Categories
कव्हर स्टोरी

अम्मा भगवानांच्या फोटोतून मध, कुंकू-भुक्कड चमत्कार!

एप्रिल - २०११

‘अम्मा भगवानांच्या फोटोतून मध, कुंकू येऊ लागले.

            ही बातमी कर्णोपकर्णी गावात पसरली, तिथून तालुका-जिल्हा-राज्य-देश आणि पुढे जगभर पसरली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला येऊ लागल्या. ज्या भक्ताच्या घरी फोटोतून मध येत होता, त्याचे अक्षरश: उखळ पांढरे झाले. पैसा ठेवायला पोती कमी पडली.’

            अशा स्वरूपाची बातमी प्रसारमाध्यमात झळकेल असे वाटत होते. कारण भारतातले वातावरण चमत्कारांना पोषक आहे. पण घडले उलटेच! त्याचा हा रिपोर्ट.

            पंधरा वर्षांपूर्वी धिरेंद्र ब्रम्हचारी नावाच्या भोंदूबुवाला अटक झाली. आणि दिल्लीतले गणपती दूध पिऊ लागले. चमच्याने दूध पाजत असूनही त्यांचा दूध पिण्याचा वेग एवढा प्रचंड होता, की दुपारपर्यंत दिल्लीतले दूध संपले. तोपर्यंत सार्‍या भारत वर्षांत गणपती दूध पिऊ लागले होते. गणपतीबरोबर शिवगणातल्या इतर मूर्तीही दूध पिऊ लागल्या. महाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्री मनोहर जोशींचा गणपती दूध प्याला. निवडणुकीत क्रांतिकारक सुधारणा घडवणार्‍या आयुक्त शेषन यांचा गणपतीही दूध प्याला. संध्याकाळपर्यंत दूध पिणार्‍या गणपतींनी देशाच्या सीमा ओलांडल्या; इंग्लंड अमेरिकेतले गणपतीही दूध पिऊ लागले.

            वरील बातमीच्या तुलनेत फोटोतून येणार्‍या मधाला फारशी किंमत मिळाली नाही. ही बातमी तालुका ओलांडून जिल्ह्याच्या गावी यायला तब्बल दोन महिने लागले.

            कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात सावर्डे गाव आहे. कोल्हापूर पासून वीस पंचवीस किलोमीटर अंतर!

            दोन मार्चच्या लोकमतमध्ये अम्मा भगवानांच्या फोटोतून मध आणि कुंकू वाहात असल्याची बातमी वाचनात आली. मधमाशाविना मध मिळण्याचा हा अफलातून चमत्कार ‘याचि तेही याचि डोळा’ पाहावा म्हणून कोल्हापूरहून निघालो. कोल्हापुरातून पेठ वडगावला जायला बस आहे. 25 रू.चा पास काढला की, दिवसभर फिरता येते. खचाखच भरलेल्या बसमध्ये सुरुवातीच्या स्टॉपवर चढल्यामुळे लवकरच बसायला जागा मिळाली. दीड तासाने पेठवडगाव आले. बसमध्ये शेजार्‍याकडून ‘सावर्डे’ गावची  माहिती मिळविली होती. त्यानुसार लगेच वडापची रिक्षा शोधली. वडाप रिक्षाही इतकी भरली होती की, रिक्षा ड्रायव्हरला बसण्यासाठी त्याची एक चतुर्थांश सीट फक्त शिल्लक होती. एवढ्या अडचणीतून रिक्षा चालवतानाही अधून मधून तो मोबाईलवर बोलत होता. त्याला पत्ता विचारल्यावर त्याने सल्ला दिला, “आज काय यून उपयोग न्हायी, मंगळवारी सत्संग असतोय, तवा या! आज कोन भेटणार?”

            ‘एवढ्या लांबून आलोय तर दर्शन घेऊन जातो’ म्हटल्यावर त्याने अर्धातास चालावे लागेल याची कल्पना दिली. रिक्षातून उतरल्यावर प्रत्येक फाट्यावर विचारत जावे लागले. रस्ता दाखवणार्‍या प्रत्येकाची मते मात्र भिन्न होती. मुख्य रस्त्यापासून सुमारे वीस मिनिटे चालल्यावर अम्मा भगवानांचे स्थान आले.

            सावर्डे गावची वस्ती पाच हजार! गावापासून तीन किलोमीटरवर शिवाजीनगर-पोवार मळा म्हणून वस्ती आहे. पोवार भावकीतील सुमारे वीस घरे अनेक वर्षांपासून तिथे वास्तव्य करून आहेत. चहूबाजूंनी सपाट शेती; ऊस नुकताच गेलेला. समोरच शरद साखर कारखाना दिसतो. वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. घरे बर्‍यापैकी सिमेंटची-सुखवस्तू आणि कष्टाळू लोकांची! प्रशस्त अंगण; तेही स्वच्छ आणि नीटनेटके!

