‘मी अण्णा आहे, आम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत हवा आहे. तुम्हाला?’ अशा आशयाच्या टोप्या घालून, छातीवर बॅचेस लावून सध्या आपल्या देशातील तरूणाई वावरताना दिसते आहे. संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यासह शाळा-कॉलेजापसून पहिल्यांदाच उद्योग क्षेत्र देखील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी, ‘लोकपाल’च्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. आयटी क्षेत्रातील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवाल्या व्यवस्थापनाकडून आपल्या स्टाफला लोकपाल व अण्णा समर्थनार्थ काळे कपडे घालून येण्याच्या सूचना दिल्याचे देखील समजले. देशातील व परदेशातील इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी तर कहर केला आहे. दिवस-रात्र अण्णा, अण्णा टीम, सरकार, विधेयक, आयडॉल्स आणि तरूणाईच्या कृती-प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एकूणच देशाचे वातावरण ‘अण्णा’मय झाले आहे, युवा-तरूणाई याच्या प्रभावापासून दूर नाही. त्यांची अभिव्यक्ती, बोलण्याची वा शक्यतेनुसारच कृती ही आश्वासक वाटते. उत्स्फूर्त वाटते.
उत्स्फूर्तता पण….
आजच्या जगात आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या अडचणींबाबत दिवसेंदिवस सजग होत जाणारी तरूण पिढी भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे वाढत्या महागाईबरोबर हातात हात घालून वाढणार्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्याची भाषा करण्याच्या मागे जाण्याची तरूणाईची आज मानसिकता दिसते. त्यासाठी कमीजास्त किंमत मोजायची चर्चा मात्र अभावानेच ऐकायला मिळाली आहे. अण्णांच्या समर्थनार्थ उपोषण करण्याची तयारी दाखविणारे युवा, आपल्या आयुष्यातील कुठल्याही निर्णयाच्या-कामाच्या कार्यवाहीसाठी भ्रष्ट व्यवहार करणार नाही, करू देणार नाही, असे म्हणताना दिसत नाही. समाज केवळ सदिच्छेवर बदलत नाही किंवा घडवता, उभारता येत नाही, तर त्यासाठी समाजाची मूल्य धारणा बदलावी लागते. अन् त्यांचे प्रयत्न व्यक्तीपासून समूहापर्यंत करावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. या अर्थाने आजची तरूणाईची अभिव्यक्ती ही बेगडी, दुटप्पी वर्तन असणारी आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. त्यांच्यावर तत्कालिक बाह्य शक्तीचा अतिप्रभाव असल्याचेदेखील जाणवते. जागतिकीकरण, उदारीकरण, बाजारीकरणातून चंगळवादी मानसिकतेबरोबरच माणसाचे मूल्य ग्राहक म्हणून ठरविण्याची संस्कृती विकसित होत आहे. अशा प्रवासात एखादा मुद्दा, विषय, वस्तू ही कशी आपल्या जीवनाची अत्यावश्यक व प्राधान्याची बाब आहे, असे जाणीवपूर्वक बिंबविण्याचा कार्यक्रम केला जातो. तसे काहीसे भ्रष्टाचार मुद्याबद्दल झाले आहे. म्हणजे जगापुढील, भारतापुढील इतर सर्व प्रश्न गौण ठरवून भारतीय राजकारणा, समाजकारणात आता भ्रष्टाचाराला संपविले नाही तर आपण जगूच शकत नाही, अशी अगतिकता, भयग्रस्तता तयार करण्याचा प्रयत्न काही हितसंबंधी मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. त्याचा जास्त प्रभाव आपल्या देशात एकूण लोकसंख्येचा 2/3 भाग होऊ घातलेल्या तरूणाईवर पडलेला दिसतो.
