भूत ही कल्पना खरे म्हणजे आत्मा या कल्पनेचे अपत्य म्हणायला पाहिजे. कारण आत्म्याची भानगड नसती तर भूतही अस्त्विात आले नसते. भुताच्या उगमाचा शोध घेताना आधी आत्म्याची कल्पना माणसाला का स्फुरली असावी याचे विश्लेषण केले पाहिजे. विविध धर्मग्रंथात आत्म्याचे स्वरूप वेगळे असले तरी मध्यवर्ती कल्पना अमरत्वाचीच आहे. मग ते पुन्हा पुन्हा जन्म घेणे असू दे किंवा कबरी मध्ये कुणीतरी आकाशातील बापाच्या न्याय निवाड्याची वाट पाहत चिरविश्रांती घेणारे आत्मे असू देत.
कुणीतरी नवीन कल्पना मांडली आणि ती त्याच्याच काळात लोकप्रिय झाली असे होत नाही. लोकांच्या मनात दृढ असलेल्या कल्पनेनेच कुणी तरी असे विवेचन करतो की, त्याला त्याआधारे त्याची नवीन कल्पना घुसडता यावी. अमर असलेला आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि कर्माचे फळ भोगतो ही काही गीते मध्ये नव्याने मांडलेली कल्पना नव्हती. त्या अगोदरही ती प्रचलित होती. आत्म्याचे अमरत्व वेगवेगळ्या पद्धतीने विविध धर्माने मांडलेले आहे. ही अमरत्वाची कल्पना माणसाच्या अमरत्वाच्या ध्यासाचे मूर्त स्वरूप आहे. आपले अस्तित्व कधीच नष्ट होऊ नये या सजीवाच्या प्रबळ प्रेरणेतून अमर अशा आत्म्याच्या कल्पनेचा जन्म झालेला आहे. काही ठिकाणी आत्म्याचे अस्तित्व व्यक्तिगणिक वेगळे मानलेले आहे आणि इतकेच नव्हे तर प्रत्येक सजीवात आत्मा असतो असे मानलेले आहे.( Animistic दृष्टिकोन) तर काही धर्म एकाच स्वरूपाचे चैतन्य सर्व सजीवात वाहते असे मानतात(Pantheism).
मृत शरीर जिवंत व्यक्तीसारखेच दिसत असले तरी ते काहीच हालचाल करत नाही याचा अर्थ त्यातील चैतन्य निघून गेले आहे आणि हे चैतन्य म्हणजेच आत्मा अशी समजूत आजही सर्वत्र प्रचलित आहे. जेव्हा एकादे गृहितक खरेच आहे असे आपल्याला वाटते तेव्हा त्याचा किंचित पुरावादेखील पुरेसा असतो. शरीर मुळात कसे चालते याची माहिती नसल्यामुळे त्याने जो तर्क केला तो त्याच्या दृष्टीने बरोबर होताच. हा आत्मा असतो कुठे याची देखील जागा त्याचे हृदयात ठरवली कारण हाच एक अवयव जिवंत असताना धडकतो आणि मेल्यावर थांबतो. कुणी म्हणेल उगाच शरीरशास्त्र माहीत नसताना असा चुकीचा अंदाज लावणे मूर्खपणा आहे. तर त्याने एवढेच समजून घेतले पाहिजे की, धडपडीतूनच तर माणूस आतापर्यंतच्या ज्ञानापर्यंत पोहचला आहे. अंदाज चुकीचा होता याला आक्षेप नसून नवीन माहिती मिळाल्यानंतर तो अंदाज तपासून न बघण्याला आहे.(माणसाचे अस्तित्व मेंदूमध्ये असते हे माहीत असून देखील भारतामध्ये अगदी काही वर्षापर्यत हृदय बंद पडल्याशिवाय मृत्यू घोषित करता येत नव्हता. हृदय आणि फुप्फुसे या अवयवांच्या रोपणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर मेंदूच्या मृत्यूला मान्यता मिळाली. म्हणजे एखाद्या जुनाट समजुतीचा परिणाम तितकाच महत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय नष्ट होत नाही याचे हे उदाहरण म्हणायला पाहिजे.) आत्म्याच्या उगमाबद्दल अनेक गृहितके मांडता येऊ शकतात पण ही सर्व गृहितके तर्कावरच आधारित असणार.