            अशा वस्तीत विद्या दिनकर पोवार हिने अम्मा भगवानाची सेवा सुरू केली. सात आठ महिन्यांपूर्वी तिला अनिल पोवार यांच्याकडून अनुग्रह आणि छोटी मूर्ती मिळाली. त्यांना ती काका म्हणते.

            रस्त्यात भेटलेल्या दहावीच्या मुलाने मला घरापर्यंत नेले, आणि पुढे होऊन घरच्यांना मी आल्याचे सांगितले. विद्या आणि तिचे वडील दारात आले. मी अंगणात चप्पल काढेपर्यंत ‘या या’ म्हणून त्यांनी स्वागत केले. ‘मी दर्शनासाठी आले आहे’ म्हटल्यावर त्यांनी ‘अम्मा भगवान आत आहेत, आत या’ म्हटले. दर्शन घेण्याची माझ्यापेक्षा त्यानाच घाई दिसली. तेव्हा मीच म्हटलं, ‘पाय तरी धुतो!’

            पांढर्‍यामातीने सारवलेले घर! पंधरा फूट लांबीच्या खोल्या! आतल्या खोलीत एका कडेला अम्मा भगवान यांची अडीच फूट उंचीची फोटो फ्रेम! पायथ्याला लहान फोटो! त्यात एक केवळ अम्मांचाच क्लोज अप!

            मध येणारा फोटो वेगळा आणि कुंकू येणारा वेगळा! मध एका फोटोतून गेले तीन महिने येतो आहे तर कुंकू गेल्या पंधरा दिवसांपासून! मध आणि कुंकू येणारे फोटो वेगवेगळे असल्याने त्यांची सरमिसळ होत नाही; नाहीतर कुंकूयुक्त मध चाखावा लागला असता आणि मधयुक्त कुंकू कपाळावर थापावे लागले असते. “अम्मा भगवानांना भक्तांची काळजी असल्याचाच हा पुरावा आहे.” हे ऐकून मी धन्य झालो.

            मध किंवा कुंकू येण्यासाठी त्या त्या फोटोखाली छोटे ताट ठेवले होते. फोटो छोटे असल्याचा हा फायदा होता. मोठ्या फोटोतून मध पडू लागला तर फोटोखाली ठेवायला एवढे मोठे ताट आणणार कुठून? अम्मा भगवानांच्या या दूर दृष्टीवरही आम्ही चर्चा केली.

            मंगळवारी बाहेरच्या मोकळ्या जागेत दोन अडीच हजार भक्त जमत असल्याची माहिती मिळाली. बाहेरच्या प्रशस्त अंगणातच सत्संग चालतो. सात आठ फुटाच्या लोखंडी स्टेजवर फोटो ठेवला जातो. ती जागा पाहायला मिळाली. मोकळी जागा दोन अडीचशे माणसे बसतील अशी आहे.

            दुसर्‍या दिवशी लोकमतमध्ये दाभोलकरांची प्रतिक्रिया आली. फोटो स्वच्छ धुवून, पुसून ठेवू आणि सतत 24 तास निरीक्षण करू! मग मध आला तर त्याला आपण चमत्कार म्हणू! अशा चमत्कारासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 21 लाख रूपयांचे बक्षिस ठेवले आहे. “हे आव्हान स्वीकारा!”

            अं.नि.स.कोल्हापूर शाखेतर्फे पत्रक काढले. तेही छापले गेले. कलेक्टर आणि डी.एस.पी.ना निवेदने दिली. त्यात म्हटले होते- “…. असा मधमाशाविना मध मिळत असेल तर अम्मा-भगवांनाचे फोटो छापण्याचा कारखाना काढावा. अनेक फोटोतून मध गळू लागला की, त्याचा वापर आरोग्य वाढवण्यासाठी करता येईल. मध परदेशी पाठवून परकीय चलन मिळवता येईल.

            किमान चमत्कार सिद्ध करून भक्त 21 लाख रूपये मिळवू शकतील. भक्तांना आर्थिक लाभ होईल! वरील दोन्ही बाबी होणार नसतील तर ही भोंदूगिरी आहे समजून पोलीस खात्याने कारवाई करावी; फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.”

            अनिल चव्हाण रमेश वडणगेकर, अरूण पाटील, सतीशचंद्र कांबळे, धनाजी जाधव, शिवाजी शिंदे यांच्या शिष्ट मंडळाने निवेदन दिले. त्यात जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव परूळेकरही सामील झाले.

