Categories
कव्हर स्टोरी

‘तिमिरातुनी तेजाकडे’चा हिंदी प्रवास

एप्रिल - २०१५

डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी झाली. सारा देश एका विलक्षण हादरलेपणातून जात होता. तत्कालीन महाराष्ट्र शासन लोकक्षोभाला सामोरे जात होतं. खुन्यांचा सुगावा लागत नसल्यानं आपत्कालीन राजकीय भूकंपातून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वटहुकूम काढून ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम’ अंमलात आणला. पुढे विधानसभेत तो मंजूर होऊन कायदा झाला. या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खुनाच्या तपासाचा आग्रह एकीकडे लावून धरत होती. त्याचा परिणाम पुढे असा झाला की, या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्युरो(सीबीआय)कडे सोपवला. दुसरीकडे महाराष्ट्रात मंजूर झालेला कायदा हे समितीच्या दोन दशकांच्या सातत्यपूर्ण चळवळीचं यश होतं. खरं पण त्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारखा मोहरा खर्ची घालावा लागल्याचं शल्य सर्वांच्या मनात होतं. त्या धामधुमीच्या काळात राष्ट्रीय स्तरावर हा विचार, चळवळ, हत्या या अनुषंगाने लोकसभा, राज्यसभा, केंद्रशासन यांना खासदार, मंत्री, अधिकारी, माध्यमे यांना दिली जाणारी निवेदने, पत्रकार परिषदांच्या प्रेसनोटस् हिंदीत असण्याच्या गरजेतून समितीकडून येईल ते साहित्य मी हिंदीत भाषांतरीत करून अविनाश पाटील, डॉ.हमीद दाभोलकर यांना पाठवत राहिलो. त्यामुळे कळीचा राष्ट्रीय मुद्दा बनवणं शक्य झालं. त्यावेळी राज्यसभेची डॉ.नरेंद्र दाभोलकरांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली हा हिंदी भाषांतराचाच परिणाम होता, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. सर्व माध्यमांना ही यातून चळवळीचं महत्व अधोरेखित झालं.

अशाच एका प्रयत्नात मी माझ्या दिल्लीस्थित हिंदी प्रकाशकांशी बोलताना डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा, कार्याचा आणि साहित्याचा संदर्भ आला नि आम्ही बराच वेळ अंधश्रद्धा निर्मूलन कार्याविषयी बोलत राहिलो. हे प्रकाशक होते अशोक माहेश्वरी. त्यांची प्रकाशन संस्था म्हणजे हिंदी साहित्यातील जगातील सर्वश्रेष्ठ प्रकाशन समूह. राजकमल, राधाकृष्ण, लोकभारती, बन्यान ही अशा दिग्गज प्रकाशनांचा समूह. नवी दिल्ली, आलाहाबाद, पाटणा, कलकत्ता, मुंबई इथं शाखा. ते म्हणाले, ‘लवटेजी ऐसा कार्य भारतवर्ष में नही है।, क्यों नही आप उसे हिंदी में लाते?’ मी म्हटलं, ‘अनुवाद होगा, प्रकाशित कौन करेगा?’ तर माहेश्वरी उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘फिर हमारा प्रकाशन किस काम का?’ या संवादाने ‘तिमिरातुनी तेजाकडे’च्या हिंदी भाषांतराचं बीजारोपण झालं.

नंतर मी काही कामानिमित्त डॉ.हमीद दाभोलकर, अविनाश पाटील यांच्याशी बोलताना वरील संवाद सांगितला, तेव्हा त्यांना विलक्षण आनंद झाला. अविनाश दोनच दिवसांनी सहपरिवार कोल्हापूरला येणार होता. येताना तो चक्क डॉ.शैलाताईंचं अनुवादास परवानगी देणारं पत्रच घेऊन आला. मी म्हटलं, ‘डॉक्टरांच्या पहिल्या स्मृतिदिनी मी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ पुस्तक भाषांतरीत करून देईन!’ तो माझ्याकडे पहातच राहिला….. क्या बात है म्हणत त्यानं टाळी दिली पण दुसर्‍याच क्षणी माझ्या लक्षात आलं की, हे पुस्तक भाषांतरीत करणं खायचं काम नाही…. ते शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. मी वि.स.खांडेकरांच्या अवघड रूपक कथा हिंदीत आणल्या होत्या. पण हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचं सिद्धांतन होतं, तशी ती कार्य, शौर्य गाथाही! अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचं तत्वज्ञान प्रतिबिंबीत करणारं हे पुस्तक हिंदीत येणं म्हणजे हे कार्य, विचार, सिद्धांत जगभर पोहोचणंच होतं.