भुताच्या विविध रूपाबद्दल जरी वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतीमध्ये मतभेद असले तरी अंत्यसंस्कार योग्य त्या पद्धतीने न झाल्याने आत्मा पृथ्वीवर भटकत रहतो इतकेच नव्हे तर तो त्रास देतो ही कल्पना मध्यवर्ती आहे. आपल्याकडे जसे विशिष्ट पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचे नियम आहेत असेच नियम इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व 1550 या काळात “बुक ऑफ डेड” या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. शरीराच्या मृत्यू नंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुखकर व्हावा(आणि त्याने परत येऊ नये) यासाठी नियमांची जंत्रावली आहे. आत्मा पुढे कुठे जातो यावर पुन्हा मतभेद आहेत पण तो परत गेला नाही तर मात्र त्रास देतो इतकेच नव्हे तर इतर लोकांना आपल्या सोबत घेऊन जातो यावर मात्र एकमत आहे.
योग्य त्या अंतिम संस्काराची गरज आरोग्य दृष्ट्या किती महत्वाची आहे हे आज आपल्याला माहीत आहेच. आपल्या पूर्वजांना कारण माहीत नसले तरी परिणामाची कल्पना होती. संसर्गजन्य आजारानी मरण आल्यानंतर इतरही त्याच लक्षणांनी मरतात हा अनुभव त्यांना असणारच. 1850 मध्ये लुई पाश्चरने जंतुसंसर्ग झाल्याने रोग होतात हे सिद्ध करेपर्यंत संसर्गजन्य आजारांची कल्पना नव्हती(त्यानंतर बराच काळ सर्वच रोग केवळ जंतू संसर्गामुळेच होतात अशी उलटी समजूत दृढ झाली. एकदा सिद्ध झालेली कल्पना कवटाळून बसण्याची माणसाची खोड अजून गेलेली नाही.) त्यामुळे मृत माणसांचा आत्माच इतरांना घेऊन जातो ही कल्पना पूर्वजांच्या मनात न आल्यास नवल! योग्य त्या अंत्यसंस्कारांनी अशा मृत्यूची शक्यता कमी होते. या अनुभवाने त्याला अंत्यसंस्कार अधिकाधिक योग्य पद्धतीने करण्याची गरज लागली. अंत्यसंस्काराचा विधी काही दिवस लांबण्याच्या कारणाची चर्चा पुढे करूच. युद्ध करताना तर युद्धाशिवायही असे अनेक मृत्यू होत असणार. मोठमोठ्या युद्ध मोहिमा काढणार्या रोमन लोकांत, तारूण्यात मरण आल्यास आत्मा भटकत राहतो ही भीती मोठ्या प्रमाणात होती. गर्भारपणात मृत्यू पावणारी स्त्री इतरांचे मूल खाणारी लावसट होते(कारण तिचा स्वत:चा मृत्यू होताना ती आपल्यासोबत मुलाला घेऊन गेली आणि इतरांच्या मुलांना देखील ती घेऊन जाते असे मानले जाते. अजूनही आपल्याकडे गर्भारपणात आई आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.).
अंतिम संस्काराचे बदलते स्वरूप :
मृत व्यक्तीच्या प्रवासाचा खर्च सुटावा म्हणून त्याच्या तोंडात नाणे ठेवले जाते. काही ठिकाणी सोन्याचा मणी ठेवला जातो(असे सोने किंवा पैसे गोळा करण्यासाठी स्मशानात घुटमळणार्या लोकांमुळे प्रेत खाणार्या पिशाच्यांची कल्पना पुढे आली असण्याची शक्यता आहे.). मृत व्यक्तीच्या मरणोत्तर प्रवास आणि जीवनाचा पगडा इतका घट्ट होत गेला की, समाजातील स्थान वाढत गेले की, त्याच्यासाठी दागिने, बायको, गुलाम इतकेच काय प्राणी देखील पुरले जाऊ लागले.
