Categories
अभिवादन

आचार्य शांतारामबापूंना सलाम!

ऑक्टोबर - २०११

आचार्य शांताराम गरूड. इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथील समाजवादी प्रबोधिनीचा दीपस्तंभ. गेल्या महिन्यात बापूंचे दु:खद निधन झाले. स्वत: अविवाहित असलेले बापू वयाच्या 86 व्या वर्षांपर्यंत समाजासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या समाजकारणातील एक ध्येयवादी कार्यकर्ता व कृतीशील समाजवादी विचारवंत नाहीसा झाला आहे.

            विद्यार्थी दशेपासूनच बापूंनी समाजकारणास सुरवात केली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्या बापूंनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत स्वयंसेवक म्हणून काम केले. त्यानंतर कामगार व शेतकरी यांच्या विविध प्रश्नाबाबतच्या लढ्यात ते सक्रीय राहिले. गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यात त्यांनी योगदान दिले. इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांचा लढा, आणीबाणीविरोधी आंदोलन असे अनेक लढे त्यांनी दिले. 1942 च्या लढ्यात 1 महिना तसेच 1962 ते 66 पाच वर्षे तुरुंगवास व इतर अनेक लढ्यात त्यांनी कारावास भोगला.

            वाढत्या वयाबरोबर त्यांचा वैचारिक प्रवासही बदलत राहिला. राष्ट्रसेवा दल, समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेवटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशी त्यांची राजकीय वाटचाल होती. सन 1977 पासून राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे वैचारिक प्रबोधन होण्याची निकड भासल्याने त्यांनी राजकारणापासून बाजूला होऊन समाजवादी प्रबोधिनीची इचलकरंजी येथे स्थापना केली. वैज्ञानिक समाजवादाचे खुले व्यासपीठ म्हणून ही संस्था आता प्रसिद्ध झाली आहे. या माध्यमातून त्यांनी लेखन कार्यशाळा व चर्चासत्रे असे विविध उपक्रम राबविले. डाव्या विचारसरणीचे अनेक विचारवंत व राजकारणी घडविण्याचे कार्य समाजवादी प्रबोधिनीच्याद्वारे बापूंनी यशस्वीपणे केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, सिंधुदूर्ग व सोलापूर जिल्ह्यात प्रबोधिनीच्या वीस शाखा सद्या कार्यरत आहेत. सद्यस्थितीत समाजवादाचा विचार गर्जत ठेवण्याची खरी गरज आहे. अशा वेळी एका थोर प्रबोधनकाराला महाराष्ट्र मुकला. त्यांचे कार्य गतिमान ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

            समाजवादी प्रबोधिनीच्या या दीपस्तंभाला आमचा विनम्र सलाम!