सकाळी नेहमीप्रमाणे मुले शाळेत जमली. बाईही आल्या. तेवढ्यात एक मुलगा घाबरून ओरडला. ‘साप-साप’ सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेलं. तो पटांगणाकडे बोट दाखवत होता. शाळेच्या समोरच्या पटांगणात खरोखरच एक दोन-अडीच फूट लांबीचा साप होता. मुलांचा गोंधळ उडाला. बाई त्यांना शांत करत म्हणाल्या, “अरे घाबरू नका, तो बिनविषारी साप आहे, जाईल तो.” असं म्हणून बाईंनी पाय आपटून त्याला हुसकावून लावलं. तो बाजूला गवतात निघून गेला.

मुलं म्हणाली, “असाच जावू दिला, पण तो पुन्हा आला तर?” बाईंनी सांगितलं, “तो उगाच नाही येणार. तो पाणसाप म्हणजे दिवड आहे. जवळच्या खड्ड्यातून आला असेल. आणि तो विषारीही नाही. मग उगाच का मारायचं?”
एक मुलगा म्हणाला, “साप भारी डेंजर असतात. ते चावले तर माणूस मेलाच. शिवाय ते डूख पण धरतात.”
“अरे सापांविषयी असे अनेक चुकीचे समज आहेत, अंधश्रद्धा आहेत. म्हणून लोक घाबरतात आणि सापाला मारतात. कधी कधी आपल्या जिवाला पण धोका करतात.” बाईंनी सांगितलं.
“म्हणजे काय, आपण सापांना मारतो हे बरोबर, पण अशा समजामुळे आपल्याला कसा त्रास होतो?” एका मुलीने विचारलं.
“मी तुम्हाला आमच्या आधीच्या शाळेवर घडलेली एक घटनाच सांगते.” बाई म्हणाल्या आणि त्यांनी सांगायला सुरवात केली. मुलं शांतपणे ऐकू लागली.
डोंगराच्या कुशीतलं एक छोटंसं गाव होतं. तेथे गावाला शाळा होती. गावातलीच मुलं शाळेत येत. एक दिवस दुसरीतला मुलगा विनायक एका पायाने लंगडत-लंगडत शाळेत येताना दिसला. त्याला धड चालताही येत नव्हतं. जवळ आल्यावर त्याला धरून बाईंनी खाली बसवलं. आणि विचारलं, ‘काय रे पायाला काय लागलं?’ विनायक काहीच बोलत नव्हता म्हणून बाईंनी स्वत:च पाय पाहिला. पाय बघून बाईंना धक्काच बसला. त्याच्या पायाची अवस्था बघून बाईंचा चेहरा रडवेला झाला. सर्व मुलं पाय पाहत होती, पण त्यांना मात्र काहीच विशेष वाटत नव्हतं.
त्या मुलाच्या पायाच्या तळव्याला सुई धाग्याने टाके घातले होते. कपडा शिवतात ना तसे कपडे शिवायच्या सुई धाग्याने. ते पाहून बाईंना अस्वस्थ झालं. त्यांनी विनायकला विचारलं, “हे असं कोणी केलं?” मुलगा म्हणाला, ‘बाबानं’ हे ऐकून तर बाईंना मोठाच धक्का बसला. त्यांनी विचारलं, “पण असा पाय का शिवलाय? तुझ्या बाबांना समजत नाही काय? थांब आपण आधी टाके काढू मग बघू काय ते.”
मुलं म्हणाली, “नको नको बाई, नायतर त्याच्या पायाला फोड येतील.” ‘म्हणजे?’ बाईंना प्रश्न पडला. मुलांनी सांगायला सुरवात केली. “साप बिळातनं जिथनं बाहेर पडतो नं तिथं बारकी बारकी खडे असतात. त्या खड्यांवरना तो साप जातो तवा त्याचं विष त्या खड्यांना लागतं. आनी आपला पाय त्या खड्यांवर पडला तर पायाला मोठे मोठे फोड येतात. मग असा पाय शिवला काय फोड नाय येत.’‘ “काय?” हे ऐकून बाई किंकाळल्याच.
त्यांनी एका मुलाला आतून कातर आणायला सांगितली. तो पर्यंत दुसर्या शिक्षकाने डॉक्टरांना फोन केला. बाई एक-एक टाका काढायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचा धीर होत नव्हता. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी भराभर टाके काढले आणि विनायकला वेदनाशामक गोळी खायला दिली. हे सर्व होईपर्यंत त्या मुलाच्या घरी ही गोष्ट समजली. विनायकचे वडील रागाने बडबडतच शाळेत आले आणि ‘माझ्या मुलाच्या पायाचा धागा कोणी काढला’ म्हणून विचारू लागले.
