Categories
विशेष

विवाहातील कर्मकांडावर विचार तर कराल?

एप्रिल - २०११

हिंदू धर्मात प्रचलित असलेल्या विवाहपद्धतीत देवदेवक (पुण्याहवाचन), गौरीहरपूजन, मंगलाक्षता, कन्यादान, लाजाहो आणि सप्तपदी या विधींचा सर्वसामान्यपणे समावेश होतो आणि असा साग्रसंगीत विवाह झाला की ‘वैदिक पद्धतीनं विवाह केला’ असं अभिमानानं मिरवलं जातं. हिंदी पिक्चर्स मध्येसुद्धा जो विधी दाखवल्याशिवाय विवाह किंवा लग्न पार पडत नाही तो, सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे होमाभोवती म्हणजेच यज्ञकुंडाभोवती सात फेरे घेणं. या होमाला लाजाहो म्हणतात आणि या होमात वधूच्या भावानं वधूच्या हातात दिलेल्या लाह्या वरानं आपल्या हाती घेऊन मंत्रोच्चारांनुसार अग्नीला अर्पण करायच्या असतात. आश्वलायन गृह्यसूत्रात पहिल्या अध्यायाच्या सातव्या खंडात विवाहविधी सांगितला आहे. त्यात लाजाहोमासंबंधी तीन देवांच्या ताब्यातून वधूला मुक्त करण्यासाठी त्यांना भाजलेल्या लाह्या दंड म्हणून दिल्या अशी कथा आहे. काळानुसार कर्मकांडात प्रतीकं कशी घुसतात आणि त्यामुळे त्यामागचा मूळ अर्थ कसा लोप पावतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा होम वस्तुतः ‘लज्जाहोम ’ आहे

आणि होमातल्या अग्नीला ‘योनक’ असं नाव आहे…

            ‘अग्नीला साक्षी ठेवून आणि देवाब्राम्हणांच्या आशीर्वादानं’ हा विवाह संपन्न होतो. जगभरात सगळीकडेच, सगळ्याच धर्मात विवाह हा एक धार्मिक विधी आहे. कोणत्याही गोष्टीला धर्माचं अधिष्ठान मिळालं की तिथे ईश्वर आणि पुरोहितवर्ग येतोच. पण इतरत्र कुठे पहायला न मिळणारी गोष्ट म्हणजे होम हवन आणि ते ज्यात करतात ते यज्ञकुंड. अग्नीचा आणि विवाहाचा संबंध काय? एरवीही वैदिक परंपरेत जिथं तिथं यज्ञयाग का? वैदिक व्यवस्थेचे निर्माते असलेल्या आर्यांना अग्नीबद्दल एवढं प्रेम का वाटावं?

