Categories
परिवर्तन

आदर्श विवाह समारंभ कसे होतील?

ऑगस्ट - २०११

            धार्मिक माणसेही आपल्यासारखा विचार करू लागलीत हे कौतुकास्पद आहे. धर्माच्या चौकटीत का होईना बदल घडवू पाहणार्‍या अशोक कुलकर्णीचा लेख छापत आहोत. – संपादक

            कुठलाही समाज व समाजव्यवस्था ही त्यांच्या विवाह समारंभाच्या कौटुंबिक वातावरण, सामाजिक जाणिवा, व्यवस्थापन, परिणामकारकता व औचित्य यावरून ओळखला जातो, जितका विवाह समारंभ आटोपशीर व आनंददायी, मनाला प्रफुल्लीत करणारा, तितका तो समाज सामाजिक व मानसिकदृष्ट्या प्रबळ, प्रभावी समजला जातो! हाच प्रभावशाली समाज समाजाला नेतृत्व देऊ शकतो! समाजापुढे काही आदर्श निर्माण करू शकतो!

            समाज प्रवाहात, आपल्या जीवनाच्या निरनिराळ्या अंगात अनावश्यक, अजागळ व कालबाह्य झालेले किंवा परिणामकारकता नष्ट पावणार्‍या अनेक रूढी व परंपरा(चाली-रिती) शिरतात. व या अनिष्ठ चालीरिती नष्ट करण्याची कोणाचीच मानसिकता नसते. काही वेळेला कालप्रवाहात निर्माण झालेले रोग अथवा सामाजिक दोष, आभूषण किंवा समाजाची व जातीची वैशिष्ट्ये म्हणून, अभिमानाने मिरविण्याची विकृत मानसिकता तयार होते!

            आज लग्न समारंभात तरूण-तरूणींचा गट लग्न समारंभाविषयी गप्पा मारताना दिसतो. आमक्याच्या लग्नात ‘काय ऐश केली’(तोंडाकडे अंगठा नेऊन दारू पिण्याचा अभिनय) काय राडा घातला? कोणाला तरी लक्ष करून, कोणाची कशी फटफजिती केली. केटरर्सची, मंगल कार्यालयवाल्याची, तेथील कर्मचार्‍याची अथवा पुरोहित, यांची कशी फजिती केली, रस्त्यावर नाचून लग्न कसे वेळेवर लागू दिले नाही! बाकीच्या धार्मिक विधीला वेळ कसा मिळू दिला नाही! अशा फुशारक्या मारत असतात! लग्न समारंभात दारू पिऊन धिंगाणा करणे व नाचणे हा अविभाज्य भाग झाला आहे. बदलत्या परिस्थितीत तरूण महिला वर्ग ह्या ‘राड्यात’ सामील असतो हे विशेष! असला हिणकस प्रकार म्हणजे विवाह विधी, असा संस्कार रूढ होण्याची वेळ आली आहे! त्याचबरोबर स्त्रियांचा उणी-दुणी काढणे, मत्सर, द्वेषबुद्धी, हेवेदावे, देण्याघेण्याच्या साड्या, दागिन्याचे प्रदर्शन हा परंपरागत व्यवसाय चालू असतो! विवाह समारंभ जितका उत्कट, भावनाप्रधान, भावपूर्ण व आनंददायी, चैतन्यमय होईल तेवढेच विवाह बंधन पवित्र व मंगलमय राहील. वाढत्या घटस्फोट व गृहविच्छेदाच्या प्रकारामागे विवाह समारंभ औचित्यपूर्ण जबाबदारीने न झाल्याचा भाग आहे असे वाटते!

            एकंदरीत हिंदू धर्माला सोळा संस्कारापैकी एक संस्कार समजला जाणारा विवाह विधी हा संस्कार होतच नाही, याऐवजी हा समारंभ भरपूर ‘कुसंस्कार’ घेऊन, अजून दुसर्‍या लग्न समारंभात जास्त विकृतीची भर घालण्यासाठी संपन्न होतो!

या पूर्वी काय परिस्थिती होती?

