Categories
भांडाफोड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून लुबाडणार्‍या भोंदूबाबाचा भांडाफोड

मे - २०१४

जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत राज्यात 50 गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून या कायद्याची उपयुक्तता व अनिवार्यता सिद्ध होते. तथाकथित बाबा-बुवांना आता या कायद्याचा वचक वाटू लागला आहे. पुण्यात मार्च महिन्यात या कायद्यांतर्गत अतुल आप्पासाहेब शितोळे उर्फ अतुलबाबा या बुवावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लुबाडणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्या बुवाविरूद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. अंनिस कार्यकर्त्यांमुळे या बाबाचा भांडाफोड झाला आहे.

ज्या मुलीवर अत्याचार झाला तिच्या भावाला लहानपणापासून मधुमेहाचा आजार होता. अनेक वैद्यकीय उपचार करूनही तो आजार बरा झाला नाही. या मुलाची आई व बहीण एकदा सासवड जवळील दिवे घाटात असलेल्या एका मंदिरात गेल्या होत्या. तिथे त्यांची या बाबाशी भेट झाली. ‘तुमच्या मुलावर कोणी तरी करणी केली आहे. ती करणी काढून मी तुमच्या मुलाला पूर्ण बरे करतो.’ असे गोड गोड बोलून वाघमारे(नाव बदलले आहे) कुटुंबियांशी ओळख वाढविली. वाघमारे बाई आणि त्यांच्या मुलीचा मोबाईल नंबर घेऊन सतत त्यांच्या संपर्कात राहिला. तो दर शुक्रवारी त्यांना कानिफनाथाच्या मंदिरात बोलावून अंगारे धुपारे करित असे. वाघमारे कुटुंबियांशी सलगी वाढल्यानंतर त्याने एक दिवस पीडित मुलीला फोन करून मी तुझे कॉलेज प्रवेशाचे काम करून देतो असे सांगून तिला सेनापती बापट रोडवर बोलविले. नंतर तिला कारमधून लवासाला नेले. तेथे तिला. तलवारीचा धाक दाखवून गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. या गोष्टीची वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांना संपवून टाकीन अशी धमकीही त्याने त्या मुलीला दिली.

यानंतर माझे तुझ्यावर प्रेम आहे. आणि आपण लग्न करू असे त्याने तिला सांगून एका मंदिरात जाऊन तिच्याबरोबर खोटे लग्न केले. 18 वर्षांखालील युवतीशी लग्न करण्याचा गुन्हाही त्याने केला. तसेच त्याचे अगोदरच लग्न झालेले असल्यामुळे हे दुसरे लग्न बेकायदेशीर ठरते. परंतु आता आपले लग्न झालेले आहे असे सांगून त्या मुलीशी अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले. तसेच पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे. त्यासाठी तिला 5 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगून त्या मुलीकडून घरातले 18 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 50,000 रुपये रोख लंपास केले. ज्यावेळी मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शितोळे बाबाशी संपर्क साधला असता त्याने त्यांना दमबाजीची भाषा वापरत सांगितले की, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. त्या बाबाची मोठी आर्थिक ताकद तसेच रजकीय क्षेत्राशी असलेले संधान पाहून काय करावे हे वाघमारे कुटुंबियांना समजेना. त्या बाबापुढे आपली ताकद अत्यंत कमी आहे हे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी अंनिसच्या पुणे शाखेशी संपर्क साधला. राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव यांनी त्यांची कैफियत ऐकून त्यांना लेखी तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यांनी तशी लेखी तक्रार दिल्यानंतर मिलिंद देशमुख व दीपक गिरमे यांनी त्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला नेऊन एफ.आय.आर.दाखल करण्याविषयी मार्गदर्शन केले. एफ.आय.आर.दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पहाटे 3 वाजता शितोळे बाबाला आकुर्डी येथील घरातून अटक केली. तसेच त्याच्याकडे असलेल्या तीनही कार जप्त करून आणल्या. दुसर्‍या दिवशी त्या मुलीची जबानी त्या आरोपीसमोरच घेण्यात येत होती. त्यावेळी तेथे गेलेल्या दीपक गिरमे व माधव गांधी यांनी त्या गोष्टीला हरकत घेऊन महिला पोलिसांकरवी तिची स्वतंत्र जबानी घ्यावी अशी मागणी केली. त्याप्रमाणे कार्यवाही होऊन शितोळेबाबावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. आजपावेतो हा खटला चालू असून शितोळेबाबा जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शितोळेबाबाचे जे साथीदार होते त्यांनाही अटक करून त्यांच्यावरही खटला दाखल करावा अशी मागणी फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी केली आहे. या बाबाची इतरही काही प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सक्रिय पाठिंब्यामुळे पीडित मुलीने या भोंदूबाबाविरोधात फिर्याद देण्याचे धाडस दाखविले. तिच्या या धाडसाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. अशा प्रकरणात पीडित महिला तक्रार देण्यास सहसा पुढे येत नाहीत. शितोळेबाबाकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनीही डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे येथे तक्रार नोंदवावी असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी केले आहे.

श्रीपाल ललवाणी

लेखक संपर्क : 9823977472