बाईंनी सांगितलं, “मी काढला.” हे ऐकून मुलाचे वडील आणखीनच चिडले. ते म्हणायला लागले, “आता माझ्या मुलाच्या पायाला काय बी झालं तर त्याला जबाबदार कोण?”
बाई समजावून सांगू लागल्या “अहो काही होणार नाही. उलट असा पाय शिवून त्याला किती त्रास होत होता. आता बघा त्याला किती बरं वाटतंय.”
“श्यान्या झाल्यात. उद्या त्याच्या पायाला मोठाले फोड येतील, तवा काय करनार?” विनायकचे वडील म्हणाले.
“असं काही होणार नाही.” बाई समजावत होत्या. डॉक्टरही समजावत होते. “अहो, काही होणार नाही, मी औषध पण दिलंय. आणि असं काहीही नसतं.”
“काय नसतं? तुमी पाय देऊन बघा खड्यावर मग समजंल” वडील म्हणाले.
“ठीक आहे, मी पाय देते त्या खड्यांवर. बघू या काय होतंय ते.” बाई म्हणाल्या.
“बगाच, मग समजंल. आनी माझ्या पोराच्या पायाला काय झालं तर बगतोच तुमाला.” अशी धमकी देऊन वडील गेले.
दुसरा दिवस उजाडला. शाळेत गेल्या गेल्या बाईंनी त्या मुलाची चौकशी गेली. विनायकचा पाय व्यवस्थित होता. बाई मुलांना म्हणाल्या, “बघा, काही होतं का?” मुलं म्हणाली, “बाई आदी पाय शिवला होता ना म्हणून काय नाय झालं. नाय तर झालं असतं.” “ठीक आहे. मला ते खडे दाखवा. मी पाय देते त्या खड्यावर. मग तर समजेल खरं काय ते. चला जावू या.” असं म्हणून बाई निघाल्या. मुलंही निघाली.
माळावर त्या बिळापाशी मुलं बाईंना घेऊन गेली. त्यांनी दाखविलेल्या खड्यांवर बाई उभ्या राहिल्या. मुलं बघत होती. ते बघून एका चुणचुणीत मुलीचाही धीर चेपला. रेश्मा तिचं नाव. तिने बाईंना विचारलं, “बाई मी पन उभी राहू?” बाई हो म्हणताच तीही त्या खड्यांवर पाय देऊन उभी राहिली. मुलांनी विचार केला, आता बाई आणि रेश्माचं काही खरं नाही. सर्व शाळेत परत आले. आता सर्वांना वाट पहायची होती दुसर्या दिवसाची.
दुसर्या दिवशी सर्व मुले लवकर शाळेत येऊन बाई आणि रेश्माची वाट पाहत होती. बाई नेहमीप्रमाणे शाळेत आल्या. मुलांचं लक्ष बाईंच्या पायांकडे होतं. पण बाईंच्या पायाला तर काहीच झालं नव्हतं. पाठोपाठ रेश्मा पण शाळेत आली. तिचे पायही व्यवस्थित होते. मुलं एकमेकांकडे पाहत होती. “म्हणजे पायाला कायच होत नाय? मग उगाचच पाय शिवायचे?” एक मुलगा म्हणाला.
“आता समजलं तुम्हाला? आता नाही ना असं करणार?” बाईंनी विचारलं. “होय बाई. आता आमी सगळ्यांना गावात सांगू. हे खोटं असतं म्हणून.” मुलं म्हणाली. बाई म्हणाल्या “शाब्बास.”
सर्व घटना सांगून झाली होती. सर्व मुले बाईंसमोर तशीच शांत बसून होती. बाईंनी त्यांना भानावर आणलं.
“अरे एवढे शांत झालात? समजलं का तुम्हाला?” “हो बाई. इतके भयानक गैरसमज असतात हे माहीतच नव्हतं आम्हाला.” मुलं म्हणाली.
“अरे, यापेक्षा खूपच भयानक गैरसमज आणि त्यावरचे उपाय असतात. चला मी तुम्हाला आज साप आणि त्यांच्याविषयीच्या अंधश्रद्धांची माहिती देणारी एक क्लिप दाखवते. मग त्यावर चर्चा करू.” मुले बाईंबरोबर वर्गात गेली.
-महेंद्र नाईक
लेखक संपर्क: मोबा. 9594094785
(ही आरती नाईक यांच्या शाळेत घडलेली सत्यघटना आहे.)