            स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारकाचा वर्ग फारच मोठा होता. त्यांचा राजकारणावर व समाजकारणावर फार मोठा प्रभाव होता. आज राजकारण हे गुंड व पुंडाच्या हाती गेले आहे. कुठल्याही विवाह समारंभात स्वत:चा सत्कार करून घेणे, भाषण ठोकणे व जमलेल्या जमावावर उपदेशाचा डोस पाजून स्वत:चा प्रभाव दाखविणे, यापुढे राजकारण्यांना समाजाचे देणे-घेणे लागत नाही. राजकारणी गेलेल्या विवाह समारंभाला वधू पित्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली तर, पुन्हा स्मशानात जाऊन प्रेताला हार घालून सांत्वनपर व परिस्थितीजन्य भाषण ठोकतात. सद्यस्थितीत राजकारण हा निर्लज्ज व निगरगट्ट लोकांचा व्यवसाय झाला आहे. त्यांच्याकडून समाजकारणाची व समाजसुधारण्याची अपेक्षा करणे, पूर्णपणे चुकीचे आहे!

            विवाह समारंभ हा जर धार्मिक समजला तर, इतर धर्मामध्ये ‘धर्मपीठ’ हे धार्मिक बाबीला नियंत्रित करते. परंतु हिंदू समाजातील ‘धर्मपीठ’ हे पूर्णपणे समाजावर नियंत्रणासाठी निष्प्रभ केले गेले आहे. या धर्मपीठापेक्षा गंडेदोरे देणार्‍या, चमत्कार करणार्‍या व अध्यात्माचा ठोक व किरकोळ व्यापार करणार्‍या बुवा महाराजाची समाजात चलती आहे. ज्यांचा धर्मविचारच जर काल्पनिक व तकलादू असेल व हिंदू तत्वज्ञानाची विडंबना करणारा असेल, तर असे बुवा महाराज समाजाला काय देणार? अशामुळे हिंदू ‘धर्म’ हा धर्म, ‘धार्मिकता’ व ‘अध्यात्म’ ह्या संकल्पनेपासून खूप दूरवर गेला आहे. धर्मबांधवांची ‘धर्मप्रेम’ व ‘धर्माचरण’ कमी होण्याची कारणं बोगस महाराजाची दुकानदारी आहे. आज कोणीही हिंदू धर्माचा हाच अधिकृत धर्ममान्य विवाहविधी आहे. असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. काही विवाह विधी तर शाखा, पोटशाखा व जातीभेदावर आधारीत आहेत.

विवाह समारंभ व धर्मशास्त्र? :

            सध्याचे विवाह समारंभ, हे धर्मशास्त्राला धरूनच आहेत, असे सध्या धर्ममार्तंड शास्त्री, पुराणिक, पुरोहित, परंपरावादी यांचे म्हणणे आहे! याबाबत सध्याची विवाह समारंभाची विवाहसंहिता ही धर्मशास्त्राला धरून आहे? हे सिद्ध करण्याची विनंती, मी अनेक धर्ममार्तंडाला केली. यात एक गंमतीचा व संशोधनाचा भाग आहे. अनेक संस्कृत रचना त्या काळातील संस्कृत प्रतिभेचा कल्पना विलास किंवा साहित्य असावे. या धार्मिक चोपड्यांना कसलाही(बेसलेस) आधार नाही या संस्कृत चोपड्यांनी पुरती हिंदू धर्माची वाट लावली आहे. या चोपड्यांचा लेखक कोण हे माहीत नाही. प्रसिद्धीचा काळ व वर्ष लिहिलेले नाही. या चोपड्यांना तत्कालीन समाजाने, राज्यकर्त्यांनी व धर्मपीठानी मान्यता दिली, असा कोठेही उल्लेख नाही. याकरीता या चोपड्या धर्मशास्त्राला धरून किती? काळाला अनुरूप किती? काळानुसार त्यांची उपयुक्तता किती? याचा धार्मिक पातळीवर संशोधन होऊन निर्णय हवा! आपले धार्मिक नेते, फक्त पायावर डोके ठेवून घेण्यातच मग्न असतात. या चोपड्यातून इतर समाजाविषयी अवमानकारक व अवहेलनात्मक उल्लेख आहेत. या संबंधी जे विकृत लिखाण आहे ते प्रचलित समाज व्यवस्थेने नाकारावयास पाहिजे. त्याचे पुर्नमुद्रण करू नये असे बंधन घातले पाहिजे. कालबाह्य झालेले औषध, अडगळीला ठेवले तर हे हानीकारक ठरू शकते, ते वेळीच नष्ट केले तर समाजाचे आरोग्य चांगले राहील!