मानव वस्ती जशी दाट होत गेली तसे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत गेले असणार. एखादा भक्त नवस पूर्ण होत नाही म्हणून देवाच्या कल्पनेला नकार न देता, आपल्या कर्मकांडामध्ये चूक राहिली असेल असे समजून अधिक महागडा पर्याय निवडतो तसेच या मानसिकतेमधून अंत्यसंस्काराचे विधी अधिकाधिक कडक होत गेले. अर्थात त्यामुळे पुढे पुढे अशा विधीमध्ये पारंगत असणार्या आणि मृताच्या आत्म्याशी संपर्क करू शकणार्या मांत्रिक गटाचा उदय झाला. मांत्रिक होण्यासाठी ज्या अटी होत्या त्यामध्ये विशिष्ट दिवसाचा उपवास, झोप न घेणे, एकांतवासात राहणे यांचा समावेश होता. शरीराला असे थकवल्याने निरनिराळे भास होतात हे आज आपल्याला माहीत आहेच. ऋषी मुनी कठोर तपश्चर्या करून देवाला वश करत, त्यांच्याशी बोलत या कथा याच कर्मकांडाचा विकसित अवतार आहे. आज मांत्रिक म्हणजे मानसिक आजारांना भूतबाधा ठरवून, ती उतरवणारी व्यक्ती अशी जरी समजूत असली तरी ज्या वेळेस आणि आजही जेथे योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध नाही तेथे प्रत्येक आजार हा बाधा झाल्यानेच होतो. असे समजून त्यावर मांत्रिकाकडून उपचार केले जातात. सापाचे विष अजूनही बर्याच ठिकाणी मांत्रिकच उतरवतो(?) साप किंवा विंचूच्या विषामुळे ग्लानी येते आणि विषाच्या रसायनाचा चेतासंस्थेवर परिणाम होतो. या अवस्थेत भास होतात. कोणते भास व्हावेत हे सर्व संस्कारावर अवलंबून असल्याने बहुधा कुणीतरी आपल्याला न्यायला आले आहे असेच भास होतात. त्यामुळे साप चावल्याने मृत्यू येत नसून तर आत्मे त्या व्यक्तीला घेऊन गेले या समजुतीला बळकटी येते.
एकदा का मरणोत्तर जीवन आहे ही मुख्य कल्पना मान्य केली असेल तर मग त्या मूळ गृहितकाच्या आधारे इतर अनेक कल्पना तर्क शुद्ध पद्धतीने उभ्या राहतात. आपल्या ओळखीतील व्यक्ती मृत झाली तर काही दिवस तिच्या अस्तित्वाचा भास होणे हा सर्व साधारणपणे येणारा अनुभव आहे. आपल्या मेंदूतील आठवणी आपल्याला हा अनुभव देतात. जसे दिवस पुढे सरकतात तशा आठवणी धुसर होत जातात. परंतु मरणोत्तर जीवन असते हे मान्य केलेले असल्यामुळे, आत्मा काही दिवस भटकतो असा अर्थ यातून काढला जातो. याच कारणामुळे अंत्यविधीचे कार्यक्रम दहा ते बारा दिवसांपर्यंत लांबवले जातात.
मरणोत्तर जीवनाच्या कल्पना जशा भूताबद्दल वापरल्या तशा त्या मोक्ष, पुनर्जन्म आणि कर्मविपाकाचा सिद्धांत यासाठी देखील वापरल्या गेल्या आहेत. या कल्पना स्वीकारल्या गेल्या कारण मरणोत्तर जीवनाची कल्पना समाजामध्ये अगोदरच मान्य केलेली होती. सुफलतेच्या विधीसाठी नरबळी दिले जात त्यावेळेस देखील अशा मृत्यूनंतर तू अप्सरांचा पती म्हणजे गंधर्व बनशील असे सांगितले जाई. अशा स्वरूपाचे आश्वासन धर्मयुद्ध करायला प्रोत्साहित करण्यासाठी ‘मेल्यानंतर तुमच्यासाठी सुंदर कुमारिका जन्नतमध्ये वाट बघत आहेत’ असे अतिरेकी तरूणांना दिले जाते.
