कर्जत येथील जोगेश्वरवाडीतील 13 वर्षे वयाच्या धनराज (विशाल) दत्तात्रय वीर हा दैवी चमत्काराचा दावा करून भोंदूगिरी करत होता. अंनिसकडे आलेल्या तक्रारीवरून अंनिसचे कार्यकर्ते अॅड.रंजना पगार-गवांदे व कृष्णा चांदगुडे यांनी बाबाच्या दरबारात जाऊन पर्दाफाश केला.
कर्जत जवळील जोगेश्वरवाडी येथे धनराज वीर हा इयत्ता 7 वीतील अल्पवयीन मुलगा मला दैवीशक्तीचा आदेश आहे म्हणून मी शिक्षण सोडावे, असे सांगून त्या दैवीशक्तीच्या आधारे भोंदूगिरी करत होता. अपत्यहिन स्त्रियांना मूल देतो, सर्व प्रकारचे आजार बरे करतो तसेच इतरही कौटुंबिक समस्या सोडवितो असा दावा करत होता. उपचारासाठी येणार्या लोकांना उपचाराच्या नावाखाली मारहाण करत होता तसेच प्रत्येकाकडून कमीत-कमी 100 रूपये घेऊन त्यांना गंडेदोरे, राख, लिंबू देत होता. हे सर्व करण्यात त्याचे आई-वडील, आजी व इतर कुटुंबियांचा सहभाग होता. येणारी गर्दी व झालेली कमाई याच्या जोरावर बाबाने नवीन आश्रमाचे काम चालू केले होते. अनेक चमत्कारांचा दावा तो करत होता.
अंनिसचे कार्यकर्ते अॅड.रंजना पगार-गवांदे व कृष्णा चांदगुडे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह पोलिसांची मदत घेऊन बाबाचा दरबार गाठला व सत्यशोधन केले. बाबास प्रश्नांची सक्ती करून आव्हान दिले. त्यातून बाबाने व त्याच्या कुटुंबियाने सपशेल माघार घेतली. बाबाला व कुटुंबियांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी विनाशर्त माफीनामा लिहून दिला. यानंतर दैवी चमत्काराचा दावा करणार नाही व त्याआधारे लोकांची फसवणूक करणार नाही, असे लिहून दिले. अज्ञात धनराज वीर(भोंदूबाबा) याचे वय, अर्धवट शिक्षण व त्याच्या भविष्याचा विचार करून समितीच्या कार्यकर्त्यांनी माफीनामा लिहून घेतला. त्याच्या कुटुंबियाला शिक्षणाचे महत्व पटवून देऊन धनराजला पुन्हा शाळेत घालण्याचे लेखी आश्वासन घेतले.
याकामी अंनिस कर्जत शाखेचे कार्यकर्ते शब्बीरभाई पठाण, हिरामण येळपणेकर, भा.सो.साळवे, निर्मला चौगुले, सवितार सुद्रीक, कपील यादव, राधिका मिसाळ, शोभाताई पवार आदींनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, सहाय्यक पो.नि.लक्ष्मण राख, कॉ.प्राजक्ता साळवे, पो.कॉ.क्षीरसागर यांनी केले.
-शब्बीरभाई पठाण