27 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्ली येथे उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती महामहीम हामीद अन्सारी यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मराठीतली तिमीरातून तेजाकडे या पुस्तकाच्या हिंदी अनुवाद आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळेस यंदाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ नामवर सिंग, हिंदी अनुवाद आवृत्तीचे संपादक डॉ सुनीलकुमार लवटे, मअंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमातील मा. उपराष्ट्रपती यांचे भाषण खास अंनिवा वाचकांसाठी देत आहोत…!
मित्रांनो,
20 ऑगस्ट 2013 हा दिवस काळा दिवस म्हणून आपल्या इतिहासात स्मरणात राहील कारण त्या दिवशी अशा एका व्यक्तीची (डॉ. नरेंद्र दाभोलकर) हत्या झाली ज्याने कधी कुणाचे नुकसान केले नाही, परंतु या समाजात अशी गोष्ट पोहचविण्याचा प्रयत्न केला की जसा प्रकाश वाढत जाईल तसा अंधश्रद्धेचा अंधार कमी होत जाईल. त्यांनी मनातील अंधार कमी करण्यासाठी प्रयत्न केला आणि लोकांना सांगीतले की त्याची आवश्यकता का आहे.
आपल्या देशाला मोठमोठे महापुरुष, ऋषी-मुनी, तत्वज्ञ, गणिती यांची समृद्ध इतिहासाची परंपरा असतांना सुद्धा, आपल्या देशात एक अजब गोष्ट (प्रश्न) आहे की, जनतेला विवेकाधिष्ठीत विचारांच्या शिकवणीची गरज काय आहे. विवेकाधिष्ठीत विचारसरणीमध्ये कोठल्याही धर्माचा आणि कोठल्याही तत्वज्ञानाचा प्रचार नाही. गणितामध्ये ज्याप्रमाणे गणिताच्या नियमानुसार
2 + 2 = 4 होतात आणि 10 – 5 = 5 होतात, त्याचप्रमाणे तो नियम कोणत्याही वेळेवर कोणत्याही विषयावर उपयोगात आणल्यास विवेकाधिष्ठीत विचारसरणी वाढण्यास मदत होईल एवढीच गोष्ट त्यांनी (डॉ. दाभोलकर) सांगीतली होती, आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात काही लोक गेले होते.
आपल्या देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे की जर मनुष्याने तर्कशुद्ध विवेकाने विचार केला तर त्याला कोणाचा विरोध करण्याची काय आवश्यकता? आणि विरोधही किती तर एखाद्या व्यक्तीची हत्या करणे, ही तर विचार करण्यासारखी बाब गंभीर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारीत होणे ही बाब त्यांनी आपल्या आयुष्यात एखाद्या झेंड्याप्रमाणे रोवून ठेवली होती. वर्षानुवर्षे डॉ. दाभोलकर त्यासाठी प्रयत्नरत होते आणि विधेयक पारीत होत नव्हते. परंतु त्यांच्या हत्येनंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने त्याबाबत अध्यादेश पारीत केला. मी याकडे अशा दृष्टीने बघतो की सध्या सगळीकडे देशाच्या प्रगतीच्या आवश्यकतेबद्दल चर्चा होत आहेत आणि विकास सुद्धा होत आहे. एकीकडे भौतीक प्रगती होत आहे, नवनवीन वैज्ञानीक उपकरणे येत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन उद्योगद्धे येत आहेत, जे एक चांगले लक्षण आहे, परंतु आपली विचारसरणी ही नेमकी उलट्या दिशेने वाटचाल करीत आहे.
आपली विचारसरणी नव्या दुनियेच्या आणि नवीन तंत्रज्ञानाच्या एकदम विरोधी आहे. आणि जर हे असेच राहिले तर आपण कोणत्याही वेळेस त्या ठिकाणी पोहचू जेथे तंत्रज्ञान आपल्याला एकीकडे खेचे आणि आपली विचारसरणी एकीकडे…. त्यामुळे ताणतणावात प्रचंड वाढ होऊन गंभीर प्रश्न आपणापुढे निर्माण होतील. डॉ. दाभोलकरांनी हीच बाब आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे नेमके काय.
आपण आपला इतिहास तपासून बघीतला तरी आपल्या लक्षात येईन की जी बाब सामान्य माणसाच्या लक्षात आली नाही तिला आपण अंधश्रद्धा म्हणून संबोधले. पण जसे ती लक्षात आली तिला आपण अंधश्रद्धेमधून काढून विज्ञान म्हणून संबोधत गेलो. अंधश्रद्धा फक्त त्याच बाबींसाठी वाढत गेली कारण आपण एकतर विचार केला नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जर आपण दोन्ही न करता आपल्याला कोणी समजून सांगत असेल की विचार करा आणि त्यावरील उत्तर शोधा तर त्यामध्ये वाईट ते काय?