भुतांची रूपे :
भुतांच्या स्वरूपाबद्दल असंख्य अनुभव आणि मते आहेत. रात्री झोपेमध्ये काही जणांचा श्वास थोड्या वेळासाठी कोंडला जातो. काही वेळेस श्वास नलिकेच्या आजाराचा तो परिणाम असतो किंवा तर काही वेळेस दारू पिऊन झोपणे. उघड्या ठिकाणी झोपल्यामुळे धूळ नाकात आणि घशात जाणे यामुळे असे घडते. परंतु त्यामुळे व्यक्तीला खाडकन जाग येते आणि कुणीतरी छातीवर बसून आपल्याला दाबत होते अशी कहाणी सांगितली जाते.
ड्रॅक्युलावर आधारित चित्रपट पाहताना स्पेनचे मेंदूविकारतज्ज्ञ जुआन गोमेझ अलोन्सो यांच्या रेबीजच्या रूग्णामध्ये आणि ड्रॅक्युलाच्या चित्रणांमध्ये असणारे साम्य लक्षात आले. कुत्रा किंवा कोल्ह्यासारख्या प्राण्याच्या चाव्यानंतर रेबीज रोगाची शक्यता असते. या रूग्णामध्ये निद्रानाश, स्नायूंचे अचानक आकुंचन(मस्कूलर स्पाईम) यामुळे रक्तमिश्रित थुंकी येणे यांच्याबरोबरच उजेड, पाणी आणि आरशासारख्या वस्तूंना असणारी अतिसंवेदनशीलता यांचा ताळमेळ ड्रॅक्युला किंवा व्हॅम्पायरच्या चित्रणांशी जवळजवळ तंतोतंत बसतो. त्यात लसणाच्या वासाला भिणारे ड्रॅक्युला आणि दुसर्या सामान्य व्यक्तीचा चावा घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे ड्रॅक्युलामध्ये रूपांतर होणे या साम्यामुळे ड्रॅक्युला दुसरे तिसरे कोणी नसून रेबीजचे रूग्ण असावेत असे मानायला वाव आहे. व्हॅम्पायर आणि ड्रॅक्युलाच्या कहाण्या प्रसिद्ध होण्याचा काळ आणि रेबीजच्या युरोपमधील संसर्गाच्या उपद्रवाचा काळ हाही जुळतो. विशेषत: हंगेरीमधील 1721 ते 28 या काळात हा उपद्रव मोठ्या प्रमाणात होता. डॉ.जुआन यांनी या संदर्भातील एक लेख मेडिकल जर्नल ऑफ न्युरॉलॉजीमध्ये 1998 मध्ये प्रसिद्ध केला आहे. त्याअगोदर 1985 मध्ये डेव्हिड डॉल्फिन नावाच्या जीवरसायनतज्ज्ञाने रक्ताच्या आजाराशी व्हॅम्पायरशी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. माणसाच्या अमरत्वाचा ध्यास, मृत्यूची भीती, मरणोत्तर जीवन आणि स्थानिक, व्यक्तिगत अनुभव यांच्या मिश्रणातून भुताची कल्पना समाजामध्ये पक्की होत गेली. एकदा घट्ट झालेली समजूत अगदी विज्ञान जगतातदेखील सहजासहजी टाकून दिली जात नाही. आणि भूत म्हणजे एका बाजूला भीती तर दुसर्या बाजूला जणू काही माणसाच्या चिरंतन अस्तित्वाचा पुरावाच! आत्मा-भूत या कल्पना जपण्यामागे स्वत:चे अस्तित्व कधीच संपणार नाही ही भावना जपण्याचा प्रयत्न जणू माणूस करत असतो.
-संजय सावरकर