            सद्यस्थितीत अशा शास्त्राचा व धर्मग्रंथाचा उपयोग शून्य आहे.

            या सर्व चोपड्या व बारीक-सारीक ग्रंथ हे वेदबाह्य आहेत असे धर्मपीठाने जाहीर करावे. यामुळे धर्मावर आलेली ही बांडगुळे गळून पडतील. व धर्माचे एक उदात्त व उज्वल, सदृढ स्वरूप दिसेल. आपले दुर्दैव असे की, हिंदू धर्माचे प्रचलित विवाह विधी हे हिंदूच्या मूळ धर्मग्रंथाशी संबंधित नसून विसंगत, विकृत व कालबाह्य झालेले आहेत. दर बारा कोसाला धार्मिक संस्कार बदलतात, दर जातीला बारा पोटजाती होऊन विवाह विधी बदलतात, असा काहीसा प्रकार आहे! याकरीता सर्वच धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन धर्माचा गौरव वाढविणारी, अधिक श्रद्धा उत्पन्न करणारी मनाला चैतन्य देणारी, आध्यात्मिक आनंद देणारी उपासना पद्धती व विधी पद्धती शोधून काढून रूढ केली पाहिजे! इतर धर्मात सर्व धार्मिक विधी विषयी एकच पद्धती(युनिफॉर्म पॅटर्न) आहे.

            इतर सर्व धर्मात ईश्वराचे सामुहिक प्रार्थनेला अनन्य साधारण महत्व आहे, हिंदू धर्मात मात्र व्यक्तिगत उपासनेलाच उत आला आहे.

            धार्मिक नेते ‘शास्त्रकार’, असे म्हणतात, असे म्हणून समोरच्या माणसाला गप्प बसविण्याचा प्रयत्न करतात. काळ प्रवाहात अनेक संस्कृत शास्त्रकार झाले. त्यांची कित्येक धार्मिक विधाने एकमेकांच्या विरूद्ध आहेत व या अनाहुत व उपटसुंभ शास्त्रकारानी लिहिलेले धार्मिक नियम पाळावेत असे बंधन राहिलेले नाही. मग या मोडीत निघालेल्या भांड्यात पाकसिद्धी करण्याचा आग्रह का? यामागे फार मोठे कारण आहे. या चोपड्याचा आधार घेऊन धर्माचे ज्ञान मलाच आहे, असे सांगून स्वत:चे धार्मिक अस्तित्व टिकविण्याचा व आर्थिक स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे धर्माचे ज्ञान केवळ मलाच आहे. अशी एकाधिकारशाही निर्माण होते.

            धार्मिक विधी करणार्‍यांने संस्कृत भाषेचा दुराभिमान का धरावा? हे कळून येत नाही. हा लढा ज्ञानेश्वर माऊली पासून आजतागायत चालू आहे. माऊलींनी हिंदूचे तत्वज्ञान माय मराठीत आणले. हिंदू धर्मातील बहुजनात धर्मप्रेमाची संस्कृती जागवली. सर्व सामान्यांना दिव्य आध्यात्मिक प्रेरणा दिली. मग मराठीतून विधीमंत्र म्हणावयास धर्मपंडिताचा का विरोध आहे. हेच कळत नाही! धर्मपीठानी सर्व विधी व उपासना करणार्‍या व्यक्तीला समजेल अशा भाषेतून विधी करण्याचे बंधन घालावे. धर्मविधीची संकल्पना, औचित्य, कार्यकारणभाव समजला तर मनुष्य अधिक श्रद्धावान होईल.

विवाह समारंभ आहे तरी काय? :

            वास्तविक पाहता विवाह समारंभ हा अतिशय उच्च दर्जाचा सामाजिक, कौटुंबिक सोहळा आहे. नववधू येणार हा आनंद वरपक्षाकडे असला तरी, वधू पक्षाकडे विरह, असहाय्यता, अनिश्तिता, त्याग याचे दु:ख असते. वधू पक्षाकडील लोकांचे दु:ख कमीत कमी करून विश्वास देणे, वरपक्षाकडील लोकांचे कर्तव्य आहे!

