प्रतिक : या वेळेला आपण आशिषचं अभिनंदन करायला हवं.
समीर : त्याला काही बक्षीस वगैरे मिळालं की काय?
प्रतिक : त्याहीपेक्षा महत्वाचं असं त्याने केलंय. यावेळी रक्षाबंधनच्या वेळेस बहिणीकडून ओवाळून न घेण्याचं त्याने ठरवलं आणि ते अंमलात आणलं देखील.
ज्योती : पण यात काही अभिनंदन करण्यासारखं नाही. कधी कधी तुमचा तर्क तुम्ही फार टोकाला नेता. इतर निरर्थक कर्मकांडाबद्दल ठीक आहे पण जिथे नात्यांमधील प्रेमाचा संबंध आहे तेथे तरी इतकी तर्कदुष्टता नको.
आशिष : यात नीरसता आहे असं नाही मला वाटत. खरं तर या वेळेस ओवाळून घेणे चुकीचं आहे असं मला वाटत होतं म्हणून मी त्याला नकार दिला.
कल्पेश : पण हाच तर्क वापरला तर राखी बांधून घेणं पण चूकच ठरेल. कारण ‘भावाने बहिणीचे रक्षण करायचं’ या विचारातच कुठेतरी विषमतेची कल्पना आहे.
समीर : परंपरांचे अर्थ कालानुरूप घ्यावेत असं मला वाटतं. आज मुळात तशी काही कल्पना नाही. त्यामुळे रक्षाबंधनचा दिवस हा बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून घ्यायला हरकत नाही.
प्रतिक : मग त्यासाठी राखी बांधण्याचं आणि ओवाळण्याची गरज कशाला?
कल्पेश : मग तसं म्हटलं तर बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणं जास्त वैयक्तिक होईल.
समीर : कल्पेशची कल्पना काही मला पटत नाही. कारण वाढदिवस हा सर्वजण साजरा करतात. त्यात वेगळेपण नाही. त्यापेक्षा हाच दिवस खास बहिणीसाठी साजरा करायला हरकत नाही.
प्रतिक : आपण जी चर्चा करतोय त्याला काही वर्षांत काहीच अर्थ उरणार नाही. आपल्यामध्येच आपण उदाहरण घेतलं तर मी आणि कल्पेश एकटेच आहोत. आम्हाला बहीण नाही. दुसर्या बाजूला शरयूला भाऊ नाही. त्यामुळे मग या रक्षाबंधनला अर्थच उरणार नाही.
आशिष : प्रतिक, तू हुशार आहेस हे मान्य पण तुझं ज्ञान पुस्तकी आहे. अगदीच पुस्तकी हा शब्द बरोबर नाही वाटला तरी तू जरा लायब्ररी सोडून किंवा तुझ्या बुद्धिमान मित्राची संगत सोडून जरा आमच्यासोबत राहिलास तर तुझ्या जगाबद्दलच्या ज्ञानात फरक पडेल.
शरयू : अरे, आशिष हे काय? किती मोठी वाक्यं बोलतोस तू. आणि ते पण तुझ्या गुरूला!
आशिष : मी म्हणतो ते पूर्ण ऐक तरी. प्रतिक जर आमच्यासोबत इतरवेळी मिसळत असता तर त्याला कळलं असतं की, रक्षाबंधनाचे काय उपयोग आहेत ते. एखाद्या मुलीशी ओळख काढायला तिच्या मैत्रिणीला बहीण मानलं जातं. किंवा मग मुलीदेखील एखादा मुलगा जास्त मागे-मागे करण्याची शक्यता असेल तर त्याला राखी बांधून टाकतात.
ज्योती : तुम्हा मुलांना पण माहीत नसेल पण मुलीदेखील कुणाला भाऊ बनवताना असाच विचार करतात.
प्रतिक : म्हणजे एकूण निष्कर्ष काय तर ‘रक्षाबंधन’च्या मागचा हेतू वेगळाच असतो.
शरयू : प्रतिक, तुला जरा निष्कर्षावर पोहचायची घाई असते.
प्रतिक : पण मुलांमुलीमध्ये मोकळेपणा असता तर या सगळ्यांचा आधार घ्यायची गरज नाही.