            तिसर्‍या दिवशी पुन्हा संपर्क साधला तेव्हा कळले की, चमत्कार बंद झालाय! “भक्तांना त्रास होऊ नये म्हणून अम्मा भगवानांनी स्वत:च मध आणि कुंकू गाळण्याचे बंद केले आहे.”

            सर्व काही भक्तांसाठीच करणार्‍या अम्मा भगवानांच्या काही साधकांची भेट घेतली.

            कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसरात हायस्कूलमागे राहणार्‍या ‘वहिनी’ म्हणाल्या, “आमच्याकडेही अम्माचे पादूका पूजन होत असे. मी पदरचे पैसे घालून लग्न सोहळा, वाढदिवस केला. आमच्या इथे हॉल भरून भक्त येत असत. पण ‘इंडियन न्यूज’वर तो कार्यक्रम दाखवला. तेव्हापासून लोक यायचे बंद झाले. तेव्हापासून कोल्हापुरातले निम्मे सत्संग बंद पडले.”

            “तो कार्यक्रम” म्हणजे चेन्नईतील भाविकांची गर्दी! पोलिसांचा हस्तक्षेप; आणि दर्शनासाठी हजारो रूपये फी! अध्यात्मिक भोंदूगिरीचा रतीब घालणार्‍या टी.व्ही.चॅनलवर आपण टीका करतो; पण अशीही चॅनेल्स आहेत जे बुवाबाजी बंद करू इच्छितात! त्यांचीही दखल आपण घेतली पाहिजे.

            या ‘वहिनी’ पैसे घालून चेन्नईला जाऊन आल्या होत्या. इतक्या वर्षात आपले घातलेले पैसे तरी निघायला हवे होते अशी त्यांची अपेक्षा होती. धनलाभ व्हावा, धंदा व्यवस्थित चालावा, नोकरी मिळावी, नोकरीत बढती मिळावी, मुले शिकावीत, आजारपण नाहीसे व्हावे अशा उद्देशाने लोक अम्मा भगवानाना पुजतात अशीही माहिती त्यांनी दिली. कोल्हापुरातील ओसवाल नावाच्या गृहस्थांनी त्या वहिनींच्या मिस्टरांना हा रस्ता दाखवला! छोटा फोटो देऊन पुजायला सांगितले; अडीच हजार रूपयात  चेन्नईला नेऊन दर्शन घडवले पण त्याचा उपयोग झाला नाही. आणि त्यांच्या घरातील सत्संगही बंद पडला.

            अनेक विवंचनांनी गांजलेले भक्त अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर येणे अवघड दिसते; ते बुवा बदलत त्याच चक्रात फिरत राहातात.

            या मध गळण्याच्या चमत्कारातून काही निष्कर्ष काढणे शक्य आहे.

            अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटना, इंडियन न्यूजसारखी चॅनेल्स, लोकमतसारखी वृत्तपत्रे यांनी प्रयत्न केले तर बुवाबाजीला आळा घालणे शक्य आहे. हे प्रयत्न वाढवले पाहिजेत.

            गणपती दूध पिण्याच्या चमत्काराप्रमाणे मध गळण्याचा चमत्कार वेगाने सर्वत्र पसरला नाही. त्यामागे वरील संघटना-वृत्तपत्रे-चॅनेल यांचे प्रबोधन कारणीभूत आहे. त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीने लोकांना शहाणे केले आहे.

            अम्मा भगवानांच्या सत्संगाला आसपासच्या गावचे, जिल्ह्यातले अम्मा भगवानांचे भक्तच गर्दी करताहेत; बाहेरचे सामान्य लोक कमीच!

            पोलिस खात्याने अंनिसच्या तक्रारीची वाट पाहाण्याची गरज नाही. अशा भोंदूगिरीवर त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलन आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये आहे. नवीन शैक्षणिक प्रवाहामध्ये विचार करणे, सृजनशिलता, प्रश्न निर्माण होणे, प्रयोग करणे, संशोधन प्रकल्प करणे इत्यादी गोष्टींना महत्व आहे, त्यांचे प्रभावी अध्यापन झाले पाहिजे.

चमत्कार झाला म्हणण्यापेक्षा “चमत्काराकडे बहुसंख्य लोकांनी, वृत्तपत्रांनी आणि चॅनेल्सनी दुर्लक्ष केले; त्यात काही तथ्य नाही म्हणून त्याला आजिबातच भाव दिला नाही.” हीच या घटनेतील मोठी बातमी आहे.

– अनिल चव्हाण