डॉ.शैला दाभोलकर यांच्या भाषांतर परवानगी पत्रावर तारीख आहे, 26 जानेवारी 2014. ही भारताच्या ‘प्रबोधनात्मक प्रजासत्ताका’ची पहाट होती. फेबु्रवारीच्या आरंभी पत्र माझ्या हाती होतं. पुस्तक पाचशे पानांचं. हातात महिनेही पाच-सहाच. भाषांतर करायचं म्हणून मी ठिय्या मारून पुस्तक परत एकदा वाचलं अन् माझ्या लक्षात आलं की, मी एकटा करत राहिलो तर वर्ष लागेल. मी भाषांतरात तरबेज असणार्‍या माझ्या विद्यार्थी-प्राध्यापकांशी बोललो. डॉ.गिरीश काशिद, त्यांंची पत्नी डॉ.चंदा सोनकर, प्रा.प्रकाश कांबळे, डॉ.विजय शिंदे यांच्याशी मी माझा संकल्प व विवंचना दोन्ही शेअर केली. सर्वांनी मदतीचा सढळ हात पुढे केला. तिघांनी पुस्तकाचे तीन भाग भाषांतरीत करायचे. तीन भाषांतरं स्वतंत्र होणार. तेव्हा मी तिन्ही भाषांतरं संपादित करायची व त्यांना एकरूप द्यायचं ठरलं. माझे हे विद्यार्थी, सहकारी, प्राध्यापक माझ्यापेक्षा अधिक बांधील, प्रतिबद्ध निघाले. आम्ही सर्व एकमेकांशी बोलत राहिलो. समान शब्द, संज्ञा, संकल्पना निश्चित करून त्यांचे समान हिंदी पर्यायाची शब्द ठरवले. त्यामुळे अनुवादात एकात्मता येणं शक्य झालं. शिवाय सर्व अनुवाद्यांना मी पूर्ण पुस्तक वाचायचा आग्रह धरला. ‘विचार’, ‘आचार’, आणि ‘सिद्धांत’ असे तीन स्वतंत्र भाग असले तरी प्रत्येक भाग परस्परपूरक होता. यातून विचार, संकल्पना स्पष्ट होण्यास मोठी मदत झाली. हे पुस्तक तात्विक, वैज्ञानिक, प्रमाण भाषिक शब्द, सिद्धांत, संकल्पना, मानसशास्त्र, अध्यात्मिक, देव, धर्म, दैव, चमत्कार, बुवाबाजी असं बहुअवधानी होतं. त्यामुळे भाषांतर कसरत होती नि कलाकुसरपण! परंतु सर्व भाषांतरकारांनी त्यांच्या कमाल कौशल्य, वेळ पणाला लावून आपापले भाग वेळेत भाषांतरीत करून दिले. त्यांचे हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य प्रसारार्थ दिलेले योगदान, सहकार्य, कष्ट यांना आभार, कृतज्ञता शब्दही तोकडे ठरणारे होते.

आता बॉल माझ्या कोर्टात होता आणि संपादक म्हणून आता माझी अग्नीपरिक्षा होती. मी तिघांची भाषांतरे शब्दश: वाचली. दुरूस्त्या केल्या. मग टाईप करून घेतले. तीन वेळा प्रुफे तपासली. दुरूस्त्या केल्या. या कामात टंकलेखक……… व प्रा.प्रकाश कांबळे यांनी मोठी मेहनत घेतली. त्याच्या कष्टाला तोड नाही. हे सारं करून आम्ही 15 ऑगस्ट 2014 रोजीच भाषांतराचा अंतिम मसुदा व मुद्रणपूर्व प्रत तयार करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राजकमल प्रकाशन समूहन, नवी दिल्ली यांना 18 ऑगस्ट 2014 ला संकल्प केल्याप्रमाणे भाषांतर प्रकाशनार्थ सादर करू शकलो. ती आम्हा सर्वांची सश्रद्ध आणि सक्रीय आदरांजलीच होती.

भाषांतर पूर्ण होत आलं होतं. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीस संकल्प सिद्धीची सुवार्ता कळवली. समिती कार्यकर्तेडॉ.शैलाताई, डॉ.हमीद, मुक्ता सार्‍यांना विलक्षण आनंद झाल्याचं मी अनुभवत होतो. समितीनी भाषांतरकारांना, संपादकांना मानधन देण्याचं ठरवून मला कळवलं. मी कार्यकर्ता असल्यानं ते नाकारणं यात काही विशेष नव्हतं. पण माझ्या भाषांतरकार विद्यार्थी, सहकारी प्राध्यापकांनीपण ते नाकारलं. अगदी उत्स्फूर्तपणे आणि जाणीवपूर्वक! मी त्यांना लिहिलेलं पत्र मुद्दामच इथे देत आहे.

प्रिय विजय, चंदा नि प्रकाश,

स्नेह स्मरण!

तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे ते मला कळत नाही. डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर त्यांचे कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीने जे अनेक प्रयत्न करण्याचे ठरले होते. त्यात त्यांचा विचार देशभर पसरवण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या स्मृतिदिनापूर्वी त्यांचे मूलभूत पुस्तक ‘तिमिरातून तेजाकडे’ चा हिंदी अनुवाद करावा असे ठरले. तुमच्या जोरावर मी ती जबाबदारी माझ्या शिरावर घेतली. ती घेतली तेव्हा मी तुम्हाला विचारले पण नव्हते. पण तुम्ही माझ्यासमोर होता.

केवळ तुमच्या निष्ठेवर आपण हा प्रकल्प पूर्ण करू शकलो. मला या गोष्टीचा विशेष आनंद वाटला की, तुम्ही तिघांनी एकत्र येऊन ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले मानधन एकमुखी नम्रतेने नाकारले. यातून तुमची सामाजिक बांधिलकी व कृतज्ञता स्पष्ट झाली. तुम्हाला मी माझे विद्यार्थी मानतो याचा सार्थ अभिमान वाटला.

तुम्ही केलेला अनुवाद मी शब्दश: वाचला. त्यातील सुधारणा तुम्हाला कळाव्यात म्हणून मूळ प्रत पाठवत आहे. संपादनात आपण मूळ मजकुरात काही ठिकाणी द्विरूक्ती असूनही ती तशीच ठेवली. कारण तिथल्या विश्लेषणात मग अपुरेपण आले असते.

अंतिम मसुद्याची प्रतही सोबत पाठवत आहे. प्रकाशनाधीन मजकूर कळावा म्हणून प्रकाशन बहुधा पुढील महिन्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत होण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी मिळून जायचे आहे. प्रकाशन राजकमल करेल.

बाकी सर्व ठीक पुन्हा एकदा तुमचे ऋण!

आपला स्नेहाकांक्षी

सुनील लवटे

मग वेध लागले छपाई, प्रकाशनाचे. राजकमल प्रकाशन समुहाचे संपादक सत्यानंद निरूपम यांनी पुस्तक वाचले. लगेच फोन आला. ‘बढिया! हम तीन खंड अलग अलग छापेंगे ताकि ज्यादा से ज्यादा लोगों तक ये विचार पहुँच पायेंगे।’ पुस्तक एकत्र छापलं असतं तर त्याची किंमत रू.500 च्या घरात गेली असती. सामान्य माणूस कसा घेणार. तो हप्त्याहप्त्यानं घेईल आणि वाचेल डॉ.दाभोलकरांच्या विचार, व्यवहाराशी हे सुसंगतच होतं. टाईम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक दिलीप पाडगावकरांच्या मार्फत उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अंसारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्वरीत निमंत्रण स्वीकारलं. तो राज्यसभा सभापतीपद भूषवत असतानाच्या काळातच डॉ.दाभोलकरांच्या श्रद्धांजलीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यांची तारीख निश्चित झाली. 27 फेबु्रवारी 2015 मराठी भाषा दिन दिल्लीत असा साजरा होणार होता. दरम्यान दिल्लीत विश्व पुस्तक मेळा भरलेला. याच काळात प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे लिखीत ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ नाटक दिल्लीत करायचं ठरलं. मी एका रात्रीत ते भाषांतरीत केलं. इस्लामपूरच्या कार्यकर्त्यांनी आठवडाभरात नाटक बसवलं ही. अतुल पेठेंनी दिग्दर्शित केलेलं हे रिंगणनाट्य. दिल्लीत पहिला प्रयोग सुरू होणार होता खालसा कॉलेजात. माझा फोन वाजला…. तिकडून विचारणा, ‘तुम्ही असाल तिथून निघून या… कॉम्रेड पानसरे व उमावहिनींवर गोळ्या झाडण्यात आल्यात….. आधार हॉस्पिटलमध्ये या.’ मी जाणं शक्य नव्हतं. दिल्लीत चार दिवस नाटकांचे प्रयोग, विश्व पुस्तक मेळ्यात ‘अंधविश्वास उन्मूलन : विचार, आचार और सिद्धांत’ पुस्तकावर भाषण असे कार्यक्रम ठरलेले. आम्ही प्रत्येक वेळी कॉम्रेड पानसरे गोळीबाराचा निषेध करून कार्यक्रम सादर केले. पुस्तक प्रकाशनादिवशी उपराष्ट्रपती हमीद अंसारींनी शिष्टाचार बाजूला सारत, लिखीत भाषण बाजूला ठेवून डॉ. दाभोलकर हत्या दिन ‘ब्लॅक डे’ म्हणून घोषित केला आणि ‘नरबळी, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा’ राष्ट्रीय पातळीवर करावा असं आवाहन केलं. मला वाटतं हिंदी भाषांतराची यापेक्षा दुसरी सार्थकता ती काय असणार?

 डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क : 9881250093