. कार्यक्रमाच्या दिवशी या खास अंकाला मोठी मागणी होती. विक्रीसाठी आणलेले सर्व अंक मुख्य सोहळ्यापूर्वीच संपून गेले. स्थानिक वृत्तपत्रांसह महाराष्ट्रभरातील प्रमुख वर्तमानपत्रांनी आधी दोन दिवस बातम्या दिल्या; तसेच एन. डी. सरांच्या जीवन प्रवासासंदर्भातील लेखही छापले. निमंत्रण पत्रिकाही वाटल्या होत्याच. परिणामी आदल्या दिवशीपासूनच दूरचे कार्यकर्ते येऊ लागले. कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी त्यांची निवास व्यवस्था उत्तम केली.
15 जुलै रोजी सकाळी ‘कृतज्ञता सोहळ्या’ची सुरुवात सरांच्या जीवनावरील माहितीपटाने झाली. त्या महितीपटात बालपणापासून सरांची जडणघडण कशी झाली, कर्मवीरांचे सान्निध्य कसे मिळाले, इथंपासून ते सरांनी केलेल्या विविध राजकीय-सामाजिक-आर्थिक लढ्यांचा आढावा या माहितीपटात घेतलेला आहे. त्यानंतर सरांच्या विचारांना साजेसे-आगळेवेगळे उद्घाटन झाले – जटा निर्मूलनाने!
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले अंनिस व इतर संघटनांचे कार्यकर्ते आणि कोल्हापुरातील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने भरगच्च झालेल्या सभागृहात कोल्हापूर जिल्ह्यातील येळवण येथील मंगला कांबळे यांच्या जटा जाहीररित्या कापून ‘कृतज्ञता सोहळ्या’चे उद्घाटन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. जटा कापल्यानंतर सभागृहातील सर्व उपस्थितांनी उभे राहत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात मंगलाताईंच्या धाडसाला सलाम केला.
त्यानंतर या ‘कृतज्ञता सोहळ्या’चे प्रास्ताविक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी केले. त्यात त्यांनी एन. डी. सरांनी अंनिसच्या विविध आंदोलनात घेतलेल्या सहभागाची विशेषत: ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ व्हावा म्हणून केलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली.

सीमा पाटील यांनी उद्घाटन सत्रातील पाहुण्यांचा परिचय करून दिला तर या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कृष्णात कोरे यांनी केले.
पहिला परिसंवाद : भाई एन. डी. पाटील – कार्यकर्ते ते नेतृत्वाचा मानबिंदू.
प्रा. डॉ. मेघा पानसरे (डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्या, कोल्हापूर) : मेघाताईंनी आपल्या भाषणात एन. डीं. च्या सडतोड वृत्तीची उदाहरणे दिली. कोल्हापूरमधील थेट पाईपलाईन योजनेचे आंदोलन, टोलविरोधी आंदोलन, दारूबंदी आंदोलन, स्त्रिया आणि दलितांच्या हक्कांचे संघर्ष, अशा प्रत्येक प्रसंगी कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आंदोलनकर्त्यांसाठी धावून येत. रात्रीच्या वेळी खोटा मेसेज फिरवून झुंडशाहीने मुस्लिम वस्तीवर हल्ला करण्यात आला. कॉ. पानसरे आणि एन. डीं.नी शांतता समिती स्थापून ऐक्य निर्माण केले आणि दंगलग्रस्तांना जनतेकडून मदत मिळवून दिली, याचा त्यांनी गौरवपूर्व उल्लेख केला.
उल्का महाजन (जनचळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या, पनवेल): ‘सेझ’विरोधी यशस्वी लढ्याच्या प्रमुख कार्यकर्त्या. उल्का महाजन यांनी आपल्या घणाघाती भाषणात आंदोलनात आलेले आणीबाणीचे अनेक प्रसंग आणि त्यावर एन. डी. सरांनी काढलेले तोडगे यांची उदाहरणे दिली. काँग्रेसची पाशवी सत्ता, पोलिसी दडपशाही आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या अंबानी उद्योगपतीशी झुंज, अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या एका असहाय्य शेतकर्याने सरांना भीत भीत विचारले, “सायब, एसईझेड जाईल का वो?”