            विवाह समारंभ व विधी हा एक पवित्र अविस्मरणीय व वधू-वराच्या आयुष्यात येणारा अत्यंत धीरगंभीर व आनंददायी, चैतन्यदायी क्षण आहे. दोन कुटुंबे, त्यांचे नातेवाईक, स्नेहीजण हे मानसिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या समपातळीत आणणारा उज्वल प्रसंग आहे. दोन्ही कुटुंबाचे मानसिक व भावनिक मीलन साधण्यासाठी हे स्नेहसंमेलन आनंदमेळा व चैतन्ययात्रा आहे. तसेच वधू-वरांचे योग्य मानसिक मनोमिलन व्हावे यासाठी प्रेरणा देणारा हा क्षण आहे.

            विवाह समारंभ हा वधूच्या असीम सर्वस्वाच्या त्यागाचा प्रसंग, हा प्रसंग तितकाच गंभीर असावा. वधू पक्षाकडील मानसिक भावुकतेचे संवर्धन होऊन, वरपक्षाकडे चैतन्यदायी आनंद निर्माण व्हावयास पाहिजे. दोन्ही कुटुंबाकडील आप्तस्वकीय व स्नेहीजन यांच्यात एका आनंदी क्षणाची अनुभुती निर्माण करावयास पाहिजे. या ऐवजी कालबाह्य विधी पद्धती व आचरट समारंभ पद्धतीमुळे विवाह समारंभाचे विकृतीत रूपांतर होते. काही टारगट लोकांच्या विकृत आनंदामुळे समारंभास आलेली संवेदनाशील माणसे असहाय्य होतात!

आजचा विवाह समारंभ कसा आहे? :

            आजचा विवाह समारंभ, हा एक कालबाह्य झालेला संस्कार आहे. अनेक धर्मबाह्य बाबी या विधीत बेमालूमपणे मिसळल्या आहेत. आर्य समाजाचे प्रवचनकार कै.उत्तमकुमारजी मुनीश्री हे प्रचलित विवाह पद्धतीवर टीका करीत. ते म्हणत सनातन धर्मात वधू-वरांचा विवाहच होत नाही. तो तर केवळ वर्‍हाडाचा(बाराती) विवाह समारंभ होतो!

            रस्त्यावर स्त्री-पुरूषांनी वेडेवाकडे व बिभत्स हाव-भाव करून नाचणे, बँडवाल्यांनी द्वयअर्थी व अश्लील गाणी वाजविणे व रस्त्यावरील आंबट शौकिनांनी हा फुकटचा रोडशो चविष्टपणे पाहणे. स्त्रियांनी दहा वेळेस दागिने व साड्या बदलणे. एवढ्यावरच विवाह समारंभाची सांगता होते!

            मुळांत हिंदू धर्माप्रमाणे विवाह विधी हा अभिवचन व शपथविधी आहे. वधू-वरांनी पंचमहाभुताच्या साक्षीने एकमेकांना वचनबद्ध करण्याचा हा क्षण आहे. (देवा, ब्राह्मणासमक्ष, ही घुसडलेली व्याख्या आहे.) एकमेकांच्या कर्तव्य व हक्क याची जाणीव करून देण्याचा विधी आहे. हा शपथविधी झाल्यानंतर जमलेल्या सर्व नातेवाईकांनी व स्नेह्यांनी तथास्तु म्हणून शब्दरूपाने व अंत:करण पूर्वक वधू-वरांच्या वैवाहिक आयुष्याला आशिर्वाद व प्रेरणा द्यावयाची आहे. असा जर आदर्श समारंभ झाला, तर तो उभयपक्षी आनंददायक ठरेल!

ह्या अनिष्ठ बाबी टाळू शकता?

            विवाह विधीत धर्मशास्त्रात न सांगितलेल्या अनेक बाबी कालप्रवाहात समारंभ प्रियतेमुळे त्या काळात करमणूक माध्यम नसल्यामुळे, रूढी व परंपरा पालन करण्याची आंधळी मनोवृत्ती, यातून निर्माण झालेली आहे!

1) विवाह समारंभापूर्वी मारूतीचे दर्शन, सिमांत पूजन अथवा विवाह विधीपूर्वी मारूतीच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात धर्मशास्त्राला धरून नाही. गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी ब्रम्हचारी असलेल्या मारूती देवतेकडून काय म्हणून आशिर्वाद घ्यावयाचे? ही एक देवतेच्या तत्वज्ञानाची विटंबना आहे. हा कार्यक्रम केवळ रस्त्यावर नाचकाम करण्यासाठी उपयोगात आहे!

