डॉ.मंगल धारवाडकर हे अंनिसचे खंदे पुरस्कर्ते व कार्यकर्ते होते. तंत्रज्ञानातून उच्च पदवी विभुषित धारवाडकर अमेरिकेत काही काळ वास्तव्यास होते. औरंगाबाद येथे प्रथितयश कॉलेजात त्यांनी विभागप्रमुख व प्राचार्य म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
निवृत्तीनंतर गेली 20 वर्षे ते महाराष्ट्र अंनिसशी संबंधित होते. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हा त्यांचा आवडीचा विभाग. फिरते नभांगण या उपक्रमाचा प्रारंभ त्यांनीच केला. त्यामुळेच महाराष्ट्रात त्याचा विस्तार होण्यास मदत झाली.
महाराष्ट्र अंनिस औरंगाबाद शाखेच्या वैज्ञानिक प्रकल्पाला त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटची जोड दिली. स्त्री-पुरूष समतेबाबत त्यांनी कार्यशाळा आयोजित केल्या. आपल्या मित्राकडून त्यांनी देणग्या जमा करून त्यातून औरंगाबाद जिल्ह्यातील 350 उर्दू शाळांना वार्तापत्राचा अंक गेली 4 वर्षे ते मोफत पाठवत होते. अशा आमच्या मित्राच्या दु:खद निधनाने अंनिसची व त्यांच्या कुटुंबियांची व प्राध्यापिका डॉ.सुनीती धारवाडकर यांची मोठी हानी झाली आहे. सर्व अंनिस परिवार सुनीतीबाईंच्या दु:खात सहभागी आहे. -संपादक