“तुम्हाला जायला हवे आहे काय?”
– “व्हयं”
“मग जाणारच! निश्चिंत राहा.” सरांनी दिलेला विश्वास प्रत्यक्षात आणून दाखवला.
एकदा शेतकर्यांसमोर बोलताना, त्यांच्या मनात एक विचित्र विचार आला. गरीब शेतकर्यांच्या जमिनी अंबानी ताब्यात घेतोय, तर शेतकर्यांनी अंबानींचं घर का ताब्यात घेऊ नये? ते म्हणाले – “आपणही आता अंबानीचं घर ताब्यात घेऊ. पहिल्या मजल्यावर आपण शेती करू, दुसर्या मजल्यावर गुरं ठेवू…… अंबानीला एक रुपयाने नुकसानभरपाई देऊ, त्या इमारतीत काय उगवत नाही, म्हणजे ती मृत जमीन हाय. त्येला रुपयाच्यावर भरपाई कशाला द्यायची?” खरोखरच असा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी अडवल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. मग शेतकर्यांनी इमारतीच्या वापराबाबत अनेक विनोदी कल्पना मांडल्या.
सत्तेवर बसलेली धर्मांध मंडळी सर्व लोकशाही संस्था ताब्यात घेत आहेत, त्या विरोधी लढ्याचे सरांनी नेतृत्व करावे, अशी विनंती शेवटी उल्काताईंनी केली.
किशोर बेडकीहाळ (समाजवादी विचारवंत, सातारा) : किशोर बेडकीहाळ यांनी एन. डीं.ची पिढी ही 1942 च्या आंदोलनात घडली असून, साम्राज्यवादी विरोध आणि कष्टकर्यांबद्दल कळवळा ही या आंदोलनाची वैशिष्ट्ये नमूद केली.
एन. डीं.नी भारतीय परिस्थितीत मार्क्सवादाचे स्वरूप अभ्यासताना फुले, शाहू, आंबेडकरांच्या परंपरेशी असलेले त्याचे नाते जपले, त्यांनी माओंचा अभ्यास केला आणि शेतकरी हा क्रांतीचा धागा होऊ शकतो, हा विचार घेतला. ते सत्यशोधक राहिले; पण ब्राह्मणेतर बनले नाहीत.
हिंसा झाली तर सत्ताधारी दडपशाही करून आंदोलन मोडतात, म्हणून ‘शस्त्र हाती घेऊ नये’ हा महात्मा गांधींचा व्यावहारिक धडा त्यांनी गिरवला.
लिहिणारे आणि लढणारे यांच्यामधील द्वैत एन.डीं.च्या व्यक्तिमत्त्वात सामावलेले आहे. एन. डी. म्हणजे कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला आलेले फळ आहे, अशा शब्दांत वक्त्यांनी गौरव केला.
प्रा. अनिरुद्ध जाधव (मअंनिस उपाध्यक्ष, लातूर) : परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी एन.डीं.च्या साधेपणाच्या आणि अभ्यासूवृत्तीच्या आठवणी सांगितल्या. पहिल्या परिसंवादाचे सूत्रसंचालन कृष्णात कोरे यांनी, तर आभार सुजाता म्हेत्रे यांनी मानले.