            जगातल्या सगळ्याच आदिमानवांप्रमाणे वैदिक काळातल्या आर्यांचे अतिप्राचीन पूर्वजही गुहांमध्ये रहात असत. हिंस्त्र प्राणी आणि थंडीवारा-वादळं यापासून बचाव करणं त्यामुळे सोपं होत असे. शिकारीसाठी किंवा फळं मुळं गोळा करण्यासाठी ते भटकत तेव्हा निसर्गात घडणार्‍या गोष्टींचं कुतूहलानं निरीक्षण होत असे. उन्हाळ्यात जंगलात आगी लागत तेव्हा हत्ती-वाघांसहित सर्वच प्राणी त्या धगीपासून बचाव करण्यासाठी पळ काढताना त्यांना दिसत. हे जेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं तेव्हा आपल्यालाही श्वापदांपासून असाच बचाव करता येईल अशी कल्पना सुचली. कुलिश (कोलितं किंवा कोळसे) देणार्‍या अग्नीला ऋग्वेदात ‘कृष्णवर्मा’ म्हणजे ‘जंगलं जाळून काळंकुट्ट करणारा’ असं अनेक ठिकाणी म्हटलंय! जळकी कोलितं फेकून जंगली श्वापदांपासून स्वतःचं संरक्षण करता यायला लागलं खरं, पण आयती कोलितं मिळायची शक्यता फक्त उन्हाळ्यातच असे. एरवीचं काय? ही अडचण सोडवण्यासाठी कालांतरानं जळते ओंडके गुहांतून राखून ठेवण्याची आणि अग्नी टिकवण्यासाठी त्यात जळाऊ लाकडं घालण्याची युक्ती सुचली. अशा तर्‍हेनं अग्नी ‘गुहाहितः’ किंवा ‘गुहायां निहितः’ झाला. आता गरजेनुसार तो केव्हाही वापरता येऊ लागला. या नव्यानं मिळालेल्या शस्त्राच्या वापरामुळे त्या लोकांच्या आयुष्यात मोठाच बदल झाला, त्यांना गुहेतून बाहेर पडून मैदानात झोपड्या बांधून रहाण्याचं धैर्य आलं. अंगिरस नावाच्या पूर्वजानं या अग्नीला ‘गुहेबाहेर काढलं’, म्हणजे झोपडीत किंवा झोपडीजवळ छोटे खड्डे खणून (‘कुंड’) त्यात झाडांची जळती खोडं ठेवण्याचा शोध लावला. कुंडातला अग्नी हे त्या रानटी अवस्थेतल्या लोकांसाठी एक उपयोगी हत्यार ठरलं. शक्ती वाढली तशा या टोळ्यांच्या इतर टोळ्यांवरील आक्रमणाच्या शक्यता वाढल्या. म्हणूनच ‘हा अग्नी दस्यूंची सैन्ये मारून काढतो, याच्या सहाय्यानं देवांनी दस्यूंचा पुरातनकाली पाडाव केला’ असं वर्णन ऋग्वेदात (सूक्त 263 ऋचा 9) येतं. दरम्यानच्या काळात झाडांच्या दोन सुकलेल्या फांद्यांच्या घर्षणातून आग तयार होते या निरीक्षणातून काटक्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण करता यायला लागला होता. म्हणूनच हातांची बोटं या दहा बहिणींनी शीघ्र ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्या खालीवर घासून अग्नी निर्माण केला असा उल्लेख ऋग्वेदात सापडतो. (सूक्त 263, ऋचा 13) (आदिम काळात चकमकीचा शोध लागलेला नसताना आग पेटवायच्या ज्या युक्त्या अनुभवातून लक्षात आल्या होत्या त्याचं साग्रसंगीत वर्णन 263व्या सूक्तात आहे)

            ज्या थंड प्रदेशातून आर्य भारतात उतरले त्या भागात अग्नीचं महत्व विशेषच असणार. सप्तसिंधूंच्या प्रदेशात आणि नंतरच्या तथाकथित आर्यावर्तातही हवामान तसं थंडच. त्यामुळे अग्नीचं महत्व इतकं वाढलं की तो टिकवून ठेवण्यासाठी ’अग्नीहोत्रा’ची प्रथा अस्तित्वात आली. मैदानात वस्ती करू लागलेल्या त्या आर्यपूर्वजांच्या वस्तीच्या ठिकाणी त्यांच्या झोपड्या असत, त्या टोळीच्या मालकीची गाईगुरं सुरक्षित रहावीत म्हणून ‘अश्मव्रजा’ म्हणजे मोठे दगड रचून तयार केलेला गोठा असे आणि सर्वांना बसण्या-उठण्याच्या दृष्टीनं सोईची अशी गाईच्या शेणानं सारवलेली एक सामायिक जागा असे. सर्वांनाच उबदार वाटावं यासाठी या जागेत एक सामायिक अग्नीकुंड असे. दिवसभर उपजीविकेचं काम करून लोक थकलेले असत. या ‘फायरप्लेस’पाशी बसून ते सोमवेलीपासून तयार केलेली दारू पीत, अश्लील लैंगिक गप्पा मारत किंवा गाण्याबजावण्यानं करमणूक करत आणि (त्या काळी पाकक्रिया जितपत प्रगत होती असेल तितपत) शिजवलेलं मांस किंवा भाज्या खात. मांस आणि कंद भाजण्यापासून ते संरक्षणापर्यंत अनेकविध उपयोग असलेला अग्नी त्या लोकांना इतका प्रिय झाला की त्यावर त्यांची भक्ती जडली आणि आहार, विहार, निद्रा, मैथुन सर्व काही ते अग्नीच्या सान्निध्यात (देवतास्वरूप झाल्यानंतर त्याच्या ‘साक्षीने’!) करू लागले. यातून अग्नीला देवत्व मिळालं आणि याच क्रिया ‘त्याच्या साक्षीनं’ होऊ लागल्या.

