Categories
चिकित्सा

गळूनि जातसे धर्म

एप्रिल - २०१३

            विजयी अविर्भावात हात वर उंचावत कार्डिनल जोसेफ रॅत्झिंगर, सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या सज्जात प्रवेशले ते नवनियुक्त पोप ‘सोळावे बेनेडिक्ट’ म्हणून. तो दिवस होता 19 एप्रिल 2005.  म्हणजे या गोष्टीला आठ वर्षं झाली. रॅत्झिंगर यांची पोप व्हायची इच्छा होती. पोप झाल्याचा आनंद आणि अभिमान वाटे. पोपपदावरूनच मृत्यूला सामोरे जाण्याचा त्यांचा इरादाही होता. 11 फेब्रुवारी 2013 या दिवशी मात्र त्यांनी जाहीर केलं की वाढतं वय आणि प्रकृतीच्या कुरबुरी यामुळे पोप पदावर रहाणं त्यांना आता शक्य नाही. आपला बराचसा वेळ लेखन-वाचन करत घालवणार्‍या आणि एरवी पियानोच्या काळ्या-पांढर्‍या पट्ट्यांवरून किंवा आपल्या लाडक्या मांजराच्या पाठीवरून बोटं फिरवत आपला फावला वेळ घालवणार्‍या पोप बेनेडिक्टना असं झालं तरी काय? तेही अखंडपणे ‘सेवेसी सादर’ असणारे नोकर-चाकर आणि आर्चबिशप जॉर्ज गॅन्सवेनसारखा कर्तबगार स्वीय सचिव असताना?

            राजीनाम्याची बातमी जगजाहीर झाली आणि मग ‘अशक्तपणा’, ‘वाढता स्मृतीभ्रंश’, ‘गंभीर आजार’ असे शब्द चर्चमधल्या चर्चेतून ऐकू येऊ लागले. ‘ही तर साक्षात विनयशीलता’, ‘पवित्र कृती’ असे भावूक उद्गार उमटू लागले. पण त्यांचेच एक पूर्वसूरी पोप तेरावे लिओ हे एकशेदहा वर्षांपूर्वी मरण पावले तेव्हा 93 वर्षांचे होते. पोपशाहीतील या सर्वात वृद्ध पोपनाही वयोमानानुसार काही तक्रारी होत्याच! वयाच्या सत्त्यहत्तराव्या वर्षी पोपपद स्वीकारताना आपली कारकीर्दही प्रदीर्घ असणार याची जाणीव रॅत्झिंगरना होती. मग आता हा अचानक पदत्याग का? याआधी पोपनं ‘राजीनामा’ दिल्याच्या घटनेलाही 598 वर्षं झाली(बारावे ग्रेगरी 1415). पोपशाहीच्या इतिहासातल्या 265 पोपपैकी फक्त पाच पोपनी यापूर्वी राजीनामे दिले आहेत. रॅत्झिंगर हे राजीनामा देणारे सहावे पोप. एरवी पोपपदावर आरूढ झालेल्या सर्वांनीच आमरण ते पद भूषवलं आहे. मग आपल्या पोथीनिष्ठ आणि कर्मठ मतांबद्दल प्रसिद्ध असणार्‍या रॅत्झिंगरनी पोपपदासारखं सुखासीन काम सोडण्यामागचं खरं कारण काय?

धर्माची संस्था : एखादा धर्म जसा स्थिरावत जातो तसा तो व्यक्तीगत किंवा सामूहिक असा निव्वळ उपासनामार्ग रहात नाही. तो एकंदर समाजव्यवस्थेचा भाग बनतो आणि त्याला संस्थात्मक रूप प्राप्त होतं, त्यात उच्चनीचता निर्माण होते, आर्थिक व्यवहार येतात आणि सत्तालालसाही येते. जेव्हा धर्म हा एका मोठ्या लोकसमूहाचा श्रद्धाविषय बनतो तेव्हा ही संस्थात्मक व्यवस्थाच ईश्वरप्रणित आहे असं लोकांच्या मनावर ठसवलं जातं. मग मूळ धर्माची नीतीतत्वं रहातात बाजूला, आणि या व्यवस्थेचं समर्थन करणारी धर्मसत्ता आपल्या सर्वच व्यवहारांचं नैतिकदृष्ट्या समर्थन करू लागते. अपरिग्रह विसरला जाऊन मठांचे आणि देवस्थानांचे खाजगी खजिने निर्माण होतात. आर्थिक हितसंबंधांमधून राजकारण येतं, भ्रष्टाचार येतो. धर्माच्या नावाखाली दाबलेल्या लैंगिक प्रेरणाही कधीतरी उफाळून येतात आणि विकृत पद्धतीनं व्यक्त होतात.