दुसरा परिसंवाद : विवेकवादापुढील आव्हाने
डॉ. हमीद दाभोलकर (सरचिटणीस, महाराष्ट्र अंनिस) : या परिसंवादाचे प्रास्ताविक करताना अंनिसचे सचिव हमीद दाभोलकर यांनी विवेकवादापुढील आव्हाने व्यक्तीपासून समष्टीपर्यंत असून विवेकाचा विजय होईल, या धारणेपोटी कार्यकर्तेहा न संपणारा प्रवास करत आहेत, त्यात एन.डीं.चे चित्र, जमिनीत अनेक पारंब्या रुजवलेल्या वटवृक्षासारखे असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे (ज्येष्ठ विचारवंत, सातारा) : बीजभाषण करताना प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी एन.डीं.ना वाढदिवसाच्या सदिच्छा देऊन हा प्रेरणा घेण्याचा क्षण असल्याचे म्हटले. त्यांनी आव्हानांचे दोन भाग केले. एक विवेकवाद्यांच्या विरोधकांकडून आणि दुसरे विवेकवादी म्हणवून घेणार्यांकडून. विरोधक चिकित्सा करू देत नाहीत. आम्ही सांगू तीच नीती, आम्ही सांगू तोच धर्म, हा त्यांचा आग्रह असतो. ते खरे-खोटे तपासण्यात अडथळे निर्माण करतात. हा त्यांचा एक मार्ग.
दुसरा मार्ग म्हणजे चारित्र्य हनन, बदनामी, अपकीर्ती; सामान्य लोक अशा प्रचाराला बळी पडतात. त्यातूनही ऐकत नसतील, तर तिसरा मार्ग हिंसेचा वापरला जातो.
विवेकवाद्यांकडून आव्हान आहे ते ऐक्याचे. आजच्या परिस्थितीत सर्व विवेकवादी एकत्र आले, तरी विषमतावाद्यांना जिंकणे अवघड आहे, अशा वेळी विवेकवाद्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विवेकवादी चळवळींनी सकारात्मकता जोपासावी. नकारात्मकतेने, ज्यांच्यासाठी कार्य करायचे आहे, तेच तुटतात. कार्य करताना आपली कुवत, आवाका पाहूनच धावपळ करावी; नाहीतर वैफल्य येते. शेवटी शत्रू-मित्र विवेक बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
दत्ता देसाई (लोकविज्ञान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पुणे) : दत्ता देसाई यांनी विवेकवाद्यांना उफराटेपणाशी लढण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. प्रत्येक देशातील नवफॅसिस्ट उफराटे चित्र उभे करत आहेत. परंपरेतील चुका दाखवणार्यांना ते वाईट म्हणून रंगवत आहेत. त्यासाठी परंपरेतील चांगल्या गोष्टीही मांडाव्यात. सामान्य माणसे परंपरेत आधुनिकता आणतात; वारीतल्या महिलाही मोबाईल आणि शांपू वापरतात, तर फॅसिस्ट आधुनिकतेमध्ये परंपरा आणतात. ते सांगतात, पूर्वी देशात हत्तीचे डोके माणसाला चिकटवण्याचे प्लॅस्टिक सर्जरीचे ज्ञान होते. ते चूक आहे म्हणतानाच भारतातल्या शेतकर्यांनी दलित आणि स्त्रियांनी प्रचंड ज्ञान गोळा केले होते, ही सकारात्मक बाजूही मांडली पाहिजे.
माणसांच्या जाणिवा उफराट्या झाल्याने, पुरोगाम्यांचा पाया ढासळतो आहे, म्हणून माणसांना विवेकवादाकडे आणले पाहिजे, हा उपायही त्यांनी सांगितला.
डॉ. तारा भवाळकर (लोकसाहित्याच्या अभ्यासक, सांगली) : डॉ. तारा भवाळकर यांनी स्त्रियांना स्वत:विषयी काय वाटते, हे समजून घेण्यासाठी लोकगीते, लोककथा, व्रतवैकल्यांतील कथांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. विवेकी बनविण्यासाठी निर्भयता आवश्यक असते, ती संत कवयित्रींनी दाखवल्याची त्यांनी उदाहरणे दिली.