            जगातील बहुतेक आदिम संस्कृतींमध्ये गर्भधारणा कशी होते याचं ज्ञान नव्हतं. मूल होणं हे स्त्रीचं विशेष कर्तृत्व वाटत असल्यामुळे बहुतेक संस्कृतीत सुरवातीला मातृप्रधान व्यवस्था होती. पण आर्यांच्या आदिम पूर्वजांना त्यामागचा कार्यकारणसंबंध जास्त आधी लक्षात आला असावा आणि म्हणूनच प्रारंभापासून त्यांची संस्कृती पितृप्रधान, पुरूषसत्ताक अशी राहिली. अग्नीवर नियंत्रण मिळवलं गेलं त्या दरम्यानच आधीची स्वैर लैंगिक संबंधांची स्थिती संपून प्रजापतीसंस्था अस्तित्वात आली. म्हणजे एक पुरूष आणि अनेक स्त्रिया असणारे ‘यूथ’ तयार झाले. स्त्रियांच्या पोटी उत्पन्न झालेल्या प्रजेचा मालक म्हणून पुरूषाला प्रजापती असं म्हटलं गेलं. हे प्रजापती सोमाची दारू पिऊन बर्हिस नावाचं गवत अंथरून त्यावर अग्नीकुंडाच्या सान्निध्यात समागम करीत. पुढे वेदकाळापर्यंत या सगळ्या क्रियेचं रूढीत रूपांतर झालं. सहज उपलब्ध आणि सुखकारक असणार्‍या त्या गवतात संततीकारक शक्ती असते असा समज रूढ झाला आणि लैंगिक भावना चेतवणार्‍या (It provoketh the desire) सोम रसात ‘वीर्य’कारक शक्ती असते असा समज होऊन बसला. म्हणूनच टोळीयुद्धात लढताना आणि समागम करताना जोर निर्माण करणारा सोमरस पिणारे ‘वीर‘ ठरले आणि ‘सुरा’(सोमाची दारू) पिणारे ‘सुर’ (देव)ठरले!

            आजच्या विवाहाला ‘पाणिग्रहण’ असा शब्द काही वेळा वापरला जातो. वरानं वधूचा ‘कर हा करी धरिला’ की विवाह संपन्न होतो, असंही काही ठिकाणी मानलं जातं. याचं मूळ स्वैर लैंगिक संबंधांच्या काळात शोधता येतं. जेव्हा पुरूषाला एखाद्या स्त्रीशी समागम करण्याची इच्छा होत असे

तेव्हा तो तिचा हात (पा णि)धरत असे आणि तो झिडकारला गेला नाही तर पुढची गोष्ट होत असे. या रानटी रूढीचं कालांतरानं ‘पाणिग्रहण’ असं उदात्तीकरण झालं. मुलगा हवा असेल तर आंगठा धरावा, मुलगी हवी असेल तर बोटं धरावीत (?) इत्यादी कर्मकांडाचे तपशील पुढे आश्वलायन गृह्यसूत्रात आले. रानटी काळातील रूढी स्वरूप बदलून कशा टिकून रहातात याचं हे उत्तम उदाहरण आहे.