मी ‘ब्लॅक‘ या शब्दाचा वापर करण्यास अनुत्सुक असतो, कारण ऐतिहासीक परंपरेत जी गोष्ट वाईट तिला ‘ब्लॅक‘ म्हणून संबांधले जाते. परंतु आमच्या मित्राच्या शब्दकोशामध्ये ‘ब्लॅक मॅजीक‘ आले आणि तो म्हणायचा ‘व्हाईट मॅजीक‘ चांगली असून ‘ब्लॅक मॅजीक‘ अत्यंत धोकेदायक गोष्ट आहे. आणि आता यलो मॅजीक, ग्रीन मॅजीक, पिंक मॅजीक काय आहे फ आपल्याला माहीत नाही. परंतु या मॅजीकची गरजच काय फ ईश्वराने आपल्याला बुद्धी आणि विचार करण्याची पद्धत दिली आहे परंतु जर बुद्धीचा उपयोग केला नाही तर त्याला गंज लागून आपली विचार करण्याची क्षमताच बंद होऊन जाईल आणि आपण हेच म्हणू की साहेब, ते ‘ब्लॅक मॅजीक‘ मुळे झाले आणि ग्रीन मॅजीक मुळे हे होत आहे.
माझ्या मते भारतातील संपूर्ण भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीचा अवलंब करुन हे पुस्तक भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोचले पाहिजे. कारण विचार तेथेच जन्माला येतात आणि वाढतात. जो मुलगा / मुलगी डॉक्टर /इंजीनियर होतो, ते शाळेनंतर आणि शाळेबाहेर पडल्यानंतर त्यांना विचार करायला वेळ फार कमी शिल्लक असतो. तेव्हापर्यंत तो आपल्या व्यवसायाबद्दल विचार करायला लागतो… चांगला अभियंता अथवा चांगला डॉक्टर कसा होईन याबद्दलच तो विचार करीत असतो. त्यामुळे वयाच्या 15-18 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना ही बाब समजावली तर ती निश्चीतच उपयोगी राहील. नव्या पिढीला विवेकाधीष्ठीत तर्कसंगत विचारसरणी हीच समाजाला भविष्यात वाचवणार आहे आणि जर तुम्ही असा विचार केला नाही तर तुमची वाटचाल निश्चितच अनर्थाकडे जाईल.
आज जेव्हा आपण डॉ दाभोलकरांना स्मरतो, तेव्हा फक्त त्यांची आठवणच करीत नाही तर त्यांना आपण धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला जो रस्ता दाखवला आहे त्यावरुन आम्ही मार्गक्रमण तर करुच परंतु जाता जाता त्यांनी आपणा सर्वांवर एक जबाबदारी सुद्धा दिली आहे की एक व्यक्तीने दहा व्यक्तींसाठी काम करावे. एक संघटना म्हणून ही जबाबदारी समाजात पसरवावी आणि महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायदा हा राष्ट्रीय स्तरावरील कायदा बनला पाहिजे. जर आपण बाहेरील जगात सांगीतले की अशा कायद्याची 21 व्या शतकात आवश्यकता आहे… तर लोक आपल्याला हसतील आणि कदाचित म्हणतील .. भारत स्वतःला 10-20 हजार वर्षांची परंपरा आणि संस्कृती आहे.. जी बाब खुप वर्षांपूर्वी जगाच्या प्रत्येक देशात पसरली होती.. मग ते चिनी संस्कृती असो अथवा ग्रीस संस्कृती अथवा मेक्सीकन संस्कृती.. मग आज ती भारतात सांगण्याची काय गरज आणि त्याला विरोध का होत आहे!
तर आपल्याला आपल्याच अंतरंगात बघण्याची आज गरज आहे? एक गोष्ट तर नक्कीच आहे की एक प्रवाह नक्की आहे. हे स्पष्ट आहे की एकीकडे आपण अवकाशात पोचत आहोत आणि दुसरीकडे आपला प्रवास उलट्या दिशेने झेप घेत आहे.
मला आनंद होतो की आपण सर्व विवेकाधिष्ठीत समाज निर्मीतीच्या दृष्टीने प्रयत्नरत आहात आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण आपल्या कार्यात यशस्वी व्हाल.
शब्दांकन : मिनाक्षी सुधीर निंबाळकर, ठाणे.
(मो. 9004343412)