डॉ. प्रदीप पाटकर (मनोविकार तज्ज्ञ व मअंनिसचे उपाध्यक्ष, पनवेल) : परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर यांनी अविवेक वाद्यांशीही संवाद साधावा आणि त्याचबरोबर स्वप्रतिमाही सुधारण्याचे आवाहन केले.
आभार मानताना अनिल चव्हाण यांनी लढ्याची रणनीती ठरवताना शत्रू-मित्र विवेक ठेवावा, परंपरेतील सकारात्मक बाबी अधोरेखित करून सामान्यांना समजून घ्यावे, हाच एन. डी. सरांच्या जीवनाचा संदेश आहे, हे स्पष्ट केले; या परिसंवादाचे सूत्रसंचालन सुनील स्वामी यांनी केले.
गर्दीचा उच्चांक : वरील परिसंवादाला सत्कारमूर्तींना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नव्हते. कृतज्ञता सोहळ्यासाठी ते व पाहुणे वेळेवर पोचले. श्रोत्यांनी मात्र त्यापूर्वीच गर्दीचा उच्चांक मोडला होता. शाहू स्मारक भवनमधील तिन्ही हॉल व व्हरांडे भरून लोक उभे होते. त्या गर्दीतून वाट काढणे अवघड होते.
कृतज्ञता सोहळा
स्टेजवरील मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कृतज्ञता सोहळ्यामागची भूमिका मांडताना एन. डी. सरांच्या पाठिंब्यामुळे परिवर्तनासाठी लढणार्या कार्यकर्त्यांना फार मोठा आधार मिळतो त्या अर्थाने ते महाराष्ट्रातील परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीचा ‘बापमाणूस’ आहेत. डॉक्टरांच्या खुनानंतर धीर देऊन, आपण ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ गमावलाय, तरीही मागे न हटता संघर्षाला तयार व्हा म्हणत कार्यकर्त्यांना ताकद देणार्या एन. डी. सरांची संघटना कायम कृतज्ञ राहील, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आजचा ‘कृतज्ञता सोहळा’ आम्ही आयोजित केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
सत्कार व कृतज्ञता पत्र : ‘नर्मदा आंदोलना’च्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते माईंचा आणि एन. डी. सरांचा सत्कार झाला. त्यापूर्वी प्रा. एकनाथ पाटील यांनी कृतज्ञता पत्राचे वाचन केले. कृतज्ञता पत्राचे लिखाणही त्यांनीच केले आहे. ‘कृतज्ञता सोहळ्या’चे सूत्रसंचालन अंनिसचे सरचिटणीस संजय बनसोडे यांनी केले.
आ. जयंत पाटील (शे. का. पक्षाचे सरचिटणीस) : आमदार जयंत पाटील यांनी ज्या कोल्हापुरात पुरोगामी विचार वाढला आणि राज्यभर पसरला, त्याच कोल्हापुरात प्रतिगामी वाढत असून, विचारवंतांचे खून पडत आहेत, याबद्दल खंत व्यक्त केली आणि कृतज्ञता सोहळ्याने पुन्हा पुरोगाम्यांना दिशा सापडेल, असा विश्वास व्यक्त केला. एन. डीं.नी केलेल्या आंदोलनामुळेच रोजगार हमी कायदा तयार झाला आणि देशभर गेला, हे नमूद केले. महाराष्ट्रभर सुरू असलेला शिक्षणाचा बाजार एन. डीं.नी ‘रयत’मध्ये येऊ दिला नाही, याबद्दल कौतुक केले.
अंनिसचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी एन.डीं.च्या साधेपणाची उदाहरणे दिली. डॉ. शैला दाभोलकर यांनी श्रम केले तर विवेकी वाटचाल अवघड नाही, हेच एन.डी.सर आणि दाभोलकरांनी दाखवून दिल्याचे सांगून श्रोत्यांना एन.डीं.च्या प्रमाणेच मेंदू वापरण्याचे आवाहन केले.