2) पाय घड्या घालणे/विहिणीचे पाय धुणे : वधूच्या आईकडून वराच्या आईचे पाय धुणे ही कालबाह्य झालेली कल्पना आहे व स्त्री जातीचा मानहानीचा विचार आहे. कारण स्त्री मुलीला जन्म देते, हे काय पाप आहे काय? आज समान हक्काच्या काळात सुशिक्षित स्त्रियांनी हा कार्यक्रम रद्द करावा.

3) वारंवार स्त्रियांचे कपडे बदलणे व दागिन्याचे प्रदर्शन टाळणे : वारंवार साड्या बदलण्याने साड्यांचा संग्रह वाढतो. व दागिन्याच्या प्रदर्शनाने चोर्‍यांचे प्रमाण वाढते. स्त्री ही शोभेची बाहुली नाही. ती एक पुरूषाइतकीच कर्तृत्ववान आहे. तर स्त्रियांनी नट्टा-पट्टा व स्त्री देहाचे प्रदर्शन स्वत:हून टाळावयास पाहिजे! पुरूष एकाच कपड्यावर विवाह विधी पार पाडतो तर  स्त्रियांनी का दहा वेळेस साड्या व कपडे बदलावेत?

4) सुनमुख बघणे : ज्यावेळेस वधुचे तोंड बघणे दुरापास्त होते. त्यावेळेची ही प्रथा आहे. आता ती कालबाह्य झालेली आहे.

5) बँड व बँजो बाजा वाजविणे : यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होतो. मंगल कार्यालय, शेजारी आजारी व्यक्ती व लहान मुले यांना त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर फटाके व बॉम्ब फोडणेही टाळावे, यासाठी मंगल कार्यालयाच्या परिसरातील लोकांनी कायदेशीर बंधन आणावे, या ऐवजी सनईची व मंगलवाद्याची कॅसेट वापरावी. वास्तविक पाहता बँड व रणवाद्य हे पाश्चिमात्य देशात परेड व अंतयात्रेत वापरावयाचे वाद्यवृंद आहे.

6) देण्या-घेण्याच्या साड्या व ब्लाऊज पीसचा घाऊक व्यापार बंद करावा. देण्या-घेण्याच्या साड्या एकही स्त्री नेसत नाही. दुसर्‍यांनी पसंद केलेली साडी स्त्रियांनी नेसण्याची मानसिकता नसते. केवळ एका समारंभातून दुसर्‍या समारंभात साड्या फिरत राहतात. हा साड्यांचा प्रवास थांबवावा व पुस्तके भेट द्यावी.

7) वधुला हार घालण्यासाठी उड्या मारावयास लावणे हा स्त्रीचा मानभंग आहे.

8) अजागळ व किळसवाण्या अश्लिल कॉमेंटस् पास करणे बंद करावे. प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी तरूण वर्गाची तोंडे बंद करावी.

9) अक्षदांची उधळपट्टी : अक्षदा ऐवजी तथास्थु म्हणावे अथवा टाळ्या वाजवाव्यात. जी तांदळाची बचत होईल ते धान्य अंधशाळा, वृद्धाश्रम, मूकबधीर शाळा यांना दान द्यावे.

11) मंगलाष्टका म्हणताना वधू-वराला कव्हर करून जमलेल्या लोकांकडे पाठ करून उभे राहणे बंद करावे.

12) जेवणाचा आग्रह न करणे इष्ट आहे. जो तो आपल्या मर्जीप्रमाणे पोटभर जेवू शकतो. अशा प्रसंगी आग्रह कशासाठी?

13) मंगल कार्यालयातील व्यवस्थापक, नोकर यांची कुचेष्टा किंवा मानहानी टाळणे.

14) लग्न समारंभ एकदिवशीय ठेवून संध्याकाळचा हमखास दारू पिण्याचा कार्यक्रम टाळणे.

15) वृद्ध अपंग, आजारी, लहान बालके व त्यांच्या माता यांना लग्न समारंभाला नेऊ नये.

16) बूट चोरण्याचा फिल्मी ड्रामा टाळावा.