            ख्रिश्चन धर्मसत्तेचा इतिहासही यापेक्षा वेगळा नाही, निष्कलंक तर नाहीच नाही. त्यांच्या धर्मगुरूंनीही कट-कारस्थानं केलीत, भ्रष्टाचार केलाय, युद्धखोरी केलीय आणि भानगडीही केल्यात. फार जुन्या इतिहासात जाऊया नको. पण गेली कित्येक वर्षं बालकांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक भ्रष्टाचार यांची कीड कॅथॉलिक चर्चला कुरतडते आहे. ख्रिश्चन धर्मसत्तेचं मध्यवर्ती व्यवस्थापन म्हणजे व्हॅटिकनमधील ‘क्युरिआ’. क्युरिआचे पदाधिकारी असणारे धर्मगरूही या भानगडींमध्ये आकंठ बुडालेले आहेत. क्युरिआचा ‘आळीमिळी गुपचिळी’ असा व्यवहार आणि सत्तालालसा यामुळे दोषी धर्मगुरूंवर आजवर कोणतीच कारवाई झालेली नाही, हेही तितकंच खरं आहे. क्युरिआचा व्याप तसा खूप मोठा आहे. 110 देशांतल्या 3000 पेक्षा जास्त बिशपांबरोबर त्यांचा संपर्क असतो. जगभरातील सुमारे सव्वा अब्ज कॅथॉलिक लोकांना धार्मिक मार्गदर्शन करणार्‍या हजारो धर्मगुरूंवर त्यांचे नियंत्रण असतं. बाहेरून व्हॅटिकनमध्ये जाणारी माहिती आणि मुख्य म्हणजे पैसा यांचा प्रवाह कल्पनातीत आहे. त्यामुळेच खात्या-खात्यांमधली स्पर्धा, व्यक्तींमधली सूडभावना, नागडी महत्वाकांक्षा, मागून कुरापती काढणं आणि कपटकारस्थानं यांची या ‘प्रभूच्या नगरी’त नेहमीचीच रेलचेल असते.

नैतिक रक्षणकर्ता?: चर्चच्या ‘नैतिक पावित्र्या’ची देखभाल करण्याची जबाबदारी पोप जॉन पॉल दुसरे यांनी 1981 साली रॅत्झिंगर यांच्याकडे सोपवली होती. ‘प्रिफेक्ट ऑफ दि सॅक्रेड काँग्रिकेशन फॉर दि डॉक्ट्रिन ऑफ द फेथ’ हे खास पद त्यासाठीच त्यांना देण्यात आलं. जगभरातले धर्मोपदेशक आणि धर्मगुरू अल्पवयीन किंवा पौगंडावस्थेतील मुलांचं लैंगिक शोषण करत होते. देशोदेशींच्या न्यायालयात याबद्दलचे खटले गाजत होते. या नैतिक-अध्यात्मिक अध:पतनाची चौकशी आणि सुधारणा यासाठी रॅत्झिंगर यांची नेमणूक झाली खरी, पण त्यांनी ‘तशा’ धर्मगुरूंना चक्क पाठीशी घातलं, या विकृत गुन्ह्याबद्दल साधी ताकीदही दिली नाही. हे कमी म्हणून की काय वारंवार तसे गुन्हे करण्याची सवय लागलेल्या भ्रष्ट लोकांना पूर्वीपेक्षा जास्त संख्या असणार्‍या मुलांच्या समूहावर नेमलं! जणू काही आणखी गुन्हे करण्यासाठी त्यांना मोकळीकच दिली! ‘नन’ म्हणून चर्चच्या सेवेत दाखल होणार्‍या तरूणींच्या लैंगिक शोषणाकडेही रॅत्झिंगर यांनी दुर्लक्षच केलं. ‘आफ्रिका आणि आशिया खंडतल्या देशांमध्ये एड्ससारख्या रोगाच्या झालेल्या फैलावापासून ख्रिस्ती धर्मोपदेशकांचं संरक्षण व्हावं यासाठी ‘नन्स’चा असा वापर झाला, तर तो आक्षेपार्ह मानता येणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली. अशा ‘नन्स’च्या लैंगिक शोषणाबद्दल इटालियन वृत्तपत्रांकडून झोड उठवली गेली, तेव्हा चर्चचे अंतर्गत चौकशी अहवाल रॅत्झिंगर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दडपून टाकले.

