Categories
उपक्रम

अंनिसतर्फे दोडी जत्रेत पशूबळी विरोधात लोकप्रबोधन

एप्रिल - २०१३

सिन्नर तालुक्यातील दोडी बु॥ ह्या गावी माघ पौर्णिमेला तेथील म्हाळोबा दैवताची जत्रा भरते. नवसपूर्ती व परंपरा म्हणून पशूबळी देण्याची येथे प्रथा आहे. अंनिसच्या सिन्नर व नाशिक शाखेतील कार्यकर्ते, मागील 13 वर्षांपासून येथील जत्रेत नवसापोटी उघड्यावर दिल्या जाणार्‍या पशूबळी आणि महिलंचा भररस्त्यात, उन्हातान्हात लोटांगण घालणे, दंडवत घालणे, गळ खेळणे अशा अनिष्ट प्रथांविरोधात प्रबोधन, सत्याग्रह करीत आले आहेत.

            दि.24 फेबु्रवारी 2013 रोजी वरीलप्रमाणे कार्यक्रम सकाळी 11 ते4 ह्या वेळात जत्रास्थळी घेण्यात आला. प्रबोधनात सामुदायिकपणे चळळीची गाणी म्हणण्यात आली. प्रबोधन सत्याग्रह कशासाठी, याचा, सविस्तर आशय स्पष्ट करणारी पत्रकं भाविकांना वाटण्यात आली. “मानाचा बोकड बळी दिल्याशिवाय कुणीही बोकड कापू नये, सदर मानाचा बोकड हा दुपारी चार नंतर बळी दिला जाईल”, असे फर्मान जत्रा कमिटीकडून लाऊडस्पीकरडून करण्यात आले. त्यामुळे रात्रीपासून तसेच सकाळी लवकर आलेले भाविक आपापले पशू सांभाळून होते. मात्र फर्मान झाल्यावर भाविकांचा तोल सुटला. परतण्याची घाई असल्याने लवकरात लवकर आपला नंबर लागावा म्हणून जो तो कत्तलखान्याबाहेर गर्दी करू लागला. उघड्यावर पशूहत्या होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा अंनिस कार्यकर्त्यांनी पोलिसांना विनंती केली की, “भाविकांना समजावून सांगून, पशूबळी हे बंदिस्त जागेतच व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. मात्र गर्दीचा तोल सुटून, उघड्यावर पशूबळी देण्यात आले. मात्र दरवर्षीच्या तुलनेत पशूबळी मोठ्या प्रमाणात घटल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले. यात्रा कमिटीने जर व्यवस्थित पूर्वनियोजन केले तर भाविकही कायद्याचे पालन करतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी पोलीस आणि कमिटीकडे केली. महिलांचे नवसपूर्तीचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले. या उपक्रमामध्ये डॉ.शिवराम हिरे, अरूण घोडेराव, विश्वनाथ शिरोळे, दिलीप गोसावी, देविदास गुजर, अशोक घरटे, शरद गोराणे, अंकीत गोराणे उपस्थित होते.

-डॉ. ठकसेन गोराणे, नाशिक