            धुनीभोवती एकत्र येणं, काटक्या आणि मारलेल्या जनावरांची चरबी टाकून आग चेतवणं, सोमाची दारू पिऊन लैंगिक गोष्टींबद्दल चर्चा करणं आणि मैथुन करणं या सगळ्याला मिळून यज्ञ हा शब्द वापरला जाई. अग्नीत टाकलेल्या हविद्वारे देवांची आराधना किंवा इतर ‘धार्मिक’ कृत्यं करणं म्हणजे यज्ञ, हा वैदिक काळातला अर्थ नंतरचा. यज्ञचा मूळ शब्द म्हणजे ‘यज् न्’ हे वाक्य. त्याचा अर्थ ते यजतात असा होतो. यज् हा दोन क्रिया दर्शवणारा शब्द आहे. त्यातल्या ‘य’ या क्रियाशब्दाचा अर्थ जाणे किंवा जमणे असा होता. ‘ज’ या क्रियाशब्दाचा अर्थ जन्मवणे म्हणजे यभन किंवा जननक्रिया करणे असा होता. एकत्र जमून मैथुन करणे हा यज् या जोडशब्दाचा अर्थ त्या रानटी अवस्थेत होता. पुढे यात बदल होत गेले. इंद्र, वरूण, सूर्य या जगण्यासाठी आवश्यक देवतांची आराधना करण्यासाठी अग्नीत हवि टाकण्याची पद्धत निर्माण झाली. त्यासाठीचं अग्नीकुंड हे आर्यांच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य. त्याचं स्वरूप त्यांच्या सामाजिक उत्क्रांतीबरोबर बदलत गेलं. अग्नीत हवि अर्पण केला की तो अवकाशस्थ देवतांपर्यंत पोचतो (धूर नेहमीच आकाशाकडे जातो!) अशी संकल्पना निर्माण झाल्यानंतर देवतास्वरूप अग्नीला जमिनीवरील कुंडात ठेवणं योग्य वाटेना. साहजिकच त्याची स्थापना उंचावर म्हणजे वेदीवर होऊ लागली. एक जळका ओंडका आणायचा आणि त्यावर लाकडं टाकून तो जळता ठेवायचा, यातला मूळचा ओंडका यज्ञातला ‘यूप’ झाला आणि जमिनीत पुरला जाऊ लागला. खरं तर समिध् म्हणजे चांगली जळणारी काटकी आणि ओषधि (आजच्या ‘औषध’ या शब्दाचं मूळ) म्हणजे उष्णता धारण करणारी काटकी. पण रूढीपालनाचा पगडा इतका जबरदस्त होता की वेदकाळात चकमकीपासून अग्नी निर्माण करण्याची कला अवगत झाल्यानंतरही समीधांचा वापर चालूच राहिला. आजच्या काळातल्या कवितेत तर मोठ्या त्यागाला समीधेचं रूपक लावलं जातं. एकंदर रानटी पूर्वजांचं आग पेटवणं आणि त्या उबेत ते करत असलेल्या गोष्टी या पुढच्या काळात इतक्या महान समजल्या गेल्या की त्या सगळ्या गोष्टींच्या हुबेहूब नकलेनं वैदिक कर्मकांड तयार झालं. यज्ञ या शब्दाच्या मूळ अभिप्रेत अर्थाचा लोप झाला असला तरी त्याचा स्त्री-पुरूष मीलनाशी असलेला संबंध अबाधित राहिला म्हणूनच ‘योनक’ अग्नीत वधूच्या लज्जेचा होम होतो.

            हजारो वर्षांपूर्वीच्या काळात समागम निर्धोक आणि आरामात व्हावा यासाठी अग्नीच्या सान्निध्यात करण्याच्या रीतीनं पुढच्या काळात लैंगिक संबंध ही मूळ प्रेरणा असलेल्या विवाहसंस्थेचं रूप घेतलं आणि विवाह ‘अग्नीसाक्षीनं’ करण्याची सांस्कृतिक कोलांटी मारली. माणसाच्या एकंदर सामाजिक आणि नैतिक उन्नतीबरोबर प्राचीन जंगलच्या कायद्याची जागा मानवतावादी आणि समतावादी मूल्यांनी घेतली. टोळीमधील स्वैर लैंगिक संबंध पुढे बदलत गेले. एक स्त्री, अनेक पुरूष किंवा एक पुरूष, अनेक स्त्रिया अशा अवस्थांतून जात समाज आज एक पुरूष, एक स्त्री आणि त्यांची मुलं अशा कुटुंबव्यवस्थेपर्यंत पोचलाय. महत्वाचं म्हणजे ही कुटुंबव्यवस्था घटनेनं आणि कायद्यानं संरक्षित आहे. कोणत्याही धार्मिक पद्धतीनं विवाह झाला तरी त्याची नोंदणी बंधनकारक आहे आणि ही व्यवस्था स्त्री, पुरूष आणि त्यांची संतती यांच्या हिताचीच आहे. असं असताना आजही ‘अग्नीसाक्ष’ विवाहाचा आग्रह धरणं हे संस्कृतीरक्षण ठरतं का? विचार तर कराल…

– डॉ. आशुतोष मुळ्ये