            सोळावे बेनेडिक्ट म्हणून पोपपद स्वीकारल्यानंतरही रॅत्झिंगर यांनी या भ्रष्ट यंत्रणेची साफसफाई केली नाही. कधीतरी आरोप झालेल्या धर्मगुरूविरूद्ध तक्रारीचा सूर काढायचा, कधी पीडित मुलांच्या पालकांची माफी मागायची एवढंच त्यांनी केलं. पारलौकिकाचं आमिष दाखवत बालकांना ऐहिक आयुष्यात मात्र आपल्या विकृतीच्या दलदलीत ढकलणार्‍या कोणत्याही गुन्हेगाराविरूद्ध कसलीही कारवाई रॅत्झिंगर यांनी केली नाही. त्यांच्या नन्स किंवा एकंदर स्त्रियांबद्दलच्या भूमिकेतसुद्धा काहीही बदल झाला नाही. घटस्फोट, पुनर्विवाह, धर्मापदेशक होण्याची संधी, संततीनियमन, गर्भपाताचा अधिकार अशा मुद्यांवर रॅत्झिंगर यांची भूमिका पुराणमतवादीच राहिली. एकीकडे स्त्रीला पारंपारिक धर्मव्यवस्थेतून बाहेर न येऊ देणं आणि दुसरीकडे धर्म ज्याचा ‘पाखंड’ म्हणून धिक्कार करतो, त्या पुरूष धर्मगुरूंमधल्या समलिंगी संबंधांना पाठीशी घालणं अशी विसंगत भूमिका त्यांनी कायम ठेवली. म्हणूनच इटालियन साप्ताहिक ‘पॅनोरामा’ ज्याचा ‘गे लॉबी’ असा उल्लेख करते त्या समलिंगी व्यवहार करणार्‍या धर्मगुरूंच्या ‘क्युरिआ’ मधल्या वर्चस्वाला रॅत्झिंगर यांचा पाठींबा होता की काय असा संशय व्यक्त केला जातो.

स्त्रीसंग टाळण्यासाठी : जगातील बहुतेक धर्म हे पुरूषांनी निर्मिलेले आणि पुरूषप्रधान आहेत. ते स्त्रीला अध्यात्ममार्गातील अडचण, पापाचं उगमस्थान किंवा स्खलनाचं कारण समजतात. त्यामुळे बहुतेक धर्मांमध्ये ब्रम्हचर्याला किंवा संन्यासाला फार महत्व आहे. धर्मानं कितीही दडपल्या तरी मूलभूत नैसर्गिक प्रेरणा आपलं काम करत असतातच. त्यातून उफाळणार्‍या कामभावनेला एरवी मिळणारा नैसर्गिक आणि समाजमान्य निचरा नाकारल्यामुळे मग लैंगिक विकृती जोपासल्या जातात. कॅथॉलिक शिकवणीनं प्रेरित झालेल्या व्हॅटिकनमधल्या किंवा जगात इतरत्र असणार्‍या काही धर्मगुरूंनी यातून समलिंगी संबंधांचा स्वीकार केलाय. काही गुप्त बार, सॉना आणि ‘सुरक्षित घर’ इथं त्यांचा वावर असतो. आणि अर्थातच वर उल्लेख केल्याप्रमाणे काहींना बालकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. महत्वाचं म्हणजे हे एकीकडे छुपेपणानं तर एकीकडे राजरोस चालतं. म्हणजे कसं? धर्मगुरूंकडून बालकांचं लैंगिक शोषण होतं. या आरोपाला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रसंघात ‘व्हॅटिकनचे कायमचे निरीक्षक’ असणारे आर्चबिशप सिल्व्हॅनो तोमासी यांनी कशी मखलाशी केली ते पहा. सप्टेंबर 2009 मध्ये जिनेव्हा येथील मानवी हक्क परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “लैंगिक छळ करणार्‍यांना धर्मगुरूंपैकी 80 ते 90 टक्के लोक 11 ते 17 वयोगटातील मुलांशी समलिंगी संबंध ठेवतात, लहान बालकांशी नव्हे!” हे त्यांचं निवेदन संपूर्ण सत्य आहे असं मानलं, तरीही पौगंडावस्थेतील मुलांवर अत्याचार होतात हे चर्चनं अधिकृतपणे मान्य केलं, असाच त्याचा अर्थ होतो. यावर उठलेल्या वादळाची कल्पनाच केलेली बरी. काहीतरी ठोस केलं असं दिसायला हवं होतं. तेव्हा मार्च 2010 मध्ये सेंट पीटर्स बॅसिलिकामधील क्वायरमधल्या 29 वर्षांच्या थॉमस एहिएम या गायकाला तो पुरूष वेश्या पुरवत असल्याच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलं. या गायकाचा एक ग्राहक एन्जेलो बाल्दुची हा खुद्द पोपमहाशयांचा खिदमतगार होता. आपल्याला नेमके कोणत्या प्रकारचे मुलगे आवडतात, याचे तपशील बाल्दुची देताना त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. धार्मिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना यासाठी ‘वापरलं’ जातं असं तेव्हा लक्षात आलं.