अण्णांचे एकला चलो रे
अण्णा हजारेंच्या व्यक्तिमत्वाचा नैतिक प्रभाव आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र पोचल्याचे दिसते. एक निवृत्त लष्करी कर्मचारी, अविवाहित राहून साध्या राहणीने व अहिंसक, नम्र वर्तनाने समाजावर आपली छाप टाकू शकतो, याचे अण्णा हजारे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. सुरवातीला ग्रामविकासाचे प्रयोग व प्रयत्न. त्यानंतर माहितीचा अधिकार कार्यान्वित करण्यात पुढाकार आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचार हा मुद्दा करून सत्ताधारी, विरोधक राजकीय नेतृत्वामध्ये स्वत:चे उपद्रव मूल्य तयार करणे अण्णांना देशपातळीवर मान्यता देणारे ठरले आहे. एका बाजूला अण्णांच्या गेल्या 25 वर्षांतल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख चढता आणि वाढता असताना, दुसर्या बाजूला सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सामान्यांना संघटित करून सोबत घेण्याचा, प्रशिक्षित करण्याचा आलेख उतरता आहे. भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाच्या सुरवातीच्या काळात महाराष्ट्रातील बुद्धिवादी जनतेने अण्णांना प्रचंड प्रमाणात सोबत केली आहे. त्यामध्ये ठिकठिकाणच्या सक्रिय कार्यकर्त्यांसह प्रा.ग.प्र.प्रधान, डॉ.बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, डॉ.कुमार सप्तर्षी, अविनाश धर्माधिकारी यांच्यासह न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ठाकूरदासजी बंग या बुजुर्ग मंडळींचा समावेश राहिला आहे. खानदेश भागातील पहिली मोठी जाहीर सभा जळगावला नूतन मराठा कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माझाही त्यात सक्रिय पुढाकार होता. परंतु, पुढे अण्णांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्यासोबतचे एकएक सहकारी थांबले. आता तर महाराष्ट्रात अण्णा एके अण्णा अशी परिस्थिती राहिली. अण्णांना आदर्श गाव अथवा भ्रष्टाचाराच्या मुद्यावर संघटना उभारण्यात यश आलेले नाही, असे म्हणता येऊ शकेल. या विश्लेषणाचा हेतू टीका-टिप्पणीपेक्षाही समाज बदलाची लढाई करताना प्रजासत्ताक-लोकशाही जीवन पद्धतीमध्ये आपली कार्यशैली कशी असली पाहिजे, यासाठी चर्चा घडून यावी, असा आहे. त्या अर्थाने लोकसमूहांना प्रबोधित, प्रशिक्षित करत त्यांच्या संघटीत कृतीतून समाजाची मानसिकता आणि व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारताच्या लोकशाहीला बळकट करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नात अण्णांचे एकला चलो रे, परवडणारे नाही.
आपण विचार करू
आपल्या जीवनातील प्रश्न, समस्या, अडचणी, दु:ख, दैन्य, अगतिकता, त्रास दूर करण्यासाठी कोणीतरी अवतार घेऊन येणार आहे, याचाही प्रभाव भारतीय जनमानसावर मोठा आहे. तो माणूस सभोवतालच्या बाबा-बुवा-महाराज-तांत्रिकांमध्ये अशा अवतारी, साक्षात्कारी दैवी अवताराला शोधण्याचा प्रयत्न करीत राहतो. आता असेच काहीसे आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही व्हायला लागले आहे. त्यामुळे महत्वाच्या समस्येच्या निराकरणासाठी स्वत:ला पणाला लावणार्या व्यक्तीला त्याच अवतारवादाच्या संकल्पनेप्रमाणे सर्वसंग परित्याग करून जीवनाच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणारा, उत्तर देणारा मसिहा समजले जाते. अण्णा हजारेंचेही काहीसे तसे झाले आहे का? आपण विचार करू.
संविधानच देईल देशाला जीवदान!
देशाने अनेक प्रगतीचे टप्पे गाठले आहेत. अनेक विकासाच्या शक्यता देखील निर्माण केल्या आहेत. लोकशाही जीवन व्यवस्थेला लायक नागरिकत्वाचे आकलन विकसित करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून हेतुपुरस्सर झाले नाहीत ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे देशासमोर अनेक प्रश्न आहेत. असे सर्व असताना लोकशाही व्यवस्थेला आव्हान देऊन त्यांच्या मूल्य आशयाशी विसंगत कुठलाही नवीन कायदा आपण करू शकत नाही, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संविधान, कायदे आता समजून घेतले पाहिजेत. कारण संविधानच देईल देशाला जीवदान, अशी माझी भूमिका आहे.
– अविनाश पाटील