ज्योती : मला आता आशिषच्या बोलण्यात तथ्य वाटायला लागले आहे. प्रतिकला खरोखरच काही कळत नाही. प्रेमासारखा विषय तो बाजारात जाऊन भाजी विकत घेतल्यासारखा समजून घेतो. अगदी टोकाचं फसवणं मलाही आवडणार नाही. पण प्रेमासारख्या विषयात थोडीफार गंमत असायलाच हवी.
प्रतिक : ठीक आहे, या विषयात मला कळत नाही हे मी मान्य करतो. पण आता मला उपदेश देणं बंद करा.
कल्पेश : हे बाकी खरं नव्हे. प्रतिकनेच सगळ्यांना ‘लेक्चर’ द्यावं असा काही नियम आहे का?
समीर : तसा काही नियम नाही. पण आपली चर्चा पुन्हा रूळावर आणायला हरकत नाही. मैत्रीचं नातं इतर नात्यापेक्षा उच्च दर्जाचं आहे असं नाही का वाटत.
आशिष : मला पण तसंच वाटतं कारण मैत्री आपण निवडू शकतो. इतर नाती जन्माने आपल्यावर लादली जातात.
शरयू : मला नाही पटत. उलट तुम्हा मुलांना कोणत्याही नात्यात जबाबदारी नको असते. आणि फक्त मिरवायची हौस असते.
प्रतिक : उगाच तू शेरेबाजी करू नको.
शरयू : मी अजिबात शेरेबाजी करत नाही. तूच मघाशी आशिषचं इतकं कौतुक केलंस. जणू काही ओवाळणी करून घ्यायचं नाकारलं म्हणून तो समतावादी वगैरे झाला. पण मग त्याने एका दिवसाकाठी का होईना “आज मी बहिणीला आराम देईन आणि आज तिच्या आवडीचं जेवण बनवून देईन.” असा विचार का नाही केला?
कल्पेश : शरयूचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला नकार देण्यापेक्षा, योग्य मुद्द्याचा कृतिशील स्वीकार जास्त अवघड आहे.
समीर : अगदी बरोबर, स्त्री-स्वातंत्र्याबद्दल लेख लिहण्यापेक्षा मुलींची शाळा काढणं अवघड असते.
ज्योती : पण मग एका दिवसाकरताच कशाला. भावाने घरच्या कामात बरोबरीने साथ द्यायला हवी.
शरयू : तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तू लक्षात घेतलंस का. जेवण बनवणं ही काय एका दिवसात शिकण्याची कला नाही. त्यामुळे त्यासाठी आपोआपच मेहनत घ्यावीच लागणार.
आशिष : खरं तर जेवण बनवण्याबद्दल हे आम्ही विसरूनच गेलो होतो. मुळात अमूक इतकंच मीठ टाकावं किंवा मसाला वापरावा, त्याचं प्रमाण यांचा विचार करता ही रसायनशास्त्रापेक्षा जास्त किचकट कला म्हणायला हवी.
शरयू : इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळ चालणारा प्रयोग म्हणून याकडे बघितलं तर कुठल्याही नोबेल पारितोषिकापेक्षा जास्त तोडीचा पुरस्कार याला मिळायला हवा.
समीर : याचा अर्थ असा की, पुढचा रक्षाबंधन जर ‘सिस्टर्स हे’ म्हणून साजरा करायचा तर आतापासूनच तयारीला लागायला हवं.
ज्योती : तुम्ही इतका जोष दाखवता तर मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो म्हणजे तुमच्या बहिणीचा आवडीचा पदार्थ कोणता?
शरयू : अगदी अपेक्षेप्रमाणेच उत्तर मिळालं. अगदी प्रतिकला देखील माहीत नसेल की, त्याच्या आईला कोणता पदार्थ आवडतो.
प्रतिक : तुम्ही दोघींनी तर आम्हाला जमिनीवर उतरवलंत.
ज्योती : आमच्या आवडीचा पदार्थ तुम्ही स्वत: कराल तेव्हा कराल पण आज निदान तो हॉटेलमध्ये द्यायला हरकत नाही.
– संजय सावरकर