17) देण्या-घेण्याच्या साड्याचा व गिफ्ट व आहेर उपचाराचा प्रघात टाळल्यास लग्न समारंभाच्या मानसिक तणावातून सर्वांची मुक्तता होईल. वाचन संस्कृती वाढण्यासाठी व चांगले संस्कार होण्यासाठी वधू-वर पक्षातर्फे सर्व उपस्थितांना पुस्तके भेट द्यावीत व पुस्तकावर वधू-वरांच्या स्वाक्षर्‍या असाव्यात. यामुळे विवाह समारंभ चिरंतन स्मृतीत राहील. वधू-वरांना नातेवाईकांनी अथवा स्नेह्यांनी मोठ-मोठ्या दुकानांची किंवा मॉलची गिफ्ट कुपन द्यावीत. त्यामुळे वधू-वर आपल्या आवडीप्रमाणे व त्यांच्या संसाराला आवश्यक वस्तू खरेदी करतील. नाही तर लग्न समारंभात दहा-पंधरा घड्याळे, चार कुकर व अनावश्यक शोभिवंत वस्तू व भांडी जमा झाली. तर वधुवरांना त्याचा काय उपयोग? काही वेळेला भिंतीवर लावावयाच्या शोभिवंत   वस्तूला घराच्या भिंतीच अपुर्‍या पडतात.

20) लग्न समारंभानंतर सत्यनारायण नावाचा विधी केला जातो. हा ऋतूशांती किंवा गर्भादान या संस्काराचा कोडवर्ड निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता या संस्काराचा व सत्यनारायणाचा कोठेही संबंध नाही. ही एक धार्मिक चालबाजी आहे.

21) विवाहाच्या वेळेस स्मरणिकेचे प्रकाशन करावे. सर्व नातेवाईकांची माहिती त्यात द्यावी.

22) उपस्थितांनी एकमेकांचा परिचय करून देण्याचा कार्यक्रम ठेवावा.

23) यशस्वी दाम्पत्यांनी आपले अनुभव कथन करावे व नवोदित वधु-वरांना मार्गदर्शन करावे.

वैवाहिक जीवन यशस्वी करण्याची जबाबदारी उपस्थितांची:

            विवाह समारंभास उपस्थित असलेल्या व्यक्तीने वधुवरांचे वैवाहिक जीवन उज्वल व्हावे, यासाठी प्रयत्न करावे. मार्गदर्शन करावे. उत्तेजन द्यावे. प्रसंगी महत्वपूर्ण मानसिक आधार द्यावा. विवाह समारंभातील इतर बाष्कळ गोष्टी टाळून, जी दाम्पत्य यशस्वी आहेत, त्यांचे अनुभव नवविवाहितांना व उपस्थितांना सांगावेत! वधु-वरांच्या जीवनात काही अडथळा येत असेल तर तथाकथीत उपस्थितजण काहीच दखल घेत नाहीत, तर तो एक सामाजिक गुन्हा ठरेल. उपस्थितांनी केवळ विवाह समारंभास उपस्थित राहून भोजन करायचे औपचारिकता पूर्ण केली. असे म्हणावे लागेल! याकरिता विवाह समारंभातील सर्व उपस्थितांनी पत्राद्वारे, दूरध्वनीद्वारे, वधु-वरांशी संपर्क ठेवावा. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा द्याव्यात व काही अडचण असल्यास त्यामध्ये वडिलकीच्या नात्याने व स्नेहीजन म्हणून नवदांपत्यास मार्गदर्शन करून वधु-वराच्या जीवनातील पुढील आपत्ती टाळण्यासाठी मार्गदर्शन करावे! विवाह समारंभास उपस्थिती ही शोभनीय व प्रदर्शनीय बाब न राहता वधु वरांच्या वैवाहिक यशस्वीतेसाठी निरंतरची नैतिक जबाबदारी असावी! असा एक विचार प्रकर्षाने पुढे येत आहे. आपण महाअधिवेशन बोलावतो. समाज सुधारणा व वैचारिक प्रगती याबाबत काहीच निर्णय घेत नाही. रस्त्यावर ढोल बडवून अथवा लाखोच्या भोजनावळी उठवून सामाजिक क्रांती होत नसते. त्यासाठी गरज आहे विचारवंतांची, सक्रिय कार्यकर्त्यांची व परिवर्तनाची इच्छाशक्ती  जागविणार्‍या नेत्यांची!

अशोक कुलकर्णी (बेंबळीकर)