            “गिअ‍ॅलुइगी नुझी या इटालियन पत्रकारानं पोप बेनेडिक्टच्या गुप्त कागदपत्रांविषयी Sua Sintita. Le Carte segrete di Benedetto XVI (म्हणजे His Holiness : The Secret Papers of Benedict XVI) हे पुस्तक प्रसिद्ध केलंय.” त्यानुसार या कामपिसाट धर्मगुरूंची भूक शमवण्यासाठी एक यंत्रणाच कार्यरत आहे. असणारच! त्यातल्या दलालांना पैशांची हाव सुटली नाही तरच नवल. ‘अतिविशिष्ट’ व्यक्तींना पुरवत असलेल्या ‘असल्या खास सेवां’चा ते जरा जास्त मोबदलाही मागणार. ही मागणी पुरवण्यासाठी धर्मगुरू व्हॅटिकनमधला पैसा वापरतात, बँकांमध्ये संशयास्पद खाती ठेवतात असं लक्षात आलंय. व्हॅटिकन बँक यात जाणीवपूर्वक सहभागी आहे असं नव्हे. पण गेल्या जानेवारीपासून इटलीतल्या मध्यवर्ती बँकेनं ‘पैशाचा स्त्रोत कळत नसल्याचं’ कारण देऊन व्हॅटिकनमधल्या ‘क्रेडिट कार्ड’च्या वापरावर बंदी घातली आहे. अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण ऐंशीच्या दशकापासूनच ‘माफिया’ आणि ‘अंडरवर्ल्ड’चे व्हॅटिकन बँकेशी संबंध आहेत असे म्हणतात. अशा या बँकेचं नाव Istituto per Le Opere di Religione असं आहे- म्हणजे ‘धर्मकृत्यांसाठीची संस्था’ 1971 ते 1989 या काळात आर्चबिशप पॉल मर्सिंकस हे या बँकेचे अध्यक्ष होते. या काळात बरीच आर्थिक गोलमाल झाली. एक घोटाळा निस्तरण्यासाठी तर इटली सरकारकडे 25 कोटी डॉलर्स एवढा दंड भरावा लागला. यासाठी मर्सिंकसनी व्हॅटिकन पेन्शन फंडातले पैसे वापरले आणि हे पत्रकारांसमोर कबूल करताना त्यांना जराही खंत वाटत नव्हती. गेल्या वर्षीही अर्थांतरण आणि संशयास्पद बँक खाती यामुळे ‘धर्मकृत्यां’साठीची ही संस्था आर्थिक घोटाळ्यात अडकली आणि याबद्दलची चौकशी अजूनही संपलेली नाही.