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी एन.डी.सरांच्या निष्कलंक, सचोटी आणि नैतिकमूल्यांचे कौतुक करून कोल्हापूरमध्ये काम करताना एन.डी., कॉ. पानसरे आणि सा. रे. पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला; तसेच एन.डीं.च्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मानवतावाद, विज्ञानवाद आणि विवेकवाद वाढवण्याचे आवाहन केले.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विवेकाचा जागर मांडणार्या अंनिसच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि विविध चळवळींना एन. डी. आपल्याला हवेत, असे वाटते. जल, जंगल आणि जमिनीसाठी लढणार्या कार्यकर्त्यांना एन. डीं.च्या बुलंद कर्तृत्वाने बळ मिळाल्याचे सांगितले.
एन. डी. सरांच्या पत्नी सरोजताई पाटील म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या माई. त्यांनी आपल्या जीवनातले विविध अनुभव सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भा. रा. तांबे यांच्या ‘संध्या छाया भिवविती हृदया’ या कवितेचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या, “कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि एन.डीं.च्या सोबत केलेल्या कार्यामुळे आपल्याला ‘संध्या छाया’ची भीती वाटत नाही,” असे सांगून गांधारीला शंभर मुले होती, तर मलाही हजार मुले आहेत, असे प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारे प्रतिपादन त्यांनी केले.
“एन. डी. पाटील यांचे स्थळ येऊन लग्न ठरल्यानंतर आपल्या घरी निनावी पत्रे आली; त्यात ‘एक वेळ मुलीला विहिरीत ढकला; पण नारायणाला देऊ नका’, ‘नारायण साखळदंडातूनही पळून जाईल’, ‘त्याची परिस्थिती चांगली नाही’, ‘तो भाड्याच्या खोलीत राहतो’, असे उल्लेख होते; परंतु घरचे ठाम राहिले,” असे म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
या सोहळ्यात एन.डी. काय सांगताहेत, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. विश्रांतीचा सल्ला दिला असूनही व्हील चेअरवरून आलेल्या एन. डी. सरांनी सुरुवातीलाच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंनिसचे तोंडभरून कौतुक केले. “डॉ. दाभोलकरांनी एक मिशन म्हणून, अंधश्रद्धेच्या बिकट परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी मअंनिसची स्थापना केली, त्यात आपण स्वत:ला जोडून घेतले.” अशी भावना व्यक्त केली.
“अंधश्रद्धा निर्मूलन हे काम कर्मवीरांचेच आहे, त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. जातीपातींचे बंड मोडण्याचा प्रयत्न केला. मत्सर करून जातिभेद मिटणार नाहीत, अशी भूमिका घेतली आणि ‘रयत’ला घ्यायला लावली. त्यातूनच आधुनिक महाराष्ट्र उभा राहिला. तो आपण जपूया,” असा संदेश देतानाच त्यांनी कर्मवीरांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अखेरीस नेहमीप्रमाणे ‘हम होंगे कामयाब’ या गीताने ‘कृतज्ञता सोहळ्या’ची सांगता झाली.
एन. डी. सर ज्या साम्राज्यवादी, भांडवलदारी आणि फॅसिस्ट शक्तींविरोधात मार्क्सवादाचे हत्यार घेऊन सत्यशोधकी बाण्याने गेली 70-75 वर्षे येथील बहुजन-शेतकरी-कामगारांसाठी संघर्ष करीत आहेत. आज त्याच शक्ती सत्तेवर येऊन देशभर धुमाकूळ घालत आहेत. दिवसभराच्या या कृतज्ञता सोहळ्यातून प्रतित झालेल्या एन. डी. सरांच्या संघर्षशील जीवनप्रवासापासून या शक्तींविरोधात लढण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या अंनिस आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांना व एन. डी. सरांच्या चाहत्यांना निश्चितच मिळेल.