व्हॅटिलीक घोटाळा : हे सगळं रॅत्झिंगर यांना माहीत नसेल असं वाटत नाही. पण झालं असं की, जानेवारी 2012 मध्ये इटलीतील एका टी.व्ही.कार्यक्रमात व्हॅटिकनमधल्या भ्रष्ट व्यवस्थेचा काही तपशील प्रथमच सांगितला गेला. यानंतर पाठोपाठ तिथलं अर्थकारण आणि सत्ताकारण कसं भ्रष्टाचारानं बुजबुजलंय याच्या कथा ‘लीक’ होऊ लागल्या. सेक्स रॅकेट आणि पैशांच्या अफरातफरीच्या बातम्या इटालियन साप्ताहिक ‘पॅनोरामा’ पर्यंत पोचल्या होत्या. पाठोपाठ ‘ला रिपब्लिका’ या दैनिकानं हे प्रकरण लावून धरलं. या ‘गळती’ची चौकशी करण्यासाठी आणि क्युरिआची सद्यस्थिती तपासण्यासाठी मार्च 2012 मध्ये रॅत्झिंगर यांनी तीन उच्च दर्जाच्या कार्डिनलचा आयोग नेमला. या चौकशीत पोपचा बटलर पाओले गॅब्रिएले हाच गुप्त कागदपत्रं ‘लीक’ करत होता असं शाबीत झालं. 17 डिसेंबर 2012 ला 300 पानांचा दोन खंडातील अहवाल पोपमहाशयांना सादर करण्यात आला. व्हॅटिकनमधील अधिकारीवर्गाकडून बालकांचं लैंगिक शोषण चालू आहे असं त्यात नमूद केलं होतं. यालाच उद्देशून बेनेडिक्टनी ‘फिल्थ’(घाण) असा शब्द वापरला. हा अहवाल सादर झाला त्याचवेळी जर्मनीतील धर्मगुरूंकडून चालू असलेल्या बालकांच्या लैंगिक छळवणुकीची ताजी बातमी पुढे आली. याच दरम्यान लॉस एन्जेलीसने कार्डिनल रॉजर मॅहोनी आणि आयर्लंडचे कार्डिनल सीन ब्रॅडी यांच्यावर बालकांचा लैंगिक छळ दडवत असल्याचा आरोप झाला. पोपमहाशय चांगलेच कोंडीत सापडले.

            या वरचा एकमेव उपाय म्हणजे अनिर्बंध सत्तेमुळे अनिर्बंध भ्रष्ट झालेल्या क्युरिआची संपूर्ण पुनर्रचना करणं. पण ती करायची तर पहिल्या क्युरिआचं विसर्जन करायला हवं. व्हॅटिकनच्या नियमांनुसार क्युरिआची नवीन नियुक्ती जेव्हा नवा पोप निवडला जातो तेव्हाच होते. म्हणजे यासाठी रॅत्झिंगर यांच्या नैसर्गिक मृत्यूची वाट पहायला हवी. रॅत्झिंगर यांना या सगळ्याची पूर्ण कल्पना होती आणि क्युरिआच्या ‘साफसफाई’ची निकडही त्यांना कळत होती. तेव्हा ‘कॅनन लॉ’मध्ये असणारा राजीनाम्याचा पर्याय हाच एकमेव मार्ग शिल्लक उरला. त्यानुसार 28 फेबु्रवारीला सोळावे बेनेडिक्ट पोपपदावरून पायउतार झाले आणि नव्या पोपच्या निवडीचा आणि पर्यायानं क्यरिआच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा झाला.

            13 मार्चला अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बर्गोलिओ ‘फ्रान्सिस’ हे नाव घेऊन पोपपदावर आरूढ झाले आहेत. क्युरिआच्या साफसफाईचं काम, कॅथॉलिक चर्चचा युरोपमध्ये कमी होत चाललेला प्रभाव अशी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत. समलिंगी संबंधांच्या ‘पाखंडा’वर इलाज करता-करता लैंगिक नैतिकतेबद्दलची सनातनी मूल्यप्रणाली रूजवली जाण्याची शक्यता आहे. बदलत्या काळाच्या पाऊलखुणा बघता, एकतर कडवा धर्म पुनर्स्थापित होईल नाहीतर टोकाचे मतभेद होऊन चर्चचे तुकडे पडतील, अशीच चिन्हं दिसत आहेत….

-डॉ. आशुतोष मुळ्ये